९५
महात्माजी राष्ट्राचे तात होते. सारी त्याची लेकरे. त्यांची कोठे आसक्ती नव्हती. ते शेवटी दिल्लीला होते. महात्माजींचे चिरंजीव देवदास भेटायला जायचे. देवदासांचा लहान मुलगा गोपू. ते त्यालाही बरोबर न्यायचे. तीन वर्षांचा गोपू. महात्माजींना त्या बाल-गोपाळांचा लळा लागला. तो आला की ते त्याला प्रेमाने जवळ घ्यायचे, हास्यविनोद करायचे.
कधी गोपू बरोबर आला नाही तर गांधीजी म्हणायचे : ‘आज गोपू का नाही आला? तो नाही आला तर मला चुकल्यासारखं होते.’
बापू तर निघून गेले. बापूजी लहानग्या गोपूचे ज्या शब्दांनी स्वागत करायचे त्याची हुबेहूब मक्कल गोपू घरी करी, आणि देवदास व त्याची पत्नी यांना रडू येई.
९६
महात्माजींनी भारतव्यापी सत्याग्रह पहिल्यानेच सुरू केला होता. त्यांनी मारलेली हाक भारताच्या हृदयाला जागृत करती झाली. जणू दहा हजार वर्षांच्या राष्ट्राच्या इतिहासातील आत्मशक्ती हाक मारीत होती. ती हाक ओळखीची वाटली. ‘प्रार्थना करा, उपवास करा, आत्मसमर्पण करा,’ अशी ती हाक होती. त्या हाकेने लाखोंच्या जीवनात क्रांती झाली.
गांधीजी साबरमती आश्रमात होते; आणि एक धिप्पाड तरुण त्यांना भेटायला आला. गांधीजींचे वजन फार तर शंभर पौंड, तर या राजबिंड्या तरुणाचे दोनशेहून अधिक. महात्माजींच्या चरणांना स्पर्श करून त्या तरुणाने त्यांच्या हातांत पत्र दिले. महात्माजी गंभीर झाले. नंतर हसून म्हणाले :
‘मग काय करायचं?’
‘मला काही म्हणू नका. मला मुलगा म्हणून माना. जणू मांडीवर घेतलेला.’
‘माझी मांडी किती लहान, तू कसा मावणार त्या मांडीवर?’ बापू हसू म्हणाले.
जमनालालजींच्या डोळ्यांत पाणी आले. शेवटी महात्माजी म्हणाले, ‘बरं तर. हो माझा मुलगा. मी माझ्याकडून पित्याचं नातं ठेवीन. पुत्राचं नातं ठेवण्याचं तुझं काम!’
जमनालालजींचा आनंद गगनात मावेना. आणि अखेरपर्यंत हे नाते राहिले.