१९८८ सालची गोष्ट आहे, तेव्हा रात्रीच्या वेळेस सहज टॅक्सी किंवा ऑटो मिळायला आजचा काळ नव्हता. लोक निमुटपणे बसने प्रवास करायचे. त्यावेळी थेटरात दुपारी बारा ते रात्री बारा या वेळेत सिनेमाचे फक्त चार शो व्हायचे.
त्या दिवशी संपूर्ण शहर गाढ झोपले होते, पण रात्र जागी होती. रात्रीच्या शेवटच्या बसमधून उतरून योगेश चालत चालत त्याच्या घराकडे निघाला होता. ती एक नेहमी सारखीच सामान्य रात्रच होती, पण तरीही का कुणास ठाऊक योगेशच्या मनात कुठल्यातरी अज्ञात भीतीने सारखी धाकधूक सुरु होती. अधून मधून त्याला कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे जाणवत होते. कोणाच्याही पावलांचा आवाज ऐकू येत नसला तरी एक काळे सावट आपल्या मागून येत आहे असे त्याला वाटत होते. रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नव्हते, ना रखवालदाराच्या काठीचा रस्त्यावर आपटल्याचा आवाज ना कुत्र्यांचे भुंकणे... रात्र कमालीची सुन्न झाली होती. थंडी नव्हती, पण तरीही योगेशच्या अंगावर अधून मधून काटा येत होता.
आज थोडा उशीर झाला होता, कारण तो मित्रांसोबत पिक्चरचा नाईट शो पाहून एकटाच परतत होता. त्यांचे घर बस स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर होते. ती अमावस्येची रात्र होती, चांदण्यांचा प्रकाश नव्हता, दूरवर दिसणारे खांबांवरचे विजेचे दिवे असे वाटत होते जणू रस्त्याच्या दुतर्फा उंच भुताटक्या हातात हात धरून उभ्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर चमकणारा उजेड म्हणजे बल्ब नाही तर त्यांचा एक चमकणारा डोळा आहे.
अशा अनेक भेदक नजरा त्याच्याकडे अविचलपणे पाहत होत्या आणि त्याचा पाठलाग करणारी सावलीही आपला मार्ग बदलण्याच्या विचारात नव्हती. त्याने हिंमत करून घड्याळाकडे पाहिले तर मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटे झाली होती. त्याने आपल्या पावलांचा वेग आणखीनच तीव्र केला.
थोडं पुढे गेल्यावर तो आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने वळणार होता तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसले. रस्त्याच्या कडेला एका खांबाखाली एक म्हातारा माणूस पुस्तकं विकता बसलेला दिसला. आणि त्याने नुकतेच दुकान थाटायला सुरुवात केली होती, कारण तो सोबत आणलेल्या पिशव्यांमधून नुकताच पुस्तके काढत होता आणि रचून ठेवत होता. योगेशला पुस्तकांची खूप आवड होती, पुस्तकं बघताच तो घड्याळात काय वेळ आहे हे पूर्णपणे विसरला. तो थेट त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि म्हणाला,
“अहो काका, तुम्ही यावेळेस अ[अपरात्री का पुस्तकं विकताय?”
सुरुवातीला म्हाताऱ्याने काहीच उत्तर दिले नाही, पण योगेशने पुन:पुन्हा विचारले मग म्हातारा म्हणाला,
"माझे ग्राहक याचवेळी येतात" आणि परत आपलं काम करू लागला.
योगेशच्या लक्षात आले की सर्व पुस्तके भूत, प्रेत, चेटकीण आणि तंत्रमंत्र यांच्याशी संबंधित आहेत. काही पुस्तके चाळल्यावर त्याने एक पुस्तकं उचलले त्याचं नाव होतं "सुसाइड नोट"
"तुम्ही रोज इथे बसता का, काका?"
योगेशने त्या म्हाताऱ्याला विचारले, तो म्हणाला
"जिथे जीवन आहे, तिथे मृत्यूदेखील आहे, मृत्यू मला जिथे इशारा करतो, मी तिथे दुकान थाटतो."
"म्हणजे? मला काही समजले नाही ?" यावर म्हातार्याने काहीच उत्तर दिले नाही.
"बरं, या पुस्तकाची किंमत किती?"
"जर तुम्ही जीवन दिलेत तर तुम्हाला ते पुस्तक फुकटात सुद्धा मिळू शकेल" म्हाताऱ्याने विचित्र प्रकारचे उत्तर दिले.
त्याच्या या विचित्र बोलण्याकडे दुर्लक्ष करून योगेशने पुस्तक उघडले. त्यात त्याची किंमत दोन पैसे इतकी लिहिली होती. तो मनात म्हणाला,
"हा म्हातारा कुठल्या जमान्यातली पुस्तकं विकतोय काय माहित?"
योगेशने आपल्या खिशातून वीस पैसे काढले आणि म्हाताऱ्याला म्हणाला
"काका, वीस पैसे आहेत.. चालतील ना? आजकाल दोन पैशाचं नाणं मिळणे कठीण आहे"
म्हातारा हसत हसत म्हणाला,
"हो हो, चालेल चालेल, आता तर तुम्ही आमचे कायमचे ग्राहक झाला आहात.."
मग योगेशची नजर पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळली आणि तो हैराण झाला.प्रत्येक पुस्तकावर वेगळा विचित्र, भितीदायक चेहरा होता, पण प्रत्येक पुस्तकाचं शीर्षक एकच होतं......सुसाइड नोट! हा सगळा प्रकार विचित्र दिसत असूनही का कोण जाणे पुस्तक खरेदी न करण्याचा विचार देखील त्याच्या मनात आला नाही, योगेश वेगाने घराकडे चालू लागला. पंधरा वीस मिनिटे चालल्यावर तो त्याच्या घरी पोहोचला होता. योगेश पुण्यात इंजिनियरिंग शिकत होता. तो सधन कुटुंबातला असल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला एक प्रशस्त ब्लॉक भाड्याने घेऊन दिला होता.
घरी पोहोचताच योगेशने सुटकेचा नि:श्वास सोडला, पंखा लावला, कपडे बदलले आणि हात धुतले आणि नुकतेच आणलेले पुस्तक घेऊन बेडवर उडी मारली. घरी पोहोचल्यावर त्याला खूप हायसे वाटत होते, खूप बरे वाटत होते. पंख्याच्या वाऱ्याने खिडकीचे पडदे हळू हळू हलत होते. घरी येऊन काही वेळ पडून राहिल्यावर त्याला थोडीशी थंडी जाणवत होती. त्याने पायाने चादर उघडली, भरतकाम केलेल्या उशीवर डोके ठेवले आणि चादर पांघरून पुस्तकाकडे पाहिले. पुस्तकाचं मुखपृष्ठ विचित्र होतं. क्षणभर त्याला असे वाटले की मुखपृष्ठावरचा चेहरा खरा आहे, त्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या बाहुल्या सतत हलत आहेत आणि त्याच्याकडे एकटक पाहत आहेत.
त्याने पुस्तकाचं मुखपृष्ठ थोडं दुमडून पाहिलं तेव्हा मुखपृष्ठासोबत मुखपृष्ठावरचा चेहराही सरकल्यासारखं त्याला वाटलं, पण कितीही दुमडलं तरी मुखपृष्ठावरच्या माणसाची नजर मात्र त्याच्यावर सतत खिळलेली होती.त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून नजर हटवणे त्याला खूप कठीण जात होते. तो चेहरा त्याला काहीतरी सांगू इच्छित होता असे त्याला वाटले. चेहऱ्याच्या अगदी वर, गडद लाल अक्षरात, पुस्तकावर शीर्षक लिहिले होते. "सुसाइड नोट"
काही वेळ मुखपृष्ठ न्याहाळल्या नंतर योगेशला पुस्तक उघडून वाचावेसे वाटले, पण थोडेसे जोर लावून कव्हर उघडताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला लक्षात आले कि काही काळापूर्वी त्याने पुस्तक म्हणून जे विकत घेतले होते ते आता पुस्तक नसून एक लहान पेटी आहे. बाहेरून दिसायला ते पुस्तक होतं, पण उघडलं तेव्हा ते आतून पेटीसारखं उघडलं. एक लहान पेटी जी आत पूर्णपणे लाल होती. पण ही पेटी रिकामी नव्हती, त्यात घडी घातलेला कागद होता. योगेश आश्चर्यचकित झाला, त्याने तो कागद काढला आणि तो वाचण्यासाठी उघडला तेव्हा त्याच्या दारावर टकटक झाली.
योगेशने त्याचा बेड दिवाणखान्यातच ठेवला होता. त्याने त्याची सर्व व्यवस्था बाहेरच्या खोलीत केली जेणेकरून दररोज जास्त खोल्या स्वच्छ करण्याची गरज भासणार नाही. रात्री इतक्या उशिरा त्याच्या खोलीच्या दारावर टकटक झाली तेव्हा योगेशचे मन स्तब्ध झाले, मध्यरात्री यावेळी दारावर कोण असू शकते? संपूर्ण खोली एका सुगंधाने भरून गेली आहे असे त्याला वाटले. पण त्याचवेळी त्याला काही अज्ञात अशा भीतीने घेरले होते. क्षणभर त्याला वाटले की काहीतरी खूपच अभद्र घडणार आहे. तो इतका घाबरला होता की त्याच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्टपणे चमकत होते. त्याला बेडवरून हलताही येत नव्हते, त्याला वाटले की दार उघडायची काही गरज नाही, काहीही झाले तरी ते पुन्हा येईल. बाहेर कुणीतरी सतत दारावर टकटक करत होते.
जवळपास ५ मिनिटे कोणीतरी असेच दार ठोठावत राहिले, नंतर अचानक आवाज बंद झाला थंडी नव्हती पण योगेशने डोक्यापासून पायापर्यंत चादर पांघरली होती, भीतीने तो घामाघूम झाला होता, दाराकडे बघायची त्याची हिम्मत होत नव्हती.
तेवढ्यात दरवाजा धाडकन आपोआप उघडला आणि गाडीच्या हॉर्नचा मोठा आणि कर्कश्श आवाज येऊ लागला. दरवाजा उघडताच गाडीच्या हेडलाइट्सच्या उजेडात खोली उजळून निघाली. मग काही वेळाने हॉर्न वाजायचा थांबला बराच वेळ हॉर्नचा आवाज आला नाही तेव्हा तोच योगेशने चादर वरून चेहरा बाहेर काढला आणि तो आश्चर्यचकित झाला, त्याच्या घराच्या बाहेर एक अतिशय महागडी रोल्स रोयास गाडी उभी होती जिचा मागचा दरवाजा उघडा होता आणि मागच्या सीटवर एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती. तिने जांभळी साडी नेसली होती आणि ती त्याला तिच्या जवळ येण्याचा इशारा करत होती. कदाचित त्याने स्वप्नातही एवढी सुंदर मुलगी पाहिली नसावी, काय चालले आहे ते त्याला समजले नाही. हॉर्न वाजणे बंद झाले होते, पण ती मुलगी मात्र त्याला सतत तिच्या जवळ येण्यासाठी इशारा करत होती.
त्या मुलीमध्ये काय जादू आहे हे त्याला कळलेच नाही योगेश बेडवरून उठला आणि तिच्याकडे ओढला गेला. सारं वातावरण एका विचित्र सुगंधाने भरून गेलं होतं इतकं की योगेश बेधुंद झाला होता. जणू काही त्याने नशा केली होती. तो सरळ जाऊन गाडीच्या मागच्या सीटवर त्या मुलीसोबत बसला. तो गाडीत बसताच त्याच्या घराचे आणि या गाडीचे दोन्ही दरवाजे आपोआप बंद झाले. गाडी सावकाश स्टार्ट झाली आणि कुठेतरी निघाली.
पण या सगळ्याचा विचार करण्याची ताकद योगेशमध्ये नव्हती. तो सतत त्या मुलीकडे टक लावून पाहत होता. मुलीची जांभळा साडी मधून मधून चमकत होती जणू काही तिच्यात तारे लगडले होते. ती मुलगी हळूच योगेश जवळ आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि हळूच त्याच्या कपाळावर हात फिरवू लागली.
योगेश तिच्यात पूर्णपणे हरवून गेला होता. तो स्वतःला इतका विसरला होता की त्याने त्याचे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि तिच्या चेहऱ्याकडे तो पाहतच राहिला. मुलीने योगेशच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि अनेक वर्षांनी त्याला पाहत असल्यासारखे भाव तिच्या निळ्याशार डोळ्यांमध्ये होते.
गाडी रस्त्याने संथ गतीने चालत होती जणू काही होडीप्रमाणे पाण्यात तरंगत होती. योगेश त्या मुलीच्या प्रेमातच पडला होता.थोड्या वेळाने गाडी थांबल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चेहरा वर करून ड्रायव्हरकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो खूप घाबरला. ड्रायव्हर त्याच्याकडे रागीट डोळ्यांनी बघत होता, त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरचा राग अंधारातही स्पष्ट दिसत होता, ड्रायव्हरच्या हातात एक मोठा चाकू होता. ड्रायव्हरने क्षणाचाही विलंब न करता थेट योगेशला धडक दिली. घाबरलेला योगेश त्या धक्क्याने बाजूला झाला आणि तो चाकू थेट त्या मुलीच्या पोटात खुपसला गेला. ती मुलगी वेदनेने ओरडत होती. योगेशच्या मनात राग, भीती आणि किळस आणि आश्चर्य यांचे मिश्रण होते. त्याने रागाने पुढे पहिले ड्रायव्हर सीटवर कोणीच नसल्याचे पाहून तो घाबरला. ड्रायव्हर तेथून गायब झाला होता.
तेवढ्यात गाडीच्या समोरच्या काचेवर कोणीतरी ठोठावले. त्याने पाहिले तर बाहेर एक पोलीस उभा होता आणि काठीने गाडीची काच ठोठावत होता. योगेश पुरता गांगरला होता. त्याच्यासोबत बसलेली मुलगी एव्हाना मृत झाली होती. परंतु त्या मुलीच्या मृतदेहाचे डोळे उघडे होते आणि ती योगेशकडे रोखून पाहत होती आणि इथे हा पोलीस सतत गाडीच्या काचेवर ठोठावत होता.
दोन मिनिटे ठोठावूनही दरवाजा न उघडल्याने पोलिस कर्मचाऱ्याने बाहेरून गाडीचा दरवाजा उघडला. तोही समोरचे दृश्य पाहून हादरून गेला. त्याने आपल्या होल्स्टरमधून बंदूक बाहेर काढली आणि योगेशवर रोखली.
"हैंड्स अप आणि गाडीतून बाहेर पडा",
योगेशकडे दुसरा पर्याय नव्हता, सगळे पुरावे त्याच्या विरोधात गेल्यावर त्याने काहीही न बोलता बाहेर पडणेच बरे असे मानले. तो बाहेर आल्यावर आश्चर्यचकित झाला. गाडी पोलिस स्टेशनच्या व्हरांड्यातच उभी होती. मग अचानक त्याला आठवलं की त्या सुंदर मुलीचां खून करणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा चेहरा आणि आज रात्री त्याला "सुसाईड नोट" हे पुस्तक विकणाऱ्या पुस्तकविक्रेत्याशी मिळता जुळता होता.
पोलिस कर्मचाऱ्याने आवाज देताच आतून आणखी पोलिस बाहेर आले आणि योगेशला करकचून पकडले. त्याला आत नेऊन तुरुंगात टाकण्यात आले. मग एक पोलीस त्याच्या शेजारी येऊन बसला आणि त्याला सर्व तपशील कागदावर लिहायला सांगितले.
आपली काही मोठी फसवणूक झाली आहे हे त्याला कसे समजावायचे हे योगेशला समजत नव्हते. आपण खून केले नसल्याचे तो त्या पोलीस कर्मचाऱ्याला वारंवार सांगत होता, मात्र त्याचे तो काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. मुलीचा मृतदेह गाडीतून बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आला आणि वाहनाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या लोकांना पाचारण करण्यात आले. तेवढ्यात बाहेरून एक पोलीस ओरडत आला.
“साहेब बाहेरची गाडी गायब आहे, साहेब! कार पोलिस स्टेशनच्या आवारातुन गायब झाली आहे.”
सगळे पोलीस बाहेर पळत गेले तेव्हा योगेशला दिसले की, जी मुलगी काही वेळापूर्वी मरण पावली होती तीच मुलगी स्ट्रेचरवरून उठून पोलीस स्टेशनच्या बाहेर चालत निघाली होती. तिच्या पोटात खुपसलेला चाकू स्पष्ट दिसत होता तरी ती कसलीही वेदना न होता पोलिस स्टेशनच्या बाहेर चालत जात होती. पोलिस स्टेशनच्या दारात पोहोचून तिने वळून योगेशकडे पाहिले आणि नंतर गायब झाली. योगेशच्या अंगावर काटा आला.
बाहेरचे पोलीस बेपत्ता वाहनामागील गूढ समजून घेण्याचा प्रयत्न करतच होते की, हे सर्व दृश्य पाहून योगेश मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पळत पळत आत आले तेव्हा आतून मुलीचा मृतदेह गायब झाला होता. योगेशने आयुष्यात पहिल्यांदाच इतके वर्दीवाले लोक एकाच वेळी थरथर कापताना पाहिले. त्यांना समजले होते की हि काहीतरी भयानक केस आहे आणि आता त्यांचा योगेश वर काही प्रमाणात विश्वास बसला होता. पुरावे आणि साक्षीदारच गायब असल्यामुळे ते योगेशला यापुढे लॉकअपमध्ये ठेवू शकत नव्हते, त्याच क्षणी त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आणि पोलिस जीपमधून त्याच्या घरी परत सोडण्यात आले.
रात्रीच्या प्रसंगांनी कंटाळलेला, वैतागलेला योगेश रात्री घरी आला तेव्हा अडीच वाजले होते. त्याने पाहिले की पुस्तकाच्या रूपातली तीच अवलक्षणी पेटी अजूनही त्याच्या पलंगावर पडून आहे आणि त्यावरील भयानक चेहरा अजूनही त्याच्याकडे रोखून पाहत आहे. त्याने रागाच्या भरात ती पेटी उचलली आणि घराबाहेर फेकली, त्यानंतर तो थेट त्याच्या पलंगावर गेला आणि बेशुद्ध झाल्यासारखा झोपला.
रात्रीची शांतता गडद होत चालली होती. बर्फासारख्या थंडगार स्पर्शाने योगेशचे डोळे हळू हळू उघडत होते. बर्फासारख्या काय, तो खरंच बर्फ होता, जेव्हा त्याला हे जाणवले तेव्हा त्याला कळले की तो त्याच्या पलंगावर नव्हता. तर तो बर्फाच्या जाड लादीवर पडून होता. त्याचे कपडे बदलले होते आणि आजूबाजूला जमलेले त्याचे सर्व नातेवाईक रडत होते. त्याचे आईवडील त्याच्या शेजारी बसले होते, सतत त्याच्याकडे रडवेल्या डोळ्यांनी बघत होते. त्याची आई त्याच्या बाजूला उभी राहून त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती आणि रडत होती, पण हे कसे घडले? तो तर परत येऊन त्याच्या पलंगावर झोपला होता, मग हा नक्की काय प्रकार होता?
योगेशला तो जिवंत असल्याचं जाणवलं, पण त्याला इच्छा असूनही हालचाल करता येत नव्हती. त्याचे शरीर मृत शरीरासारखे निर्जीव पडले होते. त्याला सर्व काही जाणवत होते, पण ना त्याचे हृदय धडधडत होते ना त्याची नाडी चालू होती.
त्याच्या नातेवाइकांसह, पूर्वी मरण पावलेले त्याचे पूर्वज आणि अनेक भयंकर आत्मे त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालताना दिसले. काही हसत होते, काही रडत होते तर काही शून्यात टक लावून पाहत होते.
त्याने तोंडाने बोलण्याचा खूप प्रयत्न केला, तो सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होता की तो जिवंत आहे, पण त्याच्या शरीराचा कोणताही भाग आता त्याच्या ताब्यात नव्हता.
काही वेळाने तसेच घडले जणू काही त्याचा मृत्यू झाला आहे, त्याच्या मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली, त्याच्या पार्थिवावर फुलांची सजावट करण्यात आली, नाकपुड्या कापूस घालून बंद करण्यात आल्या, आणि ओठावर तुळशीपत्र ठेवण्यात आले आणि स्मशानभूमीसाठी त्याची अंतिम यात्रा सुरू झाली. त्याला जाणवत होते, आजूबाजूचे सर्व काही ऐकू येत होते, पण जिवंत असूनही मृतदेहासारखे पडून राहण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता.
काही वेळाने स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्याला चितेवर झोपवले गेले. अंधार पडल्यानंतर अंत्यसंस्कार कधीच केले जात नाहीत, पण या अंधाऱ्या रात्री त्याच्यासोबत काय चालले आहे, याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. तिथे ना उजेड होता ना कोणी मेलेला माणूस, पण तो त्या सर्वांना कसे सांगणार? त्याची चिता रचण्यात आली आणि त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच वेळी अंत्यसंस्काराचे मंत्र पठण सुरू झाले. त्याच बरोबर त्याची चिता पेटवली गेली आणि त्याचा निर्जीव देह जळत्या आगीच्या ज्वाळांमध्ये कैद झाला. त्या ज्वाळांमधून त्याने पाहिले की मंत्र पठण करणारा पुजारी दुसरा तिसरा कोणी नसून तोच माणूस होता ज्याच्याकडून त्याने हे अवलक्षणी पुस्तक विकत घेतले होते.
त्या वृद्धाचे डोळे अंधारात चमकत होते आणि त्याच्या हातात तेच पुस्तक होते जे योगेशने त्याच्या घराबाहेर फेकले होते. एखाद्या मेणबत्तीप्रमाणे योगेशचे शरीर चितेच्या उष्णतेने मेणासारखे वितळून स्मशानभूमीवर पडत होते. इतकं दु:ख त्याला आयुष्यात कधीच जाणवलं नव्हतं आणि इतकं असहायही त्याला कधीच वाटलं नव्हतं.
मग कुणीतरी ते पुस्तक त्या म्हाताऱ्याच्या हातातून हिसकावून घेतलं आणि थेट ज्वालांमध्ये फेकून दिलं. योगेशने नीट निरखून पाहिलं तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सुंदर जांभळी साडी नेसलेली तीच मुलगी होती जिने त्याला गाडीत प्रेमाने मिठी मारली होती. तो सुरा अजूनही त्या मुलीच्या पोटात खुपसलेलाच होता, ती मुलगी सुद्धा वेदनेने ओरडत होती, पण तरीही धाडस दाखवत त्या मुलीने म्हाताऱ्याच्या हातातून पुस्तक हिसकावून घेतलं आणि सरळ अग्नीच्या स्वाधीन केलं. योगेशची चिता धगधगत होती आणि इकडे पुस्तकाला ज्वालांचा स्पर्श झाला.
काही क्षणानंतर योगेश स्वतःला बेडवर पडलेला दिसला.नुकतीच सकाळ झाली होती पण तो खूप आजारी आहे असे त्याला वाटत होते. इतका आजारी होता की त्याला सरळ उभे राहण्याची हिंमतही होत नव्हती, तो बेडवर पडला आणि झोपी गेला.
तो उठला तोपर्यंत दुपारचे बारा वाजले होते, तो पलंगावर तासभर पडून होता, सारखा कूस बदलत होता आणि अस्वस्थ होता. त्या रात्री त्याच्यावर घडलेल्या प्रसंगांच्या खुणा त्याला अजूनही सतावत होत्या. त्याला खूप भूक लागली होती. कसाबसा तो बेडवरून उठला.
काही वेळाने आंघोळ करून तो स्वयंपाकघरात गेला आणि स्वतःसाठी जेवण बनवू लागला. पण स्वयंपाकघरात तो एकटाच नव्हता. त्याच्या पाठीमागे तीच रात्रीची जांभळ्या साडीतली मुलगी त्याच्या मागे स्वयंपाकघरात उभी राहून त्याच्याकडे सतत एकटक प्रेमाने पाहत होती. योगेशकडे प्रेमळ नजरेने बघत ती मुलगी हळूच त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हा म्हातारा कोणी सामान्य पुस्तक विक्रेता नसून जिवंत देहांतून आत्मे काढून घेणारा आणि त्यांना नाना प्रकारे त्रास देणारा क्रूर माणूस आहे, ना तो स्वत: खुश आहे ना तो दुसऱ्याला खुश राहू देतो.
त्याने अनेक वर्षांपूर्वी मला मारले आहे आणि तुमच्यासारख्या सामान्यांना अडकवण्यासाठी माझा नेहमी वापर केला आहे. मृत्यूनंतरही मला त्याची इतकी भीती वाटते की मी त्याची आज्ञा मोडू शकत नाही. त्या म्हातार्याचा आदेश आहे, चल माझ्यासोबत, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि त्या मुलीने योगेशचा हात धरून त्याला बेडरूममध्ये नेलं.
योगेशने पलंगावर जे पाहिले, तो जागच्या जागीच थिजला. बेडवर योगेशचा मृतदेह पडला होता. योगेशचा रात्री स्वप्नात मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहासोबत तेच अवलक्षणी पुस्तक ठेवले होते, जे आता पेटी नसून एक पुस्तक होते.
ती मुलगी जी स्वतः एक भटकणारी आत्मा होती ती पुढे गेली आणि तिने ते पुस्तक उघडले आणि योगेशला वाचून दाखवायला सुरुवात केली. रात्रभर योगेशसोबत जे काही घडले ते अक्षर अन अक्षर त्यात जसेच्या तसे लिहिले होते आणि शेवटच्या पानावर लिहिले होते.
“मी योगेश, माझ्या आयुष्याला आणि भयानक स्वप्नांना कंटाळून स्वेच्छेने आत्महत्या करत आहे.”
आणि खाली त्याची सही होती ‘योगेश वसंत कुडाळकर!’