पाटिवरची पेन्सील

सहाला फक्त पाचच मिनिटं होती,शुभा शाळेतून सुटायची वेळ होत होती, लगबगीने साडी सावरत आई घराबाहेर निघाली. कुलूप कडी लावायची म्हणजे अजून वेळ होईल म्हणून शेजारच्या रमाच्या आईला आवाज दिला,अहो रमाच्या आई जरा घराकडे लक्ष द्या ,मी आलेच शुभाला घेऊन.असं म्हणत आई भरभर चालू लागली,तिचं सगळं लक्ष शुभाकडे लागले होते. धापा टाकतच आई शाळेकडे पोहचली.मिराचा हात पकडूनच शुभा शाळेच्या गेटच्या बाहेर ऊभी होती.शुभाला आणि मिराला एकत्र पाहून आईला हायसं वाटलं.

आई तू धावत धावत आलीस का गं,शुभाचा काळजीवाहू प्रश्न ???

होय रे बाळा थोडा ऊशीर झाला निघायला आज,ऊद्या आई वेळेत येईल हं,,मिरा तू ही घरी निघ आत्ता नाहीतर ऊशीर होईल तुला घरी पोहचायला,आणी घाई करु नकोस रसत्याच्या कडेने चाल हो,

आईच्या बोलण्यात काळजी होती,

होय शुभाच्या आई गोड हसत मिरा निघाली.

आईने शुभाचा हात घट्ट धरला आणि दोघी घराकडे निघाल्या,

शुभा आज आईने शुभाच्या आवडीचं जेवण बनवलंय ,आईच्या चेहर्यावर गोड हसू आलं.

हे ऐकताच शुभा आनंदानं ऊड्या मारायला लागली, आई काय बनवलय तू??सांग न‌आई ,

घरी गेल्यावर समजेल तुला ,आई समजूतीच्या स्वरात बोलली,

नाही नाही नाही आत्ता सांग ,सांग न‌आई ,शुभाचा हट्ट पाहून आई ला रहावलं नाही,हो गं बाई सांगते .

आईने आज पुरणपोळी बनवली आहे,शुभाला आवडते न‌ म्हणून .

खरच आई? आईने होकारार्थी मान हलवली, मला खुप खुप खुप आवडतेस पुरणपोळी.आणि आई मला तु पण खुप जास्त आवडतेस. शुभाच्या चेहर्यावर चा आनंद ओसंडून वहात होता,

बाबांना आणि मला आमच्या दोघांनाही पुरणपोळी आवडते ना??आणी मग तुला काय आवडतं गं?

जे शुभाला आवडतं ते आईला आवडतं.आईची वेगळी आवड नसते रे बाळा,आईचा आवाज थोडा मृदु झाला होता,

चला आता घर आलं आपलं,रमाची आई दारातच ऊभी होती, आलात का शाळेतून माय लेकी?!चला मी आत्ता घरी जाते म्हणून वळणार तोच आईने रमाच्या आईला म्हणाली, थांबा जरा गरम गरम पुरणपोळी बनवली आहे तुम्हाला डब्यात देते,रमालाही आवडतील,आणि सांगा हो कशा झाल्यात त्या,असं म्हणताच रमाच्या आईच्या हातात डबा ठेवला पण आईने,

हो हो नक्किच सांगेन हो,तुमच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे अप्रतिम ,माझ्या घरी आवडीने खातात .

असं म्हणत रमाची आई त्यांच्या घरी गेली ,आईला तिच्या पुरणपोळी ची न खाताच कोणी प्रशंसा केल्यानं तीही सुखावली होती.

शुभाने भरभर कपडे बदलले हात पाय धुवून पाटावर येऊन बसली,आईने शुभासाठी छान छोटीशी पोळी शुभाला वाढली,शुभाला कधी आई घास भरवते असं झालं होतं,आई ने शुभाला पुर्ण पोळी खाऊ घातली,तृप्तीचा ढेकर देत शुभा ऊठली.आई खूप छान होती पोळी ,रात्रि जेवायला पण मिळेल ना आई पोळी??शुभाचा लडिवाळ प्रश्न

होय गं बाळा आहेत भरपूर आहेत,जा आत्ता थोडावेळ खेळायला जा आत्ता मग अभ्यास करु आपण.

आई अगं मी विसरलेच होते मला की नाही एक गोड गुपित सांगियचं आहे.

अगं बाई 'गोड गुपित' बरेच नविन शब्द शिकतय माझं कोकरु असं म्हणत आई एकटीच हसू लागली.

बरं सांग बरं काय आहे गोड गुपित शुभाचं??आईने शुभाकडे मान वळवली.

आता नाही आई,बाबा आल्यावर दोघांना एकत्र सांगणार आहे.

आणि आत्ता छोट्या मुलांसारखा हट्ट नाही करायचाच ,शुभा बाबा आल्यावरच सांगणार आहे.हाताची घडी घालून शुभा बोलू लागली.

बर बाई बाबा आल्यावर सांग,पण तोपर्यत तू झोपून जाशील बाळा,बाबा उशीरा येतात कधी कधी.

मी नाही झोपणार आज,आणी झोपले तर मला उठव तू.

बर बाई आता खेळायला जा आणि अंधार व्हायच्या आत घरी ये हं ,

हो आई म्हणत शुभा बाहेर गेली.

कसलं गुपित आहे देव जाणे,म्हणत आई तिच्या कामाला लागली.

शुभा चल बाळा अंधार पडायला लागला ,घरी ये आता, अभ्यास पण आहे न ??

हो आई आले आले म्हणत शुभा घरी आली ,पुन्हा हात पाय धुवून अभ्यासाला बसली,आई बाबा कधी येतात गं ?शुभाच्या डोळ्यातली झोप बोलत होती,

शुभा झोप बरं झोप आली असेल तर,

नाही आई शुभा डोळे चोळत म्हणाली.

आत्ता झोप तू बाबा आले की आई उठवेल तुला,

आईवर विश्वास आहे नं?

हो आई असं म्हणत शुभा आई च्या मांडीवर आडवी झाली,

आई परी राणीची गोष्ट सांग नं ....

एक असते परी राणी अगदि शुभासारखी,तिचा फार मोठा महाल असतो,आणी मग काय होतं.....

असं म्हणताच शुभा शांत झोपी जाते,आजपर्यंत शुभाने एक ही गोष्ट पुर्ण ऐकलेली नाही,गोष्ट सुरू करायची कि बस शुभा दुसर्या ओळीला झोपी जाते.

शुभाला हळुच तिच्या बिछान्यावर ठेवत आई म्हणाली.

तेवढ्यात दरवाजा वाजतो,अगं बाई हे आले वाटतं,असं म्हणत आई दरवाजा उघडते.

आज लवकर आलात?ऐवढ्यात झोपवलं शुभाला,तुमची वाट बघून झोपली बघा,बाबांच्या हातातली सामानाची पिशवी घेत आई म्हणाली.

मलाच उशीर होतो यायला, तू नशिबवान आहेस ,तुला भरपूर वुळ मिळतो ना शुभा बरोबर

आई गालातच हसली,तुम्ही हात पाय धुवून घ्या मी जेवायला वाढते .

तू जेवलीस का?

नाही हो,तुमच्या आधि कधी जेवलेय का??

वेळेत जेवत जा ,मला उशिर होतो यायला,तो पर्यत तू उपाशी....

रात्री एक वेळ थांबायला काय हरकत आहे.??कोणी सोबतीला असेल तर दोन घास जास्त खातं माणूस ....

आणि पुरणपोळी असेल तर??आईला हसू आवरेना,

काय पुरणपोळी केलीस तू आज??

हो शुभाला आणि तुम्हाला आवडते म्हणून,आई चा चेहरा प्रसन्न दिसत होता,

आईने बाबांना पुरणपोळी आणि कटाची आमटी वाढली,एक घास तोंडात टाकताच वाह वाह सुरेख सुंदर अप्रतीम ,खुप खुप खुप छान झाल्यात पोळ्या.नावं ठेवायला जागाच नाही .

एक विचारू का? बाबांनी हळूच विचारलं,

उद्या डब्याला दोन मिळतील का?माझ्या ऑफिसात तुझ्या पोळ्या फार आवडतात सगळयांना.

हवं तर यातल्या ठेव,

तुम्ही खा आता पोटभर ,सकाळी ताज्या मिळतील तुम्हाला,काळजी नका करू.

बाबांनी जेवण आटोपले तोच आई म्हणाली, मी शुभाला उठवते ,तिला काही सांगायच आहे तुम्हाला.

अंग झोपली आहे ती शांत ,नकोस उठवू.

शुभाला सांगितलं आहे मी,बाबा आले की उठवते म्हणून.

असं म्हणत आई शुभाला उठवू लागली......

शुभा ऐ बाळा शुभा ऊठ बरं हे बघ बाबा आलेत ....

शुभा ,,असं म्हणताच शुभाने डोळे उघडले,

बाबा बाबा असं म्हणत शुभाने बाबांना कडकडून मिठी मारली.

बाबांनी ही मायेने पाठीवरून हात फिरवत विचारले ,कसा आहे माझं पिल्लू ?बाबा नाही भेटत ना रोज??

बाबा माझ्या कडे न एक गोड गुपित आहे.

आई बाबा डोळे बंद करा पाहू.…

बरं बाई असं म्हणत आई बाबांनी डोळे बंद केले,

शुभाने हळुच जाऊन दप्तरातून पाटी काढली,आणि आई बाबा आता डोळे उघडा बरं .....

शाळेत आज परिक्षा होती आणि मला दहा पैकी आठ गुण मिळाले, शुभा चा आनंद ओसंडून वहात होता.

कसं वाटलं माझं गोड गुपित???

शुभा ची पाटी पाहून आई च्या डोळ्यात पाणी आलं,किती निरागस असतात हो लहान मुलं?!!किती लहान लहान गोष्टीत त्यांना आनंद मिळतो ,अशीच निरागसता आयुष्य भर जप हो बाळा,

शुभाला आई चं बोलणं किती समजलं कुणास ठाऊक पण आईच्या डोळ्यातल़ं पाणी बघून शुभा म्हणाली,आई तू रडु नकोस न ,मी पुढच्या वेळेस अजून जास्त अभ्यास करून पैकी च्या पैकी मार्क मिळवेन .

शुभाचे ते शब्द ऐकून बाबांना ही गहीवरून आलं,त्यांनी शुभा आणि आईला कवेत घेतलं आणी म्हणाले ,माझ्यासाठी हेच मार्क पैकीच्या पैकी आहेत.

असं म्हणताना बाबा़ची मिठी अधिकच घट्ट झाली होतीं.

वेड्या गं माझ्या दोन्ही बाहूल्या वेड्या ...

संगिता