"श्रेयस, या वर्षी देखील बेस्ट परफॉर्मन्सचा पुरस्कार तुम्हालाच मिळणार आहे. मला पूर्ण खात्री आहे." दीपिका म्हणते.
"हो. मला देखील पूर्ण खात्री आहे. चल आता आपल्याला निघायला हवं. पुरस्कार सोहळा दोन तासांत सुरु होईल." श्रेयस म्हणतो.
"हो बाबा. आधी देवाच्या पाया पडा. देवाला सांगा, या वर्षीचा पुरस्कार देखील मलाच मिळू दे." दीपिका म्हणते.
"पाया पडतो. पण पुरस्कार कुणाला मिळेल हे आधीच ठरलं आहे. आज फक्त तो जाहीर होणार आहे." श्रेयस गंमतीने म्हणतो.
"बघा हा, देवाच्या बाबतीत मस्करी नको." दीपिका जरा खेकसतच म्हणते.
"बरं बाबा. देवा, या वर्षीचा पुरस्कार मलाच मिळू दे." श्रेयस म्हणतो आणि दीपिका त्याच्याकडे बघून स्मितहास्य करते.
"श्रेयस? दीपिका? चला लवकर. आपल्याला उशीर होतोय." श्रेयसची आई बाहेरून आवाज देते. दोघे देवाच्या पाया पडून बाहेर येतात.
"नमस्कार करते आई, यांना पुरस्कार मिळावा म्हणून देवाला प्रार्थना करत होतो." आईच्या पाया पडत दीपिका म्हणते.
"हे बरं केलंस. आता बघ, या वर्षीचा पुरस्कार देखील श्रेयसलाच मिळेल. तू घरात आल्यापासून सगळं किती चांगलं होतंय बघ..." आई म्हणते.
"चला... चला... उशीर होतोय तुम्ही दोघी गाडीमध्ये बसून बोला. बाहेर गाडी उभी आहे, चला लवकर. मी बाबांच्या फोटोच्या पाया पडून येतो." श्रेयस देवघरातून बाहेर निघत म्हणतो.
तिघेही वेळेवर हॉलवर पोहोचतात. श्रेयस काम करत असलेल्या कंपनीमध्ये दरवर्षी पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. कंपनीच्या २६ ब्रांचेस मधून उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. सलग ४ वर्षे हा पुरस्कार श्रेयासला मिळत होता. या वर्षी देखील हा पुरस्कार त्यालाच मिळेल याची अनेकांना खात्री होती.
मनमिळाऊ स्वभाव, मेहनत, काम करत तत्परता दाखवणे, सर्व ब्रांचेस एकमेकांना जोडणे, काम सोपे करणे, कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण ठेवणे, त्यांना सतत प्रोत्साहित करणे आणि कंपनीचा टर्नओव्हर वाढता ठेवणे, या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण कंपनी श्रेयासचा आदर करत होती.
पुरस्कार सोहळा सुरु होतो आणि या वर्षीचा पुरस्कार देखील श्रेयसला मिळतो. त्याला स्टेजवर बोलावण्यात येतं. कंपनीचे संस्थापक त्याला पुरस्कार प्रदान करतात. श्रेयस पुरस्कार स्वीकारत त्यांचे आभार मनात आपले मनोगत व्यक्त करतो,
"दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा पुरस्कार देखील मी बाबांना समर्पित करतो. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. त्यांनी मला फक्त एकाच गोष्ट शिकवली, ती म्हणजे 'कर्म करत रहा आणि स्वतः त्यांच्यावर प्रेम करा. मग ते काहीही असो, आपण करू शकत नाही असं या जगात काहीही नाही, फक्त थोडी मेहनत आणि थोडे प्रयत्न हवे असतात. यश तुमच्या पायाशी असेल.' त्यांची हीच शिकवण मी आत्मसात केली आहे. मी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी दिवसरात्र काम केलं. कधी वाईट मार्ग वापरला नाही, जे काही त्यांनी माझ्यासाठी केलं ते चांगल्या मार्गाने केलं आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझं काम करत असतो." एवढं बोलून श्रेयस आपले दोन शब्द संपवतो. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित सर्वजन त्याचे अभिनंदन करतात.
सोहळा संपल्यानंतर श्रेयस, त्याची आई आणि दीपिका व्यवस्थापनातील सर्वांची भेट घेऊन तिथून निघतात. श्रेयसची आई आणि दीपिका गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसतात आणि श्रेयस गाडी चालवतो.
"अहो, सकाळी म्हणाले होते ना! तुम्हालाच पुरस्कार मिळेल. बघा, तुम्हालाच पुरस्कार मिळाला." दीपिका म्हणते.
"देवाला आणखी काही म्हणाली होतीस का तू?" श्रेयसची आई म्हणते.
"नाही, पण सत्यनारायणाची पूजा ठेवावी आणि ब्राम्हण भोजन ठेवावं असं वाटतंय मला." दीपिका म्हणते.
"वा वा वा सुनबाई. खूप चांगली कल्पना आहे. देवाने आपल्यासाठी एवढं काही केलं, आपण त्यांच्यासाठी एवढं तरी करू शकतो." श्रेयसची आई म्हणते.
"खरंच, आता तर वाटतंय सोमवारचे उपवास पुन्हा सुरु करायचे. शेवटी १६ सोमवारचे व्रत केले म्हणून यांच्याशी लग्न झालं ना! महादेवाने घडवलं यांना." दीपिका म्हणते.
दोघींच्या गप्पा रंगत असतात आणि इथे श्रेयसच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
"घाम गाळला माझ्या बाबांनी, स्वतः शिकलेले नव्हते तरी त्यांनी मला शिकवलं, परिस्थिती नसताना इंग्रजी शाळेत शिकवून मला त्यांनी लहानाचं मोठं केलं, ते राहिलं बाजूला आणि या दोघींना त्यांच्यापेक्षा महादेवाने मला घडवलं असं वाटतंय? ऑफिसमध्ये १२-१२ तास काम करून टार्गेट्स पूर्ण केले, मार्केटमध्ये कंपनीची स्थिती भक्कम केली याची दखल म्हणून कंपनीने मला पुरस्कार दिला, तर तो पुरस्कार देव माझ्यावर प्रसन्न म्हणून मिळाला असं या दोघींना वाटतंय? माझ्या कामगारांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना शाबासकी देण्याऐवजी ब्राम्हणांना जेवण का म्हणून द्यायचं? ती देखील माणसंच आहेत, त्यांना जेवण देण्यापेक्षा एका गरिबाला जेवण दिलेलं बरं. आता या गोष्टीवर या दोघींना समजावलं तरी काही उपयोग नाही, परत देवाला बोललो म्हणून माझ्यावर रुसून बसतील. देवावर इतकं देखील अवलंबून राहणं बरं नाही. देवाला हीच कामे आहेत का? देवावर श्रद्धा ठेवा पण उठता बसता देव? हीच आपली सद्सद्विवेकबुद्धी आहे का? असो, जे चाललंय ते चालू देत, मला माझ्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे..."
"बेटा श्रेयस...?" श्रेयसची आई त्याला आवाज देते.
"हा आई?" श्रेयस म्हणतो.
"कुठे हरवला आहेस? गाडी चालवताना जास्त विचार करू नकोस, रस्त्यावर लक्ष दे. आणि घाबरू नकोस, आपल्याला काही होणार नाही, दीपिका मृत्युंजय मंत्र म्हणते आहे." श्रेयसची आई म्हणते.
"हो आई, काळजी घेतो. मला काही सांगायचं होतं का?" श्रेयस म्हणतो.
"हो, अरे तुला पुरस्कारामध्ये जी रक्कम मिळाली आहे ती तू आपल्या कुलदेवतेला दान करावी असं मला वाटतंय." श्रेयसची आई म्हणते.
"अगं आई, मी ती रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार होतो." श्रेयस म्हणतो.
"शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी सरकार आहे. आपल्या देवाला आपण नाही बघणार तर कोण बघणार? ते काही नाही, तू ती रक्कम आपल्या कुलदेवतेला दान कर." एवढं बोलून त्याची आई देखील हातात रुद्राक्षाची माळ घेऊन मंत्र म्हणू लागते.
श्रेयसच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरु होतं, "एका सुशिक्षित हायर क्लास मराठी माणसाच्या घरात हि अवस्था आहे तर मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरी काय अवस्था असेल? गरीब मराठी माणसाच्या घरात काय अवस्था असेल? इतका देवभोळेपणा? मी रोज सकाळी कोणताही लोभ न ठेवता देवाची आराधना करतो, कारण माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आणि हा समाज? स्वतःवरचा विश्वास इतका उडाला आहे कि, पावला पावलावर देवाचं नाव घेत बसले आहेत सगळे. मी विज्ञाननिष्ठ असलो तरी काही करू शकत नाही, कारण बाबा म्हणाले होते आईची प्रत्येक इच्छा पूर्ण कर आणि आईची इच्छा हि आहे कि आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला मदत नको करूस, देवाला मदत कर. एक कळत नाही, आपण देवाला बघायचं कि देवाने आपल्याकडे? मोठमोठ्या इमारती बांधून काही उपयोग नाही, आधी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या आपल्या समाजाची हि मानसिकता पुढची ५० वर्षे तरी बदलणार नाही हे नक्की." मनातल्या मनात स्वतःशीच बोलत श्रेयस गाडी चालवतो.