बलुचिस्तानातील मराठे त्यांच्या बलुची सरदारांच्या जमातींच्या नावावरुन ओळखले जातात. उदा. बुगटी मराठा… मात्र मराठा युद्धकैद्यांपैकी एक गट असा होता. त्यांनी मात्र आपली स्वतंत्र ओळख जपली, तो म्हणजे साहू मराठा अर्थात शाहू मराठा. छत्रपती शाहू महाराजांच्या नावावरुन या समाजाने आपली स्वतंत्र ओळख ठेवली. हा वर्ग सुरुवातीपासूनच मुक्त होता. बलुचिस्तान वाळवंट असला तरी या प्रांताच्या काही भागात पाणी आहे. असं सांगितलं जातं की बलुची टोळ्या या भटक्या होत्या. त्यांना शेतीचं तंत्र अवगत नव्हतं. त्यामुळे त्यांनी शेतीचं तंत्र अवगत असलेल्या मराठा युद्धकैद्यांना शेती करण्यास परवानगी दिली. मराठा युद्धकैद्यांनी हा निर्णय सार्थ ठरवत याठिकाणी गहू, बाजरी अशी पिकं घेतली. त्यामुळे हा समाज सुरुवातीपासूनच मुक्त राहिला.
दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत. इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे. शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे.