हिंसक लोकशाही लोकशाहीच नव्हे

जी लोकशाही अहिंसेवर आधारलेली नाही, ती लोकशाहीच नव्हे. लोकशाही नि अहिंसा यांचा संबंध कसा, कोठे येतो? आज जी लोकशाही आहे तिच्यासंबंधी सत्याग्रहीला आकर्षण वाटते. कारण ते जे अखेरचे अ-राजकतेचे ध्येय त्याच्याकडे या मार्गाने जाण्याची त्याला शक्यता वाटते. समाजवादांतहि सत्याग्रहीला आकर्षकता वाटते. परंतु हुकुमशाही राज्यपध्दतीत असे काहीच नसते. सत्याग्रहीला सर्वांत त्याज्य जर काही वाटत असेल तर हुकुमशाही. मग ती हुकुमशाही फॅसिस्ट असो वा कम्युनिस्ट असो. महात्मा गांधी स्वतःला लोकशाहीचे पुरस्कर्ते समजतात. ''लोकशाही चालवायचे ज्ञान मला जितके आहे तितके क्वचितच कोणास असेल'' असे ते म्हणतात. हुकुमशाही राज्यसंस्था सक्तीने सर्वांची स्वतःच्या नमुन्याप्रमाणे सुधारणा करूं पहाते. अशी सर्वंकष शासनसंस्था जीवनाच्या अंगप्रत्यंगांत घुसते. जीवनाचा असा यत्किंचितहि भाग उरत नाही की जेथे या हुकुमशाही पध्दतीचे पाश पोचत नाहीत. अशा या राज्यसंस्थेचे प्रभुत्व माझ्या सर्व जीवनावर सारखे चालत असते. लष्करी पाठिंब्याच्या जोरावर हुकुमशाहीपध्दति हे सारे करीत असते. तेथे मला विचार करण्याचेहि स्वातंत्र्य नाही, मग आचारस्वातंत्र्य तर दूरच राहिले. हुकुमाप्रमाणे वागायचे एवढेंच तेथे काम. अशाने माझा विकास कसा व्हायचा? मी काही मडके नाही; मी मानव आहे. माझा सर्वांगीण विकास, माझी सर्वांगीण उन्नति हे माझे ध्येय. परंतु हुकुमशाहीत माझे मन, माझी बुध्दि ही जणू जड केली जातात. ती केवळ बाहुली, हुकमाची ताबेदार बनतात. हा विकास नसून विनाश आहे.

लोकशाहीत असे नाही. राज्यसंस्था सक्तीने येथे सर्वांची ठरीव सांचाची सुधारणा करूं पहात नाही. मानवांत असा काही अंश आहे की, ज्याच्या सुधारणेसाठी सक्ती कराल तर तो नष्टच होईल. मानव मग मानवच राहणार नाही. तो जंड यंत्रवत् होईल. लोकशाहीत सक्ती, हिंसा थोडया फार प्रमाणांत असतीलच. परंतु या गोष्टी असल्या तरी त्यांना मर्यादा असेल. पदोपदी हिंसा समोर उभी राहणार नाही. लोकशाहीत ही मर्यादा गृहीत आहे. अंतिम ध्येयाच्या दृष्टीने राज्यसंस्थेचे शासन, तिचा दंड, ही निरुपयोगी आहेत; परंतु संक्रमणावस्थेत, त्या ध्येयाकडे जात असतांना, या गोष्टींची जरूर लागेल. मानवधर्माचे रक्षण करण्यासाठी गीता हिंसेला अनुज्ञा देते. श्रीकृष्ण म्हणतात :

''परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्''

संतांचा सांभाळ आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी मी अवतरतो असे भगवान् सांगतात. परंतु गीतेंतील ही शिकवण, हिंसेची ही अनुज्ञा राजधर्मांतील आहे, असे आपण समजून चालू. काही प्रमाणांतच या गोष्टीला सत्यता आहे. खरा जो धर्म असतो तो शस्त्रबलाने, शिक्षा करून, सक्तीने कधीच कोणास स्थापता येणार नाही. समाजधारणेसाठी धर्म असतो, आणि समाजाचे जे धारण होते ते संतांच्या तपाने होते. ''संतो तपसा भूमिं धारयन्ति'' हे खरे सत्य. भगवान् म्हणतात की, मी दुष्टांना संहारायला नि सज्जनांना, संतांना सांभाळायला अवतरलो आहे. म्हणजे भगवंताच्या अवतारापूर्वी संतत्व, साधुत्व समाजांत होते. कोठेतरी ते वावरत होते. त्याला त्रास होऊ लागला म्हणून प्रभूचा अवतार. परंतु श्रीकृष्णाच्या शस्त्राने साधुत्वाचे रक्षण झाले तरी ते निर्माण नव्हते होत. धर्माचा प्राण साधुत्वांत आहे. हा प्राण शस्त्रे सांभाळतील, परंतु निर्मूं शकणार नाहीत. हा प्राणच नसेल तर शस्त्रांनी सांभाळ तरी कशाचा करायचा?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel