तिने आरशात पाहिले आणि ती क्षणभर थबकली. आज कित्येक दिवसांनी, वर्षांनी तिचे काजळकथ्थे डोळे सजीव झाल्यासारखे दिसत होते. ही किमया त्याच्याचमुळे ना ! तिच्या लक्षात आले.
कोण होता तो तिचा ? नात्याच्या कुठल्या आकृतिबंधात त्याला बांधायचे? प्रियकर, नाही; मित्र ऊ ऊ त्याहून थोडा जास्तच. इतर महाविद्यालयीन तरुणींप्रमाणे "मोअर दॅन फ्रेंडशिप अँड लेस दॅन लव्ह" हे वाक्य महाविद्यालयात असताना वेगवेगळ्या संदर्भात तिने अनेकदा वापरले होते. परंतु खरेच तसे रिलेशन असते आणि कधीकाळी ते नातेसबंध आपल्याच आयुष्यात निर्माण होईल असे तिला कदापिही वाटले नव्हते. किंबहुना असे काही नाते असते याची तिला मनातून शाश्वतीच नव्हती. या आपल्या कविकल्पना किंवा चित्रपटातला कल्पनाविलासच वाटत होता.
खरेच तो तिचा प्रियकर नव्हताच ना? हं, त्याला मॅसेज करून झोपायची हे जरी खरे असले तरी ती कुठे त्याच्या आठवणीत रात्रभर जागी रहायची? सकाळी उठल्यावर त्याचा मॅसेज पहायची पण फार नॉर्मल मूड मध्ये. कुठे अधीरता नाही की उतावीळपणा नाही. हं, त्यावेळी पहाटे डोळे नीट उघडलेले नसायचे हेही खरे असायचे. दिवसभरही कित्येकदा ते ऑनलाईन यायचे पण ती त्याच्याच अकाउंटला लगटून बसायची असेही नाही. हं, सदैव खेळात मग्न असणाऱ्या बाळाने थोड्या थोड्यावेळाने येऊन आईला लुकलूक पहावे, ती आहे त्या जागीच आहे याची खात्री झाल्यावर समाधानाने निश्चिंत होऊन पुन्हा आपल्या जागी जावे तसे काहीसे तिला त्याला पाहून जाणवायचे मात्र.
"त्यांचं प्रेमप्रकरण आहे हं, आपले तसे काहीच नाही", एकदा असेच तो कुठल्यातरी तिऱ्हाईताच्या संदर्भात बोलला आणि ती पुष्कळ वेळ खटटू झाली. म्हणजे त्याचे प्रेम नाही हे त्याने डिक्लेअर केले होते तर, मग तिचे प्रेम जडले होते का? अन् तेही वयाच्या या चाळीशीत? त्याला त्याची आणि तिला तिची मुलंबाळं असताना?
पण "खूपदा चाळीशीत सेकंड अफेअर होतं हं, आपल्याला त्याच त्या रुटीनचा कंटाळा आला असतो, रोजच्या धावपळीने मन उबगल असतं, जोडीदाराचे दोष जास्तच जाचू लागतात, नवा चेहरा खुणावू लागतो आणि माणूस पुन्हा सोळाव्या वर्षासारखा प्रेमात पडतो" असे एकदा तिनेच त्याला बोलता बोलता सांगितले होते. त्यावेळी तो जरासा जागेवर थांबल्याचेही तिला त्याला न पाहताच जाणवले होते.
तिच्या आयुष्याच्या अतिशय हळव्या वळणावर तो तिला भेटला. बोलणे नसतानाही सुरुवातीपासूनच तिला त्याच्याविषयी एक ओढ, आत्मीयता वाटत होती. एका रात्री तो प्रवासात असताना ती त्याला सगळेच सांगून बसली, तिच्या आतले सल, झालेल्या जखमा. पुढे तर तिच्या प्रत्येक अभिव्यक्तीत जसा तो थेट, वळणावळणाने किंवा आडवळणाने यायला लागला तसे आपण त्याच्या प्रेमात पडलोय हा तिचा पक्का समज झाला.
त्याच्या प्रत्येक वाक्यात, प्रत्येक शब्दात, प्रत्येक अल्प--स्वल्प विरामात ती आपले घरटे शोधू लागली. पण असेही काही नाही असे तिच्या लक्षात येई. त्याची आर्द्रता तिला लाभली तरी ती त्यात ओली होऊ नये याचे पूर्ण भान त्याला होते. बरेचदा, नव्हे, जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळे ती पूर्णपणे त्याची तस्बीर न्याहाळत असे. त्याला पाहताना एक अनामिक देखणेपण तिच्या चेहऱ्यावर धावून येई आणि गेल्या काही वर्षातील अनंत आघातांनी निष्प्राण, मलूल झालेले मन पुन्हा पल्लवित होई.
तस्बीरितील त्याला ती आपल्या नात्याचे नाव विचारी. या एका प्रश्नाचे उत्तर तिला त्याच्याकडून कधीच मिळत नसे. उलट तो तिला ढीगभर निरनिराळी गाणी पाठवून रमवून टाके. मग आपण त्याच्या प्रेमात पडलोय का या वारंवार उगवणाऱ्या प्रश्नाचा पिच्छाच तिने सोडून दिला व कुठल्यातरी चित्रात पाहिलेल्या निळ्या आसमंतात निळ्या पाण्याशेजारी कुणीतरी ठेवून गेलेल्या दोन बोटींप्रमाणे तीही निळाळत राहिली.
पौषातल्या गार वाऱ्यात उन्ह अंगाला बिलगत असताना त्याचं गाणं आलं, "तुमसे मिलके, ऐसा लगा तुमसे मिलके, अरमा हुये पुरे दिलके......". ती लागलीच फुलली, क्षणभर परिंदातील अल्लड माधुरी दीक्षित झाली. गिरक्या गिरक्या घेतल्या आणि खूप सुखावून हसून एका जागी उभी राहिली.
आता मनातला संभ्रम स्पष्ट नष्ट झाला होता. हृदयात त्याच्या असण्याचे, उरण्याचे ठिकाण कळून चुकले होते. तो होता, फक्त होता, हव्या त्या वेळी, कदाचित हव्या त्या स्थानीही कुठल्याही नात्यागोत्याच्या संबोधनाशिवाय. कशाला हवे तू माझा कोण आणि मी तुझी कोणचे लेबल?
जयश्री दाणी
मो. - 8275488114