१२१
मीराबेन हिंदुस्थानात येऊन फार दिवस नव्हते झाले. गांधीजींच्या तालमीत त्या तयार होत होत्या. त्या दिल्लीला डॉ. अन्सारींकडे गेल्या. मुस्लिम पाहुणचारास सीमा नसते. मीराबेनना विडा देण्यात आला.
‘नको.’... त्या म्हणाल्या.
‘पान खाण्यात वाईट काय आहे? पान तर भारतीय सत्काराची खूण. आरोग्याच्या दृष्टीनेही उपकारक...’ डॉक्टर विड्याची महती सांगू लागले.
त्यांना वाईट वाटू नये म्हणून मीराबेननी विडा खाल्ला. परंतु आपण बरे केले नाही, असे त्यांना वाटले. त्यांनी तो प्रसंग बापूंना लिहून कळविला. चुकले का, म्हणून विचारले. चुकले असेल तर क्षमा करा म्हणून विनवले. महात्माजींचे पुढील आशयाचे उत्तर आले;
‘डॉक्टरसाहेबांनी तसा आग्रह करणं बरोबर नव्हतं. साधकानं अनावश्यक वस्तूंचा स्वीकार करणं बरं नव्हे. मुस्लिम बंधू पान देणं सभ्यतेचं व प्रेमळ सत्काराचं चिन्ह मानतात. परंतु मानाची जीवनाला खास जरूरी नाही. साधकानं तर पावलोपावली जपलं पाहिजे कोणी गळ घातली तरीही आपलं व्रत सोडू नये. अशा लहानसहान बाबींत खंबीर न राहिल्यामुळं पुढं ती सवयच होते व मोठ्या बाबतीतही घसरण्याचा संभव असतो.’
महात्माजी निकटवर्ती लोकांच्या जीवनाला किती प्रयत्नपूर्वक आकार देत असत!