तेथे कर माझे जुळती

दिनांक:- १५-४-२०२१
स्थळ :- इस्पितळ
वेळ:- रात्री ११.३०ची

एकदम दोन सिस्टर , मावशी आणि ड्युटीवर नव्यानच आलेली लेडी डॉक्टर यांच्या बडबडण्यानं माझी झोपमोड झाली . माझ्या पायश्याशी त्या बेडचं उसं येत होतं तरीही दोन्हींच्या मधे पाच फूट अंतर पण होतं. म्हणजे मी डाव्या कुशीवर झोपलो असेन तर मला त्या बेडसमोरचा आँक्सीजन माँनीटरच काय पण त्यावरचे आकडे आणि छातीचे ठोके दाखवणारी रेघही स्पष्टपणे दिसत होती .त्या ठिकाणची प्रत्येक हालचाल सहज दिसत होती.  गायकवाड नावाचा वयस्कर पेशंट होता तो सिरीयस झाला होता त्यामुळे होती ती गडबड .मावशी आमच्यासमोरच मिंनतवरी करुन भरवायच्या पण अक्षरशा: १-२ चमजे पेक्षा जास्त खात नव्हता म्हातारा.  त्यांन गेल्या चार पाच दिवसात खाणं टाकलं होतं शिवाय आँक्सीजन मास्क पण सारखा काढून टाकायचा . आँक्सीजन पातळी ८० च्या पण बरीच खाली गेली होती आणि छातीचे ठोके दाखवणारी रेघही आता पूर्वीसारखे चढउतार दाखवर नव्हती सगळंच मंदावताना दिसतं होतं .  सिस्टरनी ICU मधील डॉक्टरना बोलवून घेतलं होतं. चर्चेवरुन कळलं की त्या पेशंटच्या घरची सर्व म्हणजे मुलगा सून वगैरे पाँझीटिव्ह व होमकाँरंटाईन होती. म्हताऱ्याची स्थिती यापूर्वीच मुख्य डॉक्टर नी घरच्यांना सांगीतली होती . पेशंट रिस्पॉन्स करत नाही त्यांना घरी जायचं आहे पण पेशंट कोव्हिडचा असल्यामुळं  घरच्यांची आणि डाँक्टरांचीही असमर्थता होती. तुमच्याकडून होईल तेवढं करा इथपर्यंत विषय गेला होता. पेशंटनं आँक्सीजन मास्क काढू नये म्हणून आता हात बांधून ठेवले गेले आणि यापेक्षा जास्त काही शक्य नाही सकाळपर्यंत वाट पहाण्याची भुमिका घेत पांगापांग झाली.

बाकीच्या म्हणजे रुममधील आम्ही तीन पेशंटची औषधं इंजेक्शन वगैरे उरकली तोवर बारा वाजून गेले होते. माझी झोपमोड झालेली त्यात समोरची ही स्थिती त्यामुळे झोप लगत नव्हती मी नुसताच पडून होतो.

साधारण साडेबाराच्या सुमारास डॉ. प्रशांत आले. सहा सव्वासहा फूट उंच , साधारण बांधा , बोलण्यात आदबं जाणवावी असा आवाज . खरतर ते दिवसभर ड्युटी करुन नऊला घरी गेलेले परत आले होते. परत त्याच्या बरोबर पण सिस्टर वगैरे गोतावळा आला . त्यांनी मात्र विषय खूपच गांभिर्यानं घेतल्याच जाणवलं. त्यांनी अंबु का काय असतं ते आणायला लावलं . प्लॅस्टिक ची पिशवी जी त्या आँक्सीजन मास्कला समोरुन जोडता येत होती ती मागवली , जोडून त्यानं पंपिंग करुन आँक्सीजन देहात ढकलायला सुरवात केली . छातीवर दोन्ही हातानी क्लँपिंग करुन मसाज द्यायला सुरवात केली. साधारण दहाएक मिनीटात सिस्टर वगैरे एकेक करुन पाय काढता घेते झाले.

मी कधी डोळे मिटून तर कधी डोळे किलकीले करून सर्वकाही पहात होतो . आता केवळं प्रशांत एकटे झुंजत होते . आँक्सीजन पंपिंग बरोबर दोन्ही हातांनी छातीवर समोरुन , पेशंटला एका कुशावर करत पाठीवर व काखेखालच्या छातीच्या भागावर तर पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळवून याप्रमाणे सर्व छातीवर मसाज चालू केला त्यांनी. हे सगळं करत असताना पेशंट सगळं ऐकतच आहे असं ग्रुहीत धरुन ते त्याच्याशी गप्पा मारत होते , त्याला घीर देत होते . बाबा हारायचं नाही, मोठा श्वास घ्या. शाब्बास , आपणं असं हारायच नसतं . मी आहे ना , तुम्ही मला साथ द्या, मी पण मुला सारखाच आहे ना तुमच्या ? तो नाही आला म्हणून काय झालं मी आहे की तुमच्या जवळं. आपण सकाळी घरी जायचच. धीर नाही सोडायचा. शाब्बास. व्हेरी गुडं. ही सगळी वाक्य फिरुन फिरुन बोलतं होते ते. त्यांची एकाकी झुंज खरतर पहावत नव्हती . आता दोन तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता , ऊंचीमुळं कंबर जवाब द्यायला लागली. सारखं अखंड वाकून मसाज देणं कमरेला त्रास देत होतं ती आवघडली होती . तरीही बिचारा आळोखे पिळोखे देत प्रयत्न करत होता. सतत जवळचा संपर्क त्यामुळे बाबा तुम्ही मला करोना देणार, आसूदेत पण मी तुम्हाला असंच जाऊ नाही देणार! हे वाक्य माझ्या चित्तात घाव करुन गेलं . वाटलं का हा एवढं घडपडतोय?  समोर सगळं स्पष्ट असताना काय गरज आहे इतकं करायची? असं दोन तीनदा मनात आलं आणि पण दुसरं मन म्हणालं गायकवाड ऐवजी गुळवणी आहे तर मग ? काळीज हाल्ल हो . आणि मग प्रशांत करातात तेच बरोबर आहे असं पक्क पटलं . मी लघवीच्या निमित्तानं उठलो तेंव्हा आडीच तीन वाजले होते. सर मला म्हणाले जरा लक्ष ठेवा मी ग्लोज बदलून येतो ते खराब झालेत , शिवाय घेतलेल्या मेहनतीनं ते घामेघूम झाले होते . असहनीय होऊन त्यांनी पीपीई कीट पण चेहऱ्यावरुन केंव्हाच हटवला होता. आज पाचव्या दिवशी मी या माणसाचा चेहरा पाहू शकत होतो.थोड्याच वेळात ते परत कामाला लागले , आता मी बेडवर बसलो होतो. मग थोडं बोलणं झालं त्यांच्या बरोबर . मी विचारलं सर तुम्ही कसेकाय आलात ? बोलवून घेतलं का ? तर म्हणाले नाही हो मला अंथरुणावर पडल्यावर आठवलं की मावशी म्हणालेल्या बाबा युरीन अंथरुणातच पास करतात दिवसातून दोन तीन वेळातरी सगळं बदलावं लागतय तर कँथेटर टाकून द्या . मी जाई पर्यंत कँथेटर मेडीकल मधून आलाच नाही त्यामुळे मलाही विसर पडला पण मग लक्षात आल्यावर लगेच आलो तर इथं काय पहातोय बाबा हे असे ! मला असंच सोडून देणं मनाला पटलं नाही . नातेवाईक आमच्या भरोश्यावर ठेवतात ना हो पेशंटला . शेवटपर्यंत प्रयत्न नको का आपण करायला? आणि हो घेतली ना डिग्री आपण मग शिकलो ते सगळे प्रयत्न करायलाच हवेत ना ? न होऊन कुठतरी गवंडी , सुतार किंवा लोहार झालो असतो ना मी ? डॉक्टर का झालो ? सगळे ते माझ्याशी मोकळे होत होते . कदाचित मला जे मघा वाटलं तेच त्यांनाही वाटलं असावं की मी का धडपडतोय एवढा ? खरच गरज आहे का याची ? कोव्हिडमधे एवढा धोका घ्यायची ? घर संसार बायको मुलं सगळ्यांसाठीच धोक्याचं नव्हत का हे वागणं ? पण संस्कारी मनं त्यांना जे बजावत होतं तेच त्यांनी मला सांगीतलं . मझ्या मनात या माणसाबद्दल खूप खूप म्हणजे खूपच आदर वाटला आणि तो आता निरंतर रहाणार . जागरणामुळं मला डुलकी यायला लागली नी मी आडवा झालो। मग कधी डोळा लागला कळंलच नाही .

जाग आली तेंव्हा सकाळचे पावणे सहा झाले होते . डॉक्टर नव्हते दिसतं त्यामुळं मनात आलं गायकवाडानी एक्झिट घेतली वटतं आणि मी खडबडून जागा झालो . माँनीटर कडं पाहिलं तर तो आता ग्रीन दिसतं होता आँक्सीजन लेव्हल ९१-९२ तर कधी ९३ पण दिसत होती . मनोमन वाटलं , प्रशांत सर जितला हो खरचं जिंकलं होतं प्रशात सरांनी मला , राजोपाध्ये आणि श्री आगे  तीघांनाही आणि माझं हे छोटेखानी निवेदन ऐकणाऱ्या समस्तांना.  आम्ही तीघ तर खूप खूप कौतुक करत होतो प्रशांत सराचं । खूपच अपरुप वाटत होतं आम्हाला त्यांच . हे सगळं तुम्हाला सांगताना सुद्धा माझे डोळे कधी पाणावले तर कधी अंगावर शहारे आले, धन्य ते प्रशांत सर , त्यांच संस्करी आणि कर्तव्यदक्ष मन

म्हणूनच म्हणतोय येथे कर माझे जुळले!

- श्री शामकांत (कुमार)गुळवणी

Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.