दोन गुंड मिथुनसमोर उभे रहातात. त्यांच्या हातात एक रिव्हॉल्वर आहे आणि मिथुनकडे फक्त एक सूरा आहे. मिथुन दोघांना कसे मारणार? काही प्रॉब्लेम नाही. ते दोघे रिव्हॉल्वरमधून गोळी झाडतात. ती गोळी येताच मिथुन सुरा पुढे करतो. सुऱ्याचे दोन तुकडे होतात. मग मिथुन दोन्ही तुकडे गुंडाना फेकून मारतो आणि ते दोन्ही गुंड मरतात.
मिथुन म्हणतो, " अपुनका नाम हिरा, अपुनने दोनोंको चिरा!"
हा सिन तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मिथुनचे फॅन आहात आणि नसेल आवडला तरीही मिथुनचे फॅन होऊ शकता. मिथुनचे फॅन व्हायला काही अट नसते. तो काही अमिताभ नाही, संजीव कुमार नाही आणि एक श्वास चालू असताना मधेच मोठा पॉज घेणारा दिलीप कुमारही नाही. मिथुन मिथुन आहे. हिट असो किंवा फ्लॉप, तो सगळीकडून आहे. इथून तिथून आहे. लागोपाठ २२ फ्लॉप दिल्यावरही तो आहे, अस्तित्व टिकवायला तो टीव्ही मालिका करायला गेला नाही आणि जाहिरातीतून लोकांना दिसत राहावे हा विचार ह्या बंगाली बाबूच्या मनात शिरला नाही. अमिताभ, धर्मेंद्र, विनोद खन्ना हे अभिनेते ठरावीक दिग्दर्शकांसोबत, अभिनेत्रींसोबत काम करत राहिले. कारण, कोणताही सिनेमा फ्लॉप होऊ द्यायचा नव्हता. मिथुनकडे असा हिशोब नव्हता. जगा आणि जगू द्या असल्या सोप्या फॉर्म्युलावर त्याने स्वतः कमावले आणि अनेक दिग्दर्शक, नायिका, निर्मात्यांना कमावू दिले. त्याला माधुरी दीक्षित चालली आणि पुरुष आहे की बाई आहे हे नावावरून पत्ता न लागू देणारी किम यशपालही.
अमिताभ विजय नाव धारण करून चालत होता. मिथुनला अशी एका नावाच्या आधाराची गरज भासली नाही कधी तो सीबीआय ऑफिसर बनला, कधी जिमी तर कधी घांची. इतर नावे होती हिरालाल, भैरव, जेडी उर्फ जग्गा डाकू, चंदर , तात्या तुकाराम तेंडुलकर, डरकेश्वर. सिनेमांची नावे होती चांडाल, हिटलर, जल्लाद, दो नंबरी, लडाई आणि अशीच अचाट. नावात काय आहे ? मिथुन हेच नाव पुरेसं होतं बाकी कथाही तीच. नायकावर व्हिलन अन्याय करतो, मधे नायिका भेटते. नाचगाणी होतात आणि शेवटी व्हिलनचा नायनाट होतो.
मिथुनची आई किंवा बहीण हे कायम बळीचा बकरा बनलेले असायचे.
त्यानंतर " गुरु गुरु आजाओ गुरु" किंवा " हर मार्दकि है तीन कमजोरीया. पहिली शराब, दुसरी शबाब और तिजा जुआ" वैगरे गाण्यांमध्ये भप्पी लाहिरी काहीतरी वाजवायचा. त्याची संगीतकार होण्याची हौस भागायची. मिथुन त्यावर झक्कास नाचायचा. व्हिलनला मारलं की मामला खतम-पैसा हजम !!
कोणी त्याला बी ग्रेड म्हणून हिणवयाचे. पण निर्मात्याला गुंतवणूक दुप्पट झालेली पाहायला मिळायची. तो परत मिथुनकडे यायचा.
सीनही जबराट असायचे. मंदाकिनी मिथुन सोबत धावतेय. गुंड त्यांना पकडायला मागे येत आहेत. पण मंदाकिनी धावू शकत नाही. मिथुन खाली वाकतो, हातात सुरा घेतो आणि तिची मिडी फाडतो. मिडी घट्ट होती, म्हणून तिला धावता येत नव्हत. आता ती धावू लागते. आहे की नाही मजा !! मिथुन भिंतीवर धावत जाऊन चढतो आणि खलनायकाला मारतो, मग एक मिडी फाडून उपाय न शोधला तरच नवल? तो भिंतीवर चढतो म्हणून हसायचं नाही. अमितात "कुली " मध्ये छाताडात चार गोळ्या लागूनही जिवंत राहिलेला तुम्हाला कसं चालतं. एका नायकाच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्याचा ब्रेन ट्युमर निघून जातो हे चालतं ना. मिथुन तर अशक्य ते शक्य करून दाखवणारा नायकच आहे.
ह्या मिथुनदाचा प्रवासही असाच फिल्मी आहे. ब्रिटिश राजवटीतील बंगाल प्रांतात जन्मलेल्या बंगाली ब्राहमण कुटुंबातील गौरांगला उत्तम शिक्षण घेणे आणि चांगली नोकरी मिळवणे हाच मार्ग माहित होता. म्हणून त्याने बीएससीची पदवी पूर्ण केली. पण बंगल्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या नक्षलवादात तो उतरला. राजकारणाच्या पटावर त्याच्या सख्या भावाचा बळी गेला. पोलीस गौरांगवरही लक्ष ठेवून होते, म्हणून तो मुंबईत पळून आला. सिनेसृष्टीत नशीब अजमावून पाहत होता, म्हणून नाव बदलून मिथुन केले. तरीही कोणी विचारात नव्हतं. एक भल्या निर्मात्याने जिमखान्याची फुकट मेम्बरशिप मिळवून दिली. का तर, सकाळी अंघोळीची सोय व्हावी म्हणून. मोठ्या मुश्किलीने "मृगया" सिनेमा मिळाला. त्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. तरीही नशीब काही वळण घेत नव्हतं. आपटत-धोपटत "सुरक्षा" , " वारदात" बरे चालले आणि एकदाचा " डिस्को डान्सर" आला. अजून दोन-चार चालले. पुढे सलग २२ फ्लॉप दिले तरीही मिथुन संपला नाही. त्याने parallel industry चालवली.
त्याने आतापर्यंत सहाशे सिनेमे केले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, बंगालसह रशियामध्ये त्याचे खूप फॅन्स आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले. त्यांचं दरिद्री, पिचलेलं जीवन मिथुनने सुसह्य केलं होतं. अनेक चाहते त्याच्यामध्ये स्वतःला पाहत असत आणि जे जीवन जगता आले नाही ते सिनेमागृहाच्या अंधारात जागून घेत असत. मिथुनने आपले लांब पाय पुढे टाकून हात पसरून कंबर हलवली की त्याच्या चाहत्यांना स्वतःचाही विसर पडे. ह्याच पायाने त्याने व्हिलनला लोळवले की त्यांना आपला हाच त्राता आहे असे वाटे.
मिथुन स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा भक्त आहे.
" वर चढताना जे लोक भेटले त्यांच्याशी नाते जोडून ठेवा. कारण खाली उतराल तेव्हा तेच आधार देतील." हा विवेकानंदांचा विचार वर्तनात उतरवला.
spot boy लोकांचा दाता बनला, त्यांची union स्थापन केली. बंगालशी एकनिष्ठ राहिला. एक कन्या अनाथ आहे हे कळताच कोलकात्याला गेला. तिला दत्तक घेतलं. आता ती दिशानी मिथुन चक्रवर्ती म्हणून सामान्य जीवन जगत आहे. मिथुन राज्यसभेचा सदस्य आहे. बंगाल क्रिकेटचा गुंतवणूकदार आहे आणि त्याचे अनेक ठिकाणी हॉटेल्स आहेत.
हिट असो व फ्लॉप, किंवा कोणत्याही सुपरस्टारचा जमाना असो. मिथुन समांतरपणे चालत राहील. इथून तिथून अस्तित्व टिकवून राहिला.
म्हणे राजकुमार त्याच्या सिनेमात कुठंही वाकला नाही.
मिथुन त्याच्यापुढे गेला आणि म्हणाला, " दोनो हात क्या, दोनो पावभी टूट गए तो आपुन झुकनेवाला नही."
आत्मनिर्भरता आत्मनिर्भरता म्हणतात ती हीच होती. मिथुनला गरिबांचा अमिताभ म्हणायचे, पण खरं तर अमिताभ हा श्रीमंतांचा मिथुन होता....कोई शक!