लतादीदी गेल्या ....

काही लोकांचे कर्तृत्व इतके मोठे असते कि एक आक्खा काळ त्यांच्या नावावर होतो. बहुतेकशास्त्रांत आईन्स्टाईन एक असे व्यक्तिमत्व होते किंवा क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर. पण लतादीदी फक्त कर्तृत्ववान होत्या असे नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाच्या लाडक्या सुद्धा होत्या. ह्यांच्या करियर ने अनेक पिढयांना मंत्रमुग्ध केले.  अक्षरशः अब्जावधी भारतीयांनी सर्व काही विसरून ह्यांच्या आवाजांत आपले देहभान हरपले. प्रेमगीत असो व विरहगीत, खट्याळ गाणे असो वा देशभक्तीपर, लता दीदींच्या प्रतिभेला काहीही लिमिट नव्हते. भाषा, वय, प्रदेश कुठल्याच गोष्टींचे बंधन त्यांच्यावर नव्हते. रहमान पासून कल्याणजी आनंदजी पर्यंत अनेक संगीतकार मंडळी बरोबर त्यांनी काम केले. 

फक्त गायिका म्हणून त्या महान नव्हत्या तर संगीत क्षेत्रांत व्यावसायिकता आणण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. आज आपण ऐकतो कि वयोवृद्ध थोर संगीतकार मंडळी कधी कधी गरिबीत जीवन कंठतात. मंगेशकर ह्यांनी तसे होऊ नये म्हणून आधीच संगीत क्षेत्रांत व्यावसायिकता आणली. गायक, संगीतकार सर्व मंडळींना त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यात ज्या कायदेशीर गोष्टी कराव्या लागतात त्या करून घेण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.  

लता दीदी गेल्या म्हणून हृदयातून वाटते के काही लिहावे. पण टागोर काही टिमटिमते दिवे पाहून "शुभम करोति कल्याणम.. " लिहितात आणि आमच्यासारखे प्रतिभाहीन लोक लता मंगेशकर सारख्या गान सूर्याचा अस्त पाहून फक्त हळहळू शकतात, त्यांच्या कर्तृत्वाला साजेल असे लिहिण्याची प्रतिभा आमच्यात नाही. 

अक्षर