रात्री उशिरा, किती वाजता कुणास ठाऊक, पण मला जाग आली. वरच्या मजल्यावरून कसलेतरी जोरजोराचे आवाज येत होते आणि बंगल्यात धावपळ जाणवत होती. मी डोळे किलकिले केले. अल्फा अजून झोपेत होता. अर्धवट झोपेत मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली. रात्रीचे पावणेतीन वाजले होते. पुढच्याच क्षणी एक किंकाळी त्या बंगल्यात घुमली, जिने माझ्या डोळ्यांवरची झोपच उडवून दिली. मी खाडकन उठून बसलो. अल्फाही जागा झाला.
"ते काय होतं? " मी घाबरून अल्फाकडे पाहात म्हणालो. अल्फा क्षणाचाही विलंब न करता बेडवरून उतरला आणि दरवाजाकडे धावला. मीही त्याच्या मागोमाग धावलो. आम्ही जिना चढून वरती आलो. वरच्या मजल्यावर कॉरीडॉरच्या शेवटच्या खोलीसमोर बरेच लोक जमले होते. आम्ही धावतच तेथे पोहोचलो. तेथे विवेक मिरासदार आणि नागेशची झोंबाझोंबी चालली होती. विवेकने नागेशच्या शर्टाची कॉलर पकडली होती आणि तो म्हणत होता, "तू त्यांना मारलंस? तू त्यांना मारलंस?? आता मी तुला सोडणार नाही!!"
दोघे - तिघेजण त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते आणि बाकीचे खोलीच्या आत पाहत होते. प्रधानांनी सर्वांना अडवून धरले होते आणि ते ओरडत होते, "लांब रहा.. लांब रहा.. कोणीही आत यायचे नाही."
आम्ही खोलीत डोकावून पाहिले आणि माझ्या छातीत धस्स झाले.
वृद्ध माधव मिरासदार जमिनीवर पडले होते. अगदी निश्चल. त्यांच्य तोंडापाशी थोडे रक्त पडले होते. त्यांचे डोळे उघडेच होते आणि बाहेर येतील इतके मोठे झाले होते. जीभदेखील बाहेर आली होती. अतिशय भयानक असे ते दृश्य होते.
"तुम्ही दोघे जरा शांत बसा! " प्रधान ओरडले. विवेक आणि नागेश त्यांचा आवाज ऐकून थोडे बाजूला झाले.
" यानेच मारलंय माझ्या वडीलांना. ठाऊक आहे मला. " विवेक किंचाळला.
" मी पाहतोय ना? थोडा वेळ शांत बस पाहू. " प्रधान म्हणाले, " अल्फा, पोलीसांना फोन कर. "
अल्फाने दोनदा फोन लावला. पण कोणी उचलला नाही. ते पाहून प्रधान चिडले.
" झोपा काढतायत नुसते! " ते म्हणाले, " तोपर्यंत आपणच थोडी पाहणी करूया. अल्फा, तू ये इकडे. प्रभव, तू फोन लावत रहा. "
मी फोन लावता लावता प्रधान सर आणि अल्फा काय करतात ते पाहत होतो. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली.
"त्यांना गळा आवळून मारण्यात आलेय. " त्यांच्या मानेभोवतालचा भाग पाहत प्रधान म्हणाले, " मृत्यू होऊन फार वेळ झालेला नाहीये. "
अल्फा संपूर्ण खोलीची पाहणी करू लागला. दरवाजाच्या बरोबर समोर एक लांब खिडकी होती आणि ती सताड उघडी होती. बाजुला एक बुटका पलंग होता आणि त्यावरची चादर खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पसरली होती. दाराच्या बाजूला एक लांब जाडजूड दोर खुंटीला अडकवला होता. त्याबाजूच्या भिंतीमधल्याच छोट्या कप्प्यात एक मोबाईल ठेवला होता. जमिनीवर पडलेल्या मिरासदारांच्या तोंडालगत रक्त सांडले होते आणि रक्ताचे लाल थेंब दरवाजापर्यंत एका रेषेसारखे पसरले होते.
" खुनीने मिरासदारांचा गळा आवळण्यासाठी या चादरीचा उपयोग केलेला दिसतोय. " अल्फा त्या खोलीचे निरीक्षण करीत म्हणाला, " आणि ते करताना त्याने त्यांना जमिनीवर पाडलं होतं बहुधा. कारण मिरासदारांच्या नाकातून रक्त येतंय. त्यांचा चेहरा जमिनीवर आपटला असावा, तिथे. "
त्याने दरवाजाकडे बोट दाखविले. दरवाजाजवळ बरेच रक्त सांडले होते.
" आणि तेथून खुनीने त्यांना खेचत आतमध्ये आणले असणार. त्यामुळे हा रक्ताचा ओरखडा इथे पडलाय. "
त्या ठिकाणी आणखी एक लगेच जाणवणारी गोष्ट म्हणजे, त्या खोलीत सुटलेला परफ्यूमचा घमघमाट. अल्फाने मृतदेहाजवळ जाऊन त्याचा वास पाहिला. मग त्या बाजूला पडलेल्या चादरीचाही वास पाहिला.
" या दोन्ही गोष्टींमधून हा वास येतो आहे. " अल्फा म्हणाला, " हा 'डिझेल ' कंपनीच्या परफ्यूमचा वास आहे. आणि मला चांगलं आठवतंय, तो परफ्यूम रात्री पार्टीमध्ये तुम्हीच लावला होता, श्री नागेश मिरासदार. बरोबर आहे ना? "
" होय, मी लावला होता, पण मी खून नाही केला. देवाशप्पथ सांगतो. " नागेश ओरडला. तो खूपच घाबरलेला दिसत होता.
" खोटं बोलतोय तो.. "विवेक पुन्हा ओरडला, " सगळं तर समोर दिसतंच आहे. गेले कित्येक दिवस तू बाबांच्या मागे प्रॉपर्टीसाठी लकडा लावला होतास, हे काही आम्हाला ठाऊक नाही काय? बाबांनी तुझ्या नावे काहीही ठेवण्यास नकार दिला होता. म्हणूनच तू हे केलं असणार! आता तुला फासावर चढविल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये, हे ध्यानात ठेव. "
" डेडबॉडीला पहिल्यांदा कोणी पाहिले? " अल्फाने विचारले.
" मी बाहेर आलो तेव्हा हा नागेशच इथे उभा होता. बाबांच्या खोलीच्या दारात. " मिरासदारांचा धाकटा मुलगा सचिन पुढे होत म्हणाला. त्याचा चेहरा खूपच पडला होता आणि तो कोणत्याही क्षणी रडेल असे वाटत होते.
" तुम्ही कशाला बाहेर आला होतात? " अल्फाने विचारले.
" मला झोप येत नव्हती. मी जागाच होतो. थोड्या वेळापूर्वी मला पलीकडच्या खोलीचे दार उघडल्याचा आवाज आला आणि बाहेर हालचाल जाणवली. म्हणून मी इतक्या रात्री काय चाललंय, हे पाहण्यासाठी बाहेर आलो. तेव्हा हा बाबांच्या खोलीतून बाहेर येत होता. " सचिनने नागेशकडे बोट दाखविले.
" होय, मला मान्य आहे की मी इथे होतो, पण मी इथे येण्याच्या आधीच ते मेलेले होते. आत्ता आहेत तसेच ते जमिनीवर पडले होते. मी त्यांना थोडंसं हलवून पाहिलं, पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी सगळ्या लोकांना हाक मारण्यासाठी बाहेर येत होतो. " नागेश म्हणाला. त्याच्या कपाळावरून घाम निथळत होता.
" तर श्री नागेश मिरासदार, आता मला सांगा, तुम्ही इतक्या रात्री मिरासदारांच्या खोलीत काय करत होता??" प्रधानांनी विचारले.
"त्यांनीच मला बोलावले होते. म्हणाले, महत्त्वाचे बोलायचे आहे. "नागेश म्हणाला.
" रात्री अडीच वाजता काय महत्त्वाचे बोलायचे होते त्यांना? "
" मला ठाऊक नाही. " नागेश म्हणाला, " मला त्यांचा मेसेज आला. मी झोपलो होतो. सव्वादोन वाजता मोबाईल वाजला आणि मला जाग आली. इतक्या रात्री कुणाचा मेसेज आला, हे पाहण्यासाठी मी मोबाईल पाहिला तर तो काकांचा मेसेज होता आणि त्यात त्यांनी मला लगेच त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले होते."
"मला तो मेसेज दाखवाल का? " प्रधानांनी हात पुढे केला. नागेशने मेसेज दाखविला. तो असा होता -
'आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीमध्ये ये. मला सगळे विषय संपवून टाकायचे आहेत. मी वाट पाहतोय. ' - माधव मिरासदार ; वेळ : 2.17 am.
तो नंबर नवीन होता.
" हा तर नवीन नंबर दिसतोय. तुमच्याकडे मिरासदारांचा नंबर सेव्ह नाहीये का? " अल्फाने विचारले.
" आहे ना.. पण त्यांनी आज पहिल्यांदाच वेगळ्या नंबरवरून मेसेज केला आहे. एरवी त्यांचा नेहमीच्या नंबरवरून फोन वा मेसेज येत असतो. " नागेश म्हणाला. प्रधानांनी भिंतीतल्या कपाटातील मोबाईल अलगद उचलला आणि तो तपासला.
" यात तरी त्यांनी तुम्हाला पाठविलेला मेसेज दिसत नाहीये. " प्रधान म्हणाले.
" पहा.. मी हेच सांगत होतो. मला कोणीतरी फसवतंय. मला कोणीतरी दुसर्या नंबरवरून मिरासदारांच्या नावाने मेसेज केला आहे आणि वरती बोलावून सापळ्यात अडकविले आहे. " नागेश म्हणाला.
" बाबांचा आणखी एक नंबर होता. " महेश मिरासदार बोलले, " ते दोन मोबाईल वापरायचे. एक सर्वांना संपर्क करण्यासाठी होता, जो आत्ता तुमच्या हातात आहे. दुसरा जो होता, तो फक्त आम्हा तीन मुलांसाठी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठी होता. "
" तो दुसरा नंबर जरा सांगता का? " प्रधानांनी विचारले. महेशनी तो नंबर सांगितला.
" अगदी बरोबर! याच नंबरवरून माधव मिरासदारांनी नागेशला मेसेज केलाय. " प्रधान म्हणाले, " तो मोबाईलही इथेच कुठेतरी असायला हवा. "
" इथे आहे. " अल्फा मृत मिरासदारांच्या खिशातून एक मोबाईल काढत म्हणाला. त्याने तो मोबाईल तपासला, "यावरून मेसेज पाठविलेला दिसतोय. दोन वाजून सतरा मिनीटांनी. "
" झालंच तर मग. म्हणजे तुम्हाला माधव मिरासदारांनी स्वतःच मेसेज करून बोलावले होते, हे तरी सिद्ध झाले! म्हणजे कोणी तुमची फसवणूक केल्याचा प्रश्नच येत नाही. " प्रधान म्हणाले. त्यांनी तो मेसेज पुन्हा एकदा वाचला, " 'मला सगळे विषय संपवून टाकायचे आहेत'.. मिरासदार कोणत्या विषयांबद्दल बोलत होते, याची तुम्हाला निश्चितच कल्पना असेल, नाही का? "
" मला.. मला नाही.. ठाऊक.. " नागेश अडखळत बोलला.
" याने कशाला सांगायला हवे! मीच सांगतो ना. " विवेक म्हणाला, " गेले कित्येक दिवस हा मनुष्य माझ्या वडीलांच्या मागे लागला होता, मला प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा हवा म्हणून. ते नाही म्हणताच याने त्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली होतीस. बाबांनी आम्हाला सांगितले होते, की माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानंतर मी माझे मृत्युपत्र करवून घेणार आहे. त्यामुळे तो त्याच्या नावावर जास्तीत जास्त प्रॉपर्टी करण्यासाठी बाबांवर दबाव आणत होता. मघाशीही बारा वाजण्याच्या सुमारास हा बाबांच्या खोलीतच होता, जेव्हा आपण सर्वजण खाली होतो तेव्हा. चांगला तासभर वाद घालत होते ते दोघे. विचारा त्याला, इतका वेळ काय बोलत होता ते!! "
" तुम्ही प्रॉपर्टीबद्दलच बोलत होता ना? " अल्फाने विचारले.
" अं.. ते.. अं... होय.. " अखेर त्याने मान्य केले, " आम्ही प्रॉपर्टी संबंधीच बोलत होतो. पण खरेच सांगतो.. मी खून केलेला नाहीये. "
" तुम्ही मिरासदरांवर पैशांसाठी दबाव आणत होता, हे खरे आहे का? "
" अं.. हो. खरे आहे. " त्याने हतबल होऊन मान्य केले.
" असं दिसतंय की उपलब्ध असलेले सर्व पुरावे तुमच्या विरोधातच आहेत, श्री नागेश मिरासदार! " प्रधान म्हणाले, " विवेकने तुम्हाला खोलीतून बाहेर येताना पाहिले आहे. खून झाला त्या खोलीत आणि मृतदेहाच्या शरीराला परफ्यूमचा वास येतोय, जो वाढदिवसाच्या वेळी तुम्हीच मारला होता, हे कोणीही सांगेल. तुमचे आणि मिरासदारांचे प्रॉपर्टी वरून बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते. तुम्हाला प्रॉपर्टीमधला हिस्सा हवा होता आणि मिरासदार तो देत नव्हते. खून व्हायच्या काही तास आधी तुमची याच गोष्टीवरून वादावादी झाली होती, हेही तुम्ही आत्ताच कबूल केले. मिरासदारांनी तुम्हाला पाठविलेला मेसेजही तुमच्या मोबाईलवर आहे. आणि एवढे सगळे समोर दिसत असूनही तुम्ही म्हणताय, की मी खून नाही केला!! हास्यास्पद आहे हे.. "
" मला मान्य आहे.. पण.. माझ्यावर विश्वास ठेवा.. मी खून नाही केला.. " नागेश पुन्हा तेच ओरडला.
" मग सिद्ध करून दाखवा. " प्रधान म्हणाले.
नागेश थोडा घुटमळला. त्याला काय बोलावे, हे सुचेना.
" मी.. मी.. " नागेश चाचपडत बोलला. मग एकदमच त्याला काहीतरी आठवले, " पण मला त्यांनी नेहमीच्या मोबाईलवरून मेसेज का नाही पाठविला? त्याऐवजी त्यांनी दुसरा नंबर वापरला.. जो ते सहसा कुणाला देत नाहीत... हे तुम्हाला विचित्र वाटत नाही का? "
" चूप बस निर्लज्ज माणसा! आता असल्या फालतू शंका काढून तू तुझे निर्दोषत्व सिद्ध करू शकत नाहीस. तुलाही मनातून ठाऊक आहे, की तूच खून केला आहेस. त्यामुळे मुकाट्याने ते मान्य कर. " विवेक म्हणाला.
" कधीच नाही! मला मान्य आहे, की मी त्यांच्याकडे प्रॉपर्टीची मागणी केली होती, त्यांनी नकार दिला होता, मग आमचा वाद झाला होता. पण मी निर्दोष आहे.. खरंच सांगतो!! " नागेश कळवळून म्हणाला. मी अखंडपणे पोलीस स्टेशनला फोन लावत होतो. अखेर तिकडून कोणीतरी फोन उचलला. मी पटकन फोन सरांकडे दिला.
" हॅलो.. मी निवृत्त पोलीस अधीक्षक भालचंद्र प्रधान बोलतोय. काय करत काय होता इतका वेळ?.. बरं ऐका ...जयसिंगपूरच्या पुढे एका फार्महाऊसवर खून झालाय. आत्ताच्या आत्ता या... होय, मी इथेच आहे... आम्ही वाट पाहतोय. "
" पोलीस येताहेत. " प्रधान सर्वांकडे पाहत म्हणाले, " आपल्याला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्वांनी शांत व्हा आणि हॉलमध्ये जाऊन बसा. मला कोणीही तेथून हललेलं नाही पाहिजे. नागेश मिरासदार, तुमच्यावरचा गुन्हा जवळपास सिद्ध झालेलाच आहे. आता जे काही सांगायचे आहे, ते थेट कोर्टातच सांगा. आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. महागात पडेल. "
सर्वजण खाली येऊन बसले. प्रत्येकजण घाबरलेला होता. माधव मिरासदार अजूनही मूकपणे अश्रू ढाळत होते. विवेक अजूनही चिडलेला होता आणि नागेशकडे रागाने पाहत होता. सचिन खुपच दुःखात दिसत होता आणि त्याने चेहरा हातांनी झाकून घेतला होता. गणपत आणि संजूही डोक्याला हात लावून बसले होते. मी खालीच थांबलो. प्रधान सर आणि अल्फा वरतीच होते आणि मिरासदारांच्या खोलीची तपासणी करीत होते. बऱ्याच वेळाने पोलीस आले, रुग्णवाहिका आली. नागेशची पुन्हा चौकशी झाली आणि त्याला पोलीसांनी नेले. मिरासदारांचे शवही पोस्ट मॉर्टमसाठी नेले गेले. हे सर्व होईपर्यंत बाहेर उजाडले. मी गार्डनमध्ये येऊन बसलो. अखेर अल्फा माझ्या शेजारी येऊन बसला. तो कसल्यातरी विचारात खोल बुडालेला दिसत होता.
"माधव मिरासदारांचे काय दुर्दैव! बरोबर पंच्याहत्तरीच्या दिवशीच काळाने त्यांच्यावर घाला घालावा!! " मी म्हणालो. तेवढ्यात गणपतने आम्हाला चहा आणून दिला.
" हं.. " अल्फाने हुंकार दिला.
" तशी साधी सरळच केस होती, नाही का? " मी चहा कपांत ओतत पुढे म्हणालो, " नागेशने खून केला आहे, हे सरळसरळ सिद्ध होत होते. त्याच्याकडे खूनासाठी पूरक असे कारणही होते. "
" हं.. " अल्फाने पुन्हा तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
" बरं झालं तो माणूस अडकला. गुंडच दिसत होता. आणि तो ज्या प्रकारे मिरासदार कुटुंबियांना त्रास द्यायचा, ते पाहता अगदी योग्य न्याय झाला आहे त्याच्यासोबत. आता बस म्हणावं तुरुंगात खडी फोडत. "
" हं... " पुन्हा तेच. आता मात्र मी वैतागलो.
" तुला झालंय तरी काय? ऐकतच नाहीयेस माझं. कसला विचार करतो आहेस? " मी विचारले.
" सांगतो, सांगतो. थोडा धीर धर. " अल्फा म्हणाला आणि त्याने चहाचा एक घोट घेतला. तेवढ्यातच तिथे प्रधान सर आले. तेही अल्फासारखेच चिंताग्रस्त दिसत होते.
" डेडबॉडीला नेलं का? " अल्फाने त्यांना विचारले.
" हो. " प्रधान आमच्या समोर बसत म्हणाले, " डेडबॉडीला नेलं आणि नागेशलाही पोलिसांबरोबर पाठवून दिलं. "
त्यांनी अल्फाकडे हेतूपुर्वक नजरेने पाहिले. अल्फानेही प्रधान सरांकडे पाहिले. मी चक्रावून ते दोघे असे का करताहेत, हे पाहू लागलो. अखेर प्रधान सर अल्फाला म्हणाले,
" मला वाटतं आता खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यायला सुरुवात करण्यास काही हरकत नाही..!!! "