मराठी माणसाला नडतो त्याचा अतिचांगुलपणा!

(मराठी माणसाला त्याचे गुण-दोष दाखविणारा एका "अमराठी" माणूस डॉ. गिरीश जाखोटिया यांचा सुंदर लेख!)

नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्रातली आमची चौथी पिढी. मी मूळचा सोलापूरचा पण आता मुंबईकर (त्यातही पार्लेकर). मी जन्माने मारवाडी असलो तरी आहे नखशिखांत महाराष्ट्रीयन! माझी पत्नीसुद्धा आहे पक्की महाराष्ट्रीयन. यास्तव मी 'मराठी माणसा'ला खूप जवळून बघत व अनुभवत आलो आहे. एक मराठीतला लेखक म्हणूनही मराठी माणसांनी माझं भावविश्व व्यापलंय. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन युगपुरुषांवर ग्रंथलेखन करताना मराठी मानसिकतेचा खोलात जाऊन अभ्यास करता आला. महाराष्ट्रात मी जन्मलो नि इथेच काम करतोय, हे माझे अहोभाग्य! इतर राज्यातील माझ्या मारवाडी नातेवाईकांना व मित्रांना ही बाब मी खुलासेवार सांगत असतो. मात्र एका गोष्टीबद्दलची खंत पुनः पुन्हा मनात येत राहते- "स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकही मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान झालेला नाही!" माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण भारताचे उपपंतप्रधान झाले होते. ब्रिटिशांना शेवटपर्यंत मराठ्यांचीच धास्ती वाटत रहायची. माझ्या प्रामाणिक निरीक्षण, अनुभव व विश्लेषणानुसार, मराठी माणसाला त्याचा अतिचांगुलपणाच नडतो. याबाबतीतल्या दहा महत्त्वाच्या बाबी आपण पहायला हव्यात. 

१.    पहिली महत्त्वाची बाब म्हणजे साधारणपणे मराठी माणूस त्याच्या भिडस्तपणामुळे योग्य वेळी 'नाही' आणि 'होय' म्हणायला संकोचतो. अतिभावनाशील असल्याने सामान्य व्यवहारातही तो समोरच्याला न दुखावता दोन - चार गोष्टींचा अधिकार वा हट्ट सोडून देतो. इथे गमतीची दुसरी बाब म्हणजे तो मराठी माणसाला गृहित धरतो पण अमराठी माणसाशी अतिसौजन्याने वागतो. सौजन्य हवेच, पण 'अति' नको. 

२.    दुसरा मराठी माणूस आपल्याप्रमाणेच अॅडजस्ट करणारा आहे नि तो आपलाच आहे" याची या मराठी माणसाला पक्की खात्री असते. यामुळे हा भिडस्त माणूस माझ्यासारख्या मारवाडी माणसाचं काम आधी करेल,  नंतर मराठी माणसाचं!

३.    मराठी माणूस हा बऱ्यापैकी निस्पृह असतो. या निस्पृहपणातून स्पष्टवक्तेपणा सारखा डोकावत राहतो. यामुळे कार्यालयीन बेरकी वातावरणात तो बऱ्याचदा स्वतःचीच अडचण करून टाकतो. अर्थात ही तिसरी बाब आजचे चतुर मराठी युवक दुरुस्त करताहेत! 

४.    'उदारता' हा तर मराठी माणसाचा दागिनाच. या उदारतेपायी त्याच्या कामाचं श्रेय इतर महाभाग घेऊन जातात, पण या पठ्ठ्याला मात्र मोठं सात्विक समाधान होत रहातं. या चौथ्या बाबीमुळे काही उत्तम मराठी व्यवस्थापकांना मी शर्यतीत विनाकारण मागे पडताना पाहिलंय. 

५.    उत्तम संस्कारांमुळे मराठी माणूस नियम आणि कायदे पाळणारा असतो. किंबहुना 'शिस्तप्रिय' असण्याची आपली 'इमेज' सांभाळताना व नियमांचे काटेकोरपणे पालन करताना बऱ्याचदा तो आपल्याच मराठी सहकाऱ्याला वा नातेवाईकाला जरासाही "पुश" करण्याचे टाळतो. त्याच्या या 'हरिश्चंद्री' वागण्याचा फायदा अमराठी मंडळी घेणारच. या पाचव्या बाबीमुळे मराठी माणसाचे 'उपयोगी नेटवर्क' मोठे होत नाही. 

६.    शर्यत ही शर्यतच असते. तुमचा प्रतिस्पर्धी हा संधीसाधू असेल तर तुम्हीसुद्धा निष्ठूरपणे चलाखी वापरत त्याला धोबीपछाड लावला पाहिजे. बहुदा दिल्लीतल्या राजकारणात म्हणूनच मराठी माणूस हा गेली बरीच दशके गृहित धरण्यात आलाय. या गोष्टीस कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही! बहुतेक मराठी माणसं ही खूप क्षमाशील असतात. मान्य आहे की 'क्षमाशीलता' हा मोठ्ठा गुण आहे, पण तो सदोदितपणे आपणच दाखवण्याचा अट्टहास का?  "मी खूप क्षमाशील आहे" ही इमेज टोकाचा चांगुलपणा दाखवून नि स्वतःचं निरंतर नुकसान करीत का निभवत रहायचं?  ही सहावी बाब हाताळताना सालस मराठी माणसाला बऱ्याचदा आपला आक्रमकपणा हा एक हिंसेचाच प्रकार वाटतो. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठी माणसाने भीडभाड न बाळगता प्रसंगी आक्रमक व्हायलाच हवे.

७.    सातवी बाब ही हिशोबीपणात चिकट वा चिवट नसण्याची! आपल्या वाट्यातली अर्धी भाकर भुकेलेल्यास द्यावी हे मान्य, परंतु हा पायंडा पडता कामा नये. आपलेच पैसे वसूल करताना संकोच कसला?  आपण डुबणार नाही ही काळजी घेऊनच डुबणाऱ्याला वाचवायला हवे! बरेच सज्जन व भिडस्त मराठी लोक प्रेमापोटी खूप विचार न करता आणि हिशोब न घालता एखाद्याच्या कर्जासाठी बँकेला हमीदार रहातात नि नंतर चांगलेच पस्तावतात. अशी दहा उदाहरणे तरी मी पाहिली आहेत. 

८.    आठवी बाब ही सतत इतरांचं मन जपण्याची! याबाबतीतले बरेच मजेदार प्रसंग मी पाहिलेत. सहाजणात एक जरी अमराठी असला तरी बाकीचे पाच मराठी मित्र त्याच्या भाषेत वा हिंदीत बोलणार. मी असे बरेच अहंकारी अमराठी लोक पाहिलेत जे मुंबईत तीस चाळीस वर्षे राहूनही मराठी बोलण्याची इच्छा सुद्धा दाखवत नाहीत. त्यांना हे नीटपणे माहीत असतं की 'मराठी माणूस'  हा आग्रही नसतो. काही दक्षिणी राज्यांमध्ये स्थानिक भाषेचा काटेकोर आग्रह मी आजही अनुभवतो. 

९.    नववी बाब ही मराठी माणसाचं मन पाझरण्याची! आपल्या ऐतिहासिक व राजकीय नायकांबद्दल मराठी माणूस हा कमालीचा भावनाशील व म्हणून आग्रही असतो. त्याच्या या अस्मितांचं भरभरून कौतुक केलं की हा मोकळाढाकळा मराठी माणूस द्रवतोच. आपल्या ऐतिहासिक अस्मितांना जपताना तो जेवढा आक्रमक व चिवट असतो तेवढा तो आर्थिक वसुलीबद्दल वा वित्तीय मोबदल्याबद्दल नसतो.  

१०.    दहावी बाब ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची. यासाठी तो लहानपणापासून ऐकत आलेला असतो- "मोडेन पण वाकणार नाही!" आता मोडल्यावर शिल्लक काय रहातं? प्रसंगानुसार वाकण्याचं सोंगही करावं लागतं,  तरच आपलं अस्तित्व अबाधित रहातं नि आपण नवनिर्मिती करू शकतो. पुरंदरचा तह मिर्झाराजे जयसिंगासोबत करताना शिवरायांनी हीच मानसिक लवचिकता चातुर्याने दाखवली होती. यामुळेच स्वराज्य टिकलं नि नंतर वाढलं! 

तात्पर्य काय, तर चांगुलपणा हा चांगलाच असतो पण त्याचा अतिरेक हा आपल्यालाच नडतो. इथे मला श्री. हरिशंकर परसाई या ख्यातनाम हिंदी लेखकाचा शाळेतला धडा आठवला- "बेचारा भला आदमी!". मला कुणी "भला" संबोधू लागला की मी एकदम सावध होतो! आजचे बरेच हुशार मराठी युवक हा चांगुलपणाचा हिशेब चांगलाच जाणतात. अतिचांगुलपणा आता नडायला नको! 

---- डॉ. गिरीश जाखोटिया.