धृतराष्ट्रालगीं । म्हणे तो संजय । आतां अभिप्राय । ऐका तो चि ॥१॥

योग जो अष्टांग । सांगेल साचार । देव योगेश्वर । कौन्तेयासी ॥२॥

वाढिलें सहज । ज्ञानाचें पक्कान्न । अर्जुनालागोन । नारायणें ॥३॥

त्याचि वेळीं आम्ही । सुदैवेंकरोनि । पाहुणे म्हणोनि । पातलों कीं ॥४॥

लागतां तहान । पाणी पिऊं जावें । अमृत लाभावें । तों चि तेथें ॥५॥

तैसें तुम्हां -आम्हां । जाहलें हो आज । लाधलें सहज । ब्रह्मज्ञान ॥६॥

तंव धृतराष्ट्रं । संजयालागोनि । म्हणे तुज कोणीं । पुसिलें हें ॥७॥

रायाचें हृदय । देखा येणें बोलें । भलें कळों आलें । संजयासी ॥८॥

असे पुत्र -प्रेमें । घेतलें व्यापोनि । जाणोनि हें मनीं । हांसला तो ॥९॥

म्हणे हा म्हातारा । मोहें वायां गेला । संवाद जाहला । भला येथें ॥१०॥

परी तयालागीं । कैसा तो रुचेल । केविं उजाडेल । जन्मांधाते ॥११॥

तरी धृतराष्ट्र । होईल तो रुष्ट । म्हणोनि हें स्पष्ट । उच्चारी ना ॥१२॥

असो , तो संवाद । ऐकोनियां तेथें । झाला संजयातें । तोष बहु ॥१३॥

मग त्या आनंदें । होवोनियां तृप्त । आदरें यथार्थ । अभिप्राय ॥१४॥

धृतराष्ट्रालागीं । बोलेल संजय । तो चि षष्ठाध्याय । गीतेचा हा ॥१५॥

देखा कथाभाग । सर्वथा येथील । अत्यंत सखोल । बुद्धिग्राह्य ॥१६॥

क्षीरसागराचें । करोनि मंथन । अमृत त्यांतून । निवडिलें ॥१७॥

तैसा हा सहावा । अध्याय गंभीर । देखा असे सार । गीतार्थाचें ॥१८॥

विवेक -सिंवूचें । किंवा पैलतीर । म्हणों ये साचार । अध्याय हा ॥१९॥

ना तरी भांडार । योग -वैभवाचें । उघडलें साचें । म्हणावें का ॥२०॥

आदिमायेचें जें । विश्रांतीचें स्थान । वेदांसी हि मौन । पडे जेथें ॥२१॥

तेविं गीतारुपी । वेलीचे अंकुर । पावती विस्तार । जेथोनियां ॥२२॥

ऐसा हा गंभीर । सहावा अध्याय । स्वभावें चि होय । मनोरम ॥२३॥

वरी भूषवोनि । साहित्यें सांगेन । ऐका अवधान । दिवोनियां ॥२४॥

माझा जरी साधा । मराठा हा बोल । कौतुकें जिंकील । अमृतातें ॥२५॥

ऐसीं सुरसाळ । अक्षरें एकैक । प्रतिज्ञापूर्वक । मेळवीन ॥२६॥

सप्त सुरांचे हि । रंग होती थोडे । कोंवळिकेपुढें । जयाचिया ॥२७॥

जयाचिया वेधें । सुगंधाचे बळ । मोडे , ऐसा बोल । मोहक जो ॥२८॥

रसाळ तो बोल । चाखावयासाठीं । ऐका जिभा होती । कानासी च ॥२९॥

आणि जेणें बोलें । इंद्रियें सकळ । भांडूं लागतील । एकमेक ॥३०॥

शब्द हा विषय । स्वभावें कानाचा । परी तो आमुचा । जिह्रा म्हणे ॥३१॥

घ्राणें तयालागीं । हुंगावया जावें । तों चि तयें व्हावें । सुगंधित ॥३२॥

अपूर्वता कैसी । शब्द -सौंदर्याची । वाहणी ती साची । पाहोनियां ॥३३॥

संतुष्ट होवोन । बोलती नयन । रुपाची ही खाण । प्रकटली ! ॥३४॥

आणिक एकैक । जुळोनि अक्षरें । संपूर्ण उभारे । पद जेव्हां ॥३५॥

तेव्हां इंद्रियांतें । टाकोनियां मागें । मन पडे वेगें । बाहेर तें ॥३६॥

मग घेई धांव । बाहू पसरोन । बोला आलिंगन । द्यावयासी ॥३७॥

ऐसीं इंद्रितें तीं । आपुलाल्या भावीं । झोंबती आघवीं । बोलालागीं ॥३८॥

परी तो एकला । सर्वा हि लागोन । देई समाधान । सारिखें चि ॥३९॥

जागें करी जगा । एकला सविता । तैसी व्यापकता । बोलाची ह्या ॥४०॥

देखा असामान्य । चिंतामणीसम । गुण अनुपम । सर्व हि ते ॥४१॥

तयां आढलती । बोलामाजीं येथ । भाव जे यथार्थ । ओळखिती ॥४२॥

असो ह्या बोलांचीं । ऐसीं ताटें भलीं । घेवोनि भरिलीं । मोक्षरसें ॥४३॥

केली ग्रंथरुप । पाकसिद्धी येथ । निष्काम जे संत । तयांसाठी ॥४४॥

आतां आत्म -प्रभा । जी का नित्य नवी । ती च ठाणदिवी । करोनियां ॥४५॥

इंद्रियांसी कळों । न देतां जो जेवी । तयासी च व्हावी । प्राप्ति येथें ॥४६॥

कर्णोन्द्रियालागीं । टाकोनियां मागें । मनाचे निजांगें । भोगावें हें ॥४७॥

शब्दाची वरील । काढोनियां साल । गाभा जो आंतील । अर्थरुप ॥४८॥

त्या चि अर्थब्रह्मीं । होवोनि तद्रूप । सुखें सुखरुप । भोगावें हें ॥४९॥

चित्तालागीं ऐसें । हळुवारपण । तरी च व्याख्यान । सफळ हो ॥५०॥

नाहीं तरी मुक्या -। बहिर्‍यांच्या गोष्टी । तैसें चि शेवटीं । होईल कीं ॥५१॥

परी तें राहूं दे । आतां नको फार । आणिक विचार । श्रोतयांचा ॥५२॥

सर्वथा निष्काम । होती स्वभावें ते । अधिकारी येथें । ऐकावया ॥५३॥

आत्मबोधापुढें । तुच्छ वाटे साच्दें । स्वर्गसंसाराचें । सुख जयां ॥५४॥

तयांवांचोनियां । आणिक बापुडीं । जाणती ना गोडी । बोलाची ह्या ॥५५॥

सर्वथा प्राकृत । जे का भोगासक्त । नाकळे हा ग्रंथ । तयांलागीं ॥५६॥

कावळे ते जैसे । नेणती चंद्रातें । तैसी स्थिति येथें । स्वभावें चि ॥५७॥

शीतरश्मि चंद्र । तो चि चकोराचें । गोड खाद्य साचें । होय जैसा ॥५८॥

तैसे जे सज्जन । तयांलागीं पूर्ण । विश्रांतीचें स्थान । गीता -ग्रंथ ॥५९॥

आणि जे अज्ञान । महामोहग्रस्त । अनोळखी प्रांत । तयांसी हा ॥६०॥

म्हणोनियां आतां । विषय हा राहो । काय बोलावें हो । विशेषत्वें ॥६१॥

प्रसंगानुसार । परी बोलिलों मी । क्षमावें तें तुम्हीं । सज्जनांनी ॥६२॥

असो आतां काय । बोलिला श्रीरंग । तें चि तुम्हां साङ्‍ग । निरुपनि ॥६३॥

होय जें बुद्धीसी । आकळाया जड । शब्दें अवघड । निवेदाया ॥६४॥

परि श्रीनिवृत्ति -। कृपादीपें आज । पाहेन सहज । सर्व हि तें ॥६५॥

सुदैवें साचार । जरी प्राप्त होय । येथें अतींद्रिय । ज्ञानबळ ॥६६॥

तरी निजदृष्टी । पोहोंच ना जेथें । तें हि पाहूं येतें । दृष्टीवीण ॥६७॥

देखा दैवयोगें । परीस तो भला । जरी हातीं आला । आपुलिया ॥६८॥

तरी किमयेनें । मिळे ना जें साच । हेम तें लोहीं च । सांपडेल ॥६९॥

तैसी श्रीगुरुची । जरी कृपा होय । करितां तें काय । प्राप्त नोहे ॥७०॥

अपार ती मातें । लाधली सदैव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥७१॥

म्हणोनि बोलोनि । रुप अरुपाचें । दाखवीन साचें । बोलामाजीं ॥७२॥

अतींद्रिय परी । इंद्रियांकडोन । आतां भोगवीन । परब्रह्म ॥७३॥

असो ऐका जेथ । यश श्री औधार्य । वैराग्य ऐश्वर्य । आणि ज्ञान ॥७४॥

षड्‌गुण हे श्रेष्ठ । आले आश्रयास । बोलती जयास । भगवंत ॥७५॥

जाहले निःसंग । तयांचा जो सखा । श्रीहरि तो देखा । काय बोले ॥७६॥

श्रीभगवानुवाच ---

अनाश्रितः कर्मफलं कार्य कर्म करोति यः ।

स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥१॥

म्हणे पार्था चांग । देवोनियां चित्त । ऐकें आतां मात । सांगतों जी ॥७७॥

सर्वथा संन्यासी । आणि कर्मयोगी । एक चि हे जगीं । जाण ऐसें ॥७८॥

वाटतील दोन्ही । तुज वेगळेसे । परी नको तैसे । मानूं बापा ॥७९॥

एर्‍हवीं दोहोंचा । करितां विचार । ऐसा चि निर्धार । एक चि ते ॥८०॥

वेगळालीं नांवें । म्हणोनियां साचा । वेगळेपणाचा । होई भास ॥८१॥

भिन्न नांवांचा तो । सांडितां आभास । योग चि संन्यास । ऐसें होय ॥८२॥

तत्त्वतां किरीटी । पाहूं जातां कांहीं । दोहोंयाजीं नाहीं । भेदभाव ॥८३॥

एका चि व्यक्तीतें । वेगळाल्या नांवें । जैसें संबोधावें । व्यवहारीं ॥८४॥

वेगळाल्या मार्गी । किंवा धनंजया । एका चि त्या ठायां । जावें जैसें ॥८५॥

नातरी सहजें । एक चि उदक । भरावें अनेक । पात्रांमाजीं ॥८६॥

तैसें चि भिन्नत्व । योग -संन्यासाचें । जाणावें गा साचें । नाममात्र ॥८७॥

करोनियां कर्मे । फलीं अनासक्त । तो चि योगी येथ । सर्वमान्य ॥८८॥

जन्म देते भूमि । तृणादिकांलागी । न राखितां अंगीं । अहंकार ॥८९॥

आणि अपेक्षी ना । तयांचीं तीं बीजें । अर्जुना सहजें । जैशा रीती ॥९०॥

तैसीं कुळाधारें । स्ववर्णानुसार । प्रसंगें साचार । होती प्राप्त ॥९१॥

तीं तीं सारीं कर्मे । करी यथोचित । परि नाहीं युक्त । अहंकारें ॥९२॥

अंतरीं तों नाहीं । फलाची आसक्ति । ऐसीच विरक्ति । जया ठायीं ॥९३॥

ऐकें पार्था तो चि । संन्यासी संपूर्ण । निश्चयें तो जाण । योगीराज ॥९४॥

नाहीं तरी कर्मे । नित्य -नैमित्तिक । तयांतें बद्धक । म्हणे जो का ॥९५॥

आणि बद्धक तें । म्हणोनियां सांडी । तों चि दुजें मांडी । लगोलग ॥९६॥

पार्था जैसा लेप । धुवोनियां एक । सवें चि आणिक । लावावा गा ॥९७॥

तैसा तो होवोनि । आग्रहाचा दास । त्यागाचा सायास । करी वायां ॥९८॥

गृहस्थाश्रमाचें । आधीं च तें ओझें । कपाळीं सहजें । आलें असे ॥९९॥

परी तें संन्यासें । फेकूं पाहे दूर । तों चि पुन्हां भार । संन्यासाचा ॥१००॥

म्हणोनि अग्नीची । न सांडितां सेवा । नोलांडितां जीवा । कर्मरेषा ॥१०१॥

आपुल्या चि ठायीं । आहे योग -सुख । स्वभावें तें देख । पंडु -सुता ॥१०२॥

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।

न ह्यसंन्यस्तस्कल्पो योगी भवति कश्वन ॥२॥

देवोनियां चित्त । आतां परियेसीं । सर्वथा संन्यासे । तो चि योगी ॥१०३॥

ऐसी नाना शास्त्रीं । एकवाक्यतेची । जगीं ध्वजा साची । उभारिली ॥१०४॥

जाण सर्व थैव । संकल्प -निरास । होतसे संन्यास -। द्वारा जेथें ॥१०५॥

तेथें चि साचार । भेटे योग -सार । ऐसा चि निर्धार । स्वानुभवें ॥१०६॥

बाणला पूर्णत्वें । जयाचिया अंगीं । तो चि पार्था योगी । संन्यासी तो ॥१०७॥

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।

योगारुढस्यं तस्यैव शमः कारणमुच्यते ॥३॥

आतां योगरुप । पर्वताचा माथा । गांठावा तत्त्वतां । ऐसें मनीं ॥१०८॥

तरी तेणें कर्म -। मार्गाचा सोपान । सर्वथा तो जाण । सोडूं नये ॥१०९॥

यम -नियमांच्या । पायथ्यावरोन । साधक चालोन । जातां पुढें ॥११०॥

मग आसनाची । लागे पायवाट । पार्था ती हि नीट । आक्रमोनि ॥१११॥

येई चढोनियां । प्राणायाम -घाट । जो का ऐल कांठ । योगाद्रीचा ॥११२॥

प्रत्याहाररुप । बहु निसरडा । लागे अर्धकडा । मग पुढें ॥११३॥

जेथें बुद्धीचे हि । ठरती ना पाय । जेथें चळे धैर्य । बहुतांचें ॥११४॥

आपुली प्रतिज्ञा । सांडोनियां अंतीं । जेथें माघारती । हटयोगी ॥११५॥

ऐशा प्रत्याहारीं । अभ्यासाचें बळ । घेवोनि केवळ । शून्याधारें ॥११६॥

वैराग्याची नखी । रोवोनियां तेथें । हळू हळू नेटें । चढूं लागे ॥११७॥

ऐसा प्राणापान -। वाहनावरोन । मार्ग आक्रमोन । धारणेचा ॥११८॥

सर्वथा सावध । साधक साचार । गांठितो शिखर । ध्यानाचें तें ॥११९॥

मग मार्गाची त्या । सरोनियां धांव । पुरे जेथें हांव । प्रवृत्तीची ॥१२०॥

साध्य -साधनांसी । दृढ आलिंगन । जेथें पडे पूर्ण । सामरस्यें ॥१२१॥

थांबती ज्या ठायीं । पाउलें पुढील । स्मरावें मागील । तें हि ठाके ॥१२२॥

सम -भूमिकेंत । तेथें समाधींत । पार्था अखंडित । स्थिरावे तो ॥१२३॥

येणें उपायें जो। योग -पारंगत । जाहला अत्यंत । परिपूर्ण ॥१२४॥

तया सिद्धाचीं तीं । लक्षणें गहन । उघड सांगेन । ऐक आतां ॥१२५॥

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।

सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढास्तदोच्यते ॥४॥

तरी जयाचिया । इंद्रियांच्या घरा । नाहीं येरझारा । विषयांच्या ॥१२६॥

आत्मज्ञानरुप । शेजघरीं भला । असे जो झोंपला । स्वस्थपणें ॥१२७॥

जयाचें मानस । होई च ना जागें । झगडतां अंगें । सुखदुःख ॥१२८॥

विषय समीप । आले तरी जाण । काय हें म्हणोन । ओळखेना ॥१२९॥

इंद्रियें तीं सर्व । आपुले व्यापार । जरी निरंतर । चालविती ॥१३०॥

तरी फल हेतू -। लागीं सर्वथैव । अंतरीं जो हांव । बाळगीना ॥१३१॥

असोनियां देही । देहीं उदासीन । निद्रितासमान । जागृतींत ॥१३२॥

तो चि पार्था सिद्ध । भला योगारुढ । ऐसें हें उघड । ओळख तूं ॥१३३॥

पार्थ म्हणे देवा । ऐकोनि हे बोल । वाटतें नवल । मज मोठें ॥१३४॥

तया योगारुढा । ऐसें थोरपण । देई तरी कोण । सांगें आतां ॥१३५॥

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ‍ ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥५॥

तंव हांसोनियां । म्हणे नारायण । काय विलक्षण । बोलणें हें ॥१३६॥

पार्था पाहें येथें । अद्वैताच्या ठायीं । द्यावें तरी काई । कोणीं कोणा ? ॥१३७॥

दृढ अविद्येनें । भ्रांतिशय्येवरी । जीव देहधारी । झोंपे जेव्हां ॥१३८॥

तेव्हां झोंपेमाजीं । भोगीतसे साचें । जन्म -मरणाचें । दुष्ट स्वप्न ॥१३९॥

ज्ञानाची जागृति । येतां अकस्मात । स्वप्न तें लोपत । आघवें चि ॥१४०॥

ऐशा रीती मग । सर्वथा जी सत्य । अनुभूति नित्य । अस्तित्वाची ॥१४१॥

धनंजया ती हि । स्वभावतां येई । आपुल्या चि ठायीं । आपणासी ॥१४२॥

म्हणोनियां मिथ्या । देहाभिमानातें । साच ऐसें चित्तें । मानोनियां ॥१४३॥

आपुला आपण । जीव कैसा पाहीं । करोनियां घेई । घात येथें ॥१४४॥

बन्धुगत्मान्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ‍ ॥६॥

करोनि विचार । सोडावी अहंता । व्हावें पंडुसुता । सत्स्वरुप ॥१४५॥

तरी मग तेणें । आपुलें कल्याण । साधिलें आपण । ऐसें होय ॥१४६॥

परी देह साच । मानोनियां रम्य । तेथें चि तादात्म्य । पावला जो ॥१४७॥

जाण पार्था कोष -। कीटकाच्या परी । आपुला चि वैरी । आपण तो ॥१४८॥

करंटयासी कैसे । प्राप्तिचिया वेळे । लागती डोहाळे । अंधत्वाचे ॥१४९॥

असते नयन । घेतसे झाकोन । मुके तो म्हणोन । वस्तुलाभा ॥१५०॥

किंवा कोणी जैसा । भ्रमामाजीं साच । म्हणे माझा मी च । हरवलों ॥१५१॥

नसतें चि वेड । घेवोनियां दृढ । कैसा राहे मूढ । होवोनियां ॥१५२॥

एर्‍हवी तो साच । पूर्वीचा च आहे । परी बुद्धि नोह । तैसी त्याची ! ॥१५३॥

देखें स्वप्नामाजीं । लागोनियां घाय । मरेल कीं काय । कोणी साच ॥१५४॥

टांगली नलिका । उलट ती फिरे । जैसी अंगभारें । पोपटाच्या ॥१५५॥

तेव्हां तेणें जावें । उडोनियां देखा । परी मनीं शंका । बाळगोनि ॥१५६॥

वायां मान पिळी । हृदय आंवळी । धरोनि ती नळी । चवडयांत ॥१५७॥

श्रमोनिया म्हणे । बांधलों मी स्पष्ट । न सांपडे वाट । सुटावया ॥१५८।

ऐशा कल्पनेच्या । खोडयामाजीं पडे। मोकळे चवडे । गोंवी घट्ट ॥१५९॥

मग जरी अर्धा । तोडिला तयासी । तरी नलिकेसी । सोडी ना तो ॥१६०॥

ऐसा काजेंवीण । गुंतला आपण । तया दुजें कोण । बांधी काय ? ॥१६१॥

म्हणोनि संकल्प । जेणें वाढविला । वैरी तो आपुला । आपण चि ॥१६२॥

देव म्हणे दुजा । तो चि आत्मज्ञानी । कीं तो मिथ्या मानी । देहालागी ॥१६३॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥७॥

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।

युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्जनः ॥८॥

झालीं मनोबुद्धि । तयाचीं स्वाधीन । वासना निमोन । गेल्या सर्व ॥१६४॥

म्हणोनि तयासी । परमात्मा पाहीं । दूर कोठें नाहीं । पलीकडे ॥१६५॥

टाकितां काढोन । सोन्यांतील हीण । उत्तम सुवर्ण । तें चि होय ॥१६६॥

तैशापरी पार्था । लोपतां संकल्प । जीव ब्रह्मरुप । स्वभावें चि ॥१६७॥

घटाचा आकार । नाहींसा होतां च । तयांतील साच । आकाश जें ॥१६८॥

तया महाकाशीं । जैसें मिळायास । न लागे जायास । दुज्या ठायीं ॥१६९॥

तैसी मिथ्या देह -। अहंता सकळ । जयाची समूळ । नष्ट झाली ॥१७०॥

परब्रह्मरुप । तो तरी आधींच । भरलासे साच । सर्वा ठायीं ॥१७१॥

पार्था पाहें सूर्य । जया मार्गे जाय । विश्व तेजोमय । तेवढें ते ॥१७२॥

तैसें ज्ञानियासी । जें जें पावे तें तें । आत्मरुप होतें । म्हणोनियां ॥१७३॥

तया कैचें आतां । शीत किंवा उष्ण । मान -अपमान । सुख -दुःख ॥१७४॥

मेघापासोनियां । पर्जनाच्या धारा । पातल्या सागरा । खोंचतीना ॥१७५॥

शुभाशुभें तैसीं । वाटती ना भिन्न । आत्मरुपाहून । योगेशातें ॥१७६॥

करितां विचार । सांसारिक भाव । तयालागीं सर्व । मिथ्या झाला ॥१७७॥

मग पाहूं लागे । तंव जें का ज्ञान । तें चि तो होवोन । ठाके पार्था ॥१७८॥

अद्वैतीं व्यापक । किंवा एकदेशी । थांबे चर्चा ऐसी । आपोआप ॥१७९॥

जिंकिलीं इंद्रियें । जयें कोणी येथें । कौतुकें तयातें । तोलूं जातां ॥१८०॥

तो चि परब्रह्मं -। तुल्य वाटे भला । पार्था जरी झाला । देहधारी ॥१८१॥

जितेंद्रिय योगी । स्वभावें तो जाण । नेणे थोर सान । कदा काळीं ॥१८२॥

पार्था पाहें मेरु -। एवढा विशाळ । पर्वत निर्मळ । सुवर्णाचा ॥१८३॥

आणि एवढेंसे । मातीचें ढेकूळ । तया तीं केवळ । सारखीं च ॥१८४॥

पृथ्वीचें हि मोल । पाहतां थोकडें । ऐसें रत्न जोडे । बहुमोल ॥१८५॥

तरी तें हि मानी । पाषाणसमान । ऐशापरी जाण । निरिच्छ तो ॥१८६॥

सुह्रन्मित्रार्युदानमध्यस्थद्वेष्यन्धुषु ।

साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥९॥

तेथ कोण शत्रु । आणि कोण आप्त । कोण तिर्‍हाईत । कोण मित्र ? ॥१८७॥

तयाचिया ठायीं । ऐशा भिन्न वृत्ति । काय कल्पूं येती । धनंजया ॥१८८॥

मी च विश्व ऐसा । बोध होतां साचा । कोण बंधु कैंचा । कोण वैरी ॥१८९॥

मग तयाचिया । दृष्टीलागीं जाण । दिसेल का हीन -। श्रेष्ठ कोणी ॥१९०॥

हेम परिसाच्या । लागे कसोटीस । मग भिन्न कस । कोठोनियां ॥१९१॥

कसोटी ती करी । निर्दोष सुवर्ण । तैशापरी जाण । धनंजया ॥१९२॥

चराचरीं नित्य । साम्याचा उदय । तयाचिया होय । बुद्धीलागीं ॥१९३॥

कां जीं विश्वांतील। प्राणिगणरुप । भूषणें अमूप । नानाकृति ॥१९४॥

एक चि त्या ब्रह्म -। रुप सुवर्णाचीं । घडलीं तीं साचीं । सर्वथैव ॥१९५॥

बरवें हें ज्ञान । ऐसें धनंजया । आलें तयाचिया । प्रत्ययासी ॥१९६॥

म्हणोनि बाहेर । विश्वीं नानाकार । भासतां साचार । फसे ना तो ॥१९७॥

पाहूं जातां वस्त्र । तंतुमय जाण । तेथें त्यावांचोन । दुजें नाहीं ॥१९८॥

तंतु -पट -न्यायें । विश्वीं एकत्वाचा । अनुभव साचा । जयालागीं ॥१९९॥

तो चि समबुद्धि । ऐसें जाण पार्था । बोल हा अन्यथा । नको मानूं ॥२००॥

जयाचें दर्शन । समाधाना ठाव । जयालागीं नांव । तीर्थराज ॥२०१॥

जयाच्या संगतीं । भ्रांतमतीतें हि । अनायासें होई । ब्रह्मप्राति ॥२०२॥

जयाचिया बोलें । धर्म जगे देख । स्वर्गसुखादिक । खेळ ज्याचा ॥२०३॥

आणि कृपादृष्टि । जयाची होतांच । महा -सिद्धि साच । प्राप्त होती ॥२०४॥

जयाचें स्मरण । स्वभावें चि होतां । आपुली योग्यता । देई जो का ॥२०५॥

बहु बोलूं काय । तयाचें स्तवन । होय तें पावन । लाभदायी ॥२०६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel