७७

१९३० मधील एप्रिल महिना. दांडी यात्रा संपली होती. मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केला होता. ते आता शिंदीची झाडे तोडण्याचा सत्याग्रह करीत होते. कराडी गावी मुक्काम होता. ती पाहिलीत लहानशी झोपडी? त्या झोपडीत महात्माजी राहतात.

एके दिवशी सकाळी निराळाच प्रकार दिसला. गावक-यांनी मोठी मिरवणूक काढली होती. स्त्रियाही मिरवणुकीत होत्या. त्या सर्वांच्या पुढे होत्या. अग्रभागी राष्ट्रध्वज होता. वाद्ये वाजत होती. ती मिरवणूक? ती सारी मंडळी का सत्याग्रह करणार होती? पुरुष मंडळींच्या हातांत फुले, फळे, पैसे आहेत. काय आहे प्रकार?

महात्माजी बाहेर आले. एकच जयजयकार झाला. त्या सर्वांनी भक्तिभावाने प्रणाम करून आणलेल्या भेटी गांधीजींच्या चरणांवर वाहिल्या.

‘का आलात? का ही वाद्ये?’ बापूंनी विचारले.

‘महात्माजी, आमच्या गावाला नेहमी पाण्याचा दुष्काळ. उन्हाळा आला की विहिरी आटायच्या. पाण्याचा खडखडाट; परंतु काय आश्चर्य! बापू, तुमचे पाय आमच्या गावाला लागले आणि देवा, विहीर पाण्याने भरून आली. मग आमची हृदयं भक्तिभावानं का बरं भरून येणार नाहीत?’ पुढारी म्हणाले.

‘वेडे आहात तुम्ही, माझ्या येण्याचा त्या पाण्याशी काय संबंध? ईश्वरावर का माझी सत्ता आहे? त्याच्यापाशी तुमच्या शब्दाला जेवढं महत्त्व तेवढंच माझ्या. असं काही वेड्यासारखं बोलू नका.’ गांधीजी कठोरपणाने बोलले.

परंतु थोडा वेळ गेला. राष्ट्राचा पिता हसला नि म्हणाला :

‘हे बघा, झाडावर कावळा बसायला नि झाड मोडायला एक वेळ आली तर का ते झाड कावळ्यानं मोडलं असं म्हणाल? दुसरी शेकडो कारणं असतात. तुमच्या विहिरीला पाणी आलं; पृथ्वीच्या पोटात काही घडामोड झाली असेल नि नवीन झरा फुटला असेल. खरं ना? उगीच बावळट कल्पना मनात आणीत नका जाऊ. आणि सारे सूत कातायला लागा आधी. भारतमातेला कपडा हवा ना?’

सारी जनता प्रणाम करून गेली. हातांत धारदार कु-हाडी घेऊन राष्ट्राचा तात, तो महान सत्याग्रही, शिंदीची झाडे तोडायला बाहेर पडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel