८४
१९३१ मध्ये दिल्लीला गांधी-आयर्विन करार झाला. सत्याग्रह विजयी झाला होता. ब्रिटिश सरकारने हिंदजवळ आपण होऊन केलेला तो पहिला करार. गांधीजींनी लंडनला गोलमेज परिषदेला जाण्याचे कबूल केले होते, आणि ते निघाले. ती पाहा मुंबईहून बोट निघाली. निघता निघता एक लहान मुलाचा गांधीजी पापा घेत आहेत. फोटोग्राफर फोटो घेत आहेत. निघाली बोट.
आज बोट एडनला पोचायची होती. एडनची हिंदी नि अरब जनता महात्माजींना मानपत्र आणि थैली देणार होती. परंतु त्या समारंभाच्या वेळी तिरंगा झेंडा फडकवायला तेथील पोलिटिकल रेसिडेंट परवानगी देईना.
गांधीजी स्वागत मंडळाच्या अध्यक्षास म्हणाले : रेसिडेंटसाहेबांस फोन करा नि सांगा की, हिंदुस्थान सरकारजवळ काँग्रेसचा करार झाला आहे. अशा वेळेस तरी तुम्ही राष्ट्रध्वजाला नकार देऊ नये. परंतु तुम्ही परवानगी देत नसाल तर मी मानपत्र घेणार नाही.’ फोन करण्यात आला. पोलिटिकल एजंटने नाजूक परिस्थिती ओळखून परवानगी दिली. तिरंगा झेंडा एडनला फडकला. लाल नि अरबी समुद्राने तो पाहिला.
गांधी मानपत्राला उत्तर देताना म्हणाले : ‘ज्या राष्ट्रध्वजासाठी हजारो लढले, मेले; तो ध्वज राष्ट्रीय सभेच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी नसून कसा चालेल? राष्ट्रीय ध्वजाला परवानगी द्यायचा हा प्रश्न नाही, परंतु जिथे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी बोलावण्यात येतील तिथे तिच्या ध्वजासही सन्मान्य स्थान असलं पाहिजे.’
तेथील हिंदी नि अरब जनतेला किती आनंद झाला! त्या बेटीतील शेकडो गोरे लोक तो प्रसंग पाहत होते.