श्रीमन्महागणाधिपतये नमः ॥

सजयतिसिंदुरवदनोदेवोयत्पादपकंजस्मरणम् ॥

वासरमणिरिव तमसांराशिंनाशयतिविघ्नानाम् ॥१॥

याकुंदेंदुतुषारहारधवलायाशुभ्रवस्त्रावृता, यावीणावरदंडमंडितकरायाश्वेतपद्मासना ॥

याब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदावंदिता, सामांपातुसरस्वती भगवतीनिःशेषजाडयापहा ॥२॥

मूकंकरोतिवाचालं पंगुंलंघयतेगिरिम् ॥यत्कृपातमहंवंदेपरमानंदमाधवं ॥३॥

यंब्रह्मावरुणेंद्ररुद्रमरुतः स्तुन्वंतिदिव्यैः स्तवैर्वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायंतियंसामगाः॥

ध्यानावस्थिततद्गतेनमनसापश्यंतियं योगिनोयस्यांतंनविदुः सुरासुरगणादेवायतस्मै नमः ॥४॥

गुरुर्बह्मागुरुर्विष्णुर्गुरुर्देवोमहेश्वरः ॥ गुरुरेवपरंब्रह्मतस्मैश्रीगुरवेनमः ॥५॥

वसुदेवसुतंदेवंकंसचाणूरमर्दनम् ॥ देवकीपरमानंदंकृष्णंवंदेजगद्‌गुरुम् ॥६॥
इति नमनं समाप्तम् ॥

॥पद॥

कृष्णपदारविंदसदाहृदयींधरी ॥ मना कृष्णपदारविंद० ॥ध्रु०॥

निरसितभवबंधनासि ॥ करित त्वरित कंदनासी ॥

पुरवि काम पूर्णकाम ॥ सकलसंकटासिहरीरे ॥ मना कृष्णपदा०॥१॥

सतत स्मरत नंद ज्यास ॥ स्तवितिअमरवृंदज्यास ॥ वदतशेषगुणविशेष ॥

नकळेअंतपारपरीरे ॥ मना कृ० ॥२॥
मायिकसकलजाइलयासी ॥ होसीकांकाइलयासी ॥

त्यजुनिसंगहेनिःसंग ॥ विनवीदासप्रेमभरीरे ॥

मना कृष्णपदारविंदसदाहृदयींधरीरे ॥३॥

भजन-राधारमणा कंसारी ॥ तारीं दुस्तरसंसारीं ॥ राधारमणा कंसारी ॥तारीं०॥

अभंग

सद्गुरुवांचोनीसांपडेनासोय ॥धरावेतेपायआधीआधीं॥१॥

आपणासारीखेकरितितात्काळ ॥ नाहींकाळवेळतयालागीं ॥२॥

लोहपरिसाचीनसाहेउपमा ॥ सद्गुरुमहिमाअगाधतो ॥३॥
तुका म्हणे कैसे आंधळेहेजन ॥ गेलेविसरुनखर्‍यादेवा ॥४॥

आदौ कीर्तनारंभाचेठायीं सत्पुरुष तुकोबा महाराज साधकांप्रत हितोपदेश करितात. बाप हो, ह्या भवसागरापासून तरुन जावें व जन्ममरण चुकवावें अशी जर तुमची इच्छा असेल तर त्यास अन्य उपाय नाहीं. हाच उपाय श्रेष्ठ आणि सुलभ आहे. तुकोबा म्हणतात कीं, सद्गुरुस शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरी सोय नाहीं व सांपडणेंही नाहीं. श्रीमद्भागवीं राजा परीक्षितीप्रत शुकयोगींद्रांनीं हेंच सांगितले आहे.

श्लोक

॥ तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमं ॥

शाब्दे परे च निष्णांत ब्रह्मण्युपशमाश्रयं ॥१॥

अर्थ -

उत्तम श्रेयाची इच्छा ज्यास आहे, त्या पुरुषानें वेदशास्त्रादिकांचेठायीं निष्णात म्हणजे पारंगत व आत्मविद्येच्याठायीं निपुण असून ज्यानें ब्रह्माचाच आश्रय केला आहे अशा सद्गुरुतें अनन्य शरण व्हावें, त्यावांचून दुसरी सोय सांपडणें नाहीं. ह्यास्तव तुकोबाही हेंच म्हणतात. "सद्‌गुरुवांचोनी सांपडेना सोय" गुरुवांचून जन्ममरण दूर करण्यास सोय म्हणजे मार्ग नाहीं. अज्ञानीं पाखंडी पुरुषास जसा ज्ञाता पुरुष म्हणतो कीं, सोयीवर ये सोयीनें बोल. म्हणजे मार्गावर ये, मार्गानें बोल. तुला समजून सांगण्याची सोय नाहीं. म्हणजे रस्ता नाहीं. याप्रमाणें बोलून त्यास सोयीवर म्हणजे रस्त्यावर आणितो. यावरुन सोय या शब्दाचा अर्थ मार्ग, म्हणून तुकोबांनीं सोय हें पद घातलें. गुरुवांचून मार्ग सांपडणें नाहीं. यास्तव ’धरावे ते पाय आधीं आधीं’ या द्विरुक्तीनें सांगतात कीं, गुरुचे पाय सत्वर धरावे. आतां ’आधी आधीं’ या शबदाचा अर्थ दुसरा आहे.

॥श्लोकार्ध॥

शरीरे जर्जरीभूत व्याधिग्रस्ते कलेवरे ॥

अर्थ-

शरीर हें जर्जरीभूत व्याधिग्रस्त आधिव्याधींचे अधिष्ठान तशींतही बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व अशा तीन अवस्था यास आहेत. त्यांत वृद्धावस्था प्राप्त झाली नाहीं. तशांत चित्तास प्रपंचांतील खेदादिक आधीं प्राप्त झाले नाहींत, त्या आधींचे आधीं म्हणेज पूर्वींच गुरुचे पाय धरावे. भर्तृहरि म्हणतात.

॥ श्लोक ॥

यावत्स्वस्थमिदं शरीरमरुजं यावज्जरा दूरतो,

यावच्चेंद्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुषः ॥

आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्‍नो महान्‌,

संदीप्ते भवने प्रकूपखनने प्रत्युद्यमः कीदृशः ॥१॥

अर्थ-

विदुषा म्हणजे शाहण्या पुरुषानें आपले हितास्तव मोठा प्रयत्‍न करावा. जो कालपर्यंत रोगरहित शरीर स्वस्थ आहे, वृद्धावस्था व जरा दूर आहेत व इंद्रियांची शक्ति नष्ट झाली नाहीं, आयुष्याचा क्षय झाला नाहीं, तो कालपर्यंत विद्वान् पुरुषानें आपलें श्रेय "पुनर्जन्म न विद्यते" अशा हितास्तव मोठा प्रयत्‍न करावा. तसें न करील तर ज्या प्रकारें गृहास अग्नि लागल्यानंतर विहीर खणण्याचा उद्योग करणें व्यर्थ, त्या प्रकारें अनेक साधनादि यत्‍न व्यर्थ होत. यासाठीं तुकोबांनीं आधी आधी असें पद घातलें. कोणताही प्रयत्‍न कोणत्याही कारणांत करणें तो पूर्वीं समयासच केला पाहिजे. याविषयीं गोष्ट-कोणी ग्रहस्थ नांवेंत बसून समुद्रांतून जलमार्गानें जात असतां तो नावेचे कडेवर बसला होता. प्रथम बसला तेव्हांच त्याचे हातांतली आंगठी दोनशें रुपये किंमतीची हातांतून गळून पाण्यांत पडली. तेथें उदक थोडें असून ती सांपडण्यासारखी होती; परंतु तो ग्रहस्थ त्या वेळेस कोणाही जवळ न बोलतां मनांत म्हणाला कीं, नावेचे कडेवर जेथून मुद्रिका पडली, येथें खुणेकरितां बोट लावून ठेविलें, आणि उतरतेसमयीं नावाडयास खूण दाखवून मग मुद्रिका काढावी, असें योजून तो खुणेकरितां बोट लावून बसला. नंतर सुमारें दोन प्रहरांनीं नावाडयानें ती नाव दुसरे बंदरीं नेऊन लाविली. वरील उतारु उतरुं लागले, तेव्हां तो गृहस्थ नावाडयाला म्हणाला कीं, माझी मुद्रिका पाण्यांत पडली आहे ती काढून दे. म्हणजे मी तुला एक रुपया बक्षीस देईन. नावाडी म्हणाला केव्हां आणि कोठें पडली ? तेव्हां त्या गृहस्थानें सांगितलें कीं, दोन प्रहर झाले. जेथून पडली तेथें मी खुणेकरितां अद्यापि बोट लावून ठेविलें आहे. तेथेंच उदकांत पडली. असें ऐकून नावाडी म्हणाला अरे गृहस्था, दोन प्रहरांत नाव पंचवीस कोस निघून आली, आणि तुझी मुद्रिका पडली तें ठिकाण तर पंचवीस कोस मागें राहिलें. त्याच वेळेस जर कळविलें असतेंस तर माझा यत्‍न चालला असता. गृहस्थ म्हणतो, मी शाहाणपणानें खूण धरुन बसलों आहें. या बोटाखालीं पाण्यांत मुद्रिका आहे. नावाडी म्हणतो या शाहाणपणास काय म्हणावें. जेथून पडली ती खूण तूं धरलीस पण जेथें पडली ती जागा पंचवीस कोस मागें राहिली. आतां त्यास प्रयत्‍न चालणें नाहीं. या प्रकारें समय निघून गेल्यावर उपाय नाहीं. यास्तव तुकोबा म्हणातात, ’धरावे ते पाय आधी आधीं. ’ मोठे मोठे श्रेष्ठ ज्ञातेही सद्गुरुस अनन्य शरण गेले. नरदेहास येऊन गुरुला शरण गेला नाहीं त्याचें जिणें व्यर्थ होय. याअर्थीं मोरोपंत म्हणतात.

॥आर्या॥

सद्गुरुवांचुनि वांचुनि विफळ जिणें व्यर्थ यांत वांकडें काय ॥

शुक सांगे भागविला कृष्णें वाहोनि लांकडें काय ॥१॥

शुक परीक्षितीप्रत म्हणतात, सद्‌गुरुसी शरण गेल्या व्यतिरिक्त जो पुरुष वांचला त्याचें जिणें ह्म० जगणें व्यर्थ. यांत वांकडें काय ? तर वांकडें नाहीं; कारण संदीपन ऋषि यांस श्रीकृष्णानें गुरु करुन त्यांचें घरी लांकडें वाहून काय ह्म० देह भागविला (कष्टविला) मग इतर जनांची काय कथा सांगावी. मानपुरी साधु म्हणतात रेक्ता---मृगनाभ सुगंध भरे भटके सूंगत चील उदासी ॥

घटमो नट आप विराजे मूरख कहे अबिनाशी देहेके देयको भेद न जानो कैसी कटे जमपाडी ॥

कहत मानपुरी गुरु --- ग्यानबिना मीन मरे जलमेहि प्यासी ॥१॥

अर्थ-

मृगाचे नाभींत कस्तुरी असून तो गुरुवाक्यज्ञानहीन यास्तव सुवास कोठून येतो हें पहात तृणें हुंगीत उदासीन भटकतो, तसाच घटांत बिंबलेला सूर्य अविनाशी आहे असें मूर्ख म्हणतो. देहांतील देव न जाणतां गुरुवांचून यमपाश कसा तुटेल ? तसेंच उदकांत मीन म्ह० मत्स्य असतां गुरुज्ञानहीन तृषेनें मरतो. सारांश गुरुवांचून कोणासही परिणाम नाहीं. याजवर गोष्ट-कोणी एक चितारी तजबीर काढण्याचे कामांत अति कुशल होता. त्यानें त्या गुणावर प्रतिष्ठा आणि द्रव्य बहुत मिळविलें. तो फिरत फिरत द्वारकेस आला. त्यानें श्रीकृष्णाच्या सभेस जाऊन आपले गुणाची प्रशंसा केली; तेव्हां कृष्णानें त्यास सांगितलें कीं, माझी तसबीर काढून आण, म्हणजे तुला सहस्त्र रुपये देईन. तेव्हां त्यानें आठ दिवसांचा वायदा करुन नववे दिवशीं तजबीर हुबेहुब सर्वोत्कृष्ट काढून सभेस आणला. त्या समयीं श्रीकृष्ण दुसर्‍या तर्‍हेचें स्वरुप घेऊन त्या चितार्‍यास म्हणतात कीं,माझ्या स्वरुपाप्रमाणें तूं आणलेली तसबीर आहे किंवा कसें; हें तूंच सांग. याप्रमाणें ऐकून बिचार्‍यानें कृष्णाचें स्वरुप पाहिलें होतें त्यापेक्षां शतगुणी रुप दिसूं लागलें. तेव्हां पुनः आठ दिवसांचा वायदा मागून त्या स्वरुपाची तसबीर आणिली. त्या समयीं श्रीकृष्णानें तिसर्‍या प्रकारचें स्वरुप धरिलें. याप्रमाणें त्यांनीं त्या चितार्‍यास दहा वेल चकित केलें. त्या काळीं तो चितारी आश्चर्य मानून द्रव्य न मिळतां प्रतिष्ठेची हानि जाणून अत्यंत सखेद चिंतातूर असा मार्गानें जात असतां कोणीं एका सत्पुरुषाची गांठ पडली. त्यानें त्यास चिंताग्रस्त पाहून विचारलें कीं, तूं सखेदरुप दिसण्याचें कारण काय ? तेव्हां त्यानें सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून साधु म्हणतात कीं, कृष्ण नाटकी आहे. क्षणांत अनेक रुपें दाखवील यास्तव तुला सांगतों तसें कर. एक मोठा आदर्श म्हणजे आरसा वस्त्रांत गुंडाळून नेऊन तसबीर आणली आहे असें कृष्णास सांग आणि आरसा पुढें कर. मग त्यानें कसें ही जरी रुप धरिलें तरी आदर्शांत तसेंच दिसेल. याप्रमाणें सांगितल्यावरुन चितारी यानें तसाच आरसा नेऊन कृष्णास दाखविला. आणि म्हणाला महाराज, आपली तसबीर यांत पहावी. असें ऐकून श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुला कोणी तरी गुरु भेटला, त्यावांचून हें तुझें ज्ञान नव्हे; असें म्हणून श्रीकृष्णानें एक सहस्त्र रुपये देऊन त्याला मार्गस्थ केलें. तात्पर्य, कोणतेंही कार्य गुरुवांचून होणें नाहीं. यासाठीं तुकोबा म्हणातात---"सद्‌गुरुवांचूनि सांपडेना सोय" जन्ममरण चुकविण्यासाठीं आत्मप्राप्ति करुन घेण्यास तत्वदर्शीं अशा ज्ञानी गुरुतें शरण गेलें असतां प्रणिपातेंकरुनच ते दयाळू फलद्रूप होतात. या अर्थी मोरोपंतांची उक्ति---आर्या देती फल बहु दिवसां देव शिला काष्ठ मृन्मय प्रणतां ॥ जलमय तीर्थेंहि तशीं, संतची फलती नमोस्तु ते म्हणतां ॥१॥

अर्थ-

शिला, काष्ठ मृन्मयांदि देव, तशींच गंगा आदिकरुन जलमय तीर्थें कालेंकरुन फल देतात. आणि संत जे ते नमस्कारें करुनच तत्काल फलप्रद होतात. भगवद्गीतेंत श्रीकृष्ण अर्जुनाप्रत सांगते झाले ॥१॥

श्लोक

॥ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ॥

उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥१॥

अर्थ-

तत्वदर्शि, ज्ञानी अशा गुरुतें शरण जाऊन प्रणिपात केल्यानेंच ते ज्ञानोपदेश करितात. अथवा प्रश्न केल्यानें किंवा सेवा केल्यानें सद्‌गुरु ज्ञानाचा उपदेश करितात. भगवान्‌ गोपालकृष्णाचे चरणारविंदीं प्रीति करुन देणारा असा जो पुरुष तोच खरा गुरु जाणावा. यदर्थीं वामनपंडितांची उक्ति ॥

॥ श्लोक ॥

हे तों गुरु पापतरु म्हणावे ॥ अंधासवें अंध तसे गणावे ॥

दे कृष्णिं प्रीती गुरु तोच साच ॥

श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच ॥

अर्थ-

श्रुतीचाही इत्यर्थ असाच आहे कीं, श्रीकृष्णाचे ठायीं प्रीति देणारा तोच सद्गुरु होय. इतर गुरु ते पापवृक्ष समजावे. ज्या प्रकारें आंधळ्यास सोबती आंधाच. दोघेही खांचेंत पडणारे, त्या प्रकारें इतर गुरु आणि शिष्य उभयतां अधःपातास जाणारे होत. याजवर

॥पद॥

गुरुजी या परिचे या परिचे ॥

शिष्य शिटाव बंद्रीचे ॥ध्रु॥

गुरुजी भांग तमाखू मागे ॥

शिष्या वाण्याचें घर सांगे ॥गुरुजी० ॥

गुरुजी मागे पाणी ॥

शिष्या दुरुन दावी पाणी ॥गुरु० ॥२॥

गोष्ट- कोणा एका पाटलाचा कुलगुरु गोसावी घरीं आला. तेव्हां पाटलानें विचार केला कीं, गुरुजीस भेटावें तर गुरुची वार्षिक दक्षिणा सव्वा रुपया द्यावी लागते. यास्तव चावडींत खोडा आहे त्या खोडयांत जाऊन पडावें. म्हणजे गुरुजी हें वर्तमान ऐकून निघून जातील. असें मनांत योजून चावडीवर आला. आणि अंमलदाराचें आर्जव करुन म्हणाला कीं, दोन घटका मला खोडयांत घालावें, माझें कार्य होत आहे. तेव्हां त्यानें परवानगी देऊन शिपायाचे हातून त्यानें दोन्ही पाय खोडयांत घालावें, माझें कार्य होत आहे. तेव्हां त्यानें परवानगी देऊन शिपायाचे हातून त्यानें दोन्ही पाय खोडयांत अडकवून टाकले. गुरुजी त्याचे घरीं येऊन चौकशी करितात तों शिष्य खोडयांत पडल्याचें समजलें. त्यावरुन गुरुजी निघून दुसरे गांवांस गेले. इकडे चार घटिका गेल्यावर कोतवालास पाटील म्हणूं लागला कीं, माझें कार्य झालें, आतां मला सोडा. कोतवाल म्हणतो, खोडयांत घालण्यास मला हुकूम आहे; पण काढण्यास वरिष्ठ अंमलदाराचा हुकूम पाहिजे, त्यास पांच रुपये खर्च लागतो. असें ऐकून तो मोठया संकटांत पडला. निरुपायास्तव पांच रुपये देऊन सुटून आला. सव्वा रुपयासाठीं पांच घालविले, पण गुरुस पैसा दिला नाहीं. असे गुरु आणि शिष्य पुष्कळ आहेत, त्यांना काय करावयाचें आहे. उभयतांही सुपात्र पाहिजेत. कबीर म्हणतात

॥पद॥

सोही कच्चाबे कच्चाबे ॥

नही गुरुका बच्चा ॥ध्रु॥

गुप्त होकर प्रगट जावे ॥

गोकुल मथुरा कासी ॥

ब्रह्मरंध्रसे प्राण निकाले ।

सत्य लोकका वासी ॥सोही० ॥१॥

अनेक प्रकारचीं साधनें केलीं तथापि आत्मज्ञानावांचून मोक्ष नाहीं, यदर्थी

॥श्लोक॥

नानाशास्त्रं पठेल्लोको नानादेवं च पूजयेत्‌ ॥

आत्मज्ञानं विना पार्थ मुक्तिर्नास्ति न संशयः ॥

अर्थ-

गर्भगीतेंत भगवान् अर्जुनाप्रत सांगतात. नानाशास्त्रें पठत केलीं, नानाप्रकारें देव प्रसन्न केले, तथापि आत्मज्ञानावांचून मोक्ष नाही. तें आत्मज्ञान गुरुस शरण गेल्यावांचून होणें नाहीं; यास्तव तुकोबा म्हणतात, अभंग-सद्‌गुरुवांचूनि सांपडेना सोय ॥ सद्‌गुरु अनुग्रहावांचून देवाशीं नित्य संभाषण असलें तरी तें व्यर्थ होय.

॥आर्या॥

सद्‌गुरुअनुग्रहाविण हरिला तो कठिण सर्वथा पटणें ॥

गोरासंत परीक्षी मस्तकिं हाणूनि सर्व थापटणें ॥१॥

एके समयीं गोरोबा कुंभाराचे घरीं संतांचा समाज मिळाला असतां तेथें नामदेवही येऊन बसले, तेव्हां ज्ञानोबा महाराज गोरोबास ह्मणतात कीं, येथें या समाजांत घट आहेत, यांत कच्चा घट म्हणजे कच्चें मडकें कोणतें आहे हें परीक्षून सांगावें. त्यासमयीं थापटणें हातीं घेऊन सर्व संतांच्या माथ्यावर हाणिलें, तें सर्वांनीं सहन केलें. त्यांत नामदेवाजवळ येतांच तो भयानें उठला, तेव्हां सर्वांनी कच्चा कच्चा म्हणतांच तो रागानें रुसून निघून गेला. थापटण्यास नामा भ्याला

॥आर्या॥

सांगे प्रभु मत्प्रियजरि जिंकिति रिपु जाणते न सहसाही ॥

परि त्यांस गुरुकृपेविण समदृष्टी ते न होय सहसाही ॥१॥

पांडुरंग सांगतात बापा, मला अत्यंत प्रिय असून दुःसह षड्रिपु जिंकणारे असे असतील तथापि गुरुस शरण गेल्यावांचून "वासुदेवः सर्वमिति" अशी समदृष्टि होत नाहीं. यास्तव तूं विसोबा खेचरास शरण जाऊन त्यास गुरु कर. अशीं देवाची आज्ञा ऐकून तो खेचराकडे गेला. त्याचा शोध करीत असतां तो विसोबा एका शिवालयांत जोडयासहीत पिंडीवर पाय ठेवून निजला आहे, तें पाहून नामा म्हणतो कीं, देवावर पाय ठेवणारा असा अज्ञानी गुरु मला देवानें कसा सांगितला. नंतर त्यास जागृत करुन म्हणतो, महाराज, पिंडीवर पाय ठेविले हें काय ? तेव्हां विसोबा म्हणतो, मी वृद्ध थकलों आहें. माझ्यानें पाय उचलवत नाहीं. यास्तव तूंच पाय उचलून देव नसेल तेथें ठेव. असें ऐकून नामदेवानें त्याचे पाय उचलून दुसरे ठिकाणीं ठेविले, तों तेथेंही पिंडी दिसूं लागली. तेव्हां तिसरे जागीं ठेविले, तों तेथेंही पिंडी दिसूं लागली. याप्रमाणें सहा ठिकाणीं ठेविले, तितकेही जागीं पायांखालीं पिंडी पाहून नामा विस्मय पावून उमजला. आणि साष्टांग प्रणाम करुन अनन्य शरण गेला. तेव्हां विसोबा खेचरानें त्याचे मस्तकीं हात ठेवून ’ आब्रह्मस्तंबपर्यंतं वासुदेवः सर्वमिति’ या प्रकारें नामदेवाचे हृदयीं बोध ठसविला. नंतर नामदेवाची परीक्षा पहावी म्हणून कोणे एके दिवशीं पांडुरंगानें श्वानाचें रुप धरुन नामदेव स्वयंपाक करीत असतां तेथें येऊन सर्व रोटया तोंडांत धरुन पळ काढिला. तें पाहून नामदेवानें मनांत आणिलें कीं, श्वानाचे हृदयीं पांडुरंगच आहे. असें जाणून तुपाची वाटी हातीं घेऊन श्वानाच्या मागें लागला, आणि तोंडानें म्हणतो देवा, कोरडी रोटी कशासाठीं खातोस. हें तूप घे, आणि त्याजबरोबर खा. असें क्रोधरहित मनःपूर्वक भाषण ऐकून पांडुरंगानें स्वरुप प्रगट करुन दर्शन दिलें. आणि सांगितलें कीं, तूं कच्चा होतास तो आतां गुरुकृपेनें पक्का झालास. यास्तव तुकोबा म्हणतात.’सद्‌गुरुवांचूनि सांपडेना सोय’ कपिलगितेंत कपिलमहामुनि म्हणतात

॥श्लोक॥ अनेक जन्मसंस्कारात् सद्‌गुरुः सेव्यते बुधैः ॥

संतुष्टः श्रीगुरुर्देव आत्मरुपं प्रदर्शयेत् ॥

॥अर्थ॥

अनेक जन्मसंस्कारांचे योगानें बुधजन सद्‌गुरुस शरण होतात. त्यांच्या पूर्व सुकताचा सांठा असल्यानें गुरुदेव संतुष्ट होऊन आत्मस्वरुप दाखवितात. तुकोबा म्हणतात.

’आपणासारीखें करिति तात्काळ ॥

नाहीं काळवेळ तयांलागीं ॥१॥

उपदेशाच्या योगानें श्रवण, मनन, निदिध्यासन हीं कर्में करुन प्राप्त होतात. निदिध्यासानें प्राणी सहजीं तद्रूप होतो. यास दृष्टांत--

भ्रमरः कीटकं न्यस्य अन्यस्थानं प्रतिष्ठते ॥

कीटके भ्रमरध्यानात् साक्षाद्भमरता भवेत् ॥१॥

जसा कीटक आणून आपले कोठयांत ठेवितो, आणि त्यास अहोरात्र दातांनीं टोंचितो. तो बाहेर भ्रमण करावयास गेला, तथापि त्याच्या टोंचण्याच्या भयानें कीटकास त्याचेंच ध्यान लागून त्या ध्यानाचे निदिध्यासानें तो कीटक तद्रूप म्हणजे भ्रमररुप होतो. त्या प्रकारें सद्‌गुरुवाक्यबोधें आत्मचिंतनेंकरुन मनाचे सर्व व्यापार राहून तो प्राणी आत्मरुपच होतो. आत्मरुप असतां मायेच्या भ्रमानें झालेली अनात्मता सद्‌गुरु दूर करितात. याजवर गोष्ट-कोणी एका प्रुउषानें कुट्र्याचे पिलांत वाघाचें पिलूं वाढविलें. तें कुत्र्यांच्या बरोबर शिकारीस गेलें असतां अरण्यांत वाघाची गांठ पडली, तेव्हां तें कुत्र्यासारखें पळूं लागलें. तेव्हां त्यास वाघ म्हणतो, अरे तूं कोण आहेस ? पिलूं म्हणतें, मी कुत्रा आहें. वाघ म्हणतो, अरे मूर्खा, कुत्र्याचे अवयव कसे आहेत आणि तुझे कसे आहेत ते पहा. माझे हात, पाय कान, पुच्छादिक व वर्ण हीं जशीं आहेत तशींच तुझींहि आहेत. असें तो म्हणतांच त्या पिलानें त्याकडे व आपलेकडे पाहिलें. तेव्हां कुत्रा नसून मी वाघच आहे असें त्यास खचित वाटलें याप्रमाणें आत्मस्वरुप गुरु दाखवितात. यास्तव तुकोबा म्हणतात---’सद्‌गुरुवांचूनि सांपडेना सोय’ सद्‌गुरुच्या कृपेंकरुन नानाविध दुःखें तशींच संकटें यांचा परिहार होऊन उत्तम गति प्राप्त होते. शिवयोगी गुरुच्या कृपेंकरुन वज्रबाहुराजाचा पुत्र भद्रायु नामेंकरुन दुःखविरहित होऊन शिवसायुज्यता पावला, त्याची सत्कथा स्कंदपुराणांतर्गत सूत शौनकादिक ऋषींप्रत सांगते झाले. तेंच निरुपण गद्यपद्ययुक्त श्रोत्यांप्रत कविजन कथिताहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel