६४
दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू होता. शेकडो सत्याग्रही तुरुंगात होते. त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था टॉलस्टॉय फार्मवर करण्यात आली होती. अनेक भगिनी आपली मुलेबाळे घेऊन तेथे राहत. महात्माजी कधी मोकळे असले म्हणजे या माय-भगिनींना धीर द्यायचे. त्यांची कामेही करायचे.
एके दिवशी महात्माजी धुणी धुवायला निघाले. ते निरनिराळ्या भगिनींकडे गेले व म्हणाले, ‘धुवायचे कपडे द्या आई. मी आणतो धुवून. नदी जरा लांब आहे. तुमची मुलं लहान. आणा सारी हगोली मुतोली. इतरही कपडे द्या. संकोच करू नका. तुमचे पती तिकडे सत्यासाठी तुरुंगात तपश्चर्या करीत आहेत. तुमची काळजी आम्ही घेतली पाहिजे. द्या. खरंच द्या.’
आणि ते शब्द ऐकून संकोचणा-या मायबहिणी कपडे काढून देत. आणि त्यांचे भले मोठे गाठोडे बांधून, पाठुंगळीस घेऊन हा राष्ट्रपिता नदीवर जाई. तेथे ते सारे कपडे नीट धुवून उन्हात वाळवून, त्यांच्या घड्या घालून ते परत आणीत आणि मायबहिणींना देत. असे होते बापू! त्यांच्या सेवेला सीमा नाही.