३६ ते ३२८ : एक ऐतिहासिक प्रवास

१९  डिसेंबर २०२० भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस... भारत पहिल्या डावात ५७ धावांची आघाडी घेऊन सुस्थितीत होता. ही कसोटी जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.. या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली आणि सामन्याचे चित्रच पालटले...कमिन्स आणि हेजलवूडच्या जबरदस्त गोलंदाजी समोर भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला.. फक्त ३६ धावांत भारताचा डाव संपुष्टात आला आणि सहाजिकच भारताचा दारूण पराभव झाला.. भारतीय संघ जिंकू शकणार नाही , भारत ४-० ने मालिका हरणार इत्यादी चर्चा सुरू झाल्या..यात ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे माजी कर्णधार आघाडीवर होते..त्यातच पितृत्व रजेसाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली जाणार होता शिवाय प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हता. यामुळे या दाव्यांना बळच मिळत होते.

पुढच्या तीन कसोटींसाठी संघाची धुरा अजिंक्य रहाणेवर सोपवण्यात आली. मेलबर्नला दुसरी कसोटी चालू झाली आणि भारतीय संघ पुन्हा जिद्दीने उभा राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणेने एक शानदार शतक झळकावले याशिवाय नवख्या शुबमन गिलने पदार्पणातच सुंदर खेळी केल्याने तसेच रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी व गोलंदाजांच्या मेहनतीने भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन सव्याज परतफेड केली.

तिसरा सामना सिडनीत होता. भारताने याही सामन्यात उत्कृष्ट खेळ करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. या सामन्यात दुखापतीमुळे महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले. पण तरीही भारतीय संघाने कडवी झुंज दिली. रवीचंद्रन अश्र्विन व हनुमान विहारीने पाचव्या दिवशी ५० षटके तिखट ऑस्ट्रेलियन मारा खेळून काढला तर ऋषभ पंतने जबरदस्त ९७ धावा केल्या. याच सामन्यात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांना वर्णद्वेषी टिप्पणीला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी भारतीय संघाचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा एक पत्रकार होता. भारतीय संघ याला पुरून उरला. केवळ लढलाच नाही , तर सामनाही झुंजार फलंदाजी करून अनिर्णीत राखला.

चौथी कसोटी निर्णायक होती. यात सर्वच प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे खेळू न शकल्याने भारतीय संघ पूर्णपणे नवख्या गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरला. या गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या २० विकेट्स काढण्याची किमया केली. फलंदाजीतही ऐन मोक्याच्या क्षणी शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 'गेम चेंजिंग' भागिदारी करून भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात वर्णभेदी टिप्पणी करण्यात आलेल्या मोहम्मद सिराजने ५ बळी घेत चोख प्रत्युत्तर दिले. अखेरच्या दिवशी अवघड असा धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल व ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी केली. यात चेतेश्वर पुजाराचा विशेष उल्लेख करावा लागेल. २०० चेंडू खेळताना, चेंडू अंगावर घेऊन त्याने एक बाजू लावून धरली व त्यामुळे भारताचा विजय सुकर झाला.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या संघाने मिळवलेल्या या विजयाचे खूप मोठे महत्त्व आहे. ४-० हरणार असे छातीठोकपणे सांगणार्या माजी कर्णधारांना भारतीय संघाने दिलेली ही एक चपराक आहे. वर्णद्वेषी टिप्पणीला हे खणखणीत प्रत्युत्तर होते. भारतीय खेळाडूंची दुसरी, तिसरी बळीही तेवढीच मजबूत आहे , हे दर्शवणारा हा विजय वर्षानुवर्षे एक महान विजय म्हणून स्मरणात राहील.  १९ डिसेंबर २०२०  च्या धक्क्यातून सावरत १९ जानेवारी २०२१ च्या दिवशी मिळवलेला हा विजय वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.

लेखक : सौरभ मालवडे
saurabhpmalwade97@gmail.com