चिनीयुद्धभूमीवरील एक आगळा अनुभव - शैलेश दामले

हिंदुस्थान आणि चीन यांच्यात १९६२ सालचे युद्ध, १९६७ साली झालेली चकमक आणि नुकतीच लडाखमधील गलवान येथे झालेली चकमक या प्रसिद्ध आहेत एरव्ही काही चकमकी झाल्या असल्या तरी त्यांची माहिती बाहेर आलेली नाही. ती सैन्याच्या कागदपत्रात झाकली आहे.

१९६२ साली २० ऑकटोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान चिनी आणि हिंदुस्थानी भाई भाई न राहता एक भीषण युद्ध झालं. वास्तविक चीन हा हिंदुस्थानचा कधीच शेजारी नव्हता. अनेक शतके तिबेट हा देश आपला शेजारी होता. आज भूतान या देशाच्या संरक्षणाची जबाबदारि हिंदुस्थान पार पाड्त आहे. तीच जबाबदारी ही हिंदुस्थानच्या सरकारची तिबेट बद्दल होती. ऑकटोबर १९५० मध्ये चीनने तिबेटवर हल्ला करून तो देश आपल्या अधिपत्याखाली आणायला सुरुवात केली. हिंदुस्थानातील तत्कालीन राज्यकर्त्यांनी नादानपणा करून तिबेटच्या रक्षणाची जबाबदारीकडे डोळेआड करून षंढपणा दाखवला. त्याची परिणीती १९६२ च्या युद्धात आणि हिंदुस्थानच्या नामुष्कीत झाली. त्याने झालेली जखम आजही अधून मधून डोके वर काढत आहे.

हिंदुस्थानची उत्तर पूर्व सीमा ही अनेक हिमालयीन डोंगर रांगांनी व्यापलेली आहे. तिबेटमधून येण्यासाठी तेथे दळणवळण फक्त पायवाटा मार्फत होत असे. एक पायवाट जी लोहित नदीच्या काठाने आहे. याच लोहित नदीला हिंदुस्थानात आपण ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखतो. याच पायवाटेवर हिंदुस्थानच्या हद्दीत २० मैल आपल्यावर ब्रह्मपुत्रेच्या काठावर वौलॉन्ग नावाचे एक छोटेसे खेडे आहे. आज वौलॉन्ग अनेक लोकांच्या माहितीत नाही पण १९६२ साली वौलॉन्ग येथे एक भीषण लढाई झाली होती.

आजच्या अरुणाचलच्या (तत्कालीन नेफा) सपाट भूमीवरून वौलॉन्ग येथे पोहोचण्यासाठी एक महिना लागायचा असा हा प्रदेश आहे. तेथे कधीतरी जाणारी पेट्रोलिंग टीम असे. पण प्रदेश बिकट असल्याने आणि दळणवळणासाठी तुटपुंजी साधने असल्याने पेटोलिंग टीम मधील काही सैनिक दरीत पडून किंवा ब्रह्मपुत्रा नदीत वाहून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. युद्धाला सुरुवात झाल्यावर चीनने अनेक ठिकाणी सरहद्दीवर हल्ला चढवला असला तरी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाने येणाऱ्या मार्गावर मात्र सुरुवातील काहीच हालचाल नव्हती. मात्र सरहद्दीपलीकडे काही मोर्चेबांधणी झाली आहे याची बातमी पेट्रोलिंग टीम आणि काही सरहद्दीवरच्या गावकर्यांनी आणली होती. त्यामुळे हिंदुस्थानी सैन्याची एक टोळी वौलॉन्ग येथे नेली. एकेदिवशी चिनी सैनिकांनी वौलॉन्ग येतील टोळीवर जबरदस्त हल्ला केला. विषमतेची लढाई होती. हिंदुस्थानी सैनिक यांच्याजवळ फार मर्यादित दारुगोळा होता आणि बंदुका या कालबाह्य (Outdated) झालेल्या होत्या. तसेच हाडे फोडणाऱ्या थंडीत पुरेसे कपडे आणि पायताणे (Shoes) पण नव्हती. अश्या विषम परिस्थितीत हिंदुस्थानी सैन्याने भयंकर लढत दिली. पण एका मर्यादेनंतर त्यांना हार मानायला लागली. वौलॉन्ग येथील सैनिकांना कैद केले गेले.

२१ नोव्हेम्बरला युद्ध संपल्यावर चिनी सैन्याने सर्व कैद्यांना एकत्र जमवले. हे कैद केलेले सैनिक युद्धानंतर साधारण सात ते आठ महिने चीनच्या ताब्यात होते. नेमके ते कुठल्या स्थानी होते याची खबर हिंदुस्थानी सैनिकाना दिली नाही. रोज सकाळ संध्याकाळ सैनिकांना बराकीतून बाहेर आणत. तेथे तांदूळ आणि डुक्कराचे मांस (Pork) हा शिधा आणून देत तेथे काही सैनिक चूल मांडून हा शिधा शिजवून सगळ्या कैद सैनिकांना वाढत असत.

अनेक चिनी कमांडर येत असत आणि आपल्या सैनिकांना तुच्छतेने वागवून त्यांचा देश किती चांगला आहे याचे प्रवचन देत असत. पुढे दोन देशातील करारानंतर या युद्धकैद्यांना हिंदुस्थांचा सरकारच्या हवाली केले गेले.

तत्कालीन सरकार हिंदी चिनी भाई भाई या अफूच्या गुंगीत मश्गुल होतं. युद्धाची कसलीच तयारी केली नव्हती तरीही हिंदुस्थानचे सैनिक शस्त्रबळाची कमी असली तरी हिरीरीने लढले. ही आठवण एका युद्धकैद्याने लिहून ठेवली आहे.

१९६२ साली लढलेल्या सर्व सैनिकांना माझे दंडवत

शैलेश दामले

१६-जानेवारी-२०२२

संदर्भ

१. वौलॉन्ग एका युद्धकैद्यांची बखर - कर्नल श्यामकांत चव्हाण

२. 1962 The War That Wasn't - Shiv Kunal Verma.