१. अन्याय चालू ठेवून क्लेश दूर करूं बघणें.
२. न्यायप्रस्थापना करून सत्यावर आधारलेली समाजरचना निर्मिणे.

पहिला मार्ग भ्रामक आहे. अहिंसा म्हणजे दुबळेपणा नव्हे. प्रेम म्हणजे अन्यायहि चालू देणें असा अर्थ नव्हे. ब्रिटिशांवर प्रेम करणें म्हणजे ब्रिटिश हिंदुस्थानची जी पिळवणूक चालवीत आहेत तिला मान्यता देणें असा अर्थ नव्हे. त्यांचा अन्याय सहन करून मी माझ्या शेजारच्या बांधवांची दुःखें कशीं दूर करूं? अहिंसा म्हणजे सत्याची प्रतारणा नव्हे. इंग्रजांनाहि मीं सत्य गोष्ट सांगितली पाहिजे कीं तुम्ही अशी दुसर्‍यांची पिळवणूक करणें बरें नाहीं. सत्यनिष्ठा कठोर असतें. असत्यानें, अन्यायानें सुख मिळत नसतें ही गोष्ट निर्विवाद आहे. न्याय आल्याशिवाय सुख नाहीं. न्याय कशा रीतीनें स्थापावयाचा हा प्रश्न आहे. हिंसेनें न्यायाची स्थापना करतां येईल का? तो प्रयोग हजारों वर्षें चालला आहे. तो प्रयोग फसला. हिंसेनें न्याय स्थापण्याचा प्रयत्न कधींच यशस्वी होत नाहीं. तात्पुरता प्रयत्न सफल झाल्याचा भास होतो. बाह्यतः यश मिळाल्यासारखें दिसलें तरी खर्‍या अर्थानें तें यश नसतें. ज्या कारणास्तव हिंसा केली तें कारण सिध्दीस गेलेलें दिसत नाहीं. सशस्त्र क्रान्ति कल्याणकारी नाहीं, तशी करूं नये असें गांधीजी म्हणतात, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नीट समजून घेऊं या. म्हणजे बराचसा उलगडा होईल. ते म्हणतात कीं, माझें हे निश्चित मत आहे कीं, सत्याग्रह हेंच भारतीयांचे शस्त्र आहे. ''सत्याग्रह एव शस्त्रं भातीयानाम्'' हें गांधीजींचें सूत्र आहे. ते म्हणतात, ''जग तर हिंसेला कंटाळलें आहे. हिंसेनें उद्देश सफल होत नाही. हिंसा यशस्वी व्हायला तीहि प्रबळ असावी लागते, आणि ती यशस्वी होते तेव्हां अति यशस्वी होते. इतकीं कीं, ज्या लोकशाहीसाठीं म्हणून आपण सशस्त्र क्राति केली, त्या लोकशाहीवरहि ती विजय मिळविते. लोकशाहीहि नष्ट होते.'' राजकीय  लोकशाही, आर्थिक लोकशाही यावी म्हणून सशस्त्र क्रान्ति. परंतु राजकीय लोकशाही तर नष्टच होते. हुकुमशाह्या अस्तित्वांत येतात असा जगाला  अनुभव येतो. म्हणून महात्माजी म्हणतात कीं, जग या मारामारीला विटलें आहे, कंटाळलें आहे. रक्तपाती क्रान्ति जगांत यशस्वी होणें शक्य नाहीं असें वाटतें. जगाची गोष्ट सोडून देऊ. भारतांत तरी ती यशस्वी नाहींच होणार. येथील जनताच सशस्त्र क्रान्तीला इतका पाठिंबा देणार नाहीं. आणि काहींनी सशस्त्र होऊन समजा, क्रान्ति यशस्वी केली तरी तिच्यामुळें जनतेचें कल्याण होईल असें वाटतेही. सशस्त्र क्रान्तीनें त्यांची गुलामगिरी अधिकच वाढेल, चिरस्थायी होईल. सशस्त्र वर्गाची एक हुकमत स्थापन होईल. जनतेशीं या सशस्त्र वर्गाचा संबंध राहणार नाहीं.  हातांत सत्ता ठेवण्याची त्यांची लालसा वाढेल. एकप्रकारें परकी राज्यच तें. परतंत्रताच ती. तें स्वराज्य नव्हें. सत्तेच्या जोरावर परकीयांनीं राज्य चालवलें काय, स्वकीयांनी चालवलें काय? परतंत्रताच ती. ज्या स्वराज्यांत प्रत्येकाला हें माझें असें वाटेल तेंच खरें स्वराज्य. माझ्या बाजूस जर सत्य असेल, माझी आत्मक्लेश भोगायची जर तयारी असेल तर मी अन्याय नष्ट करूं शकेन. अशी प्रचीति ज्या राज्यांत येते ती लोकशाही. अहिंसेवर उभारलेली लोकशाही. जेथें असें करता येणें शक्य नसेल तेथें लोकशाही नाही. सविनय कायदेभंग हा प्रत्येकाचा हक्क आहे. अहिंसक प्रतिकारांत सर्वांना वाव. शरीरानें धष्टपुष्ट असोत वा अशक्त असोत, मनोधैर्य असलें म्हणजे झालें. अहिंसक क्रान्ति यशस्वी व्हायला विधायक रचनाहि मोठया प्रमाणांत पाठीशीं असावी लागते. सारेच गोळया खायला तयार होतील असें नाही. सारेच लढयांत भाग घेतील असें नाहीं. शेंकडा कांही लोक प्रत्यक्ष सत्याग्रही सैनिक बनतील, परंतु विधायक कार्यांत सारी जनता सामील हवी. ती उत्कटपणें काम करीत राहाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel