आरण्यक : हिमालय मर्डर मिस्ट्री

OTT प्लॅटफॉर्म मुळे भारतीय मनोरंजनाच्या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. रद्दी बॉलिवूड च्या उथळ हिंदी मनोरंजनाला पर्याय म्हणून उच्च दर्जाचे कार्यक्रम येत आहेत. दुसरी एक बाजू आवडली कि ह्यांत अनेक नवीन चेहेर्याना चांगली संधी मिळते.

पहाडी प्रदेशांतील गुन्हे हे एक वेगळेच genre आहे. पहाडी प्रदेशांत तुम्ही राहत असाल तर तसे का असावे ह्याचा साधारण अंदाज तुम्हाला येईल. बहुतेक पहाडी प्रदेश हे मागासलेले असतात, लोकवस्ती तुरळक आणि सर्व लोक एकमेकांना ओळखतात त्यामुळे तिथले गुन्हे सुद्धा छोटेच असतात. त्याशिवाय अश्या हवामानात एकमेकांची मदत केल्याशिवाय जगणे कठीण त्यामुळे प्रामाणिकपणा आपोआप स्वभावांत येतो. पहाडी प्रदेशांतील लोक म्हणूनच थोडे प्रामाणिक आणि साधे भोळे वाटतात. रस्किन बॉण्ड पासून सत्यजित रे पर्यंत अनेकांनी पहाडी प्रदेशांतील गुन्हे ह्यावर कथा लिहिल्या आहेत. ब्लु अम्ब्रेला सारखा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट सुद्धा शेवटी एका गुन्ह्यांवर आधारलेला होता.

गूढ आणि हिमालय ह्यांचे नाते जणू दैवीच आहे. आरण्यक हा चित्रपट त्यावरच आधारित आहे. रविना टंडन ची कस्तुरी नावाची इन्स्पेक्टर सुट्टीवर जाणार असते म्हणून तिची जागा घ्यायला अंगद हा नवीन दरोगा येतो (परंब्रत चॅटर्जी). आणि त्याच वेळी एक फ्रेंच टीनएजर मुलगी त्यांच्या शहरातून गायब होते. तिची फ्रेंच माता बरीच गोंधळ घालते आणि सुंदर ह्या तिच्या देशी बॉयफ्रेंड चा सुद्धा खून होतो. कस्तुरीचे श्वशुर निवृत्त हवालदारसाहेब (आशुतोष राणा) ह्यांत निवृत्त असून सुद्धा लक्ष घालतात. त्यांच्या मते हा खून नर-तेंडुआ म्हणजे कधी माणूस कधी वाघ ह्या प्राण्याने केलेला असू शकतो. २० वर्षे मागे ह्याने अनेक स्त्रियांचा बलात्कार करून त्यांना फासावर लटकावले होते.

अंगद आणि कस्तुरी दोघांनाही ह्या भाकडकथेवर विश्वास नसतो. कस्तुरी आणि तिचे पती ह्यांच्यातील संबंध ताणले जातात. कस्तुरीची टीनएज मुलगी आणि बंटी हा टुरिस्ट गाईड चे प्रेम जमते. आणि जेंव्हा मृत एमी ची शरीर सापडते तेंव्हा तिच्यांत बंटीचे वीर्य सापडते आणि बंटी सुद्धा गुन्हा कबुल करतो.  

अंगद आणि कस्तुरीला मात्र हे बरोबर वाटत नाही, काही गोष्टीचा हिशेब लागत नाही आणि जेंव्हा कोडे उलगडू लागते तेंव्हा सर्वच मंडळी संशयाच्या भोवऱ्यात सापडतात.

मजेदार गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण कथानकात कुठलेही पात्र काळे गोरे वाटत नाही. कांती हा जगदंबा ह्या भ्रष्ट स्त्री नेत्याचा मुलगा कांती आधीच बलात्कार आरोपांत जेल मध्ये आणि गुन्ह्याच्या दरम्यान तो पॅरोल वर बाहेर आलेला असतो त्यामुळे तोच आधी गुन्हेगार वाटतो. जगदंबा हि भ्रष्ट व्यक्ती असल्याने तिच्याबद्दल कुणाला सहानुभूती वाटेल हे शक्यच वाटत नाही. आशुतोष राणा नर तेंदुआ च्या मागावर असतात, ह्यांत थोडा ट्वीन पिक्स स्टाईल गूढ आणण्याची त्यांची धडपड थोडी कृत्रिम वाटते. माझ्या मते नरतेंदुआ ची लोक कथा छान गुंफण्यात आली असली तरी जादुई मश्रूम्स ची काहीही गरज नव्हती. हिमालयन दृश्ये अतिशय नेत्रदीपक वाटतात. लहान मुलांची ऍक्टिंग आऊट ऑफ द वर्ल्ड झाली आहे.

माझ्या मते रविना टंडन च्या संपूर्ण कारकिर्दीतील हा अभिनय कदाचित सर्वोत्तम असावा. परंब्रत चॅटर्जी सुद्धा अत्यंत जबरदस्त अभिनेते आहेत.

कथानक रोचक आहे आणि नक्की पाहण्याजोगे आहे.