‘रुसवेफुगवे, त्यांत प्रेम पिकवते।’
घरात रुसवे, फुगवे, परंतु त्यांतच मी प्रेम पिकवते, अशी जुनी महाराष्ट्रीय भगिनी सांगते. स्त्रियांचा हा मोठेपणा तर खराच. परंतु अतःपर तेवढयाने स्त्रियांना वा पुरुषांना समाधान वाटता कामा नये.
मी खानदेशातील खेडयांतून हिंडायचा. “घरात कोण आहे ?” मी विचारी. “घरात माणसे नाहीत” मला सांगण्यात येई. बायका तर घरांत असत. पुरुष म्हणजे माणसे, असा खानदेशी अर्थ. बायकांना कोण माणूस म्हणतो ? बायकांतली अभिजात मानवताही जणू आम्ही विसरुन गेलो. त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे. व्यक्तिमत्त्व आहे. आत्मा आहे, हृदय आहे, बुद्धी आहे, सुखदुःखे आहेत, हे आम्ही विसरुन गेलो. खानदेशात पेरणी करायची असली म्हणजे भरल्या कपाळाची स्त्री शेतात घेऊन जातात. तिच्या हाताने आरंभ करतात. ती सुवासिनी आणि गतधवा असेल तर ती अशुभ ! शुभाशुभ का अशा गोष्टींवर अवलंबून आहे ? परंतु समजुती अजून यायचेच आहे. जोवर दुसर्याच्या आत्म्याची प्रतिष्ठा आपणांस कळली नाही तोवर स्वातंत्र्याचा अर्थ आपणांस कळला असे मी तरी म्हणणार नाही.