असे झालें म्हणजे मग राज्यसंस्थाच नको. सरकार नको. आपोआप नैतिक सहकार्यानें, मानवी समाज चालत राहील. केवळ आर्थिक सुधारणा केल्यानें, समाजांत आर्थिक समता आणल्यानें सरकार ही संस्था नष्ट होणार नाहीं. केवळ आर्थिक समता राज्ययंत्रहीन समाज, सहकारी समाज निर्मायला अपुरी आहे. रामराज्य, आत्मारामाचें राज्य निर्माण करायचें असेल तर सत् प्रवृत्तीच जागृत करून असत् प्रवृत्ति समूळ नष्ट केली पाहिजे. महात्माजींचा कर्मयोग, हा अनासक्त कर्मयोग गीतेंतूनच घेतलेला, लोकमान्यांचा कर्मयोगहि गीतेंतलाच. लोकमान्यांचा राजर्षींचा कर्मयोग आहे तर महात्माजींचा ब्रह्मर्षीचा कर्मयोग आहे. शस्त्रबल कितीहि न्यायबुध्दीनें नि निरपेक्षवृत्तीनें, अनासक्त रीतीनें वापरलें तरी त्यानें कायमची खरी सुधारणा होणें अशक्य आहे. तात्पुरती मलमपट्टी जरी तात्पुरती उपयोगी पडली तरी तिनें रोग कायमचा दूर होणार नाहीं. आत्मबलानें दुसर्‍याचें आत्मबल जागृत करूनच समाज उन्नत होत जाईल. हिंसेचा मार्ग - (Short Cut) जवळचा रस्ता वाटतो. म्हणून आसक्तीनें तो आपण उचलतों. परंतु हा जवळचा रस्ता अति लांबचा आहे. एवढेंच नव्हे तर ध्येयाकडे तो कधींहि नेणार नाहीं. दहा हजार वर्षे हिंसेनें प्रयोग चालले आहेत, तरी फळ नाहींच अन्याय नाहींसा झाला नाहीं, असत्य दूर झालें नाही. हा मार्ग विफल ठरला आहे. कोणत्याहि परिस्थितींत अनीति नको. धर्म राजानें नरो वा कुंजरो वा म्हटलें तर त्यालाहि फळ भोगावें लागलें. त्याचा रथ चार बोटें उंच चाले तो इतरांप्रमाणें खालीं आला. लोकसंग्रहार्थ खोटें बोलावें वगैरे गोष्टीहि भ्रममूलकच आहेत. अशा पळवाटा मग वाटेल तितक्या निघूं लागतात. आणि अखेर दुष्परिणाम होतात. पांडवांनीं युध्दांत नीति सोडून विजय मिळविला. परंतु उपयोग काय? तेहि मागून रडलेच. आणि त्याचें उदाहरण युध्दांत वाटेल तें केलें तरी चालेल हें आम्ही हजारों वर्षे गिरवीत आहोंत. त्याचे परिणाम आम्हांला भोगावे लागतच आहेत. तेव्हां पाडवांनीं युध्दांत नीति सोडली ही गोष्ट भली केली कीं बुरी केली, हा प्रश्नच आहे. तेव्हा निरपवादपणें निरपेक्ष नीतीचा सर्वश्रेष्ठ मार्ग पत्करणेंच योग्य होय. तोहि आचरणें कठीण आहे ही गोष्ट खरी. भित्रेपणापेक्षां उघड हिंसा बरी. भित्रेपणा सर्वथा त्याज्य. भित्रेपणा म्हणजे आत्म्याचा वध. भित्रेपणा म्हणून सर्वांत मोठी हिंसा आहे. आत्म्याची हिंसा टाळण्यासाठी हिंसा केली तरीहि ती क्षम्य आहे. आत्म्याच्या हिंसेच्या मानानें ती अहिंसाच आहे. पोलंडच्या जर्मनीजवळच्या लढाईला महात्माजीनें अहिंसक म्हटलें. पोलंडनें भ्याडपणा पत्करला नाहीं. तोंडानें अहिंसा बोलायची परंतु बाह्य आचार भेकडपणाचे असायचे हा दंभ, हा अधःपात सर्वस्वी तिरस्करणीय. त्याहून हिंसाहि बरी. हिंसामय क्रान्ति करण्यासाठीं झगडलेत तरीहि चालेल. भेकडपणानें अन्याय सहन करण्यापेक्षां हिंसेनें प्रतिकार करा. समाजांत अन्यायाला प्रतिकार करण्याची वृत्ति रहायलाच हवी. ही वृत्तीच समाजांत नसेल तर तेथें समर्थाची खरी अहिंसा तरी कशी दिसणार? जेथें अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ति आहे, वृत्ति आहे, तेथेंच आज ना उद्यां कमी वा अधिक खरी अहिंसाहि दिसूं शकेल. भेकडपणापासून अहिंसा फार दूर आहे. महात्माजींची अहिंसा शूराची आहे, हें सर्वांनी लक्षांत घ्यावें. ते कधींहि तुम्ही भेकड बना म्हणून सांगणार नाहींत. अहिंसा कळत नसेल तर हिंसा घ्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel