पुरुषार्थाच्या व्याख्या प्रथम बदलायला हव्यात. पुरुषांना व्यवस्थेनं दिलेल्या आभासी अढळ स्थानावरून खाली उतरवून आजूबाजूच्या माणसांकडे पाहायला शिकवायला हवं. स्त्रीला ज्याप्रमाणे तिचं शोषण होतं आहे याची जाणीव करून द्यायला हवी, त्याप्रमाणे पुरुषांनाही ते शोषणकत्रे आहेत, याची जाणीव करून द्यायला हवी. आज अनेक पुरुष स्वत: पुढाकार घेऊन या व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्रीच नाही, तर प्रत्येक व्यक्ती ही सन्मान्यच असते, हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्रियांच्या शोषणाविरोधात आवाज उठवताहेत. त्यांच्या सन्मानासाठी भांडताहेत. पुरोगामी महाराष्ट्रात असे अनेकजण आहेत, की जे स्त्रियांच्या प्रश्नांवरच काम करता आहेत.
संगणक, त्याची हार्ड डिस्क किंवा त्यासाठी बनवले गेलेले विशिष्ट सॉफ्टवेअर प्रोग्राम्स या गेल्या ३०-४० वर्षांत प्रचलित झालेल्या गोष्टी असल्या तरी मला हे सारं विश्वच भलामोठा संगणक आहे असं वाटतं. त्याची हार्ड डिस्क पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळीच बनवली गेली. मग हळूहळू वेगवेगळ्या विन्डोज् तयार होत गेल्या. त्या सतत अपडेट केल्या गेल्या. जुन्या-नव्याचा मेळ घालून वेगवेगळी सॉफ्टवेअर्स तयार केली गेली. आपल्या समाजव्यवस्थेत जगण्यासाठी जे नियम पाळावे लागतात त्याचं प्रोग्रामिंग केलेली सॉफ्टवेअर्स तर कुटुंबकल्पना उदयाला आली तेव्हापासूनच उपलब्ध झाली आहेत. केवळ कुटुंब किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, तिचं कुटुंबातील स्थान याचंच प्रोग्रामिंग झालेलं आहे असं नाही, तर या कुटुंबाचा मिळून तयार झालेला समाज, तो चालण्यासाठी आवश्यक असलेले वर्णाच्या आधाराने केलेलं विभाजन याचीही सॉफ्टवेअर त्याकाळी तयार झाली. आणि ज्यानं ती बनवली, तेच लोक आपापल्या फायद्यासाठी हळूहळू त्यात व्हायरस सोडू लागले.
पुढे लोकांच्या सत्ता मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे हळूहळू त्यात सोडले गेलेले व्हायरस कायमचे वस्तीला राहिले. आज आपल्यासाठी तयार केलेल्या आणि प्रोग्राम केलेल्या विन्डोज् आपण जन्मल्याबरोबर ओपन केल्या जातात आणि त्याच्या प्रोग्रामिंगप्रमाणे आपण आपली मानसिकता तयार करत जातो. हे प्रोग्रामिंग जात, धर्म, वर्ण, वर्ग आणि लिंग या आधारे तयार केलं गेलंआहे. आणि त्याप्रमाणेच आपण जगायचं असं ठरलं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीतही असं प्रोग्रामिंग फार पूर्वीपासून केलं गेलं. स्त्री ही अनंतकाळची माता आणि क्षणाची पत्नी. पुरुष हा मालक आणि स्त्री त्याची दासी. पती परमेश्वर आणि पत्नी सहनशीलतेची करुण मूर्ती. नवऱ्यासाठी स्वत:ला शृंगारणारी, त्याची इच्छा असेल तर थोडंसं मद्य पिऊन त्याला खूश करणारी. आणि पुरुष आपल्या पुरुषार्थाच्या व्याख्येखाली जन्मापासूनच वाकलेला. स्त्रीला ताब्यात ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं याचं बाळकडू घरातल्या बुजुर्गाकडून शिकत असलेला.
आपल्या वंशाचा दिवा चालवण्यासाठी आणि आपली लंगिक भूक भागवण्यासाठीचं एक साधन म्हणून बाईकडे पाहणारा. तिनं आणि त्यानं कसं वागावं, बोलावं, त्यांच्याकडून किंवा त्यांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा असाव्यात, याचाही प्रोग्राम ठरलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुरुषांनी कायम मर्दासारखं (?) वागलं पाहिजे. त्यांनी अर्थार्जनच करायला हवं. त्याची इच्छा असली तरी त्यानं गृहस्थाची (हाऊस हजबंड) भूमिका करता कामा नये. किंवा बाईनं घर-कुटुंबच सांभाळावं. अर्थार्जन करणं हा तिचा धर्म नाही. आणि आज गरजेपोटी ती ते करत असली (हा प्रोग्राममध्ये केलेला छोटासा बदल आहे.) तरी ती घराची कर्ताकरविता होऊ नये. तिनं नवऱ्याची, घरातल्या माणसांची मर्जी सांभाळावी. देवधर्म, सणवार, व्रतवैकल्यं यांत मन रमवावं.. अशा गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या. अगदी खेळांची निवडही लिंगाप्रमाणे ठरवली गेली. त्यात भातुकली, बाहुला-बाहुली स्त्रीच्या वाटय़ाला आली, तर मदानी खेळ पुरुषांच्या वाटय़ाला गेले. खरं तर कालबाह्य झालेल्या साऱ्या रूढी-परंपरांचं तयार केलेलं हे सॉफ्टवेअर आता जुनं झालंय.
ज्याप्रमाणे नव्या उमेदीनं आजची आयटी क्षेत्रातली मुलं नव्या नव्या सॉफ्टवेअर्सचा शोध लावताहेत, नवं तंत्रज्ञान आणताहेत, विंडो टेन बाजारात आलं की विंडो सेव्हन आपल्या संगणकातून काढून टाकतात, त्याप्रमाणेच केवळ संस्कारांच्या, परंपरांच्या नावाखाली हे व्हायरसनं नासवून टाकलेलं आपल्या मनाचं सॉफ्टवेअर आपण सारेच का बदलत नाही? या विश्वाच्या या संगणकात कुटुंबकल्पनेनंतर ज्या नीतिनियमांची सॉफ्टवेअर्स घातली गेली होती ती आता न बदलता येणाऱ्या हार्डकोडेड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये रूपांतरित झाली आहेत. खरं तर संगणकातदेखील आपल्याला हवी ती सॉफ्टवेअर्स हवी तेव्हा आणि आपल्याला हवी तशीच घालता येतात. मग आपण आता आपल्या जगण्याचं प्रोग्रामिंग पूर्णपणे बदलून जाईल असं सॉफ्टवेअर का तयार करत नाही? अर्थात बहुतांशी पुरुष आणि स्त्रिया या पूर्वापार चालत असलेल्या जुन्याच विंडोज् वापरत असल्या तरी सारेच पुरुष किंवा स्त्रिया या प्रोग्रामप्रमाणे चालत नाहीत. या प्रोग्रामप्रमाणं न चालणाऱ्याला बाद करण्याची प्रथाही या प्रोग्राममध्ये टाकून ठेवली असली तरी आज अनेकजण या प्रोग्राम्सना नाकारून स्वत:चे प्रोग्राम्स तयार करताहेत. काही आपला स्वत:चा नवा प्रोग्राम शोधून काढताहेत.
आज स्त्रिया ज्याप्रमाणे स्वत:च्या जगण्याचा विचार करू लागल्या आहेत, त्याचप्रमाणे अनेक पुरुष स्त्रियांच्या जगण्याचा, स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा अतिशय गंभीरपणे विचार करताना दिसतात. त्यांची संख्या कमी असली तरी पुरुषसत्ताक समाजानं केलेल्या शोषणानं व्यथित झालेल्या अनेक समंजस व विचारी पुरुषांनी स्त्री-शोषणाच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आहे. स्त्रियांच्या जगण्याचे, त्यांच्या शोषणाचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठं निर्माण केली जात आहेत. यात सुशिक्षित, उच्चशिक्षित, विचारी मुलं आहेतच; पण मागील पिढीचे अनेक पुरुषही यात आहेत. एकेकाळी हे काम फुले, आगरकर, कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी केलं होतं. आज त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले अनेक लोक स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडताहेत. पुरुषांनी चालविलेल्या ‘पुरुषस्पंदन’, ‘पुरुषउवाच’सारख्या नियतकालिकांतून स्त्री-पुरुष समानतेची सतत चर्चा होते आहे. स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुरुषांनी चालविलेल्या अनेक संस्था काम करताहेत. ज्यांना व्यापक पातळीवर काम करणं शक्य नाही असे पुरुष आपापल्या घरात तरी हे समानतेचं वारं वाहू देत आहेत. हा सारा बदल आशादायक आहेच; पण आजच्या समाजाची मानसिकता बदलवणाराही आहे.
खरं तर आपल्या समाजातीत केवळ स्त्रियाच नाही, तर पुरुषही या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी आहेत. शरीरशास्त्रीयदृष्टय़ा एक मुलगा किंवा मुलगी म्हणून लिंगभेदावर आधारित वेगळेपण घेऊन या जगात जन्माला येताना आपल्याला लिंगभेदाची कल्पना असली तरी आपल्या समाजानं निर्माण केलेल्या लिंगभावनेची जराही कल्पना नसते. ती आपल्या मनात हळूहळू आपल्या अवतीभवतीच्या माणसांकडून रुजविली जाते. एखादं मूल आपला बाप आपल्या आईला मारताना, तिच्यावर हुकूम चालवताना पाहत असेल तर नकळत आपली ताकद स्त्रीचं दमन करण्यातच आहे, हे शिकतच तो मोठा होत जातो. पण घरात आई-वडील दोघांमध्ये सौहार्दाचं, प्रेमाचं आणि एकमेकांविषयी आदराचं नात असलेलं पाहत तो मोठा झाला तर स्त्रियांचा आदर करायला तो आपोआपच शिकतो. लहानपणी त्याला भातुकली खेळावीशी वाटत असेल तर त्याच्या हातून ती काढून घेऊन बंदूक किंवा गाडी दिली नाही तर त्याला पुढे स्वयंपाक करणं हे आपलंही काम आहे, हे सहज स्वीकारता येईल. आपल्या या व्यवस्थेनं पुरुषाकडूनही फार अपेक्षा ठेवल्या आहेत. त्याला सतत ‘मर्दासारखं वाग’ असं सांगितलं गेलं असल्यामुळे आणि मर्द म्हणजे काय, याच्या चुकीच्या व्याख्यांचा पाऊस त्याच्यावर पाडला गेलेला असल्याने तोही फार गोंधळून गेला आहे. बायकोची मतं स्वीकारली की ताबडतोब ‘बायकोचा बल’, ‘जोरू का गुलाम’ किंवा ‘हेनपेक्ड हजबंड’ म्हणून त्याची संभावना होत असल्यानं अनेकदा पुरुषही या सामाजिक दबावाखाली येतात आणि घरात समानता मानत असले तरी ती समाजापासून लपवून ठेवतात. धुणीभांडी, स्वयंपाक यासारखी कामं करून घरातल्या स्त्रियांना मदत करणारे काही पुरुष आपल्या समाजात आहेत. त्यांना स्वयंपाक करायला खरोखरच आवडतो. पण त्यांना स्वयंपाकघरात जाण्यापासून आपली व्यवस्थाच रोखत असते. त्यामुळेच कदाचित, उत्तम शेफही ‘मी हॉटेलात उत्कृष्ट स्वयंपाक बनवत असलो तरी घरी मात्र बायकोच्या हातचंच खातो,’ असं लोकांना आवर्जून सांगताना दिसतात. हे सांगणंही अनेकदा या सामाजिक दबावातूनच येत असतं. स्वयंपाकच नाही, तर मुलांचं संगोपनही अनेक पुरुष व्यवस्थित करत असतात. अनेकदा स्त्रीपेक्षाही उत्तम तऱ्हेनं ते करत असतात. पण हे काम त्यांचं नाही असं समजणाऱ्या समाजात त्यांची टिंगल केली जाते. बायकी म्हणून त्यांची निर्भर्त्सना केली जाते. त्यामुळेच अनेकदा इच्छा असूनही या परंपरा मोडण्यासाठी पुरुष पुढे येत नाहीत. किंवा आले तरी त्याविषयी मोकळेपणानं बोलत नाहीत.
स्त्रीवर लादलेल्या रूढी-परंपरांच्या बंधनातून त्यांना सोडवून स्वत:कडे त्यांनी एक व्यक्ती म्हणून पाहावं, स्वत:चा सन्मान करावा, दुसऱ्याला तो करायला लावावा, आपलं शोषण होतं आहे याचं भान त्यांना यावं म्हणून आज अनेक संघटना, विचारवंत, चळवळीतले कार्यकत्रे प्रयत्न करत आहेत. तसेच प्रयत्न पुरुषार्थाच्या ज्या कल्पनेत पुरुषाला जखडून ठेवलं आहे, त्या कल्पनेतून त्याला मुक्त करण्यासाठी व्हायला हवेत. अनेकदा पुरुषार्थ म्हणजे काय? तर माऱ्यामाऱ्या करणं, शिवीगाळ करणं, व्यसनं करणं, एखादी मुलगी आवडली तर तिची इच्छा नसली तरी तिला जबरदस्तीनं लग्न करायला भाग पाडणं, नाही म्हणाली तर अॅसिड फेकून किंवा मारून आपलं श्रेष्ठत्व दाखवणं, शंभर पोरी नाकारल्याचा अभिमान मिरवणं, बायकोला ताब्यात ठेवणं, हक्कानं शरीरसुखाची वसुली करणं, बायको कितीही शिकलेली असली तरी तिला करिअर करू न देणं, सारे आíथक व्यवहार आपल्या ताब्यात ठेवणं, बायकोकडून प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेणं, तिच्या वागण्या-बोलण्यावर बंधनं घालणं, तिला मारहाण करणं.. हेच आपल्याकडच्या अनेक मुलांच्या डोक्यात बसलेलं आहे. काही पुरुष तर ‘दिवसातून दोन वेळा मी जेवतो,’ असं म्हणण्याइतक्या सहजपणे ‘महिन्यातून दोन-तीन वेळा मारतोच बायकोला’ असं सहजगत्या म्हणतात आणि वर ‘ऐकलं नाही तर मारणार नाही का?’ असा प्रश्न हसत हसत विचारतात.
पुरुषार्थाच्या या व्याख्या प्रथम बदलायला हव्यात. पुरुषांना व्यवस्थेनं दिलेल्या या अशा आभासी अढळ स्थानावरून खाली उतरवून आजूबाजूच्या माणसांकडे पाहायला शिकवायला हवं. स्त्रीला ज्याप्रमाणे तिचं शोषण होतं आहे याची जाणीव करून द्यायला हवी, त्याप्रमाणे पुरुषांनाही ते शोषणकत्रे आहेत, याची जाणीव करून द्यायला हवी. आज अनेक पुरुष स्वत: पुढाकार घेऊन या व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्रीच नाही, तर प्रत्येक व्यक्ती ही सन्मान्यच असते, हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्रियांच्या शोषणाविरोधात आवाज उठवताहेत. त्यांच्या सन्मानासाठी भांडताहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात असे अनेकजण आहेत, की जे स्त्रियांच्या प्रश्नांवरच काम करताहेत. मग तो स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न असो, स्त्रीशिक्षणाचा प्रश्न असो, हुंडय़ासाठी स्त्रियांना जाळण्याचा, स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचा किंवा खैरलांजीसारख्या सामूहिक बलात्काराचा प्रश्न असो, किंवा अगदी स्त्रियांच्या कपडय़ांवरून, त्यांच्या मासिक पाळीवरून अथवा त्यांनी ठेवलेल्या शरीरसंबंधावरून त्यांचं पावित्र्य किंवा चारित्र्य ठरवण्याचा प्रश्न असेल- या सगळ्या प्रश्नांवर आज स्त्रियांबरोबरीने पुरुषही काम करताहेत. कदाचित त्यांची संख्या कमी असेल; पण ते बदलू पाहताहेत.. परंपरेनं बनवलेली सॉफ्टवेअर्स उघडू पाहताहेत नव्या विन्डोज.
लेखिका – निरजा