परंतु हे काही असले, तरी त्यांचे सामाजिक स्थान कमीच मानले जाऊ लागले. धर्मराजा द्रौपदीसह पणास लावतो, याचा अर्थ काय ? परंतु तो आपल्या भावांनाही पणास लावतो. कुटुंबाचा मुख्य असल्यामुळे त्याची का सर्वांवर सत्ता ? खरा प्रश्न असा होता की, धर्माने स्वतःला आधी पणाला लावले होते. स्वतः गुलाम बनल्यावर पत्नीला त्याला पुन्हा पणास लावता येत होते का ? पत्नीला स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही ? परंतु ‘धर्मस्य सूक्ष्मा गतिः’ असे म्हणून भीष्मद्रोणही मुके बसतात. पतीच्या जीवनाहून पत्नीला निराळे जणू अस्तित्व नाही. पतीच्या हाताला हात लागल्याने मोक्ष मिळेल. तिला स्वतंत्र मोक्षाचा कुठला अधिकार ? म्हणून का गीतेचे बंड ? ज्याप्रमाणे वैश्य, शूद्र यांना कमीपणा आला, त्याप्रमाणे स्त्रियांनाही. ज्यांनी स्वयंपाक करावा, दळावे, कांडावे, शेण लावावे, त्यांना कोठला मोठेपणा ? परंतु राजसूय यज्ञात उष्टी काढण्याचे कर्म स्वीकारुन श्रीकृष्णाने स्त्रियांची प्रतिष्ठा स्थापिली. परंतु स्त्रियांची प्रतिष्ठा वाढली नाही. त्यांना स्वतंत्र किंमत नाही.
कालिदास, भवभूती यांच्या नाटकांतून स्त्रियांची स्थिती बरी दिसते. शाकुंतलात कण्वाच्या आश्रमात मुलांबरोबर मुलीही शिकत आहेत, असे दृश्य आहे. उत्तमरामचरितात लवकुशांबरोबर भराभर शिकता येत नाही, म्हणून एक तापसी दुस-या आश्रमात जाते. परंतु हे उल्लेख त्या त्या कविवरांच्या काळाला धरुन होते, की प्राचीन काळाचे चित्र त्यांनी रंगवले होते, हे कळत नाही.
स्मृतिग्रंथ पाहिले तर निराळे प्रकार दिसू लागतात. प्रौढविवाह लोपले असे दिसते. बालविवाहाची प्रथा रुढ झाली. मग कोठले शिक्षण नि काय ? पति हाच गुरु. त्याने शिकवावे. स्त्रियांना स्वातंत्र्य दिसत नाही. हा फरक का आला, कसा आला ? हा का बुद्धधर्माचा परिणाम होता ? बुद्धधर्म स्त्री-पुरुषांना कमी लेखी ना. पुरुषांप्रमाणे स्त्रियाही दीक्षा घेत. त्या भिक्षुणी बनत. धर्मप्रचार करीत. परंतु यांतून पुढे अनाचार माजला का ? ब्रह्मविहार हे कामविहार झाले की काय ? म्हणून का निराळी लाट आली ? वैदिक कर्मकांडाने पुन्हा उच्चल खाल्ली तेव्हा का लहानपणीच विवाह करावे असे ठरले ? काही असो. स्त्रियांच्या जीवनातील मोकळेपणा गेला.