तेरावे वगैरे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात .

 काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरूजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरूजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात . 

या विधीत चार गुरूजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते . 

चारही दिशांस बसून चारही गुरूजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरूजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel