व्यवसायात्मिका बुद्धिरे केह कुरुनन्दन ।

बहुशाखा ह्यनन्ताश्व बुद्धयोऽव्यवसायिनाम् ‍ ॥४१॥

दिसावया सान । असे दीप -ज्योति । परी बहु दीप्ति । देई जैसी ॥३८९॥

तैसी सद्‌बुद्धी ही । म्हणूं नये अल्प । प्रकाश अमूप । असे जिचा ॥३९०॥

अपेक्षिती ज्ञानी । हिज नाना परी । पार्था , चराचरीं । दुर्लभ ही ॥३९१॥

आणिकांसारिखा । न जोडे परीस । भाग्यें लाभे लेश । अमृताचा ॥३९२॥

तैसी सद्‌बुद्धीची । दुर्लभ ही वाट । पोंचवी जी थेट । परंधामा ॥३९३॥

गंगेलागीं जैसा । नित्य निरंतर । निर्वाणीं सागर । एकला चि ॥३९४॥

तैसें जिला नाहीं । दुजें प्राप्तिस्थान । ईश्वरावांचोन । जगीं कांहीं ॥३९५॥

ती च एक पाहें । अर्जुना सद्‌बुद्धि । अन्य ती दुर्बुद्धि । ऐसें जाण ॥३९६॥

दुर्बुद्धि ती जाण । विषयांची खाण । तेथें रममाण । होती मूढ ॥३९७॥

म्हणोनियां स्वर्ग - । नरक -संसार । तयांसी साचार । प्राप्त होय ॥३९८॥

ऐसे जे का मूढ । तयांलागीं पार्था । लाभे ना सर्वथा । आत्मसुख ॥३९९॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्याविपश्चितः ।

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफल प्रदाम् ‍ ।

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥४३॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ‍ ।

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥

वेदांचा आधार । घेवोनि बोलती । प्रतिष्ठा वर्णिती । कर्माची च ॥४००॥

परी कर्म -फळीं । धरोनियां आस । पार्था , स्व -हितास । मुकती ते ॥४०१॥

मृत्युलोकीं येथें । घेवोनियां जन्म । यज्ञादिक कर्म । आचरावें ॥४०२॥

मग रम्य ऐसें । कर्माचें तें फळ । भोगावें केवळ । स्वर्ग -सुख ॥४०३॥

सर्व सुखांमाजीं । स्वर्गसुख श्रेष्ठ । बोलती यथेष्ट । दुर्बुद्धी ते ॥४०४॥

देवोनि केवळ । भोगाकडे दृष्टि । चित्तीं फलासक्ति । ठेवोनियां ॥४०५॥

विविध विशेष । आचरिती कर्म । यथाविधि धर्म । अनुष्ठिती ॥४०६॥

अनुष्ठितां धर्म । दाविती नैपुण्य । एक चि वैगुण्य । परी तेथें ॥४०७॥

कीं ते स्वर्ग -भोग । वांछिती मनांत । सांडोनि यथार्थ । भोक्ता जो का ॥४०८॥

सर्व हि यज्ञांचा । भोक्ता परमेश । विसरती त्यास । अल्पज्ञ ते ॥४०९॥

करोनियां जैसा । कापुराचा ढीग । द्यावी त्यासी आग । लावोनियां ॥४१०॥

किंवा मिष्टान्नाचें । वाढोनियां ताट । त्यांत काळकूट । कालवावें ॥४११॥

अमृताचा कुंभ । लाभतं सुदैवें । त्यातें उलंडावें । पदाघातें ॥४१२॥

तैसा संपादिला । धर्म धनंजया । घालविती वायां । सकामत्वें ॥४१३॥

जोडोनि सुकृत । करोनि सायास । धरावी कां आस । संसाराची ॥४१४॥

परी अज्ञानी ते । नेणती हें कांहीं । काय कीज नाहीं । ज्ञानदृष्टि ॥४१५॥

सुगरिणीनें जैसें । रांधोनि पक्कान्न । टाकावें विकोन । द्रव्यासाठीं ॥४१६॥

तैसा भोगासाठीं । घालवितो धर्म । नेणोनियां वर्म । कर्मातील ॥४१७॥

म्हणोनि वेदांच्या । अर्थवादीं जाण । होवोनियां मग्न । राहिले जे ॥४१८॥

अविवेकी मूढ । तयांचिया चित्तीं । सर्वथा दुर्मति । वास करी ॥४१९॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।

निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ‍ ॥४५॥

सत्त्व रज तम । त्रिगुणांनीं व्याप्त । वेद हे निभ्रांत । जाण पार्था ॥४२०॥

उपनिषदादि । समस्त सात्त्विक । रजतमात्मक । इतर ते ॥४२१॥

विवरिलें जेथें । कर्मकांडादिक । एक स्वर्ग -सुख । सुचविती ॥४२२॥

म्हणोनि सर्वथा । धनंजया जाण । होती ते कारण । सुखदुःखां ॥४२३॥

तरी अर्थवादीं । नको देऊं चित्त । अव्हेरीं त्वरित । त्रिगुण हे ॥४२४॥

मी -माझें हें पार्था । न ठेवीं अंतरीं । एकलें चि धरीं । आत्मसुख ॥४२५॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।

तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥

विधि -निषेधाचे । विविध प्रकार । वर्णिले साचार । वेदांमाजीं ॥४२६॥

असो जरी ऐसें । बोलिलें बहुत । तरी ज्यांत हित । तें चि घ्यावें ॥४२७॥

अशेष हि मार्ग । पडती दृष्टीस । येतां उदयास । भानु -बिंब ॥४२८॥

तरी पार्था पाहें । सर्व हि मार्गानीं । चाले काय कोणी । सांगें मज ॥४२९॥

जरी भू -तळीं तें । अपार उदक । घ्यावें आवश्यक । तेवढें चि ॥४३०॥

तैसा वेदार्थाचा । करोनि विचार । ज्ञानी इष्ट सार । तें चि घेती ॥४३१॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्‌गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥

तरी ऐकें आतां । ह्यापरी पाहतां । स्वकर्म हें पार्था । योग्य तुज ॥४३२॥

सर्व हि गोष्टींचा । करितां विचार । ऐसें चि साचार । मना आलें ॥४३३॥

पार्था , न ये सोडूं । निज -कर्तव्यास । नये धरुं आस । कर्म -फळीं ॥४३४॥

आणि कुकर्माची । न व्हावी संगती । करावी सत्कृति । हेतुविण ॥४३५॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्‌गं त्यक्त्वा धनंजय ।

सिध्द्यसिध्द्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥

सोडोनि फलाशा । होवोनि योग -स्थ । देवोनियां चित्त । करीं कर्मे ॥४३६॥

आरंभिलें कर्म । सुदैवें सिद्धीस । गेलें तरी तोष । नको फार ॥४३७॥

किंवा दुर्दैवें तें । नाहीं झालें सिद्ध । तरी दुःखें क्षुब्ध । होऊं नये ॥४३८॥

सिद्ध झालें तरी । काजा आलें पाहीं । न झालें तरी हि । भलें मानीं ॥४३९॥

घडे तें तें कर्म । होतां ब्रह्मार्पण । स्वभावें संपूर्ण । झालें जाण ॥४४०॥

पाहें पूर्णापूर्ण । कैसें असो कर्म । परी मनोधर्म । सारिखा चि ॥४४१॥

तरी पार्था होय । ती च योगस्थिति । तिज वाखाणिती । ज्ञाते जन ॥४४२॥

आपुल्या चित्ताची । जी का साम्यावस्था । तें चि जाण पार्था । योगसार ॥४४३॥

दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगगाद्धनंजय ।

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।

तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ‍ ॥५०॥

मन -बुद्धीमाजीं । जेथें एकभाव । तया ऐसें नांव । बुद्धियोग ॥४४४॥

बुद्धियोगाची ती । पाहतां महती । दिसे गौण अति । कर्मभाग ॥४४५।

परी तें चि कर्म । आचरावें साङ्‍ग । तरीच हा योग । प्राप्त होय ॥४४६॥

पाहें धनंजया । कर्तृत्वाचा मद । आणि फलास्वाद । गाळोनियां ॥४४७॥

उरे जें जें कर्म । ती च येथें जाण । स्वभावें संपूर्ण । योगस्थिति ॥४४८॥

तरी होई स्थिर । बुद्धियोगीं थोर । करोनि अव्हेर । फलाशेचा ॥४४९॥

पार्था , बुद्धियोग । साधिला जयांनीं । पावले ते ज्ञानी । पैलपार ॥४५०॥

नाहीं तयां पुण्य । नाहीं तयां पाप । तुटे आपोआप । द्वन्द्व -बंध ॥४५१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel