या फुलाहूनहि अधिक सुंदर फूल असूं शकेल असें जेव्हां आपण म्हणतों तेव्हां एक आदर्श फूल अंतश्चक्षूंसमोर उभें असतें. त्या अदृश्य पुष्पाशीं या प्रत्यक्ष पुष्पाची आपण तुलना करतों नि मग म्हणतों कीं, हें फूल सुंदर असलें तरी तितकें नाही. आदर्शदृष्टि नेत्रांना दिसत नाहीं, तरीहि हृदयांत तिची प्रतीति असते. अशी प्रतीति नसेल तर आपणांस बाह्यसृष्टि  अपूर्ण अशी वाटतीचना. सृष्टीचें बाह्य निरीक्षण करतांना निर्दोष अशा सृष्टीची आपणांस सदैव कल्पना असते. ती जी चर्मचक्षूंना न दिसणारी परंतु हृदयांत भासणारी, जिच्या प्रकाशांत आपण जगाचें मूल्यमापन करतों, तीच सृष्टि वास्तविक खरी. आणि इंद्रियगम्य अशी जी ही सृष्टि - जिला आपण खरीखरी म्हणून म्हणत असतों, तीच त्या आदर्श सृष्टीच्या प्रकाशांत मिथ्या ठरते, माया ठरते. ती जी निर्दोष, परिपूर्ण सृष्टि, तीच हळूहळू व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे विचार तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांतून मांडलेले असतात. ज्याप्रमाणें आत्मभिन्न वस्तूंत आपण आदर्श वस्तु आणि इंद्रियगम्य वस्तु असा फरक करतों, तसा आत्म्यांतहि आहे. आदर्श आत्मतत्त्व आणि अहंकाराशीं संबध्द असें शबल आत्मतत्त्व. मनुष्याची प्रत्यक्ष कल्पना, मनुष्याची आदर्श कल्पना. प्रत्यक्ष संसारांतील विकारी मनुष्य नि आदर्श सृष्टींतील ज्ञानस्वरूप मनुष्य. मनुष्याला स्वतःच्या विकारी रूपांतून मुक्त होऊन, या उपाधि सोडून, हीं बंधनें तोडून त्या निर्मळ आत्मरूपाकडे जाण्याची तळमळ असते. प्रत्येकाच्या अंतःकरणांत ही तळमळ असते. ही तळमळ तुम्हां आम्हां सर्वांना त्या आदर्शाकडे धडपडत जायला, त्या आपल्या परम सुंदर नि मंगल आत्मरूपाकडे जायला प्रवृत्त करीत असते, प्रेरणा देत असते. त्या आदर्शालाच आपण सत्यमय मानतों. आजचें आपलें अपूर्ण असें रूप आहे. त्याहून भिन्न असें तें जें अव्यक्त रूप तें व्यक्त करावें, तें आपल्या जीवनांत मूर्त करावें, अवतरवावें असें आपणांस वाटतें. या ध्येयासाठी जी खटपट तीच आत्मप्राप्तीची खटपट, मोक्षार्थी माणसाची खटपट. त्या परोक्ष सृष्टीकडे, आदर्शसृष्टीकडे जायचे आपले सर्वांचे प्रयत्न असतात. ती सृष्टि, ती आदर्शसृष्टि जे अधिकाधिक जीवनांत आणतात, त्यांच्या उद्योगावरून आपणांसहि विश्वास वाटूं लागतो. त्या व्यक्तींना आपण श्रेष्ठ मानतों. यांच्याप्रमाणें आपणहि धडपडावें, यांच्याप्रमाणें आपण व्हावें असें इतर मुमुक्षूंच्या मानला वाटूं लागतें. आपल्यापेक्षां श्रेष्ठ विभूति जेव्हां आपणांस दिसते,  तेव्हां तिला आपण अवतार मानतों. ती परोक्ष कल्पना, तो अमूर्त आदर्श, तें कल्पनेंतील ध्येय या माणसांत मूर्त झालें आहे, येथें अपूर्णता पूर्ण रूपांत प्रकट झाली आहे असें वाटून आपणांस कृतार्थ वाटतें. या इंद्रियातीत ध्येयाला आज आपण प्रत्यक्ष संसारांत या व्यक्तीच्या स्वरूपानें वावरतांना पाहात आहोंत, डोळयांना हें भव्य रूपडें दिसत आहे असें वाटून आशा दुणावते. ती जी स्वर्गीय सृष्टि तिचें कांही प्रतिबिंब अशा थोरांमध्यें आपण पाहतों. मग आपण त्या व्यक्तीला अवतार मानतों. अवतार म्हणजे आदर्श सृष्टींतून प्रत्यक्षांत आलेली आदर्श मूर्ति. सामान्यतः दुर्मिळ असें तें परिपूर्णतेचें रूप, परंतु बर्‍याचशा अंशानें तरी प्रत्यक्ष दिसतें. किती छान ! आदर्श मानव, आदर्श आत्मा आपण अंतःकरणांतच असतो.  ख्रिस्त म्हणतात, ''स्वर्गाचें राज्य तुमच्यांतच आहे, तुमच्या अंतरंगातच आहे. (Kingdom of God is within you.) त्या अंतःकरणांतील आदर्श मूर्त  दिसले तरीहि ते अपूर्णच असतात. प्रत्यक्षांत येतांना थोडी अपूर्णता येतेच.  म्हणून आपली नेहमीं प्रार्थना असते,

असतो मा सत् गमय ।

जों असत् आहे त्यांतून तूं मला जें सत् आहे तिकडे ने, अशी आपली सनातन आर्त प्रार्थना आहे. ज्यांना आपण थोर पुरुष म्हणतों, त्यांचीहि हीच प्रार्थना असते. मानवी जीवनांत संपूर्ण ज्ञान, संपूर्ण निर्दोषता, केवळ परिपूर्णता अशक्य. तिच्या जवळ जवळ आपण फार तर जाऊं. प्रकाशाचा किरण माध्यमांतून पलीकडे जातांना जसा थोडा तरी वक्र होतो, त्याप्रमाणें जीवनांत आदर्श उतरवीत असतांना थोडी तरी अपूर्णता येतेच. महात्माजींच्या विचारांत ही गोष्ट नेहमीं दिसते. जीवनाचा थोर आदर्श अशांच्या जीवनांत प्रतीत होत असतानाहि त्यांना अपूर्ण अपूर्ण असे कां वाटतें?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel