- शैलेंद्र बेंडाळे
जळगाव

मी घरी पोहोचलो. हातातली पिशवी पाहून बायकोने विचारलं, "काय आणलंय या पिशवीत?"

मी न बोलताच पिशवी तिच्या हातात दिली. तिने पिशवीत पाहिलं, पिशवीतून 4-5 छोटी छोटी खरबूजं निघाली. माझा मुलगा दिप होताच तिथे. म्हणाला, "ही असली कसली खरबूज आणलीत? कोण खाणार असली छोटी छोटी खरबूज?"

मी म्हणालो, "आपणच खाणार."

बायको म्हणाली, "तुम्ही काहीपण कशाला घेऊन येत असता? ही असली खरबूजं कशाला आणलीत? जरा मोठी आणि चांगली नाही का आणायची?"

मी: "अगं, एखादं कापून तरी बघ आधी आणि मग बोल."

ती: "कापायला कशाला पाहिजे, दिसतंय ना मला".

खरबूज न कापताच त्या खरबुजाच्या दिसण्यावरून त्याची चव पारखली गेली..!

पण मला मात्र खात्री होती त्या खरबूजाच्या गोडीची...

.

.

.

मी हातपाय धुतले आणि शांतपणे खुर्चीत बसलो आणि काय घडलं ते आठवू लागलो.

भर दुपारची वेळ होती. साधारण 1 वाजला होता. ऊन मी म्हणत होतं. मी गाडीने चोपड्याला निघालो होतो. गाडीतला AC सुरू होता पण तरीही भलतंच गरम होत होतं. सगळ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी temperature पाहायला मोबाईल हातात घेतला, 42℃ तापमान होतं!

गाडी हळूहळू गावाबाहेर आली आणि आता मेन रोड ला लागली. एव्हाना AC पण छान गार झाला होता. मी FM लावला आणि खूष झालो कारण माझ्या आवडीचं " तुम जो आये जिंदगी मैं" गाणं सुरू होतं. मी पण गाणं गुणगुणायला लागलो....

आता गाडीने चांगलाच वेग पकडला होता. रणरणत्या उन्हात काळा डांबरी रोड तापून चांगला चमकत होता. खानदेश चा उन्हाळा, त्यात मे महिना आणि दुपारचा दिड वाजलेला. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादी काली-पिली passenger रिक्षा तेवढी दिसत होती, पण तीही फारच तुरळक.

सुनसान रस्त्यावरून मी वेगाने जात होतो. दूरवर रस्त्याच्या एका बाजूला एक पांढरं गाठोडं दिसलं. त्याच्या थोडं जवळ गेल्यावर समजलं की एक म्हातारा रस्त्याच्या बाजूला एका छोट्याशा बोरीखाली बसला होता. बोरीची पानं बऱ्यापैकी झडून गेली होती.नावापुरती सावली होती, बस.

म्हाताऱ्या जवळ जाऊन मी गाडी जरा हळू केली. त्याने माझ्याकडे पाहून केविलवाणा रामराम केला. मी गाडी थांबवली. तो म्हातारा एवढ्या उन्हात एका तळवटावर बसून 'खरबूज' विकत होता. मी गाडीची काचही खाली नाही केली. त्याने मला खरबुजाकडे खुणावलं..

मी काच खाली केली, तो म्हणाला, " साहेब, घ्या की डांगर पोरांसाठी. लंय गोड हाय." ...

मी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता काच वर केली आणि पुन्हा सुसाट वेगानं चोपड्याकडं निघून गेलो. माझ्या मनात आपसूकच त्या म्हाताऱ्याचा विचार आला. एवढ्या उन्हात भर रस्त्यावर बसून हा जख्ख म्हातारा खरबूज का विकत असेल?

मी चोपड्याला पोहोचलो. माझं काम केलं आणि तडक माघारी निघालो. ऊन काही कमी व्हायला तयार नव्हतं, 4.30 वाजून गेले होते.

मी गाडी चांगली जोराने पळवत होतो. काही वेळाने मला पुन्हा दूरवर रस्त्यावर एक पांढरं गाठोडं दिसलं. मी लगेच ओळखलं की तो म्हाताराच असणार. मी त्याच्याजवळ पोहोचलो. त्याने पुन्हा मघासारखाच केविलवाणा रामराम केला. मी गाडी थोडी बाजूला घेऊन थांबवली. खाली उतरलो आणि त्याच्याजवळ गेलो. त्याला रामराम केला. म्हातारा मस्त गोड हसला. मी म्हणालो, " आजोबा, तुम्ही अजून इथेच का? मी मघाशी गेलो तेव्हाही तुम्ही इथेच होता."

तो म्हणाला, "हाव साहेब, हाडीचाय मी कव्हाचाच. डांगरं ईकी राह्यलाय. तुम्हींबी घी जाय जा पोराईले, घैरे गोड हाय." म्हाताऱ्याचं बोलणं डांगरापेक्षाही जास्त गोड वाटलं...!

म्हाताऱ्याचं वय असेल अंदाजे 80 वर्ष. चेहरा रापलेला. कपडे मळके आणि बऱ्यापैकी जीर्ण झालेले. पण डोळे मात्र पाणीदार होते गड्याचे.

"साहेब, घी जाय जा तुम्हीबी डांगरं. "

त्याने पाटीतल्या डांगरांकडे बोट दाखवलं.

"माही नातबी घैरी आवडीनं खात जाये. तिलेबी घैरे पटत डांगरं. रोजचे 3-4 तरी खाईच घेये माही नात."

मी हसलो..म्हणालो, " आजोबा, 3-4 तर उरलेत आता डांगरं, कशाला विकताय, जा घेऊन घरी परत नातीला".

म्हाताऱ्याचे डोळे अचानक पाणावले. म्हणाला,

" साहेब, मरी गेली माही नात, ल्योक आन सूनबी.  2 वर्षाला गेले होते सगळे वैष्णोदेवीला, गाडीचा अक्षीडेन झाला आन गेले सगळे देवाघरी."

म्हाताऱ्याला हुंदका अनावर झाला. नातीच्या व पोराच्या आठवणीने म्हाताऱ्याचे डोळे घळाघळा वाहू लागले.

मी सुन्न झालो. आजोबाच्या खांद्यावर हात ठेवला, थोडीशी पाठ थोपटली.

" शांत व्हा आजोबा. सगळं ठीक होईल.", मी उसनं अवसान आणून त्याला धीर देत होतो.

थोड्या वेळातच म्हातारा शांत झाला. मी गाडीतून बिसलेरी बाटली आणली आणि त्याला पाणी दिलं प्यायला.

"कशी दिलीत डांगरं?", मी.

"10 ला 1 देतू मी, पण तुम्ही न्या तशीच, तुमची पोरंबी माह्या नातीवानीच असतील की.. मी समजेन की माह्या नातीनच खाल्ली डांगरं. न्ह्या तुम्ही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel