लोकशाहीसाठी युध्द

आशिया, युरोप, आफ्रिका, पॅसिफिक, अ‍ॅटलांटिक आणि हिंदी महासागरांतील विस्तृत भागांत भीषण युध्द चालू होते.  युध्दातील सारे महाभयंकर प्रकार घडत होते.  चीनमध्ये सात वर्षे युध्द चालले होते; युरोप आणि अफ्रिकेमध्ये साडेचार वर्षे आणि सर्व जगभर युध्द सुरू होऊन दोन-अडीच वर्षे झाली होती.  फॅसिस्टवाद नि नाझीवाद यांच्या विरुध्द हे युध्द होते.  तसेच जगावर अधिसत्ता मिळविण्यासाठीही ते होते.  या युध्दकाळातील तीन वर्षे मी तुरुंगात काढली.  या किल्ल्यात नि हिंदुस्थानातील इतर तुरुंगांत काढली.  नाझी आणि फॅसिस्ट संप्रदायाच्या प्रारंभकाळात माझ्या मनावर—माझ्यावर नव्हे तर, हिंदुस्थानातील अनेकांच्या मनावर—कोणत्या क्रिया-प्रतिक्रिया झाल्या त्याची मला चांगलीच आठवण आहे.  आणखी असे आठवते की, जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा सार्‍या हिंदुस्थानचे हृदय हलले.  चीनशी असलेली जुनी मैत्री नवी झाली; तिला नवीन पालवी फुटली.  इटलीने अ‍ॅबिसिनियावर बळजबरी केली त्याची आपल्याला चीड आली; झेकोस्लोव्हाकियाला दगा दिला त्याची शिसारी आली— मन अगदी विटले.  भावना पुरत्या दुखावल्या.  स्पेनमध्ये असीम शौयाने व चिकाटीने लढा देता देता लोकशाही पडली, त्यामुळे मला स्वत:ला व इतर अनेकांना आपण स्वत:च पडल्याचे दु:ख झाले.

नाझींनी व फॅसिस्टांनी चौफेर चढाई करून धुमाकूळ घातला.  त्याबरोबरच जे नीच पशुतुल्य अत्याचार चालविले ते तर महाभयंकरच; पण त्यांनी जाहीरपणे डांगोरा पिटून ज्या मतांचा, ज्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार चालविला होता व स्वत:ही तसेच वागण्याचा प्रयत्न करीत होते ती मते व ते तत्त्वज्ञान महाभयंकर वाटे.  कारण युगेच्या युगे आपण जे मानीत आलो, आज घटकेला आपली ज्यावर श्रध्दा आहे त्या सगळ्या मतांवर व तत्त्वज्ञानावर हे बोळा फिरविल्यासारखे होते.  वंशाची सारी आठवण बुजली.  जुन्याचे सारे घरबंध सुटले तरी प्रत्यक्ष आपल्याला परकीय राजसत्तेचा जो अनुभव आला त्याने (त्यांनी लाजेकाजेखातर का होईना काही सोंगे उभी केली असली तरी) अशी अद्दल घडली आहे की, जीवनविषयक व राज्यशासनविषयक नाझी मतप्रणाली व तत्त्वज्ञान म्हणजे काय याचा आपल्याला पुरेपूर उमज पडला आहे.  याच तत्त्वांनुसार व शासनपध्दतीनुसार हिंदी जनतेचे बलिदान चालले आहे.  म्हणूनच तर या फॅसिस्टवादाचे व नाझीवादाचे नाव निघाल्याबरोबर आपल्या मनात चटकन तिडीक उठली !

तो १९३६ चा मार्च महिना होता.  त्या महिन्याच्या पहिल्या दिवसातच सिनॉर मुसोलिनीचे भेटीचे आमंत्रण मला आले होते.  ते आग्रहाचे आमंत्रण मी का झिडकारले ते मला आठवते आहे.  इटलीचा युध्दात पराभव झाल्यानंतर मुसोलिनीबद्दल वाटेल ते बोलणारे, त्याला शिव्याशाप देणारे प्रमुख ब्रिटिश मुत्सद्दीदेखील अगोदर मुसोलिनीचे नाव निघाले की अगदी जिव्हाळ्याने त्याचे कौतुक करीत आणि त्याच्या राजवटीची व उपाययोजनांची तोंड भरून स्तुती करीत.

पुढे दोन वर्षांनी, म्युनिच प्रकरणाच्या आधी उन्हाळ्यात, नाझी सरकारने जर्मनीला भेट देण्याबद्दल मला आमंत्रण दिले होते.  ''तुमचा नाझी संप्रदायाला विरोध आहे हे आम्हाला माहीत आहे, तरीही आपण जर्मनी बघून जावे असे आम्हाला वाटते.''  असे त्या आमंत्रणात नमूद केले होते.  त्यांचा पाहुणा म्हणून किंवा खाजगी रीत्या, नाव बदलून, गुप्तपणे किंवा जहीरपणे जेथे इच्छा असेल तेथे जायला मुभा आहे वगैरे सारे त्या आमंत्रणात होते.  तरी तेही आमंत्रण मी साभार नाकारले.  जर्मनीत जाण्याऐवजी मी झेकोस्लोव्हाकियात गेलो.  तो दूरचा देश ! त्या वेळच्या इंग्लंडच्या पंतप्रधानांना त्याच्याविषयी फारशी माहिती नव्हती.

म्युनिच प्रकरणाआधी इंग्लंडमधील मंत्रिमंडळातील काही सभासदांना व इतर काही प्रमुख राजकारणी लोकांना मी भेटलो होतो.  माझे फॅसिझम व नाझिझम विरुध्दचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा मी धीर केला.  परंतु मला दिसले की माझे विचार त्यांना रुचले नाहीत.  इतर अनेक गोष्टींचा विचार करून त्याही ध्यानात घेतल्या पाहिजेत असे त्यांचे म्हणणे पडले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel