पांडव पुन्हा परतून आले आणि आणखी एक डाव खेळले व हरले. त्याना १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासासाठी वनात जावे लागले. परिणामी कॉरव-पांडवांमधले युद्ध १३ वर्षे टळले. हा सर्व काळ द्रोण हस्तिनापुरातच राहिला. १३ वर्षांनंतर पांडवांबरोबर युद्ध होणार आणि पांडवांचे मुख्य समर्थक द्रुपद व त्याचे बंधु, पुत्र हे असणार हे द्रोणाला दिसत होते. युद्ध टाळण्याचा कोणताहि प्रयत्न द्रोणाने केला नाही. जणू द्रुपदाबरोबर एक अखेरचे युद्ध त्याला हवेच होते!
अज्ञातवासाचे अखेरीस त्रिगर्ताच्या बेताप्रमाणे विराटाचे गोधन लुटण्याच्या दुर्योधनाच्या मोहिमेत द्रोण सामील झाला. अर्जुन समोर आल्यावर, द्रोणानेच १३ वर्षे पुरी झाली कीं नाही हे विचारले भीष्माचा खुलासा त्यावेळी वा नंतरहि, त्याने स्वीकारला वा नाकारलाहि नाही! दुर्योधनाने मात्र तो तेथेच नाकारला. अर्जुनाने सर्व कौरववीरांचा समाचार घेतला व त्याना पळवून लावले. त्या युद्धप्रसंगी द्रोणाने फारसे काही केले नाही. पट्टशिष्य अर्जुनाचा पराक्रम तो पाहत बसला.
पांडव प्रगट झाले, अभिमन्यूचा विराटकन्येशी विवाह झाला, पांडवानी इंद्रप्रस्थाच्या राज्यावर आपला दावा दुर्योधनाकडे केला. त्याने तो नाकारला. वाटाघाटी चालल्या. अखेरच्या प्रयत्नासाठी कृष्ण आला. तेव्हाही द्रोणाने दुर्योधनाला ‘मी युद्धापासून अलिप्त राहीन’ असा धाक घातला नाही. युधिष्ठिराचा दावा द्रोणाने स्पष्टपणे स्वीकारला पण नाही वा नाकारलाहि नाही! द्रुपदाबरोबरचे युद्ध त्याला टाळायचे नव्हतेच. केव्हातरी त्याला धृष्टद्युम्नाबरोबर अंतिम युद्ध करणे भाग होते. युद्ध सुरू झाले तेव्हा भीष्माने सेनापतिपद स्वीकारले. कर्ण बाहेर राहिला. १० दिवस युद्धावर भीष्माने नियंत्रण ठेवले. द्रोणाने निकराचे युद्ध केले नाही. १० व्या दिवशी सर्व प्रमुख रथीना ‘भीष्माचे संरक्षण करा’ असे त्याने म्हटले. पांडवाना मारण्याचा द्रोणाचा हेतु नव्हताच. कदाचित थोड्या युद्धानंतर समेट झाला तर त्यालाहि तो बहुधा हवाच असेल. १० दिवसाचे अखेर भीष्म कोसळला पण उत्तरायण लागेपर्यंत त्याने शरपंजरी पडणे पत्करले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel