- शैलेंद्र बेंडाळे
जळगाव

रविवारचा दिवस होता. मी ठरवून मुद्दाम उशिरा उठलो होतो त्यादिवशी. आणि निवांतपणे आवरून व. वा. वाचनालयात निघालो होतो पुस्तक बदलायला. 'चिकन सूप फॉर द सोल्स- भाग - 4' संपला होता, आता 5 वा भाग आणायचा ठरवलं होतं.

वाचनालयात पोहोचलो. नेहमीचीच माझ्या परिचयाची धीर-गंभीर शांतता होती. काउंटर वरच्या क्लर्क ला ओळखीचं स्मित हास्य दिलं. त्यांनीही स्मित हास्यानेच स्वागत केलं. भाग 4 परत  केला, खुणेनेच भाग 5 वा द्या असं सांगितलं. सगळीकडे शांतता होती. फक्त पुस्तकांची पानं उलटवल्याचा आवाज तेवढा येत होता. थोड्याच वेळात भाग 5 वा घेऊन वाचनालयातून बाहेर पडलो. खाली गाडी जवळ येऊन थांबलो. सहज आजूबाजूला पाहिलं,रविवार असल्याने रस्ता तसा सामसुमच होता. थोड्या अंतरावर एक माणूस आणि एक 5-6 वर्षाचा मुलगा हातात हात धरून रमतगमत येताना दिसले. बाप -लेक असावेत असं वाटलं.

ती जोडी जशी जवळ आली तेव्हा दिसलं की, त्या माणसाने मुलाचं बोट धरलं नव्हतं तर त्या मुलाने त्या माणसाचं बोट धरलं होतं... वडील होते ते त्याचे की जे अंध होते...मुलगा छान ऐटीत चालत होता बापाचं बोट धरून. आणि अगदी मोठ्या माणसांसारखं वडिलांना म्हणत होता - रस्त्याने नीट चालावं, सगळीकडे नीट लक्ष ठेवावं, धांदरटासारखं करायचं नाही. वगैरे...

मला कौतुक वाटलं त्या लहानग्याचं. मी त्याला विचारलं, "कारे? कुठे घेऊन चाललायस बाबांना?"

तो म्हणाला, " कामावर सोडयाले. याईले आता दिसत नी नं, मंग मीच जातो दरोज  कामावर सोडयाले अन तडून आण्याले  बी."

मी: "छान, आणि मग शाळेत नाही जात का तू?"

तो: "शाईत बी जातू. याईले हाडी कामाले सोडीसन मी जातू शाईत. अन शाईतून आला की याईले हाडी कामावर यीसन घी जातो घरी."

मी: "मग ठिक आहे."

त्याचे वडील: "चाल बेटा, जाय तू आता. मी जाईल हडून, आता जोयचं हाय."

मी म्हटलं, " दादा, कुठे आहात तुम्ही कामाला? देऊ का सोडून तुम्हाला तिथं?"

तो: "नको नको, हडी जोयचं हाय."

मुलगा: "बाबा, जातू मी"

आणि तो मुलगा परत फिरून निघून गेला.

मी त्या माणसाशी थोडं अजून बोललो तेव्हा समजलं की तो आधीपासून आंधळा नव्हता. MIDC मध्ये एका कंपनीत नोकरीला होता.

8-10 महिन्यांपूर्वी कंपनीत झालेल्या एका अपघातात त्याची दृष्टी गेली. मालकाने नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये दिले, पण कामावरून काढून टाकलं. Manufacturing कंपनीत आंधळा काय कामाचा? टाकलं काढून कामावरुन. 3-4 महिने गेले. पैसे संपले. मग बायको कामाला जाऊ लागली. पण तिच्या कामाच्या पैशात काही भागत नव्हतं म्हणून यानी कामावर जायला सुरुवात केली....वगैरे, वगैरे.

मी पूर्ण ऐकून घेतलं. त्यालाही मन जरा मोकळं झाल्यासारखं वाटलं. मला तो म्हणाला, "चला भाऊ, आपु च्या घिऊ."

मी त्याला मनाई नाही केली. वाचनालयाच्या थोडंसंच पुढे एका गाड्यावर आम्ही 'च्या' पिला.

त्याने चहावाल्याला 10 रुपये दिले. मी पटकन ते पैसे परत त्याच्या खिशात ठेवले आणि त्याला म्हणालो, " भाऊ, तू पुढच्या वेळेस दे पैसे."

आणि त्याचा निरोप घेऊन मी घरी निघून आलो.

3-4 दिवसांनी मी पाचोऱ्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन वर गेलो. तिकीट घेतलं. तिथं ATM जवळ मला एक भिकारी बसून भीक मागताना दिसला. त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. अरेच्या, हा तर तोच माणूस होता जो मला रविवारी भेटला होता. त्याचा मुलगा त्याला कामावर सोडून गेला. आम्ही सोबत चहा पिला... मनातून मला त्याच्या खोटारडेपणाचा भयंकर राग आला. लहानश्या मुलाला खोटं सांगून हा काही काम न करता भिक मागत होता चक्क!!!

मला माझीच भयानक चीड आली, मी एका खोटारड्या भिकाऱ्यासोबत गप्पा काय मारल्या, चहा काय पिलो...! शी!

मी तडक त्याच्याजवळ गेलो. आणि अक्षरशः ओरडून त्याला जाब विचारू लागलो...

त्याला समजलं लगेच की मी कोण आहे आणि मला त्याचा खोटारडेपणा कळलाय.

तो खूपच ओशाळला. म्हणाला, "भाऊ, राग आला माह्या? मी खोटं बोलला म्हणून?

मी तरी काय करू सांगा मले. डोये फुटी गेले. नौकरी बी चालली गेली. बायको न पोऱ्या उपाशी मारू ? बाई जाती कामाले, मियता तिले 3-4 हजार रूपे. त्यात काय पुरतं? मंग मीनबी ठरोयलं की आपुबी काम करू. गहिरं फिरलू पण फुटक्याले कोणी काही काम देईना. ल्योकाले चांगला शिकाडनाय मले. घरबी त चालोयनाय. कुकुन आणसान पैसे?"

मी: "मग काय भिका मागतोस?"

तो: मंग? काय काम मिळाना, पैसे दरोजच लागताय. काय करू? फुटक्याले ( आंधळ्याला) कोणीच काम देईना ...काय करु सांगा. मलेबी न्हाई पटत भीक मागणं. आयुष्यभर कष्ट केलं, कोणापुढं कधी हात न्हाई पसरलं.. पण आता नशिबानं वेळच अशी आणलीय.."

आणि तो रडू लागला.

विनंती करू लागला की, वाटलं तर मुस्काडीत हाणा, पण माह्या लेकाले सांगजा नका की मी भिक मांगतो... त्याले बिलकुल मालूम नियाय की मी भिक मांगतो.  तो कितला कौतुकानी मले दरोज कामावर सोडतु अन घी बी जातू...

मी निःशब्द झालो. डोकं बधीर झालं. बिचाऱ्याच्या नशिबाची किव आली. काम करायची इच्छा आहे पण आंधळा आहे म्हणून काम मिळत नाही. पोराला शिकवून मोठं करायची आस आहे, पण पैसे नाहीत. मुलाला कळू नये म्हणून थेट रेल्वे स्टेशन वर त्याला न सोडायला सांगता थोडं बाजूला सोडायला सांगायचं... किती यातना होत असतील ना त्याच्या जीवाला हे सगळं रोज रोज करताना?

दिवसभर त्याचाच विचार माझ्या मनात रुंजी घालत होता.

अखेरीस मी ठरवलं आहे की मी मेल्यानंतर अवयव दान करणार. माझ्या डोळ्यांमुळे 2 जणांना दृष्टी मिळेल आणि त्यांना स्वाभिमानाने जगता येईल, केविलवाण्या स्वाभिमानाने नाही!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel