युनायटेड किंग्डम मध्ये प्लिमथला राहणारा कैवल्य चिपी विमानतळाच्या बाहेर येताच आश्चर्यचकित झाला. मुंबई ते कुडाळ पूर्वी रेल्वेने १०-१२ तासाचा प्रवास करून यावे लागायचे पण यावर्षी तो थेट विमानाने चिपी विमानतळावर उतरला होता.
इतके दिवस परदेशात राहिल्याने भारतात जूनच्या सुमारास असही वातावरण असते हे तो साफ विसरलाच होता. त्याच्या अंगाची लाही लाही होत असल्यासारखी वाटत होती. त्याची सारखी चिडचिड होत होती.
“शीट...का आलो मी इकडे?”
त्याच्या मोठ्या बहिणीचे गौरीचे लग्न ठरले नसते तर तो कदाचित भारतात आलाच नसता असा विचार करत असताना त्याला दिसले की त्याचा मोठा भाऊ अद्वैत दादा आणि लहान बहीण ऋचा विमानतळाबाहेर एका पांढऱ्या कारजवळ त्याची वाट पाहत होते. पण त्या लोकांना धूळ आणि उन्हाच्या कडाक्याचा त्रास होत नव्हता, दोघे आपापसात गप्पा मारत होते हसत खिदळत होते, कैवल्यलाच शोधत होते. मनातल्या मनात तो विचार करू लागला
“हे लोक इथे आरामात उभे आहेत आणि मी? मी इतका कसा बदललो ? आता इथेच कपडे काढावेसे वाटतायत. काढले तर खरंच कदाचित जरा बरं वाटेल.”
असा विचार करता करता कैवल्य चालत चालत दोघांपर्यंत पोहोचला भेटाभेटी झाली आणि तिघे गाडीत बसले.
अद्वैत दादा कार चालवत होता हे बघून कैवल्य चकित झाला आणि म्हणाला
"दादा, तू कधी गाडी चालवायला शिकलास?"
अशाच इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी चालू होत्या. ऋचाच्या तोंडाची टकळी अखंड चालू होती. रस्ता लांबचा नव्हता. कैवल्य आणि ऋचाची खेचत होता. तिला सारखा चिडवत होता. थट्टा मस्करी सुरु होती. हि सगळी गाडीत बसवलेल्या एसी महाराजांची कृपा जे सर्वांना खुश ठेवत होते. त्यामुळे उकाडा आजीबात जाणवत नव्हता.
“पण..मी एवढा कसा बदललो” कैवल्य मनाशीच म्हणाला.
शेवटी तिघेजण मजामस्ती करत एकदाचे घरी पोहोचले. गाडीतून उतरताच कैवल्यला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं. पण त्याने पाहिलं दादा आणि ऋचाला काहीच फरक पडला नाही.
कुडाळ तसं गजबजलेलं ठिकाण, गोंधळ गोंगाट यांची कैवल्यला पूर्वी सवय होती पण ती सवय जादूने घालवल्यासारखी सुटली होती. कैवल्यला घरी अजिबात बरे वाटत नव्हते कारण त्याला आपली खोली इतक्या नातेवाईकांसोबत शेअर करणे कठीण जात होते. बाकी इतर सगळ्या खोल्यांमध्ये सुद्धा फक्त सामान, सामान आणि नातेवाईक दिसत होते.अध्येमध्ये लग्नासाठी घरी आलेली लहान लहान चुलत-मावस भावंड घरभर निष्कारण धावत होती आणि कैवल्यच्या येऊन अंगावर धडकत होती.
कैवल्य बाहेर ओसरीवर ठेवलेल्या आजोबांच्या लाकडी आराम खुर्चीवर जाऊन बसला. दुपारची वेळ होती. थोडथोडी गार वाऱ्याची झुळूक येत होती जी त्याला आता सुखावत होती. काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरीही कोसळू लागल्या.
घरातील उकाड्याचा त्रास सहन होत नसल्याने काहीजण अंगणात बसले होते. ओसरीवर रुखवताची तयारी सुरु होती. मोत्याचे दागिने, रंगीत फराळ आणि कागदी फुलांची सुंदर आकर्षक सजावट केलेली होती. विविध प्रकारची छोटी-मोठी रंगीबेरंगी फुले अतिशय सुंदर रीतीने सजवली होती. मांडव घातला होता. तेथे विवाह सोहळा पार पडणार होता. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता.
इथे कैवल्य या रिमझिम पावसाच्या थेंबात हरवून गेला होता. त्याला त्याचे बालपण आठवत होते. लहानपणी पाऊस पडला की त्याला असाच आनंद व्हायचा. श्रावणात पाऊस थांबला कि पावसाचे थेंब फुलांवर पानांवर विसावत असत. ते चमकदार थेंब खूप सुंदर दिसत असत. मग तो त्या थेंबाना त्याच्या बोटांनी स्पर्श करून पाहायचा. जणू काही तो ते मोती वेचू पाहत आहे.
त्याची बालमैत्रिण अमृता म्हणायची
“ए हुशाssर हे मोती नाहीयेत काही. जे तू उचलून घेऊन त्यांचा माझ्यासाठी हार ओवणार आहेस..”
हा विचार मनात येताच कैवल्य गालातल्या गालात हसू लागला. अमृता सोबत फिरत फिरत तो कितीतरी ठिकाणी जायचा. काजूच्या बागेतून धावत धावत पुढे गेल्यावर त्यांना कुठेतरी डोंगरावरून खाली कोसळणारा ओहोळ दिसायचा, तर कुठे पावसाचे थेंब साठलेल्या डबक्यात पडायचे तेव्हा पाण्यावर थेंबांचा नाच पाहायला मिळायचा.
इतक्यात अद्वैत दादाचे काही मित्र कैवल्यजवळ आले आणि एकजण म्हणाला,
"अरे कैवल्य तू इथे बसलायस?जेवलास कि नाय?” आणि सगळे जोरात हसायला लागले.
धनंजय लुकतुके जो अद्वैतचा बालमित्र होता. तो कैवल्यच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला
“बघा बघा, ब्रिटीश लोकं. आता कोकणात येऊन पावसात भिजायला लागली... आणि खयालो में खो गये ”
हे बोलताना धन्याने सवयीनुसार तोंडात सुपारीचा तोबरा भरला होता त्यामुळे तो हे वाक्य बोबडं बोलला. धन्याच्या बोबड्या वाक्यामुळे कैवल्य सुद्धा आता फुटला होता. त्याला हसू आवरता आले नाही आणि सर्वजण एकत्र ख्याख्याखीखी करून हसू लागले.
कैवल्यच्या लक्षात आले कि काही क्षणांपूर्वी घामाने भिजलेला तो आता पावसाच्या थेंबांनी चिंब भिजलेला होता. थोड्या गप्पाटप्पा झाल्या आणि कैवल्य गालातल्या गालात हसत घरात जेवायला गेला.