६३
सरदार वल्ल्भभाईंना गांधीजींविषयी अपार भक्तिप्रेम. १९३५ मध्ये त्यांनाही महात्माजींजवळ येरवड्यास ठेवण्यात आले होते. महात्माजींप्रमाणे ते खाऊ पिऊ लागले. ते चहा घेतनासे झाले. खजूर खाऊ लागले.
‘बापू, खजुराच्या किती फोडी घेऊ?’ ते विचारायचे.
‘पंधरा.’ बापू सांगायचे.
‘वीस घेतल्या म्हणून काय बिघडलं? पंधरा नि वीस यात कितीसं अंतर?’
‘तर मग दहाच पुरेत. दहा नि पंधरा यात तरी कितीसा फरक?’ असे म्हणून महात्माजी मुक्तहास्य करीत. महात्माजींची सेवा करायची सरदारांना अनावर हौस, परंतु गांधीजी स्नान करून येतानाच कपडेही धुवून आणीत! तीही सेवा सरदारांना मिळत नसे. रात्री झोपायला जाताना सरदार बापूंच्या चरणांवर डोके ठेवून जायचे!
१९३२ मध्ये जातीय निवाडा बदलून घेण्यासाठी, अस्पृश्य स्पृश्यांपासून दूर केले जाऊ नयेत म्हणून गांधीजींनी तुरुंगात मरणांतिक उपवास आरंभिला. राजाजींना येरवड्यास आणण्यात आले. राजाजी सरदारांस म्हणाले, ‘त्यांच्याहून अधिक पवित्र पुरुष मी कुठं पाहिला नाही. त्यांना मी काय सांगणार? त्यांना त्यांचा अंतरात्मा प्रमाण.’
सरदार गांधीजींना कितीदा म्हणायचे, ‘आपण बरोबर मरू. तुमच्यामागं मला नका ठेवू.’ परंतु बापू गेले! सरदार दु:ख गिळून सहका-यांसह राष्ट्राचा गाडा आज संकटातून पुढे नेत आहेत!