हिंदुस्थानच्या इतिहासातील हैदर ही नामांकित व्यक्ती आहे.  मोघम का होईना एक प्रकारचे राष्ट्रीय ध्येय त्याच्यासमोर होते, दूरवर पाहणार्‍या पुढार्‍याचे गुण त्याच्या अंगी होते.  असाध्य व दुर्धर रोगाची त्याला सारखी पीडा असूनही त्याची शिस्त आणि कठीण कामे करण्याचा त्याचा उरक ही आश्चर्यकारक होती.  दुसर्‍यांना आकलन होण्यापूर्वीच आरमाराचे महत्त्व त्याच्या लक्षात आले होते.  आरमारी बळात ब्रिटिशांचा प्राण आहे, आणि ही आरमारी सत्ता म्हणजे वाढता धोका आहे हे त्याच्या केव्हाच ध्यानात आले होते.  इंग्रजांना हाकलून देण्यासाठी सर्व हिंदी सत्तांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा असे त्याच्या मनात आले.  त्याने मराठे, निजाम, औधचा सुजाउद्दौला या सर्वांकडे या हेतूने वकील पाठविले.  परंतु काही निष्पन्न झाले नाही.  तेव्हा स्वत:चे आरमार तो बांधू लागला.  त्याने मालदीव बेटांचा ताबा घेऊन, तेथे गलबते बांधण्याचे व इतर चळवळींचे मुख्य केंद्र केले.  सैन्यासह कूच करीत असता वाटेत तो मरण पावला.  त्याचा मुलगा टिपू.  याने आरमाराचे काम पुढे सुरू ठेवले.  त्यानेही नेपोलियन आणि इस्तंबूलचा तुर्की सम्राट यांच्याकडे ब्रिटिशांना हाकलण्याच्या बाबतीत बोलणी केली.

उत्तरेस पंजाबात रणजितसिंगाच्या नेतृत्वाखाली शीख सत्ता उदयास आली होती.  पुढे ही सत्ता वायव्य सरहद्दीपर्यंत आणि वर काश्मिरभरही पसरली.  परंतु शीख राज्य हिंदुस्थानच्या एका सीमेवर पडले.  अखिल भारतीय प्रभुत्वावर त्यांच्या सत्तेचा परिणाम होत नव्हता.  अठरावे शतक हळूहळू संपले आणि हिंदुस्थानात कोण शेवटी अधिसत्तेसाठी लढणार हे जवळजवळ निश्चित झाले.  मराठे व इंग्रज या दोन सत्तांतच हा शेवटचा सामना व्हायचा होता.  बाकी छोटीमोठी राज्ये या दोघांची मांडलिक होती.

१७९९ मध्ये ब्रिटिशांनी टिपूचा शेवटचा मोड केला; आणि ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठे यांच्यातील शेवटच्या युध्दासाठी रणांगण आता मोकळे होते, मैदान खुले होते.  चार्ल्स मेटकाफ हा ब्रिटिशांचा अत्यंत कर्तबगार असा एक अंमलदार होता, तो १८०६ मध्ये लिहितो, ''हिंदुस्थानात आता दोनच प्रमुखा सत्ता आहेत : मराठ्यांची व ब्रिटिशांची.  बाकी इतर राजेरजवाडे या दोन सत्तांचे अंकित आहेत.  आम्ही गमावलेली तसूतसू जमीन मराठे बळकावून बसतील.''  परंतु मराठा सरदारांत आपसात स्पर्धा होत्या, आणि त्यांना अलग अलग गाठून ब्रिटिशांनी त्यांचा मोड केला.  मराठ्यांनीही मर्दुमकी गाजविली व ब्रिटिशांचे त्यांनीही पराभव केले १८०४ मध्ये आग्र्याजवळ ब्रिटिशांचा त्यांनी चांगलाच मोड केला.  परंतु १८१८ पर्यंत मराठी सत्तेचा शेवटी पुरा मोड होऊन मध्य हिंदुस्थानातील मराठे सरदारांनी ईस्ट इंडिया कंपनीची अधिसत्ता शेवटी मान्य केली.  हिंदुस्थानच्या बर्‍याचशा भागाचे ब्रिटिश आता एकमात्र सत्ताधार होऊन या प्रदेशाचा कारभार प्रत्यक्ष किंवा हाताखालच्या दुय्यम राजेरजवाड्यांच्या द्वारा ते करू लागले.  अजून पंजाब आणि त्याच्या आसपासचे काही प्रदेश मिळवायचे राहिले होते, परंतु हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्य ही एक आता सिध्द वस्तू झाली होती.  पुढे शिखांबरोबर, गुरख्यांबरोबर आणि ब्रह्मी सत्तेबरोबर ज्या लढाया झाल्या त्यांनी नकाशा पुरा केला एवढेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel