९१
१९३३-३४ मधील गोष्ट. अस्पृश्यता-निवारणाचा गांधीजींचा दौरा सुरू होता. ओरिसा प्रांतातील दौरा नुकताच संपला होता. त्या दौ-यात पुष्कळदा पायीही हिंडावे लागले; आणि बापू पायी जात. त्यांना पायी हिंडणे फार आवडते. ओरिसातून आंध्र प्रांतात महापुरुष आला. यात्रा सुरू झाली. सत्यधर्माची अमर वाणी देशबांधवांच्या कानी पडू लागली. जागोजाग हीऽऽ गर्दी. खेड्यापाड्यांतून लाखो लोक येत. महात्म्याचे दर्शन घेत.
हा कोण आला आहे? मला महात्माजींना भेटू द्या, म्हणत आहे. कोण आहे हा? काय आहे त्याचे काम? तो का सनातनी आहे? तो का वाद करायला आला आहे? परंतु त्याच्या तोंडावर वादप्रेमाची वृत्ती नाही. हे निराळेच डोळे आहेत.
‘आपले काय काम आहे?’ विचारण्यात आले.
‘क्षणभर भेट द्या. मी एक भेट आणली आहे. ती महात्माजींना माझ्या हातांनी मला देऊ दे. नाही नका म्हणू.’ त्या पुरुषाचे डोळे ओले झाले. गांधीजींकडे त्यांना नेण्यात आले. एका खादीच्या शुभ्र रुमालात गुंडाळलेले ते गांधीजींचे चित्र होते. ती सुंदर तसबीर होती. तो चित्रकार होता. महात्माजींचे चित्र काढून त्याने आपले कुंचले पावन केले होते.
‘महात्माजी, ही तुमची तसबीर मी काढली. ही भेट घ्या.’ पदकमलाला प्रणाम करून तो म्हणाला. गांधीजींनी तसबीर हातांत घेतली. पाहिली. ती पुन्हा त्या चित्रकाराच्या हाती देऊन म्हणाले :
‘मी ही कुठं नेऊ? मला घर ना दार, आणखी बोजा कशाला वाढवू? कुठं लावू ही तसबीर? कुठं ठेवू? देहाचंही ओझं आता नको वाटतं आहे, गड्या, तुझ्याजवळच ठेव.’
सारे गंभीर झाले. महात्माजींचे ते उद्गार आठवून मला तुकारामाचे शब्द आठवतात :
‘उद्योगाची धाव बैसली आसनी।
पडले नारायणी मोटळे हे।’
पुरे आता धावपळ. देहाचे मोटळे आता नारायणाच्या चरणी पडो म्हणजे झाले!