जानेवारीचा पहिला आठवडा सुरू झाला आणि तीन तारखेच्या सकाळी मी महिन्याभराच्या हिवाळी सुट्टीनंतर पुन्हा रूमवर परतलो. सकाळचे आठ वाजायला आले होते. सूर्य वरती आला असला तरी वातावरणात बोचरी थंडी होती आणि मला कधी एकदा रुममध्ये जाऊन अंगाभोवती ब्लँकेट लपेटून बसतोय असं झालं होतं. आजपासून आमचं कॉलेज सुरू होणार होतं. एवढ्या लांबलचक सुट्टीनंतर मला कॉलेजला जायचं जिवावरच आलं होतं. म्हणून मी माझा घराचा मुक्काम शक्य होईल तेवढा लांबवला आणि कॉलेज सुरू होण्याच्या सकाळी रूमवर अवतरलो. जिन्याच्या पायऱ्या चढताना मी रूममधील दृश्य कसे असेल, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. सर्वत्र धुळीचे साम्राज्य झालेले असणार होते. रूममध्ये प्रवेशल्यानंतर जळमटं वगैरे डोक्यात पडली नाहीत म्हणजे मिळवली, असा मी विचार केला. कागदाचे बोळे कचरापेटी सोडून सर्वत्र पसरलेले असणार होते. रूममध्ये कुबट वास सुटलेला असणार होता. दाराच्या समोर बेडवर विस्कटलेली बेडसीट आणि त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं ब्लँकेट दिसणार होतं. आणि, पलीकडच्या खुर्चीवर पाय लांब करून बसून वरती शून्यात पाहणारा माझा जिवलग रूममेट अल्फा माझ्या दृष्टीस पडणार होता.
मी दार ढकललं आणि रूममधील दृश्य पाहून चकितच झालो!!
रूम कधी नव्हती इतकी चकाचक वाटत होती. सर्व जागच्या जागी अगदी व्यवस्थित रचून ठेवले होते. धुळीचा कुठे लवलेशही नव्हता. सर्व झाडून पुसून साफ केलेले दिसत होते. कचराकुंडी जागच्या जागी होती आणि त्यातला कचराही जागच्या जागी होता. बेडवरती बेडसीट नीटनेटकी अंथरली होती. रूममधील खुर्ची टेबलापाशी ओढून घेतली होती आणि त्यावर महाशय विराजमान होते. खूप दिवसांनी अल्फाला पाहून मला बरे वाटले. त्याचा टेबलाशेजारी बसून काहीतरी वेगळाच उद्योग चालला होता.
टेबलावरती इस्त्री बटण सुरू करून उभी करून ठेवली होती. शेजारीच एक मेणबत्ती पेटत होती. त्याच्या बाजूला एक अगरबत्ती रोवून ठेवली होती. टेबलावर काळ्या रंगाची चादर पसरून ठेवली होती. त्या लगतच्या खुर्चीत अल्फा बसला होता. अंगावर स्वेटर आणि त्यावरती शाल लपेटली होती. हातात नेहमीचे बॉलपेन होते. समोर एक पुस्तक उघडले होते आणि एका कच्च्या कागदावर तो कसलीतरी आकडेमोड करत होता. त्याचा हा पसारा पाहून मी चाटच पडलो आणि दरवाजातच मिनिटभर उभा राहून ते दृश्य पहात राहिलो.
"ये ना रे आत. की माझ्या आमंत्रणाची वाट पाहतोयस?? " अल्फाने माझ्याकडे न पाहताच म्हटले.
"नाही. कुठल्या भलत्याच रूममध्ये आलोय अशी शंका आली म्हणून थबकलो. " मी सँडल काढून ठेवत म्हणालो.
"माहितीये मला, माझी खोली एवढी स्वच्छ असलेली पहायची सवय नाही तुला. पण कधीकधी उन्हातही पाऊस पडतोच की.. तसंही मला फार काही करायचं नव्हतं. फक्त दोन चार वस्तू उचलून ठिकठाक दिसतील अशा लावायच्या होत्या. लहर आली आणि करून टाकलं मग. "
"अशी लहर रोज का बरं येत नाही?? आणि हे सगळं काय मांडून ठेवलं आहेस?? प्लँचेट वगैरे करत नाहीयेस ना सकाळ सकाळी?? मेणबत्ती पेटवून.. "
"छे छे.. भुता-बितावर माझा काही विश्वास नाही. आणि आपल्याला छळणारी भुतं काय कमी आहेत? पेपरला शून्य मार्क देणाऱ्या कॉलेजच्या मास्तरापासून रूमच्या भाड्यासाठी टुमणे लावणाऱ्या घरमालकापर्यंत भुतंच भुतं आहेत सगळीकडे. त्यामुळे मेणबत्त्या पेटवून आणखी भुते बोलाविण्याइतका हौशी नाहीये मी. "
"मग हा पसारा कसला म्हणायचा?? आणि बरं, या मेणबत्त्या, काळी चादर या सर्वांपेक्षा जास्त विचित्र म्हणजे तुझ्यासमोर उघडलेलं पुस्तक आणि तुझ्या हातातलं पेन दिसतंय मला. आता कृपया तू अभ्यास करायला बसला आहेस असं सांगू नकोस. मला ते मुळीच झेपणार नाही. "
अल्फा हसला.
"खरा मित्र शोभतोस बघ प्रभू. हिवाळ्याच्या एका थंडगार सकाळी, सर्वत्र झोपेचे वातावरण असताना अल्फासारखा माणूस पुस्तक घेऊन अभ्यासाला बसणे शक्य नाही, याबद्दल इतकी खात्री आहे तुला?? " त्याने त्याच्या समोरचे पुस्तक मला दाखविले.
"अॅप्टीट्यूड?? " मी आश्चर्याने विचारले, " बुद्धीमत्ता चाचणीची पुस्तके सोडवायला लागलायस का तू आता?? "
"हो. तू नव्हतास तेव्हा हेच केलंय मी महिनाभर. " अल्फा म्हणाला, "बघ ना. रुममध्ये कोणी नसल्यामुळे माझं तोंड बंद पडलं. त्यामुळे बोलण्यासाठी करावी लागणारी विचाराची प्रक्रिया बंद पडली. अभ्यास नसल्यामुळे हाताचं आणि डोळ्यांचं काम कमी झालं. त्यामुळे मेंदूची गती आणखीच मंद झाली. त्यातच डोक्याला ताण येईल अशी कोणती केसही मिळाली नाही बरेच दिवस. त्यामुळे आणखीनच सुस्ती. तुला माहितीये का प्रभू, मेंदू विचार कसा करतो?? मेंदूमध्ये न्यूरॉन्स नावाचे घटक असतात जे माहिती वाहून नेण्याचे काम करतात. जेव्हा विचार करण्याची प्रक्रिया होते, तेव्हा ते विशिष्ट प्रकारच्या लहरी उत्सर्जित करतात. त्यांना 'स्पाईक्स' असे म्हणतात. या लहरींची एकमेकांशी अन्योन्यक्रिया होऊन त्यातून जे आऊटपुट निघतं, ते म्हणजे आपले विचार. आता माझ्या मेंदूला काम असलं, तरच हे न्यूरॉन्सही काम करतील ना. मी काहीच न करता नुसता बसून राहिलो असतो, तर माझ्या न्युरॉन्सची लहरी उत्सर्जित करण्याची क्षमताच नाहीशी होईल, अशी मला भिती वाटते. त्यामुळे मी स्वतःला नेहमी कशात ना कशाततरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे बुद्धीमत्तेचे प्रश्न म्हणजे मेंदूला खुराक. मला हे सोडवायला जाम आवडतं. विचार करण्याचे नवे मार्ग मिळतात. सो हा सगळा पसारा. आणि या इस्त्री, मेणबत्तीबद्दल बोलशील, तर हे फक्त मी रुममध्ये उबदार वातावरण बनविण्यासाठी केलेले खटाटोप आहेत. थंडीमुळे अंगाबरोबरच माझी विचार करण्याची प्रक्रियादेखील गोठून जाते बुवा. मी तर इथे शेकोटीच तयार करायची म्हणत होतो, पण म्हटलं, तुला विचारल्याशिवाय रुममध्ये अशी पेटवापेटवी करणं योग्य नाही. बरं, ते उघडलेलं दार लावशील, तर बरं होईल. माझा मेंदू थंडीने पुन्हा बंद पडायला लागलाय. "
अल्फाची लांबलचक 'आकाशवाणी' बंद राहण्यासाठी दरवाजा उघडाच ठेवावा असा विचार माझ्या मनात आला. पण बाहेर खरंच खूप थंडी होती. त्यामुळे मी दरवाजा लावून घेतला. माझे सामान आतमधल्या खोलीत व्यवस्थित लावून दिले. गरम पाण्याने हात पाय तोंड धुतले (आमच्या रुममध्ये इलेक्ट्रीक हिटर होता). रूममध्ये थंडी होतीच. त्यामुळे मी उबदार वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या अल्फाजवळ जाऊन बसलो.
"मग? सुट्टी कशी गेली? फेसबुकवर असायचास लेका दिवसभर आणि मला एकपण मेसेज करावासा वाटला नाही? पोरगी बिरगी पटवली नाहीयेस ना सुट्टीत?? " मी खाली बसताच अल्फा माझ्यावर खेकसला.
"छे रे.. माझ्यासारख्या चपटगंजूला कोण पोरगी पटणार!! " मी हसून उद्गरलो, " मी असंच काहीतरी सर्च करायला इंटरनेट वापरायचो. फेसबुक नव्हतो वापरत फार. "
"अच्छा. " अल्फा मेणबत्तीजवळ आपले तळवे नेत म्हणाला, " मी जामच बोअर झालो बुवा. पहिले काही दिवस झोपून काढले. पण माझ्या मेंदूची निष्क्रियता हळूहळू मला जाणवायला लागली. मग मी वाघमारे सरांच्या अॉफिसला खेटे घालण्यास सुरुवात केली. काही नवीन केसेस मिळतील, काहीतरी इंटरेस्टिंग पहायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांनी मला हाकलूनच लावलं जवळपास. कुठल्यातरी महत्त्वाच्या कामात मी गुंतलेलो आहे आणि मला सध्या तुझ्यासाठी अजिबात वेळ नाहीये असं सांगून दरवेळी घालवून दिलं. मग तर मोठाच पेचप्रसंग माझ्यासमोर निर्माण झाला. शेवटी तुझ्याच कपाटातलं अॅप्टीट्यूडचं पुस्तक काढून बसलो उघडून!! "
"म्हणजे एकूणच तुझी सुट्टी खराब गेली म्हण.." मी सहानुभूतीपर आवाजात म्हणालो. अल्फा नुसता हसला. मी पुन्हा एकदा अल्फाच्या सगळ्या पसाऱ्याकडे पाहिले.
"मला खरोखरीच आपण प्लँचेट करतोय असं वाटायला लागलंय. " मी म्हणालो, " सुट्टीत वेळ जावा म्हणून तू हा उद्योग का नाही केलास? मस्तपैकी पिशाच्चं मंडळी आली असती तुझ्या सोबतीला. "
"तू लवकर आला नसतास तर मी तेही केलं असतं. पण आता त्याची गरज नाहीये." अल्फा म्हणाला, "कारण एक जख्ख म्हातारी आत्ता इकडे येऊन आपल्याला समक्ष भुतांची भेट घालण्यास घेऊन जाणारे असं मला वाटतंय."
मी ते ऐकून नुसताच 'आ' वासला. अल्फा माझ्याकडे पाहून डोळे मिचकावत हसला. आमचं हे संभाषण होतं न होतं, तोच आमच्या रूमच्या दारावर थाप पडली. अल्फा एकदमच घाईने उठला. "चला. हा पसारा आवरायला हवा. "
मी त्याला ते सगळं उचलून ठेवण्यास मदत केली. आमची रूम पुन्हा पहिल्यासारखी झाल्यावर मी रूमचे दार उघडले.
बाहेर एक सत्तरीत असणारी एक वृद्ध महिला उभी होती. तिचे केस लांब आणि पांढरे होते. नाकावर जाड भिंगाचा चश्मा आणि त्यामागून बारीक होणारे डोळे माझ्याकडेच रोखून पाहत होते. कानांवर, त्या कानांच्या मानाने थोडा जास्तच आकार असणारे श्रवणयंत्र बसवले होते. अंगावर एक जुनाट वाटणारी नऊवारी नेसली होती. हातात कधीकाळी वरती रंगीत असलेली, पण आता रंग उडालेली लाकडी काठी होती.
"अलका नावाची कोणी इथे राहते का? " त्यांनी चश्मा सावरत आपल्या कापऱ्या आवाजात विचारले, " मला इन्स्पेक्टर वाघमारे साहेबांनी पाठवलंय. "
"या पाटीलबाई, तुमचीच वाट पहात होतो आम्ही. "अल्फा आतूनच म्हणाला, " आणि ते अलका नाही, अल्फा म्हणाले असावेत. "
"बरोबर ठिकाणी पोचलेय का मी? मला काही दिसत नाही बाई नीट. तू कोण आहेस बाजूला हो पाहू.. " त्यांनी मला जवळपास ढकललंच, " कुठे आहे अलका ही? "
"इकडे. " मी म्हणालो , " आणि त्याचं नाव अलका नाही... अल्फा आहे. "
"तुझं नाव अलका आहे? " त्यांनी अल्फाकडे पहात विचारले, " अगंबाई मला वाटलं अलका म्हणजे मुलगीच आहे. काय नव्हेच!! आजकाल मुलांची नावंपण अलका वगैरे ठेवायला लागलेत होय! बरं असो अलका, मला सांगायचं हे होतं की मला वाघमारेंनी पाठवलंय. "
हा 'अलका' चा जप ऐकून अल्फा जरा वैतागलाच.
"हो ठाऊक आहे मला. त्यांचा मेसेज आला होता तुम्ही येणार म्हणून. "तो म्हणाला, " आणि मला माझं पुन्हा बारसं व्हावं अशी मुळीच इच्छा नाही. माझं नाव 'अल्फा' आहे, 'अलका' नव्हे!! "
"बरं बाबा. जे काही असेल ते. " त्यांनी माझ्या खुर्चीवर बसकण मारली. मग माझ्याकडे पाहून त्या म्हणाल्या, " पाणी देतोस का रे पोरा थोडंसं? "
मी त्यांना पाणी दिलं. अल्फाने विचारलं, " येताना काही त्रास नाही ना झाला? "
"काय म्हणालास? " त्यांनी त्यांचं श्रवणयंत्र व्यवस्थित बसविण्याचा प्रयत्न केला. त्यांना बहुधा कमी ऐकू येत असावं.
"मी म्हटलं, येताना काही त्रास नाही ना झाला? " अल्फाने आवाज वाढवून विचारलं.
"नाही नाही. चालायला - फिरायला तशी मी दणकट आहे. पण ऐकू थोडं कमी येतं आणि डोळ्यांचं पण अॉपरेशन झालं होतं चार वर्षांमागं. त्यामुळे दिसतं पण थोडं कमीच. " त्या म्हणाल्या, " मी माझी अडचण घेऊन सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला आले होते. पण तिथल्या साहेब लोकांना माझं गाऱ्हाणं ऐकायला कुठला आलाय वेळ. मग त्यांनी मला इकडे पाठवून दिलं. तुम्ही मात्र त्यांच्यासारखं करू नका. मला जे वाटतंय ते तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटेल की ही म्हातारी बाई आहे. हिचं वय झाल्यामुळे ही काहीतरी बरळत असणार. फार गंभीरपणे घ्यायला नको. पण मला माहितीये मला कशा प्रकारचा अनुभव येतोय. जरी मी म्हातारी असले आणि इतर तरण्या लोकांसारखं मला काही कळत नसलं, तरी मी वेडी नाहीये. नजर आणि कान कमकुवत झाले असले तरी अजून काम करताहेत. त्यामुळे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, असं मला वाटतं. कारण मला जे वाटतं ते खरं असेल तर काय सांगावं, एखादं मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. "
" हं.. " आपले हात एकमेकांवर चोळत अल्फा उद्गारला. बऱ्याच दिवसांनी कोणीतरी मदत मागण्यासाठी आलंय, हे पाहून त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, " सांगा तुमची कथा. " आजीबाईंनी सांगण्यास सुरूवात केली,
"माझे नाव कमला पाटील. वय वर्षे एकोणसत्तर. माझे लग्न परशुराम पाटील यांच्याशी झाले त्याला आता चोपन्न वर्षे झाली. सासरचं गाव अर्जुनवाड. मिरजेच्या पुढे नरसोबाच्या वाडीला जाताना नदी ओलांडल्यानंतर एक छोटेसेच गाव आहे ते म्हणजे अर्जुनवाड. तेव्हापासून आजतागायत मी त्याच गावात राहिले आहे. माझे धनी गावचे पाटील होते आणि गावात त्यांना चांगला मान होता.आम्हाला एकच मुलगा होता. तो तरणाताठा असताना अपघातात गेला. त्याला आता जवळपास पंधरा वर्षे झाली. तेव्हापासून आम्ही दोघेच आमच्या गावातल्या घरात दिवस काढत होतो. ह्यांचे साधारण तीन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली तीन वर्षे मी एकटीच त्या बंगलीत राहतेय. एकटेपणा खूप खायला उठतो पण काही इलाज नाही. परमेश्वराचे बोलावणे येईपर्यंत इथे राहणे भाग आहे. गेली तीन वर्षे मी एकटी रहात असूनही माझ्या घरी कधी चोरी - दरोडे पडले नाहीत की मला कधी कुणा भुताखेताची भीती वाटली नाही. पण गेले तीन दिवस मी फारच अस्वस्थ आणि बेचैन आहे. मला असं वाटतंय की माझ्या घरात माझ्याशिवाय आणखीही कोणीतरी वावरतंय."
आजीबाईंचे ते शब्द ऐकून माझे डोळे विस्फारले गेले. अल्फाच्या डोळ्यांत एकदम उत्सुकता दिसू लागली.
"असं का बरं वाटतंय तुम्हाला? मला जरा सविस्तर सांगाल का? " त्याने विचारले.
"मला पहिला वाटलं की मला भास होतोय. कारण आमचे धनी गेल्यानंतरही मला काही दिवस असंच वाटायचं, की ते माझ्यासोबत आहेत. पण तो भास होता. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्याने मला तसं वाटत होतं. पण यावेळी असं नाहीये. " त्या म्हणाल्या, " माझं जेवण रात्री लवकर आवरतं. साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण आवरायचं आणि जपमाळ ओढत बसायचं असा माझा रोजचा कार्यक्रम आहे. माळ ओढून झाली, की साडेदहा वाजता माझी पाठ टेकते. झोप काय लागत नाही पण पडून रहायचे नुसते. त्या रात्री, कधी बरं, हां, शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माझी माळ ओढून झाली आणि मी माझ्या खोलीत जाऊन बिछान्यावर पडले. रात्रीचे किती वाजले होते कुणास ठाऊक, त्यावेळी मला काहीतरी जोराने आपटल्याचा आवाज आला. सुदैवाने त्या रात्री मी माझे कानातले यंत्र काढून ठेवायला विसरले म्हणून मला तो आवाज ऐकू आला. नाहीतर मला छोटीमोठी खुडबुडसुद्धा ऐकू आली नसती. तो आवाज आल्यामुळे मी दचकून उठले. माझा चश्मा चढवला आणि बॅटरी घेऊन आमच्या घराच्या मागच्या बाजूला जाणाऱ्या पॅसेजमध्ये आले. आमच्या घराच्या मागील बाजूला मोकळी जागा आहे आणि तिथे काही झाडे लावली आहेत. आवारातच एक छोटीशी विहीर आहे. त्यापलीकडे तारेचं कंपाऊंड आहे आणि त्यामागे उसाचे शेत आहे. मी थोड्या धाकधूकीनेच मागचा दरवाजा उघडला. बाहेर किर्र अंधार होता आणि त्यातच माझी दृष्टी अधू. त्यामुळे मला काही दिसले नाही आणि आवाज कशाचा झाला हेपण कळाले नाही. मी आपली पुन्हा दरवाजा लावून आत आले आणि माझ्या जागी पडले. नंतर आवाज झालेच नाहीत की मला ऐकू आले नाहीत देवच जाणे.
त्यानंतरचा दिवस मी थोड्या सावधगिरीनेच आमच्या बंगलीच्या आवारात हिंडत होते. पण दिवसभर कोणी आसपास आहे असं काही मला वाटलं नाही. शिवाय मागच्या शेतात दिवसभर शेतमजूर असतात त्यामुळे थोडी गजबज असते. त्यामुळे मला काय संशयास्पद जाणवलं नाही. दुसऱ्या रात्री मी जरा उशीरापर्यंत जागीच राहिले. माझं कानाचं मशीन मुद्दामच मी कानावर ठेवलं. मी माझ्या खोलीत माझ्या पलंगवरच पडून होते. रात्री खूप उशीरा मला पुन्हा आवाज ऐकू आला आणि यावेळी माझ्या छातीत धस्सच झालं. कारण तो आवाज आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीतून आला होता. मी चाचपडतच उठले. माझी काठी घेतली आणि आवाज न करता बाहेरच्या खोलीत आले. बाहेर कोणीच नव्हते. मी सगळ्या घरातले दिवे लावले. सावकाश चालत सगळे घर तपासले. पण कोठेच कुणाचा मागमूसही नव्हता. घराला आत येण्यास दोन दरवाजे आहेत - पुढं एक आणि मागं एक. दोन्ही दरवाजे मी तपासले. दोन्ही आतून बंद होते. मला ते पाहून स्वतःवरच शंका यायला लागली. मला खरंच भास होत होता काय? की यामागे अकल्पित अमानवी काही आहे?? मला फारच भीती वाटू लागली. मी आतल्या खोलीत न झोपता बाहेरच्या खोलीतच सोफ्यावर झोपून रात्र काढली. त्या रात्री पुन्हा कसली हालचाल मला जाणवली नाही.
मी पुढच्या दिवशी, म्हणजे काल ही गोष्ट शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सांगितली त्यांनी तर थेट मला सांगितले की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे आणि तुम्ही तेथे न राहता दुसरीकडे रहायला जा. पण मी बिचारी एकटी, म्हातारी, अधू. मी अशा अवस्थेत घर सोडून कुठे जाणार. मग मी ठरवलं. काहीपण होऊदे, घर सोडायचं नाही. काल मी संध्याकाळीच सर्व दारं खिडक्या व्यवस्थित बंद करून घेतल्या आणि त्या बाहेरून उघडता येणार नाहीत, याची खात्री करून घेतली. रात्री जेवण केलं आणि माझ्या नियमानुसार माळ ओढायला बसले. जशीजशी रात्र होऊ लागली, मला वाटणारी भीती हळूहळू वाढू लागली. मी बाहेरच्या खोलीतच बसले आणि काही आवाज येतोय का, यावर बारीक लक्ष ठेवलं. खूप वेळ काही हालचाल नव्हती. पण अखेर रात्री उशिरा ते घडलंच. साधारण दोनच्या सुमारास आमच्या स्वयंपाकघराचा दिवा लागला...!! "
अल्फाने खुर्चीवर जवळपास उडीच मारली.
"आतमध्ये कोणी होतं का??" त्याने विचारले, " तुम्ही पाहिलं का?? "
"तो दिवा लागला ते पाहून पहिला तर माझ्या काळजाचा नुसता थरकाप उडाला. " आजीबाई म्हणाल्या, " मला क्षणभर सुचेचना की मी काय करू. तो माणूस असो वा भूत, मी त्याचं काहीच बिघडवू शकत नव्हते. प्रतिकार करण्यासाठी माझ्याकडे ना शक्ती होती ना कुठलं साधन होतं. मला आतून पावलांचा आवाज येऊ लागला. कोणीतरी आत चालत होतं. मी पाचेक मिनिटं तिथंच खिळून राहिले. रात्रीची वेळ होती आणि अगदी बारीकसं खुट्ट झालं तरी ऐकू येईल इतकी स्मशानशांतता होती. मला वाटलं की तो क्षणभरातच बाहेर येईल आणि माझ्या समोर उभा ठाकेल. हे सगळं एक मिनीटभरच. मग तो आवाज बंद झाला आणि पुन्हा पहिल्यासारखी शांतता पसरली. मी थोडा वेळ वाट पाहिली. आता आतून कसलाच आवाज येईनासा झाला आणि आतमध्ये कोणी आहे असंही वाटेनासं झालं. शेवटी मीच उठून आतमध्ये जायचं ठरवलं. मी माझी काठी उचलली आणि लटपटत्या पावलांनी मी स्वयंपाकघराकडे चालू लागले. दरवाजापर्यंत पोचल्यावर सावकाशपणे मी आत डोकावून पाहिलं आणि मला धक्काच बसला. स्वयंपाकघर रिकामं होतं!! "
"रिकामं?? " मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
" होय. " पाटीलबाई म्हणाल्या, " ते पाहून मात्र माझं उरलंसुरलं अवसानही गळालं. मी धडपडतच माझ्या खोलीत गेले आणि दार आतून बंद करून घेतलं. माझी छाती इतक्या जोराने धडधडत होती की मला वाटलं, आता सगळं संपलं. मी काही राहात नाही. कसंबसं मी स्वतःला शांत केलं. हे काहीतरी वेगळं होतं. शेजारी जे म्हणत होते तेच खरं होतं असं मला वाटायला लागलं. मी भीतभीतच कालची रात्र काढली आणि आज सकाळी उठून पहिल्यांदा पोलीस स्टेशन गाठलं. त्यांना माझी हकिकत सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे भुताटकी वगैरे ऐकून त्यांनी मला घालवूनच दिलं. त्यांनी मला तुमचा पत्ता दिला आणि तुमचं तुम्ही पाहून घ्या असं सांगितलं. अशा तर्हेने मी शेवटी इथवर येऊन पोचले. "
"हं.. " अल्फाने एक विचारमग्न हुंकार दिला.
"आता इथून कोणाकडे जाण्याचे बळ माझ्यात नाही. तुम्हीच यावर काय करायचं, ते मला सांगा. " त्या म्हणाल्या.
"फारच उत्कंठावर्धक कहाणी आहे तुमची. " अल्फा म्हणाला, " पहिला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही सांगितलेल्या हकिकतीवरून मी एवढं तरी खात्रीपूर्वकपणे सांगू शकतो, की हे जे कोणी आहे त्याच्यापासून तुम्हाला काहीही धोका नाहीये. सरळच आहे. जर त्याला तुम्हाला इजा पोहोचवायची असती, तर त्याने ते काम चुटकीसरशी करून टाकले असते. पण तसा काही आपल्या भूतमहाशयांचा हेतू दिसत नाहीये. बरं, मला एक सांगा, तुमच्या घरावर किंवा घराच्या जागेवर कोणी डोळा ठेवून आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे, तुमचे नातेवाईक आणि तुमचे पती यांच्यामध्ये घरासाठी काही वाद होते का?? "
"नाही. असं तर काही नव्हतं बाबा. नाहीतर आमचे हे गेल्यानंतरच ज्याला कुणाला घर बळकवायचं होतं त्यानं बळकवलं असतं. "
"बरोबर. त्यामुळे हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे. " अल्फा म्हणाला, " आणि कुतूहलजनकसुद्धा. पाटीलबाई, मला या प्रकरणात तुम्हाला मदत करायला आवडेल. मला तुमच्या वाडीमध्ये यावं लागणार असं दिसतंय. हरकत नाही. तसंही आज कॉलेजला जाण्याचा माझा मूड नाहीये. मला तुमच्या घरी येऊन थोडी पाहणी केल्याखेरीज काही अनुमान बांधता येणार नाहीत. प्रभू, मित्रा तुझा आज काय प्लॅन आहे? "
"आज तासभर जाऊन यावे लागणारे कॉलेजमध्ये. नवीन सेमिस्टरसाठी लायब्ररी कार्ड घ्यायचे आहे रे. " मी म्हणालो.
"कधीपर्यंत येशील? तुला सोबत घेऊन जायचं आहे. " अल्फा म्हणाला. अल्फा साहसात मला सहभागी करून घेऊ इच्छितो, हे पाहून मला आनंद झाला.
"दुपारी तीन वाजेपर्यंत. " मी म्हणालो.
"ठिकाय. मग आपण चार वाजता इथून निघू. पाटीलबाई, तुम्ही आत्ता पुढे निघा. तीन दिवसांच्या अनुभवानुसार आपला पाहुणा दिवसाढवळ्या काही तुमच्या घरी उगवत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त घरी जा. आणि आम्ही येणार याची खात्री बाळगा. आपण तुमच्यासमोर उभं राहिलेलं हे कोडं निश्चितपणे सोडवू याची मी तुम्हाला हमी देतो. "
"तुमच्यानं होईल ना हे पोरांनो? तुम्ही कॉलेजला जाणारी कोवळी पोरं दिसताय. त्या अदृश्य होणाऱ्या जादूगारासमोर टिकाव लागेल ना तुमचा? होय बाबा. पहिलाच सगळ्या गोष्टींचा विचार केलेला बरा. नाहीतर तुमच्यासारख्या वीस बावीस वर्षांच्या तरुणांना काही मला संकटात टाकायचे नाहीये. " आजींनी आमच्याकडे थोड्या अविश्वासाने पाहत विचारले. अल्फा त्यावर हसला.
"नाही आजी. आम्हाला कोवळे वगैरे काही समजू नका. आम्ही पोलिसांची मदत करतो म्हणूनच त्यांनी तुम्हाला इकडे पाठवले आहे. त्यांना आम्ही काहीतरी करू शकतो असं वाटतं म्हणूनच त्यांनी तुम्हाला आमचं नाव सुचवलं. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा. "
"बरं बरं. निघू का मी आता? " त्या काठीचा आधार घेऊन उठल्या.
"हो चालेल. "अल्फाही जागेवरून उठला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, " प्रभू तू आवरून कॉलेजला जा. मी यांना बस स्टॉपवर सोडतो आणि दुसरी दोनतीन कामं करून येतो. तुझ्याकडे किल्ली आहे ना रुमची? "
मी नुसती मान डोलावली.