४७
गांधीजींपासून जे जे गुण आपल्यापैकी प्रत्येकाने उचलले पाहिजेत त्यांपैकी एक म्हणजे काटकसर. गांधीजी आपल्या नित्याच्या जीवनात काटकसरीवर फार कटाक्ष ठेवीत असत. कोणतीही वस्तू गरजेपेक्षा अधिक वापरणे म्हणजे ते गुन्हा समजत असत. आपल्याला गरज आहे त्यापेक्षा कोणतीही वस्तू अधिक वापरणे, म्हणजे दुस-याला ती न वापरू देणे, म्हणजेच चोरी करणे.
गांधीजी सेवाग्रामला होते तेव्हाची गोष्ट आहे. त्यांच्या आश्रमात अनेक पाहुणे- कोणी भेटायला, कोणी मुलाखती घ्यायला, कोणी चर्चा करायला- येत असत. गांधीजींना काही लिहून द्यायचे झाले, किंवा कोणाला चिठ्ठीचपाटी पाठवायची झाली तर त्यांना बारीकसारीक कागद लागत. अशा वेळी कागद न घेता ते फुकट गेलेले कागदाचे तुकडे वापरीत असत.
सरकारी पत्रके येत. त्यांच्या चारी बाजूंना भरपूर जागा सोडलेली असे. बाजूचे हे कोरे कागदाचे कपटे कापून गांधीजी वापरीत असत.
एकदा बरीच आश्रमवासी मंडळी होती. गांधीजींनी समोर पडलेली कात्री घेतली नि त्यांनी कोरे कपटे कापून घ्यायला सुरुवात केली. पण त्यांना हे काम नीटसे जमेना. जवळच बसलेला एक आश्रमवासी म्हणाला : ‘बापू, आणा ती कात्री इकडे. तुम्हांला नाही ते काम जमत. मला सवय आहे.’
गांधीजी म्हणाले : ‘नाही जमत म्हणजे काय? प्रयत्न करणं तर माझ्या हाती आहे.’ आणि गांधीजींनी काम पुढे सुरू केले. काही केल्या त्यांना व्यवस्थित कापता येईना. पण त्यांनी धडपडत का होईना काम पुरे केले.
काम तितकेसे साधले नाही, पण पूर्ण तर झालेच.
बापूजी काही बाबतीत फार हट्टी होते, अमुक एक गोष्ट येत नाही हे त्यांना खपत नसे. काम उत्तम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे ते समजत.