अनाथांची माय

ती" एक समाजाकडून ठोकरलेली गेलेली अबला..

गुरांमागे हिंडत शेण गोळा करणारी..मुळात जन्मली तेंव्हाच नकोशी झाल्याने तिला चिंधी या नावाने उपेक्षित केले गेले.बाप गुरं चारायला न्यायचा आपल्या संगतीनं.. हिचं काम शेण गोळा करायचं..पायात काटा मोडू दे नाहीतर कंबरेचा काटा ढिला होऊ दे..काम नाही तर जेवण नाही...मार पडायचा तो वेगळाच..

अवघं नऊ वर्षांचं वय आणि पस्तीस वर्षांचा एक पुरुष नवरा म्हणून आयुष्यात आला..काम मात्र तेच शेण उचलायचं.. जोडीला घरकाम. त्यातून दोन बाळंतपणं झेलावी लागलेली..तिसऱ्या खेपेला बाळ पोटात असताना देखील ती गुरांच्या मागे शेण उचलायला जायची.

या शेण उचलण्याच्या कामात गावातील इतर बायका देखील असायच्या..हे शेण विकण्यावरून गावातील सावकाराशी संघर्ष झाला आणि त्याची जबदस्त किंमत मोजावी लागली तिला...दमडाजी नावाच्या त्या सावकाराने हलकटपणाचा कळस गाठला आणि तिच्या सासरी जाऊन तिच्या पोटातील बाळ स्वतःचे असल्याचे सांगून तिच्यावर सूड उगवला...परिणाम एकच लाथाबुक्यांचा प्रसाद वाटणीस आला..अर्धमेल्या अवस्थेत तिला गोठयात टाकून दिले सासरच्यांनी..गुरांनी तुडवून मारले की यांच्यावर आळ येणार नाही..पण गुरं तिच्या सवयीची,त्यांनी धक्का सुद्धा लावला नाही..पण ती तिथून बाहेर पडली आणि गाव सोडले..

पुढे देखील आयुष्यात फरफट वाटणीस आली..

पण एकदा रेल्वेखाली जीव देण्याच्या इराद्याने ती रुळांवर उतरली देखील पण मुलीचा किंवा बाळाचा काय दोष म्हणून परत फिरली आणि त्याच स्टेशनवर भीक मागू लागली.मिळालेली भीक एकटीने न खाता इतर भिकाऱ्यांना काला करून वाटू लागली. तेच तिचे सहकारी आणि रक्षक झाले..जेमतेम एकवीस वर्षांची ती आयुष्यात येणारे संकटांचे धडे शिकू लागली. या सहकाऱ्यांमधील लहान मुलांची ती माय बनली आणि जिथे कुठे अनाथ मुलं दिसली त्यांना सोबत घेऊन त्यांना मायेने वाढवत #अनाथांची_माय बनली.

हळूहळू या मुलांसाठी तिने ममता बाल संस्था उभारली.लोकांकडून देखील मदतीचा हात पुढे येऊ लागला..चारपाच मुलांची माय आता शेकडो मुलांची माय बनली.कामाचा पसारा वाढत गेला,तसा मदतीचा ओघ देखील वाढत गेला.एकाची दुसरी मग तिसरी संस्था असा पसारा वाढतच चालला.आता केवळ गाव,जिल्हा, राज्य,देश इतकीच या कार्याची सीमा राहिली नव्हती तर देशाच्या सीमा ओलांडून ह्या कार्याची माहिती आणि महती परदेशी पोचली.

छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झाला होता आणि त्याच्या छायेत हजारो अनाथ मुलं वाढू लागली आणि त्यांना स्वतःची ओळख मिळू लागली.

" तिला" या प्रवासात अनेक सन्मान मिळाले.कुठे शेण वेचून मार खात कुढत जगणारी ती आता दोन चार नाही तर तब्बल साडेसातशे पुरस्कारांची मानकरी झाली. यात विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार होतेच पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडूनही पुरस्कार मिळाले. यातील महत्वाचे दोन पुरस्कार होते ते म्हणजे 2012 ला मिळालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार व नुकताच 2021 ला मिळालेला पद्मश्री पुरस्कार.

मध्यंतरी तिचा एक व्हिडिओ बराच प्रसिद्ध झाला होता...त्यात ती चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोनवर "कसा आहेस उद्धवा..."? असे विचारत होती..हा मानसन्मान तिने आपल्या कर्तृत्वाने मिळवला होता.

अलिकडे पंचाहत्तरीत असतानाच दुर्दैवाने तिला कर्करोगाने गाठले.बघता बघता कर्करोगाने तिच्या भोवती पाश आवळण्यास सुरवात केली आणि संध्याकाळी तिला पुण्याच्या ग्लॅलॅक्सि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची बातमी सगळ्या चॅनेलवर झळकली आणि माझ्यासारख्या लाखो लोकांच्या मनात खळबळ माजली.ती सुखरूप असू दे अशी प्रार्थना चालू असतानाच ती आपल्या थकलेल्या देहाला त्यागून

निघून गेल्याची बातमी आली.

मन खूप खंतावलं..अनाथांची माय परत एकदा सर्वांना अनाथ पोरकं करून न परतीच्या वाटेने निघून गेली.

बाई ग..एवढी कसली घाई झाली होती तुला?

ती गेलीय परत न येण्यासाठी पण तिच्या आठवणी,तिचं कार्य ते थोडंच निघून जाणार? ते कायमच स्मरणात राहिल. ती स्वतः अनाथ असूनही अनाथांची माय बनली होती..आणि माय गेली तरी तिच्या आठवणी थोड्याच पुसल्या जाणार? त्या तर कायमस्वरूपी राहणारच..

"ती" #सिंधुताई_सकपाळ....

ताई,तुला लाख लाख दंडवत!

#अनुराधा_यादवाडकर