१०८

महात्माजी अलाहाबादला गेले होते. ते आनंदभवनात उतरले होते. कमला नेहरू स्मारक दवाखान्याचा पाया घालायचा होता म्हणून ते आले होते. १९३९च्या नोव्हेंबरची २३ तारीख होती.

गांधीजींना एक न्हावीदादा हवा होता. जवाहरलालजींचे खाजगी चिटणीस श्री. उपाध्याय यांनी एका कुशल न्हावीदादास बोलाविले. त्यांचे नाव पुन्नीलाल. श्री. उपाध्यायांनी स्वच्छ खादीचे कपडं त्याला घालायला दिले. ते कपडे त्याला नीट होत नव्हते. तरी पण ते पेहरून आनंदभवनाच्या दुस-या मजल्यावर तो गेला. गांधीजी वर्तमानपत्रे वाचीत होते. त्याला पाहून ते म्हणाले;

‘अरे, तुम आ गये. तुम अच्छा बाल बनाते हो न?’

न्हावीदादा नम्रतेने स्मित करता झाला. तो गांधीजींची डोई करायला बसला. त्याने त्यांची दाढीही केली. गांधीजी थट्टाविनोद करीत होते, त्याला त्याच्या घरची हकीकत विचारीत होते. मध्येच त्यांनी विचारले; ‘तू नेहमी खादी वापरतोस वाटतं?’

‘नाही. हे कपडे तात्पुरते उसने आहेत.’

गांधीजींना त्याने खरे सांगितल्यामुळे बरे वाटले. गांधीजींची डोई केली जात असता श्री. उपाध्यायांनी फोटो घेतला.

काम झाले. न्हावीदादा जायला निघाला. त्याने गांधीजींना प्रणाम केला. बापू म्हणाले;

‘तुम अच्छा बाल बनाते हो.’

‘तो मुझे सर्टिफिकिट दीजिये.’

‘जब तक तुम अच्छा काम करते रहेंगे तबतक सर्टिफिकिटकी जरूरत ही क्या?’

परंतु न्हावीदादाने गळ घातली. अखेर गांधीजी तयार झाले. तो पहा; कागद आणण्यात आला. बापू लिहू लागले;

आनंद भवन, इलाहाबाद.

भाई पुन्नीलालने बडे भावसे अच्छी तरह मेरी हजामत की है। उनका वस्तरा देहाती और बगैर साबुनके हजामत करते है।
मो. क. गांधी

(अर्थ : भाई पुन्नीलालने मोठ्या प्रेमाने माझी डोई केली. त्याचा वस्तरा खेड्यात तयार झालेला आहे व साबणाशिवाय तो हजामत करतो.)

जणू पृथ्वीमोलाचा ठेवा अशा आनंदाने न्हावीदादा निघाला. जवाहरलालजींनी त्याला दोन रुपये कारागिरी दिली. आणि उपाध्यायांजवळून तो फोटोही घेऊन गेला. तो फोटो व ते प्रशस्तिपत्र म्हणजे पुन्नीलालच्या मालकीच्या दोन अमोल वस्तू. एकजण शंभर रुपये देत होता परंतु पुन्नीलाल त्या वस्तू द्यायला तयार होईना! श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांनी मोठ्या मिनतवारीने त्या फोटोचा व प्रशस्तिपत्राचा फोटो घेऊन प्रसिद्ध केला, तेव्हा ही गंमत जगाला कळली!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel