१६.

पुंडलिक भक्तबळी । विठो आणिल भूतळीं ॥१॥

अनंत अवतार केवळ । उभा विटेवरी सकळ ॥२॥

वसुदेवा न कळे पार । नाम्यासवें जेवी फार ॥३॥

भक्त भावार्था विकला । दासी जनीला आनंद झाला ॥४॥

१७.

भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥

भलें घालूनियां कोडें । परब्रह्म दारापुढें ॥२॥

घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥

जनी ह्मणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥

१८.

पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥

भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥

उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥

१९.

अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥

तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥

तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥

उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥

२०.

जन्म खातां उष्‍टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥

राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥

देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥

जनी ह्मणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥

२१.

ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥

अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥

जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति। ॥३॥

तेथें कौचे बा धरिसी । ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥

२२.

स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥

ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥

न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥

कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥

२३.

बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर ॥१॥

तें हें जाणा पंढरपुर । जग मुक्तीचें माहेर ॥२॥

तेथें मुक्ति नाहीं ह्मणे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥

२४.

अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥

पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥

त्याचे पाय चुरी हातें । कष्‍टलीस माझे माते ॥३॥

आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥

ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥

२५.

देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥

तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥

जनी ह्मणे पूर्ण काम । विठ्‌ठल देवाचा विश्राम ॥३॥

२६.

योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्‌ठला ॥१॥

योग करितां अष्‍टांग । तुजविण शुका रोग ॥२॥

बैसला कपाटीं । रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥

तंई त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला ॥४॥

सांगोनी पुत्रातें । त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥

अमराच्या राया । ह्मणे जनी सुखालया ॥६॥

२७.

आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥

ते हे यशोदेच्या बाळा । बरवी पाहातसें डोळां ॥२॥

विटेवरी उभा नीट । केली पुंडलिकें धीट ॥३॥

स्वानंदाचें लेणें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥

२८.

स्तन पाजायासी । आली होती ते माउसी ॥१॥

तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥

मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडींरे अनंता ॥३॥

लिंग देह विरविरलें । जनी ह्मण विठ्‌ठलें ॥४॥

२९.

अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥

वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥२॥

धांवे धांवे गाई पाठीं । जनी ह्मणे जगजेठा ॥३॥

३०.

विठो माझा लेंकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥

गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥

बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥

३१.

नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥

परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥

जनी ह्मणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥

३२.

तुझ्या निजरुपाकारणें । वेडावलीं षड्‌दर्शनें ॥१॥

परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासीं ॥२॥

चारीश्रमें हो कष्‍टती । वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥

परि कवणें रीति तुला । न जाणवे जी विठ्‌ठला ॥४॥

तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥

३३.

पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥

तया पंचक्रोसी ह्मणती मरावें । मरोनियां व्हावें जीवनमुक्त ॥२॥

नको गा विठोबा मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥

मरचीमान्न वेरण स्तंभीं घाली । घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥

जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥

आई आई बाबा ह्मणती काय करुं । ऐसें दुःख थोरू आहे तिथें ॥६॥

इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥

लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील यातना नको देवा ॥८॥

न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादुःखें ॥९॥

अमरादिक थोर थोर भांबावले । भुलोनियां गेले मुक्तिसाठीं ॥१०॥

ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥

ऐसिये पंढरी पहाती शिखरीं । आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥

सख्या पुंडलिका लागतांचि पाया । मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥

घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥

मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥

मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं । आमुची ती काय धरिती सोयी ॥१६॥

समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी । मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥

अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचें सुख तुझें ॥१८॥

जनी ह्मणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel