योगी युञ्जीत सततत्मानं रहसि स्थितः ।

एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥

मावळे ना ऐसा । अद्वैताचा दिन । उगवला जाण । जयालागीं ॥२०७॥

मग तो आपण । आपुल्या चि ठायीं । जडोनियां राही । अखंडित ॥२०८॥

ऐशा आत्मदृष्टी । विवेकी जो झाला । पार्था तो एकला । एक असे ॥२०९॥

आतां तिन्ही लोकीं । तो चि तो म्हणोनि । असंग्रही जाण । स्वभावतां ॥२१०॥

सिद्धाचीं लक्षणें । ऐसीं विलक्षण । प्रेमें बहरोन । देव बोले ॥२११॥

देखा द्रष्टयांच्या हि । दृष्टीचा जो दीप । ज्ञानियांचा बाप । असे जो का ॥२१२॥

जयाच्या संकल्पें । विश्वाची रचना । होय ,ऐसा जाणा । समर्थ जो ॥२१३॥

ॐकाराच्या पेठे -। माजीं शब्दब्रह्म । झालें जें उत्तम । महावस्त्र ॥२१४॥

होय तें हि टांचें । ज्याचिया यशातें । देखा वेढायातें । पुरे चि ना ॥२१५॥

चंद्र -सूर्यालागीं । प्रतिष्ठा सहजें । लाभे मूळ तेजें । जयाचिया ॥२१६॥

चराचरासी ह्या । म्हणोनियां कोण । दुजा तयाविण । प्रकाशक ॥२१७॥

अहो जयाचिया । नामाचिया पुढें । गगन हि पडे । तोकडेंच ॥२१८॥

तयाचे एकैक । गुण अद्वितीय । कोणीं कैसे काय । आकळावे ॥२१९॥

म्हणोनियां असो । सर्वथा हें आतां । प्रभु कृष्णनाथा । किती वानूं ! ॥२२०॥

वानूं नेणें देवें । बोलिलीं लक्षणें । कोणाचीं कां येणें । मिषें येथें ॥२२१॥

जरी ब्रह्मविद्या । करावी उघडी । समूळ जी फेडी । द्वैतभाव ॥२२२॥

तरी देवालागीं । पार्थाची आवडी । नासेल ना गोडी । अद्वैतीं ती ॥२२३॥

म्हणोनियां पार्था । तूं चि ब्रह्म ऐसें । नाहीं हृषीकेशें । स्पष्ट केलें ॥२२४॥

ऐशापरी आड । पडदा ठेवोन । अद्वैत -वर्णन । करी देव ॥२२५॥

भोगावया देव -। भक्त -प्रेमसुख । मनें वेगळीक । असावी कीं ॥२२६॥

मोक्ष -सुखालागीं । जाहला जो दीन । अटक ठेवोन । सोऽहं -भाव ॥२२७॥

अहंभाव ह्याचा । जरी का जाईल । आणि हा होईल । मत्स्वरुप ॥२२९॥

तरी मी एकाकी । काय करुं येथें । मनीं ऐसें वाटे । श्रीकृष्णातें ॥२३०॥

जयातें पाहोन । व्हावें समाधान । करावें भाषण । तोंडभरी ॥२३१॥

जयालागीं द्यावें । दृढ आलिंगन । ऐसें मग कोण । उरे दुजें ॥२३२॥

आपुलिया जीवीं । जी का सामावे ना । वाटे जी का मना । भली गोष्ट ॥२३३॥

कवणासी मग । सांगावी ती येथें । पावला ऐक्यातें । जरी पार्थ ॥२३४॥

ऐसी काकुळती । आपुली आपण । सर्वथा जाणून । जनार्दनें ॥२३५॥

अन्योपदेशाची । रीति स्वीकारुन । बोलीं मनें मन । आलिंगिलें ॥२३६॥

ओतीव ती मूर्ति । कृष्ण -सुखाची च । पार्थरुपें साच । प्रकटली ॥२३७॥

ऐकतां हें वाटे । जरी अवघड । जाणा कीं निवाड । ऐसा चि हा ॥२३८॥

वांझेसी वार्धक्यीं । एक चि संतान । तेणें आनंदोन । नाचे मोहें ॥२३९॥

झाली अनंताची । तैसीच अवस्था । देखोनियां पार्था । तिये वेळीं ॥२४०॥

न होता तल्लीन । देव पार्थ -प्रेमीं । तरी ऐसें हें मी । बोलतों ना ॥२४१॥

पार्थावरी कैसें । प्रेम विलक्षण । कोठें आत्मज्ञान । कोठें युद्ध ॥२४२॥

प्रीतिपात्रापुढें । जणूं प्रेममूर्ति । पहा तो श्रीपति । नाचे कैसा ! ॥२४३॥

सांगा प्रेम जरी । उपजवी लाज । तरी तें निर्व्याज । प्रेम काय ॥२४४॥

तेवीं चि व्यसनें । जरी वाटे शीण । तरी तें व्यसन । म्हणों ये का ॥२४५॥

वेड जें टीका ना । जीवा भुलवोन । वेड म्हणे कोण । तयालागीं ॥२४६॥

तरी धनंजय । सख्यत्वा आश्रय । हा चि अभिप्राय । जाणा येथें ॥२४७॥

सुखें शृंगारिलें । किंवा जें मानस । पहावया त्यास । आरसा तो ॥२४८॥

धन्य पुण्यवंत । ऐसा धनंजय । पावन तो होय । जगामाजीं ॥२४९॥

भक्तिबीजालागीं । पेराया सुक्षेत्र । म्हणोनि तो पात्र । कृष्णकृपे ॥२५०॥

आत्मनिवेदना - । अलीकडे देखा । सख्याची भूमिका । जी का दृढ ॥२५१॥

सख्य -भक्तीची त्या । कैसा धनंजय । अधिष्ठात्री होय । देवता तो ॥२५२॥

पासीं प्रभु तरी । न वर्णितां त्यासी । येथें सेवकासी । वाखाणावें ॥२५३॥

थोर पात्रतेचा । ऐसा धनंजय । स्वभावें तो प्रिय । देवालागीं ॥२५४॥

प्रियोत्तमा मान्य । होय जी का नारी । पतिसेवा करी । आवडीनें ॥२५५॥

पतिहूनि ती च । पतिव्रता जगीं । वर्णावयाजोगी । नव्हे काय ॥२५६॥

पार्थ चि तो तैसा । विशेषें वानावा । हेंचि माझ्या जीवा । आवडलें ॥२५७॥

कीं जें त्रैलोक्याचें । सर्वथा सुदैव । तया झाला ठाव । हा चि एक ॥२५८॥

जरी निराकार । स्वयंपूर्ण साचा । तरी अर्जुनाचा । वेध तया ॥२५९॥

पार्थाचिया ठायीं । प्रेम अनिवार । म्हणोनि साकार । झाला देव ॥२६०॥

बोलाचा हा ढंग । पाहोनियां श्रोते । तेव्हां बोलती ते । थोर भाग्य ! ॥२६१॥

जिंकोनियां आलें । नादब्रह्मा काय । शब्दांचें सौंदर्य । ऐसें वाटे ॥२६२॥

नवल ना देशी । मराठी ही भाषा । परी कैसी यशा । आली येथें ॥२६३॥

साहित्य -रंगाचे । नानाविध ठसे । शब्दाकाशीं कैसे । उमटले ॥२६४॥

कैसें ज्ञानरुप । चांदणें टपोर । शीतल साचार । भावार्थे जें ॥२६५॥

कैसी श्लोकार्थाची । कुमुदिनी येथ । झाली विकसित । स्वभावें चि ॥२६६॥

निरिच्छ जे येथें । तयांतें हि व्हावी । इच्छा कीं ऐकावी । कथा ही च ॥२६७॥

मनोरथाची ह्या । थोरवी ही साच । अंतरीं येतां च । प्रत्ययासी ॥२६८॥
मग उत्कंठेनें । ऐकतां हे बोल । सुखें आला डोल । श्रोत्यांलागीं ॥२६९॥

तंव ज्ञानदेव । सर्व हें जाणोन । म्हणे अवधान । द्यावें आतां ॥२७०॥

पांडवांच्या कुळीं । उजाडलें पूर्ण । कृष्णरुप दिन । उगवतां ॥२७१॥

देवकीमातेनें । उदरीं वाहिला । सायासें पाळिला । यशोदेनें ॥२७२॥

नवल हें परी । झाला तो श्रीहरी । शेवटीं कैवरि । पांडवांचा ॥२७३॥

म्हणोनि सेवावा । यत्नें बहु दिन । प्रसंग पाहोन । विनवावा ॥२७४॥

ऐसा हि सायास । पडे चि ना आतां । तया भाग्यवंता । अर्जुनासी ॥२७५॥

तंव श्रोतेजन । बोलती राहो हें । कथा लवलाहें । सांगें आतां ॥२७६॥
मग म्हणे पार्थ । लडिवाळपणें । देवा हीं लक्षणें । संतांची जीं ॥२७७॥

सांगितलीं तुम्हीं । सर्वथा तीं पाहीं । वसती ना कांहीं ॥२७८॥

देवा पाहतां ह्या । लक्षणांचे सार । खरोखरी फार । अपुरा मी ॥२७९॥

परी तुम्ही मातें । जरी शिकवाल । योग्यता येईल । तरी अंगीं ॥२८०॥

जरी माझ्याकडे । पुरवाल चित्त । ब्रह्म चि निश्चित । होईल मी ॥२८१॥

सांगाल अभ्यास । तो तो करायास । का मज सायास । वाटतील ॥२८२॥

देवा तुम्हीं गोष्ट । सांगितली जी ही । कोणाची तें कांहीं । आकळे ना ॥२८३॥

परी ऐकोनि हि । तीर्ते स्तवावें च । ऐसें मनीं साच । वाटतसे ॥२८४॥

मग झाले सिद्ध । होतां ब्रह्मप्राप्ति । तयांची महती । केवढी ती ! ॥२८५॥

अंतरीं उत्कंठा । लागली म्हणोनि । प्रभो विनवणी । ही च आतां ॥२८६॥

आपुला मानोनि । ऐसें चि करावें । कीं म्यां स्वयें व्हावें । ब्रह्मरुप ॥२८७॥

पार्थाचें वचन । ऐकोनि भगवान् ‍ । बोलती हांसोन । करुं ऐसें ॥२८८॥

नाहीं समाधान । लाधलें निर्मळ । सुखाचा दुष्काळ । तोंवरी च ॥२८९॥

देखा सुदैर्वे तें । लाभतां संपूर्ण । मग राहे न्यून । कोठें काय ॥२९०॥

तैसा सर्वेश्वर । समर्थ जो साचा । तयासी पार्थाचा । लागे छंद ॥२९१॥

म्हणोनि तो पार्थ । ब्रह्म हि होईल । कायसें नवल । असे येथें ? ॥२९२॥

परी पिका आलें । भाग्य तें म्हणोन । पहा ओथंबून । आला कैसा ॥२९३॥

घेवोनियां जन्म । सहस्त्र हि देखा । होय इंद्रादिकां । दुर्लभ जो ॥२९४॥

तो चि येथें कैसा । पार्थाच्या आधीन । बोल ते झेलोन । धरी त्याचे ॥२९५॥

बोलिलें जें पार्थे । स्वयें ब्रह्म व्हावें । ऐकिलें तें देवें । संपूर्णत्वें ॥२९६॥

मग मनीं म्हणे । पार्थालागीं भले । लागले डोहळे । ब्रह्मत्वाचे ॥२९७॥

बुद्धीचिया पोटीं । विरक्तता आली । म्हणोनि जवळी । ब्रह्मप्राप्ति ॥२९८॥

अपूर्ण ते दिन । तरी पाहूं जातां । वैराग्य -वसंता । भर आला ॥२९९॥

म्हणोनि हा पार्थ । अहंब्रह्मरुप । मोहोरं अमूप । ओथंबला ॥३००॥

ब्रह्मप्राप्तिरुप । फळें यावयास । आतां नको ह्यास । फार काळ ॥३०१॥

झाला हा विरक्त । सर्वथैव ऐसा । आला भरंवसा । अनंतासी ॥३०२॥

म्हणे जें जें कांहीं । आतां अनुष्ठील । सिद्ध तें होईल । आरंभींच ॥३०३॥

म्हणोनि अभ्यास । सांगितला ह्यास । येईल यशास । सहजें चि ॥३०४॥

ऐसा दूरवरी । करोनि विचार । म्हणे योगेश्वर । अर्जुनातें ॥३०५॥

सर्व मार्गामध्यें । असे जो का श्रेष्ठ । तो चि ऐकें येथ । योगमार्ग ॥३०६॥

प्रवृत्तिवृक्षाच्या । तळीं जेथें साचीं । फळें निवृतीचीं । कोटयवधि ॥३०७॥

असे चि अद्यापि । शंभु महेश्वर । यात्रेकरु थोर । मार्गाचा ज्या ॥३०८॥

योग्यांचा समुदाय । निघाला सवेग । आडमार्गे मग । शून्यामाजीं ॥३०९॥

स्वानुभवाचिया । पाउलीं चालतां । आली सुलभता । मार्गासी ज्या ॥३१०॥

अज्ञानाचे मार्ग । सकळ सांडोनि । तया योगियांनीं । एकसरें ॥३११॥

आत्मबोध उजू । मार्ग स्वीकारोनि । धांव महाशून्यीं । घेतली गा ॥३१२॥

ह्या चि मार्गे मग । महर्षी हि आले । साधक ते झाले । सिद्धराज ॥३१३॥

पावले श्रेष्ठत्व । आत्मज्ञ हि येथें । आले ह्या चि पंथें । म्हणोनियां ॥३१४॥

नाठवे ती भूक । नाठवे तहान । घडतां दर्शन । मार्गाचें ह्या ॥३१५॥

आक्रमितां मार्ग । रात्र कीं हा दिन । राहे ना हें भान । साधकातें ॥३१६॥

चालतां पाऊल । जेथें जेथें पडे । मोक्षाची उघडे । खाण तेथें ॥३१७॥

आणि आडमार्गे । साधक तो गेला । तरी लाभे त्याला । स्वर्गसुख ॥३१८॥

पूर्वेचिया मार्गे । पश्चिमेचा तट । गांठावा , उलट । पंथ ऐसा ॥३१९॥

निश्चळपणें चि । चालणें येथींचें । देखें असे साचें । विलक्षण ॥३२०॥

जाण येणें मार्गे । जया स्थानीं जावें । तें तों स्थान व्हावें । आपण चि ॥३२१॥

थोरवी ही ऐसी । किती सांगूं आतां । स्वभावें तूं पार्था । जाणशील ॥३२२॥

पार्थ म्हणे तेव्हां । कृपानिधे देवा । तें चि मग केव्हां । जाणेन मी ॥३२३॥

उत्कंठा -सागरीं । बुडालों मी येथें । कां न काढा मातें । वरी तुम्ही ॥३२४॥

तंव तया ऐसें । बोलती श्रीकृष्ण । काय हें भाषण । उच्छृंखळ ॥३२५॥

आम्ही स्वेच्छेनेंच । सांगतसों साच । वरी तूम हि तें च । विचारिसी ॥३२६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा