म्हणजे नैतिक मूल्यांसाठीं लढूं अशीच राष्ट्रसभेचीहि भूमिका आहे. राष्ट्रीय कल्याणाची वृत्ति जनकल्याणाच्या वृत्तीशी तिनें जोडली आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ राष्ट्रसभा बघती तर तिनें निराळी भूमिका घेतली असती. महात्मा गांधी राष्ट्रसभेच्या पुढें जाऊन 'युध्दविरोधाचा प्रचार करा, सर्वत्र जा,' असें सांगूं लागले. ''देशावर परकी आक्रमण झालें तर ज्यांना हिंसेनें रक्षण करतां येईल त्यांनी हिंसेनें करावें. सत्कार्यार्थ हिंसा असेल तर परवानगी परंतु मी अहिंसेनेंच प्रतिकार करीन'' असें ते म्हणाले.

परंतु देशांत जेव्हां चलेजाव लढा सुरू होणार होता तेव्हां त्यांनी हिंसेला मान्यता दिली नव्हती. जो लढा आतां चालला आहे, त्यांत अहिंसेची व्याप्ति किती, हिंसेची किती, कोण किती बरोबर, कोण किती चूक तो हिशेब मागून बघा. परंतु एक गोष्ट मान्य केली पाहिजे कीं, आज असा कोणीहि शंभर टक्के मी हिंसात्मक आहें असें म्हणेल. आमचा लढा स्वार्थासाठीं आहे, सौद्यासाठी आहे, तो हिंसात्मक आहे असें कोणी म्हणूं शकणार नाहीं. वर्षभर चळवळ चालली. महात्मा गांधींच्या पाठीमागें जनतेनें लढा दिला, अद्याप देत आहे. राष्ट्रीयसभेमध्यें मतभेद असले तरी महात्माजींच्या मागें सारे आहेत. अहिंसापालनाची वृत्ति सर्वत्र उत्पन्न झाली आहे. वास्तविक ब्रिटिशांशीं आपण युध्द पुकारलेलें, परंतु जनतेकडून हत्त्या क्वचितच झाली. ४० कोटि लोक हिंसा करायची असें मनांत आणते तर ते अपार करूं शकते. परंतु 'प्राण पवित्र माना' अशी घोषणा सर्वांनी केली. जगाच्या इतिहासांत ही अपूर्व गोष्ट होती. शत्रूच्या रक्ताचा थेंबहि न सांडतां हा लढा लढवला गेला. ही जी वृत्ति महात्माजींनी निर्माण केली, ती सामान्य नाहीं. जगाच्या इतिहासांत भर घालणारी हीं अपूर्व वस्तु आहे. महात्माजींनी जगाच्या इतिहासांत भर घालणारी ही अपूर्व वस्तु आहे. महात्माजींनी जगाच्या इतिहासांत एक नवीन प्रकरण लिहिलें. अहिंसेच्या मर्यादा लढा चालवणार्‍यांनीं कितपत पाळल्या, त्यांना त्या कितपत झेंपल्या हा वादाचा प्रश्न असला तरी, महात्माजींच्या सत्याग्रहाच्या मर्यादा कोणी सोडून दिल्या असल्या तरी, सत्याग्रहाची वृत्ति महात्माजींनीं जो कोटयवधि   लोकांत निर्माण केली, ती इतिहासांत नवीन वस्तु आहे यांत शंका नाहीं. जो लढा बाहेर झाला, त्याची कोणासहि शरम वाटायला नको. सरकारच्या पर्वतप्राय हिंसेच्या, मानानें जनतेच्या हातून झालेली हिंसा कणासमान आहे आणि प्राणहत्या तर जनतेनें जवळजवळ शपथपूर्वक वर्ज्यच मानली होती.

महात्माजी जगांतून युध्दें जावीं म्हणून हा नवीन प्रयोग करीत आहेत. ते नवीन मार्ग दाखवीत आहेत. न्यायप्रस्थापनेसाठींहि हिंसा नको. यासाठीं हा त्यांचा नवा युध्दप्रकार. अहिंसक युध्दाचा प्रकार. या मार्गाचें ते संशोधन करीत असतात. हिंदुस्थानांत ते जो हा प्रयोग करीत आहेत, त्याच्याकडे जगाचें लक्ष आहे. जगामध्यें ध्येयें वाढलीं, साध्यें वाढली; परंतु साधनें तींच आहेत. आपलीच साध्याविषयींची भाषा बघा. पूर्वी म्हणत असों कीं, हे परके आधीं येथून जावोत. पुढें म्हणूं लागलों की, जें स्वराज्य येणार तें एकतंत्री नको, लोकशाही स्वरूपाचें तें हवें. देशांतील सर्वांना मताधिकार हवा. पुढें एवढयानेंच संपलें नाही. आर्थिक सुस्थिति यायला हवी. सामाजिक समता हवी. समाजवाद एकप्रकारें यायला हवा. परंतु हेंहि अखेरचें ध्येय नाहीं. राजकीय हिंसाच नको असेल तर स्टेटच नको. सरकारच नको. सरकार असणें म्हणजे समाजांत थोडा तरी अन्याय आहे हा अर्थ आहे. कम्युनिस्टहि म्हणतात कीं, अखेर सरकारच नको. महात्माजाहि एका अर्थी अराजक म्हणजे राज्यसत्ताच नकों असें मानणारे आहेत. केवळ सत्य युग यावें. सारे सत्यानें, न्यायानें, सहकार्यानें वागणारे झाले म्हणजे मग सरकार ही वस्तु कशाला? सरकाररूपी संस्थेला खुशाल मग संग्रहालयांत ठेवूं. अशा रीतीनें ध्येयें विकसत जात आहेत. परंतु ध्येयांच्या उत्तरोत्तर विकासाबरोबर साधनांचाहि विकास होत गेला का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel