वर्ष - २०१९ 

“एक सुंदर सजवलेला वाडा. वाडा कसला महालच तो ! सर्वत्र उत्साह सळसळत होता. सुंदर वस्त्र - अलंकार ल्यायलेल्या  स्त्रियांची लगबग सुरु होती. मुख्य दरवाजातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी आत येत होत्या. सुग्रास जेवणाचा सुवास हवेत दरवळत होता. कुठेतरी मागच्या भागात असलेल्या मुदपाकखान्यात आचारी स्वयंपाक करत असतील. जेवणाच्या सुवासाबरोबरच फुलांचा, धुपाचा, उदबत्त्यांचा वास, त्यात मिसळत होता. बरोबरीने  ब्राम्हणांचे मंत्रपठण घुमत होते. संपूर्ण वातावरण प्रसन्न होते. मग नजर जात होती ती एका प्रचंड देव्हाऱ्याकडे. जो आजच्या दिवशी खास बाहेर आणून ठेवला होता पूर्ण चंदनाचा असणारा हा देव्हारा आणि त्याला शोभा आणणारी एक फूटी झगमगणारी सोन्याची श्रीरामाची मूर्ती डोळ्याचे पारणे फेडत होती.सूर्यही पूर्ण तेजाने झळकत होता. बहुतेक श्रीरामापुढे आपले तेज फिके पडेल कि काय हि भीती त्याला वाटत असावी. इतक्यात सोहळ्याचे यजमान आले. ते पाठमोरे होते. सगळ्या लोकांनी श्रीरामाचा जयजयकार केला. या इतक्या सुंदर पवित्र वातावरणावर अचानक झाकोळ आली. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला आणि कोणाच्यातरी भयानक हसण्याचा आवाज आला.”

आणि राम घामानी निथळत त्याच्या अंथरुणात जागा झाला. हे स्वप्न पडायची हि काही पहिलीच वेळ नव्हती. आज तो २५ वर्षांचा झाला होता. लहानपणापासूनच  त्याला  हे स्वप्न पडत होतं आणि तो तितकाच घाबरून उठत होता.                    

त्याचा जन्म लंडन मध्ये झाला होता. तो जरी भारतीय असला तरी दोन पिढयांपासून ते लंडन मधेच राहत होते. जरी राम चे शिक्षण तिकडेच झाले असले तरी त्यांच्या घरातल्या अलिखित नियमाप्रमाणे त्यांना मराठी आणि संस्कृत येणे सक्तीचे होते. राम हे नावही त्यांच्या घरातल्या परंपरेप्रमाणे ठेवलं होतं. त्यांच्या घरात प्रभू श्रीरामांचेच नाव ठेवायची प्रथा होती. नाही म्हटलं तरी त्याच्या लंडनच्या मित्रांनी त्याचं रॅम करून टाकलेलं हि गोष्ट वेगळी. त्याची रामरक्षाही पाठ होती.  त्याच्या खोलीत चहा द्यायला आईनी त्याचा चेहरा पहिला. ती घाबरून गेली, " काय झालं बेटा? tell  me  anything  wrong ? you  are  looking  horrible  " ती म्हणाली. " nothing  mom  that  dream  again . I  cannot  understand  why  me  ? मलाच हे सगळं का दिसतं?  मला जे काही दिसतं ते इंडिया मधलं आहे, असं वाटतंय . मी तर कधी तिकडे गेलोच नाही. मग मलाच का दिसतंय हे सगळं ?" हे सर्व त्याच्या वडिलांच्या राघूथांच्या कानावर गेलं. ते तिकडे आले. त्यांना पाहून राम म्हणाला, " डॅड मीच काय तुम्हीसुद्धा इंडियात गेला नाहीत ना ? मग हे काय आहे ? मी तिकडच्या culture  बद्दल ऐकलं आहे. मी नेट वर सर्च केलं तेंव्हा समजलं कि   मला स्वप्नात दिसतंय ते श्रीराम देवांचा birth  ceremony  चा celebration  चालू आहे. तिकडचे लोक at  least  १०० इयर्स ओल्ड तरी असतील. काय करू समजत नाहीए. आपली इंडियात काही प्रॉपर्टी आहे का ? आपण जाऊन शोधूया का ?"   “ don’t worry beta, It was just a dream.” रघुनाथ बोलले. त्यांच्या मनात एक भीती डोकावत होती. राम नेहेमीप्रमाणे ऑफिस ला गेला. मग ते त्यांच्या खोलीत गेले. तिथे एक जुनी चंदनी पेटी होती. ती अनेक पिढयांपासून त्यांच्याकडे चालत आली होती. त्यात काय आहे हे कोणालाही माहित नव्हते. फक्त त्यांना त्यांच्या वडिलांनी, आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी अशी करत हि कथा ऐकवली जात होती. राजारामाची कथा. त्याच्या पुण्याईची कथा. सीताबाईच्या त्यागाची कथा.  

“जेंव्हा वाड्याचा सर्वनाश ओढवणार हे राजारामांनी जाणलं. तेंव्हाच त्यांनी आपल्या वारसाला वाचवायचा निश्चय केला. त्यांनी सीताबाईंना त्याबद्दल सांगितले. त्यांना सातवा महिना चालू होता. गर्भारपणाचं तेज चेहऱ्यावर झळकत  होतं." काय झालं ? काळजीत दिसताय. वाड्यात जे काही चाललं आहे. ते दिसतय मला. काय उपाय हो यावर?" राजाराम गंभीर झाले होते. दणकट असणारी त्यांची तब्बेत ढासळत चालली होती. आपलं मरण जवळ आहे याची त्यांना जाणीव होती. आपल्या पत्नीला यातून बाहेर काढले पाहिजे हे त्यांनी ठरवले होते. " सीते जरा माझं ऐकणार का?  मी आता काय सांगतो ते नीट ऐक. प्रश्न आता आपल्या बाळाचा आहे. कोणत्याही परिस्थतीमध्ये त्याला वाचवलंच पाहिजे.या वाड्यात जे काही चाललं आहे त्यावर काही इलाज नाही. मी तुला यातून बाहेर काढतो. आपल्या पिढीतला येणारा वारस या वाड्याला पार्वती आणि महंत पासून मुक्त करू शकेल. मी उद्याच तुला एका गुप्त जागी पाठवून देतो. या वड्याला मुक्त करायचा मार्ग या पेटीत आहे. श्रीरामांनी मला सांगितले आहे कि जो मुलगा पाठीवर धनुष्याची जन्मखूण घेऊन जन्माला येईल तो या वाड्याला शापमुक्त करून श्रीरामांची परत आपल्या देव्हाऱ्यात स्थापना करेल. म्हणून हि कथा पुढच्या पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे आणि हि जबाबदारी तुझी.  " ते म्हणाले.  सीताबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी त्यांच्या पतीचा आजपर्यंत एकाच शब्द टाळला नव्हता. परंतु हि मागणी खूप भयानक होती. जन्मभराची ताटातूट होणार होती.परंतु पोटातल्या बाळासाठी त्यांना हे करावंच लागणार होतं. त्या रात्री ते दोघं संपूर्ण रात्रभर बोलत बसले. सीताबाईंच्या अश्रुना ठाव नव्हता. दुसऱ्या दिवशी ते निघाले मागे वळून सीताबाईंनी वाड्याला डोळेभरून पाहून घेतले. कुलस्वामिनीची ओटी भरली. तिच्याजवळ साकडं घातलं. मग राजारामचा निरोप घेतला. बैलगाडी त्यांना घेऊन निघाली. आपण कुठे निघालोत याची काळजी त्यांना वाटत नव्हती. धूसर होणारी आपल्या पतीची प्रतिमा त्या डोळ्यात साठवत होत्या. गाडी निघाली कोणत्या दिशेला? कुठे प्रवास करतोय हे त्यांना समजत नव्हते. वाटेत त्यांच्या गड्यानी त्यांना दुसऱ्या बैलगाडीत बसवले. त्यांना मुजरा करून निरोप घेतला. त्यांच्यासोबत त्यांच्या विश्वासू सेविका होत्या. ते धर्मशाळेत मुक्काम करत होते. शेवटी ऐक अतिशय दुर्गम पहाडी भाग लागला. त्यांना चालत जायचे होते. मोठ्या कष्टाने त्या तो प्रचंड पर्वत चढून गेल्या. वरती एका प्रचंड गुहेत प्रभू रामाचें मंदिर होते. तिथे एक साधुमहाराज आणि त्यांच्या पत्नी राहत असत. सीताबाईंना ठेवण्यासाठी राजारामांनी हे ठिकाण निवडले होते. त्यांच्या सेविका त्याना इथे सोडून माघारी गेल्या. त्यांना कितीही विचारले तरी हे ठिकाण त्यांना आठवणार नव्हते. सुमारे दोन महिन्यांनी सीताबाईंनी एका सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यांनी त्याच्या पाठीवर पहिले तर कुठेही जन्मखूण नव्हती. बहुतेक पुढच्या पिढीपर्यंत थांबावे लागेल त्यांनी विचार केला.  दोन महिने झाले. एक दिवस अचानक सीताबाईंना संकटाची चाहूल लागली. आपल्या पुत्राच्या जीवाला धोका आहे हे त्यांना जाणवले. त्यांनी साधू महाराजांना विनंती करून त्या बाळाला दूर सुरक्षित जागी पाठवले. त्याच्यासोबत ती चंदनी पेटीही पाठवली. आणि आपले उरलेले आयुष्य त्या गुहेत व्यतीत केले. त्यांचं शेवटी काय झालं ? त्यांचा मृत्यू कधी झाला हे कोणालाच माहित नाही. आपल्या ४ पिढ्यांपासून हि पेटी आपल्याकडे आहे आणि हि कथा आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकतो आहे. वाड्याला शापमुक्त करणाऱ्या वारसाच्या पाठीवर धनुष्याची जन्मखूण असेल. आणि ती तुझ्या पाठीवर आहे राम." धक्का बसलेल्या राम ला त्याचे वडील हि कथा सांगत होते. त्यांनी ऑफिस मधून आल्यावर रामला हि गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला होता. पण "डॅड हे कसं possible  आहे ? माझा यावर विश्वास बसत नाही. एक आई तिच्या बाळाला असं कोणाकडेपण कसं सोपवेल?" राम आश्चर्याने म्हणाला. माझ्या अंगावर  birth  मार्क असणार आहे  हे पूर्वी कोणीतरी कसं लिहून ठेऊ शकतं? आपल्या घरात सगळ्यांची नावं रामाच्या नावावरूनच ठेवायची हा काय रुल आहे? " राम एकापुढे एक प्रश्न विचारत होता." माझी माहितीही कमीच आहे. हि गोष्ट पिढ्यानपिढ्या अशीच सांगितली गेली आहे. भारतात विसापूर म्हणून गावात आपला वाडा आहे. इतकंच माहित आहे. मला नाही वाटत आधीच्या पिढीतल्या कोणीही हा शोध घ्यायचा प्रयत्न केला असेल कारण कोणाच्याही पाठीवर धनुष्याची जन्मखूण नव्हती. तूही  नाही गेलास तरी फरक पडणार नाही. सीताबाईंनी आपला मुलगा एका निपुत्रिक दाम्पत्याला दिला. जे त्या पर्वतांतल्या मंदिरात पुत्र प्राप्तीसाठी नवस बोलायला आले होते. त्यांचा मुलगा श्रीराम त्याची ओळख तीच ठेवायचं वचन त्या जोडप्यानी सीताबाईंना दिलं. म्हणून आपलं आडनाव आजही कुलकर्णी आहे. सीताबाईंना मुलाला काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली होती. या सीताबाईंचं पुढे काय झालं माहित नाही. माझं मत ऐकशील तर तूही जायची गरज नाही. तिकडे तो वाडा शापमुक्त झाला काय किंवा नाही झाला काय , आपण इकडे ठीक आहोत ना मग झालं तर! फक्त आपल्या घराची परंपरा म्हणून हि गोष्ट तुला सांगितली. तू तुझ्या मुलाला सांग झालं.” "म्हणजे मी इतक्या पिढ्यांच्या आशेवर पाणी फिरवायचं? ज्या सीताबाईंमुळे आपण जिवंत आहोत त्यांच्या आत्म्याला धोका द्यायचा ? नाही डॅड हे शक्य नाही. मी जाणार आपल्या वाड्यावर. ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यावर उपकार केलेत त्याची परतफेड मी करणार." राम  म्हणाला. त्याच्या घाऱ्या डोळ्यात ठाम निर्धार दिसत होता. व्यायामाने कमावलेले सहा फुटी शरीर, सतेज कांती असलेला राम अतिशय देखणा होता. परदेशात राहूनही त्याला कोणतेही व्यसन लागले नव्हते. रघुनाथरावांनी ती पेटी त्याला सुपूर्द केली. ती त्या वाड्यात गेल्यावरच उघडायची होती. मग त्यांनी भारतात निघायची तयारी केली.  सगळ्यात आधी त्यांनी मनीष ठाकूर बरोबर संपर्क साधला. तो त्याचा कॉलेजचा मित्र दोघे लंडन ला एकत्र शिकले. एकत्र नोकरीही करत होते. तो काही दिवसासाठी भारतात गेला होता. तो कोकणातला होता. त्याला रामनी विसापूर गाव सांगताच,तो म्हणाला " अरे ! ते तर आमच्या महाडजवळच आहे. आपण शेजारी निघालो कि ! ये तू बिनधास्त तुला अगदी फुलासारखा त्या वाड्यावर घेऊन जातो ." 

राम भारतात पहिल्यांदाच येत होता . इथे आल्यावर का कोणास ठाऊक त्याला अजिबात परकं वाटलं नाही. मनीष त्याला घ्यायला आला होता. खूप कंटाळवाणा परावास करून ते महाडला आले. रामला इतक्या प्रवासाची सवय नव्हती. त्यांनी दोन दिवस आराम करायचे ठरवले. झोप चांगली झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला बरे वाटले. आश्यर्य म्हणजे त्याला एकही स्वप्न पडले नाही. दुसऱ्या दिवशी मनीषच्या घरचे सगळे त्यांचं आराध्य दैवत पर्वतेश्वर राम मंदिरात जाणार होते. खूप आग्रह केल्यामुळे रामही त्यांच्यासोबत गेला. मनीषनं ते देऊळ एका उंच पर्वतावर गुहेत आहे असं सांगितलं. जसजसं ते देऊळ जवळ येऊ लागलं तसा तो भाग आपल्या परिचयाचा आहे असे रामला वाटू लागले. गुहेतल्या देवळात दर्शन घेऊन सगळे बसले. राम आणि मनीष आसपास फिरू लागले. इतक्यात तिथे एक कुटी दिसली. त्यातून एक साधू बाहेर आले. रामनी जाऊन त्यांना नमस्कार केला. ते अतिशय वृद्ध होते. ते हसून म्हणाले," आलास तू ? मला माहित होतं तू येणार . खूप वाट पाहायला लावलीस. आत ये ." राम कुटीत गेला तर समोरच एका स्त्रीचं चित्र होतं, हातानी रेखाटलेले. ती अतिशय सुंदर होती. ते सीताबाईंचे चित्र आहे हे न सांगताही त्याला समजले. " त्यांनी त्यांच्या मुलाला दिल्यावर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. महंतचे लोक त्यांना शोधत इकडे आले होते. त्यांना काहीच सापडलं नाही. तो मुलगा कोणाला दिला हे मलाही माहित नव्हतं. या आईचा आशीर्वाद घे. तू तुझ्या कामात यशस्वी होशील जा आशीर्वाद आहे."   रामनी त्या तसबिरीला नमस्कार केला. त्याला आपल्या अंगावर रोमांच उभे राहिल्याचे जाणवले. दुसऱ्या दिवशी मनीषच्या हट्टाला ना जुमानता तो एकटाच रस्ता विचारून वाड्याबाहेर दाखल झाला. इतर गाव बदलला होता. परंतु वाडा आणि आसपासचा परिसर तसाच होता. राम गाडीतून उतरला. समोर वाड्याचे प्रवेशद्वार होते. त्यानी वाकून दाराला नमस्कार केला आणि आत पाऊल टाकले. इतक्यात त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला. आपले पूर्वज आपले स्वागत करत आहेत हे त्याला जाणवले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. मग तो सर्वत्र फिरू लागला. सगळी पडझड झाली होती. त्यात झाडे उगवली होती.  फक्त एकच खोली चांगल्या अवस्थेत दिसत होती. रामने ती जोर लावून उघडली. त्यात फक्त एक सुंदर देव्हारा होता. जागा साफ करून राम खाली बसला आणि त्यानी ती चंदनी पेटी उघडली. त्यात एक सुंदर नीलमणी असलेले लॉकेट होते. मध्यभागी नीलमणी आणि आसपास हिरे, ते लॉकेट सोन्याच्या सुंदर साखळीत अडकवले होते. एक प्रकारच्या प्रेरणेने रामनी ते गळ्यात घातले. खाली काही कागद होते. ते संस्कृत मध्ये लिहिलेले होते.   

 " प्रभू श्रीरामांना नमन करून प्रारंभ करत आहे. ज्याअर्थी हि पेटी उघडली त्याअर्थी या वाड्याचा तू तारणहार आहेस. नीट लक्ष देऊन ऐक. या वाड्याच्या दक्षिणेला ऐक मोठा आड आहे. तुला त्यात उडी मारून जायचे आहे. त्या आडात ऐक गुप्त रस्ता आहे तो तुला तुझ्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मार्ग सोपा नक्कीच नाही. यात अनेक अडथळे आहेत नैसर्गिक तर आहेत पण अनैसर्गिकही आहेत. महंत तुला सहजासहजी तिकडे जाऊन देणार नाही. तुझ्या गळ्यातले पदक प्रभू रामांचा आशीर्वाद आहे. तेच तुला या संकटातून वाचवेल.  एकदा का प्रभू रामाची देव्हाऱ्यात स्थापना झाली कि सर्व अशुभाची सावली या वाड्यावरून जाईल. जा पुत्रा  तुला आशीर्वाद आहे." मग त्यावर दिलेल्या सूचनेनुसार हे पत्र रामने जाळून टाकले. मग तो मागच्या दारात गेला तिथे खूप दाट झाडी होती.  अचानक सोसाट्याचा वारा सुटला. जोरात धूळ उडू लागली. रामला एकही पाऊल पुढे टाकता येईना. धुळीमुळे त्यानी डोळे मिटून घेतले होते. ते उघडून बघितल्यावर त्याला समोर ऐक १२ फूट उंच मांत्रिकाच्या वेशातील माणूस दिसला. तो मोठमोठ्याने हसत होता. त्याच्याबरोबर ऐक पायापर्यंत केस असलेली बाई होती. त्यांच्या मागे झाडांनी झाकलेला आड दिसत होता. इतक्यात कितीतरी विषारी साप येऊन रामच्या अंगावर चढू लागले. राम खूप घाबरला . तो मागे मागे मागे जाऊ लागला आणि एका दगडाला अडखळून पडला. आता आपण नक्की मारणार. असे त्याला वाटले इतक्यात त्यानी गळ्यात घातलेले पदक त्याच्या टी-शर्ट मधून बाहेर पडले ते तेजानी तळपत होते. ते साप त्यामुळे अचानक नाहीसे झाले. महंत आणि पार्वती डोळे झाकून मागे गेले. तीच संधी साधून रामनी आडात उडी मारली . पाणी खूप खोल होते. कचरा वरवर असला तरी आतले पाणी स्वच्छ होते. त्या लॉकेट मधून येणाऱ्या उजेडात त्याला एक कपार दिसली. ती खूप अरुंद होती. तो जेमतेम जाऊ शकला. तो जसा जसा आत गेला तशी ती कपार रुंद होत गेली. खोल पाण्यात असूनही आत पाणी नव्हते. तो चालत आत गेला. आत मंद प्रकाश होता तो कुठून येत होता ते समजत नव्हतं. आत अनेक बोळ होते प्रत्येक ठिकाणी एक दरवाजा होता आणि त्यावर एक एक प्रश्न लिहिला होता. पहिल्या दरवाजावर लिहिलं होतं कि, "अशी कोणती अतिशय लहान गोष्ट आहे ज्यात संपूर्ण आकाश सामावू शकते? " राम विचारात पडला बरोबर उत्तरच त्याला पुढे घेऊन जाणार होते. मग खूप विचार करून त्याला उत्तर सुचले. डोळ्यातले बुबुळ ज्यात संपूर्ण आकाश सामावू शकते. तिथल्या असंख्य दरवाजांमधल्या डोळ्याचे चित्र असणाऱ्या दरवाजासमोर तो गेला. त्यावर प्रश्न होता कि " जगातली सर्वात सुरक्षित जागा कोणती ?" राम खूप विचारात पडला मग त्याला उत्तर मिळाले आईच्या गर्भात मूल सर्वात सुरक्षित असतं मग एक आई आणि बळाचा चित्र असलेल्या दारापुढे तो आला. त्यावर लिहिले होते. "जगातला सर्वोत्तम पुत्र कोण ? " रामनी यावर विचार केला आणि त्याला एकच नाव आठवले. जो वडिलांच्या वचनाखातर वनवासात गेला. तो “मर्यादा पुरुषोत्तम राम” तो रामाचे चित्र असलेला दरवाजा शोधू लागला. त्याला दरवाजा कुठे दिसेना. मग त्यानी गळ्यातले लॉकेट बाहेर काढले त्याचा उजेड एका दारावर पडताच त्या दारावर श्रीरामाची मूर्ती साकार झाली. दारावर त्या लॉकेटच्या आकाराचं किल्लीसाठी छिद्र होतं. तिथे ते ठेवताच दार उघडलं. दार एका मोठ्या गुहेत उघडत होतं. तिथे होता राजाराम कुलकर्णींचा खजिना. त्याच्या उजेडाने डोळे दिपत होते. रामनी आयुष्यात कधीही इतकं धन पाहिलं नव्हतं. इतर वेळी तो हुरळून गेला असता. परंतु आता त्याला त्याचं बिलकुल आकर्षण वाटत नव्हतं. त्या गुहेच्या मधोमध एका चौरंगावर श्रीरामाची मूर्ती प्रचंड तेजानी तळपत होती. त्यानी मूर्तीला नमस्कार केला आणि ती हातात घेतली इतक्यात तिथे एक आवाज घुमला," बाळा तू मला मुक्त केलंस आता हि मूर्ती नेऊन देव्हाऱ्यात ठेव ज्यामुळे महंत आणि पार्वतीच्या आत्म्याचा नाश होईल आणि कुलकर्णी कुटुंबातल्या सर्वाना मुक्ती मिळेल. हा खजिना तुझा आहे तू हवे तसा याचा उपयोग कर. जा आशीर्वाद आहे." राम आनंदाने म्हणाला," हे ईश्वरा! तुमची कृपा माझ्यावर झाली हे मी माझ्यावर झाली हाच माझा मोठा खजिना आहे. हा खजिना धरतीच्या पोटात सुरक्षित राहू दे हा वापरायची कोणाचीच योग्यता नाही. फक्त आपल्या घराण्याची खूण असलेलं हे लॉकेट आणि तुमची मूर्ती सोबत घेऊन जायची मला मला परवानगी द्या." "तथास्तु या मूर्तीची तिच्या जागेवर स्थापना करून तिची पूजा करून मग तू तिला बरोबर नेऊ शकतोस. जा पुत्रा." तो आवाज म्हणाला. राम पोहत वर आला त्याच्या हातात ती मूर्ती होती. वर येताच परत महंत, पार्वती आणि त्यांचे साथीदार असलेले प्रेतात्मे त्याला आडवे आले. आता आपला मृत्यू  निश्चित आहे, हे त्याला जाणवले. कारण रामाची अजून प्रतिष्ठापना झाली नव्हती. ते त्याच्या जवळ जवळ येऊ लागले. इतक्यात त्यांची वाट आडवून राजारामांचे पाच भाऊ उभे राहिले. ," तू जा लवकर आम्ही फार काळ यांना थोपवू शकणार नाही हे फार शक्तिशाली आहेत", राघव म्हणाला. राम घरात गेला. देव्हाऱ्यात मूर्तीची स्थापना केली. त्याच्या बॅग मधल्या पाण्यानी मूर्ती धुतली. देव्हाऱ्याच्या एका खणात त्याला पूजेचे सामान मिळाले. मनोभावे पूजा करून त्यानी हात जोडले. इतक्यात एक प्रचंड आवाज आला. अनेक काळ्या आकृती येऊन तिथे भस्मसात होऊ लागल्या. त्यानी मागे वळून पहिले तर संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीय तिथे हात जोडून उभे होते. राम म्हणाला," तुम्ही आशीर्वाद द्यायचा. हात नाही जोडायचे." राघवनीं नकारार्थी मान हलवली आणि एका ठिकाणी बोट दाखवले. देव्हाऱ्याच्या मागे एक तसबीर होती. ती रामनी काढली. ती त्याचीच होती. अगदी हुबेहूब. " तू आमचा दादा आहेस. दादाच्या पाठीवर धनुष्याची जन्मखूण होती. तू आमचे अपराध पोटात घालून आम्हाला मुक्ती द्यायला आलास. दादा माफ कर." असे बोलून सर्व कुटुंब एका शुभ्र प्रकाशात लुप्त झाले. राम राजारामाची तसबीर श्रीरामाची मूर्ती आणि ते लॉकेट घेऊन बाहेर पडला आणि एक मोठा आवाज होऊन तो संपूर्ण वाडा धरतीच्या पोटात लुप्त झाला.

रामच्या लंडन च्या घरी सुंदर चंदनाचा देव्हारा आहे आणि त्यात प्रभू रामाची मूर्ती. राम दरवर्षी रामनवमी साजरी करतो. ते लॉकेट स्वतःपासून दूर करत नाही. आता त्याला कोणतेच स्वप्न त्रास देत नाही.

समाप्त 

सौ. संपदा राजेश देहपान्डे                                                      

                                                                                                                                                                                           

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel