"नमस्कार मंडळी." अल्फा म्हणाला,  "मी इथल्या कोणालाच माहीत असण्याचे कारण नाही. मी माधव मिरासदारांना याआधी कधी भेटलोही नव्हतो आणि आमची ओळखही नव्हती. त्यामुळे तुम्ही मला ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अल्फा. प्रधान सरांचा सहकारी. काल प्रधान सरांनी आग्रह केला म्हणून मी आणि माझा मित्र प्रभव या कार्यक्रमाला हजर झालो. दुर्दैवाने तो मिरासदारांचा शेवटचाच दिवस ठरला. असे काही होईल, हे कोणाच्याच ध्यानीमनी नसावे. अर्थात, अपवाद आहे तो मिरासदारांच्या खुनीचा. नागेश पूर्वीपासूनच मिरासदारांना त्रास देत होता. अलिकडे त्याने प्रॉपर्टीमधला हिस्सादेखील मागण्यास सुरूवात केली होती, असे काल त्यानेच कबूल केले. काल रात्री बाराच्या सुमारास त्याची आणि मिरासदारांची वादावादीदेखील झाली होती. आणि काही वेळाने, रात्री अडीचच्या आसपास कधीतरी मिरासदारांचा खुन झाला.

दर्शनी पुरावे आणि खुनाच्या ठिकाणची परिस्थिती खुनी म्हणून नागेशकडेच बोट दाखवित होती. त्याच्यापाशी खुन करण्यासाठी पूरक असे कारण होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही त्याच्या विरोधात होती. याखेरीज खुनाच्या आधी मिरासदारांनी नागेशला पाठविलेला तो मेसेज, मिरासदारांच्या मृतदेहाजवळ सर्वात आधी त्याचे आढळणे आणि त्यांच्या कपड्यांना आणि त्यांचा ज्या चादरीने गळा आवळून खुन झाला, तिला त्या विशिष्ट परफ्यूमचा वास असणे.. या गोष्टी निर्विवाद सिद्ध करत होत्या, की मिरासदारांचा खुन नागेशनेच केला आहे. पण डोळ्यांना दिसणारे दृश्यही कधीकधी धोका देऊ शकतेच ना. या प्रकरणाचा आपण जर थोडासा खोल जाऊन विचार केला, तर या गोष्टींमधला फोलपणा आपल्या लक्षात येतो आणि खुनी नागेश नसून कोणीतरी दुसराच आहे, अशा निष्कर्षाकडे आपण जायला लागतो. "

" काय?? " तिथे बसलेल्या प्रत्येकाला अल्फाच्या त्या वाक्याने जोराचा झटका दिला. सर्वत्र कुजबुज सुरू झाली आणि क्षणात वातावरण भीतीने भरून गेले.

" काय म्हणायचेय काय तुम्हाला?? " सचिन मिरासदार ओरडला.

" स्पष्टच आहे, नाही का? मला हेच सांगायचेय, की आपण चुकीच्या माणसाला पकडले आहे. " अल्फा आपला धारदार कटाक्ष सर्वांवर टाकत म्हणाला, " माधव मिरासदारांचा खुन नागेशने केलेलाच नाहीये. "

" पण.. पण.. कशावरून..??? " विवेकाने स्वतःला सावरत विचारले.

" सांगतो. आपण पहिल्यापासून एक एक गोष्ट पाहत जाऊया, जेणेकरून तुमच्या शंकेला जागाच रहायला नको." अल्फा उद्गारला,  "आपल्याला हे ठाऊक आहे, की नागेश बऱ्याच दिवसांपासून माधव मिरासदारांना प्रॉपर्टीसाठी छळत होता. काल रात्री अकराच्या सुमारास विवेकनी त्या दोघांना मिरासदारांच्या खोलीत भांडताना ऐकले होते. तेव्हा नागेश मिरासदारांकडे प्रॉपर्टीमधला हिस्सा मागत होता आणि ते तो देण्यास आढेवेढे घेत होते. त्यानंतर काही तासांतच मिरासदारांचा खुन झाला. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या, तर असाच निष्कर्ष निघतो, की मिरासदारांचा खुन नागेशनेच केला आहे. अर्थात, ते साहजिकच आहे. विवेकच्या जागी दुसरे कोणीही असते, तर त्याने हाच निष्कर्ष काढला असता.

पण खुनाच्या ठिकाणची परिस्थिती काही वेगळेच सांगत होती. त्या खोलीत अशा काही गोष्टी होत्या, ज्यांचा नीट विचार करता खुन नागेशने केला नसावा, असे निष्पन्न होत होते. त्यांतली पहिली गोष्ट म्हणजे त्या खोलीत दरवळणारा परफ्यूमचा घमघमाट. रात्री दोन वाजता खुन करण्यासाठी बाहेर पडलेला कोणीही अंगावर परफ्यूम मारून बाहेर पडणार नाही. इथेच संशयाला जागा निर्माण झाली. त्यातच, मिरासदारांच्या कपड्यांच्या आणि त्या चादरीच्या ओलसरपणामुळे हे स्पष्टच झाले, की परफ्यूम थेट त्यावरच मारण्यात आला आहे. नंतर मी थोडा तपास केला, तेव्हा मला आढळून आले, की हे करण्यासाठी हॉलमधील काचेच्या कपाटातील परफ्यूमची बाटली वापरण्यात आली आहे. तेव्हा मला प्रथम वाटले, की नागेश खुनी नसून त्याला मुद्दाम अडविण्यात आले असावे.

मग मी या शक्यतेला पुष्टी देणाऱ्या आणखी काही गोष्टी दिसतात का, हे पाहण्यास सुरूवात केली आणि मला त्या मिळतही गेल्या. दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे मिरासदारांनी नागेशला मेसेज करण्यासाठी वापरलेला मोबाईल. त्यांनी त्यांचा नेहमीचा फोन न वापरता असा मोबाईल वापरला, जो ते फक्त महत्वाच्या व्यक्तींना फोन करण्यासाठी वापरायचे. असे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे दरवाजाजवळील खुंटीला अडकविलेला दोर. खुनीने अगदी हाताशी असलेला दोर वापरायचा सोडून दूर खिडकीपाशी असलेली चादर मिरासदारांचा गळा आवळण्यासाठी का वापरली? निश्चितच कुठेतरी पाणी मुरत होते. आणखी एक गोष्ट, जी वरवर साधीशी वाटते, पण थोडे नीट पाहिले, तर विचार करायला लावते. ती म्हणजे दरवाजाजवळ पडलेला रक्ताचा सडा. खोलीच्या आतमध्ये दरवाजाजवळ रक्ताचे बरेच शिंतोडे उडाले होते आणि तेथून मिरासदारांचा मृतदेह जिथे पडलेला आढळला, तिथपर्यंत रक्ताची रेषा उमटली होती. याचा अर्थ खुनीने मिरासदारांना प्रथम दरवाजाजवळ पाडले असावे आणि त्यांचे नाक फुटून तिथे रक्त सांडले असावे. मग त्याने त्यांना खोलीच्या आत फरफटत आणले आणि चादरीने गळा आवळला. असे का घडले? खुनीला मिरासदारांना पाडण्याची गरज का भासली? आता कोणीही म्हणेल, की यामागे फार विचार करण्यासारखे काय आहे? मिरासदार जखमी व्हावेत आणि त्यांना प्रतिकार करण्याची संधी न देता त्यांचा गळा आवळता यावा म्हणून खुनीने प्रथम त्यांना पाडले असावे. पण जेव्हा आपण तो मोबाईल, खुंटीवरचा दोर आणि मिरासदारांचे दरवाजाजवळ पडणे या तिन्ही गोष्टींचा एकत्र विचार करतो, तेव्हा आपल्याला त्यांमध्ये एक समानता आढळते. अतिशय धूसर, न जाणवणारी, पण विलक्षण, अतर्क्य अशी समानता. या तिन्ही घटना तेव्हाच घडू शकतात, जेव्हा खुनीला मिरासदारांच्या खोलीत उभे राहणे शक्य नसेल..!! "

अल्फाचे ते वाक्य ऐकून माझ्यासकट सगळेचजण बुचकळ्यात पडले.

" नाही समजले? " सर्वांच्या चेहेऱ्यांवर नजर फिरवत अल्फा म्हणाला, " आता लक्षपूर्वक ऐका. मिरासदारांचा मोबाईल भिंतीमधील ज्या कप्प्यात ठेवला होता, तो जमिनीपासून बऱ्यापैकी उंचीवर होता आणि त्यातील मोबाईल घेण्यासाठी माणूस उभा असणे अनिवार्य आहे. पुढे, तो दरवाजाजवळील खुंटीला अडकविलेला दोर. तोदेखील हस्तगत करण्यासाठी उभे राहणे आवश्यक आहे. खाली बसून तो हाताला लागत नाही. शिवाय मिरासदारांना खुनीने प्रथम खाली पाडले, त्याचेही कारण हेच की एकदा मिरासदार खाली पडले, की त्यांना खाली बसूनच मारणे शक्य व्हावे. थोडक्यात सांगायचे झाले, तर खुनीवर कसलेतरी विचित्र बंधन होते, ज्यामुळे तो उभा राहू शकत नव्हता आणि त्याला जे काही करायचे होते, ते जमिनीशी लागूनच करता येणार होते. ही कल्पना करून जर आपण चाललो, तर त्या खोलीत घडलेल्या घटनांमागच्या अनैसर्गिकतेचा अर्थ हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतो आणि काल रात्री तिथे काय घडले असावे, याचे चित्र स्पष्ट होऊ लागते.

काल रात्री दोन वाजण्याच्या आसपास मिरासदारांचा दरवाजा वाजला. बाहेर अर्थातच खुनी होता आणि तो बसलेल्या अवस्थेत होता. कारण मिरासदारांच्या खोलीत उभे राहणे शक्य नाही. मिरासदारांनी दरवाजा उघडला आणि तत्क्षणी खुनीने त्यांना पाडले. त्यामुळे मिरासदारांचे नाक जमिनीवर आपटून तिथे रक्ताचा सडा पडला. मग त्याने त्यांना आत खेचून आणले. जवळच्या बेडवरील चादर त्याने ओढली आणि मिरासदारांना ठार मारले. आता त्याला खुनाचा आळ नागेशवर आणायचा होता. त्यासाठी त्याला वरती बोलावणे आवश्यक होते. पण मिरासदारांचा मोबाईल तर वरती होता, जिथे खुनी पोहोचू शकत नव्हता. त्यामुळे त्याने त्यांच्या खिशातच असलेला दुसरा मोबाईल नागेशला मेसेज करण्यासाठी वापरला. नागेश वरती आला आणि जाळ्यात अडकला.

आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो, की अशी कोणती गोष्ट होती, जी खुनीला उभे राहू देत नव्हती? असे काय त्या खोलीत होते, ज्यासाठी खुनीने सर्वकाही न उभे राहता करण्याचा खटाटोप केला?? मी जेव्हा काल रात्रीची मिरासदारांची खोली डोळ्यांसमोर आणली, तेव्हा माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. ती गोष्ट म्हणजे त्या खोलीत असलेली खिडकी होती. दरवाजाच्या बरोबर समोर असलेली लांबलचक खिडकी. जर खालून त्या खिडकीकडे पाहिले, तर त्यातून मिरासदारांची पूर्णच्या पूर्ण खोली दिसते. मी थोडे प्रयोग करून पाहता मला लक्षात आले, की खाली गार्डनच्या पलीकडील रस्त्यावरून जर या खिडकीच्या आत पाहिले, तर आतमध्ये उभी असलेली व्यक्ती सहज दिसते. पण तीच व्यक्ती जर वाकली अथवा खाली बसली, तर खालून पाहणाऱ्याला ती दिसत नाही. ज्याअर्थी खुनी त्या खोलीत उभा राहू शकत नव्हता, त्याअर्थी त्याला नक्कीच  आपण पाहिले जाऊ अशी भीती वाटत असणार. या सर्वातून एकच निष्कर्ष निघतो - तो म्हणजे काल रात्री दोन वाजता गार्डनपलीकडच्या रस्त्यावर खिडकीतून आत पाहणारे कोणीतरी उभे असले पाहिजे आणि खुनीला या गोष्टीची निश्चितपणे आधीपासूनच माहिती असली पाहिजे!! त्याशिवाय खुनी खुन करताना इतकी काळजी घेणे शक्यच नाही. "

ते ऐकून हॉलमध्ये असलेला एकन एक जण थक्क झाला होता. हे सर्वच कल्पनेच्या पलीकडील होते. अल्फा मघाशी मला जे बोलला होता, त्याचा अर्थ मला आत्ता लागत होता. अल्फा पुढे बोलू लागला,

" हा दुवा मला मिळाला आणि मी खाली रस्त्यावर थोडी तपासणी करताच मला माझा तर्क खरा असल्याचे लक्षात आले. रस्त्यावर दिव्याच्या खाली मला एका व्यक्तीच्या अस्तित्वाचे ताजे निशाण मिळाले. ते निशाण म्हणजे एका तेरा-चौदा वर्षांच्या मुलाच्या चपलांचे ठसे होते.. होय, तो संजू होता. मिरासदारांचे बागकाम करणारा पोऱ्या. काल रात्री मिरासदारांचा खुन होण्याच्या वेळी संजू खाली उभारून खिडकीतून आतमध्ये पाहत होता. तसे करण्यास त्याला मिरासदारांनीच सांगितले होते.

आपण आता या घटनेच्या शेवटच्या आणि सर्वात उत्सुकतेच्या भागाकडे वळूया. जर नागेशने खुन नाही केला, तर मग खरा गुन्हेगार कोण?? तसं पहायला गेलं तर खुपच कठीण प्रश्न होता हा. कारण खुनी इतका चालाख आहे, की त्याने एकही पुरावा मागे सोडला नव्हता. त्याने खाली उभारलेल्या संजूला चकविण्याचा खटाटोप केला खरा; पण शेवटी अशी एक घटना घडली, ज्यामुळे मला खुनी कोण आहे हे समजायला फारतर एक मिनीट पुरले. आता काल रात्रीच्या मिरासदारांच्या खोलीकडे आपण पुन्हा जाऊया. खुनीने मिरासदारांचा खुन केला, नागेशला वरती येण्याचा मेसेजही केला. पण संजू तर अजुनही खाली उभा होताच. त्याला तेथून हटविणे आवश्यक होते. कारण त्याने नागेशला खोलीत येताना पाहिले, तर सगळेच मुसळ केरात जातील. खुनाचा आळ तर नागेशवर आणायचा होता. पण खुन करताना नागेश दिसणे शक्य नव्हते, कारण मिरासदार तर आधीच मेलेले होते. जर संजू तिथेच उभा राहिला असता, तर तो नागेश निर्दोष असल्याचा साक्षीदारच झाला असता. त्यामुळे काहीतरी करून खुनीने त्याला तेथून जाण्यास भाग पाडले. मी हिच गोष्ट संजूला विचारली. तू तेथून कधी गेलास आणि का गेलास?? तुला कोणी जायला सांगितले?? तेव्हा तो म्हणाला, की खुद्द मिरासदारांनीच खिडकीतून हात करून त्याला तेथून जाण्यास सांगितले. पण हे तर असंभव होते. कारण मिरासदार तेव्हा जिवंत नव्हतेच. मग ते संजूला जाण्याचा इशारा कसा देतील??

या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते - खिडकीतून संजूला निघून जाण्याचा इशारा देणारा दुसरातिसरा कोणी नसून खुद्द खुनीच होता!! त्याने आपला चेहरा खाली उभारलेल्या संजूला दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आणि खिडकीतून फक्त हात बाहेर काढून संजूला जाण्यास सांगितले. संजूला तो हात मिरासदारांचाच आहे, असे वाटले, कारण त्या हातावरचा शर्ट आणि घड्याळ या दोन गोष्टी मिरासदारांच्याच होत्या. हाच मुद्दा मी बरोबर उचलला आणि मला खुनी कोण आहे, हे कळून चुकले. काल रात्री खुनानंतर जेव्हा सर्वजण त्या खोलीपाशी जमले होते, तेव्हा त्यातल्या एका व्यक्तीने हुबेहुब मिरासदारांच्या शर्टाच्या रंगाचा नाईट ड्रेस घातला होता. त्यातच त्या व्यक्तीचे घड्याळाही हुबेहुब मिरासदारांसारखेच आहे. अर्थातच, नागेश वरती येईपर्यंत त्या व्यक्तीला कपडे बदलण्यास वेळ मिळाला नसणार. नागेश वरती येण्याची त्याने वाट पाहिली आणि तो खोलीत जाताच एकदम ती व्यक्ती बाहेर आली आणि नागेशला रंगेहाथ पकडण्याचा बहाणा केला.. तुमच्या हुशारीला दाद द्यायला हवी, श्री सचिन मिरासदार!!! "

सर्वांच्या नजरा सचिन मिरासदारांकडे वळल्या. सचिनने भयभीत होऊन इकडेतिकडे पाहिले.

" मी.. मी.. न्.. नाही.. " तो चाचपडत म्हणाला.

" कबूल करण्यावाचून तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, सचिन. मला सुरूवातीपासूनच तुमच्यावर संशय होता. बरोबर नागेश खोलीत असताना तुम्ही बाहेर यावे, तेही इतक्या रात्री - विचार करायला लावणारी गोष्ट होती. शिवाय इतका विचारपूर्वक आणि कौशल्याने खुन करणारा माणूस चांगला प्रशिक्षित असला पाहिजे, असा मी विचार केला होता. तुम्ही एनसीसी चे प्रशिक्षक होता, असं मी ऐकलंय. त्यामुळे अशी चपळता फक्त तुम्हीच दाखवू शकला असता. साहजिकच मी खुनी म्हणून तुम्हालाच धरून चाललो होतो. संजूने त्या खिडकीतील हाताबद्दल सांगितल्यानंतर माझी खात्रीच पटली, की मिरासदारांचा खुन तुम्हीच केलेला आहे. आपण प्रथम जेव्हा बंगल्याच्या दारात भेटलो, तेव्हा तुमचं घड्याळ मी पाहिलं होतं आणि ते अगदी माधव मिरासदारांसारखंच होतं. शिवाय काल रात्रीचा तुमचा पेहरावदेखील मिरासदारांसारखाच होता. त्यामुळे हे स्पष्टच होतं, की खुन तुम्हीच केलेला आहे. आता तुम्ही सत्य कबूल करावं, हेच उत्तम. "

सचिन खुपच भेदरलेला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. विवेकने चिडून त्याला विचारले, " हा मुलगा जे बोलतोय, ते खरं आहे का?? बोल!! तू मारलंस बाबांना?? "

" नाही.. मी.. कशावरून..मी.. नाही.. "तो असंबद्ध बडबडला.

" तुझा गुन्हा बऱ्याबोलाने कबूल कर सचिन.. नाहीतर माझ्याकडे तुझ्याकडून सत्य वदवून घेण्याचे दुसरेही मार्ग आहेत. " प्रधान सर आपल्या शर्टाच्या बाह्या वरती सरकवत म्हणाले. त्यांचा करडा आवाज ऐकून सचिनचा उरलासुरला धीर संपला आणि तो मटकन खाली बसला.

" हो.. हो.. मी.. मीच मारलंय त्यांना.. "तो थरथर कापत म्हणाला. ते ऐकताच विवेकची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो सचिनच्या दिशेने धावला.

" तू आपल्या वडिलांना मारलंस!! निर्लज्ज, क्रूर माणसा!! तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळेल.. मी तुला सोडणार नाही.. "

त्याला सर्वांनी मोठ्या कष्टाने मागे ओढले. त्याचा राग फारच अनावर झाला होता. त्याला शांत करण्यात काही मिनिटे गेली. सचिनने आपला चेहरा हातांनी झाकून घेतला. त्याने खुन केलाय, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.

" शांत हो विवेक. त्याला शिक्षा ही होणारच आहे. पण त्याआधी त्याने हे कृत्य का केले, यामागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे." प्रधान सर म्हणाले,  "सचिन, तू हे का केलंस?? अशी कोणती गोष्ट आहे, जिने तुला स्वतःच्या वडिलांना ठार मारण्यास भाग पाडले?"

तो काहीच बोलला नाही. त्याला काय करावे, हे सुचतच नव्हते.

"हे बघ. तुला बोलण्याची ही शेवटची संधी आहे. पोलीस आता येतच असतील. तू बोललास तर ठिक, नाहीतर तुझ्याकडून जबरदस्तीने बोलवून घ्यावे लागेल. " प्रधान म्हणाले.

" त्यांना मी नाही मारलं!! " अखेर सचिन बोलला, " त्यांच्या कारस्थानी स्वभावानेच त्यांना मारलंय!! "

" म्हणजे?? काय म्हणायचंय काय तुला?? " विवेकने विचारले.

"  यातील फारशी कोणाला माहिती नाहीये. पण आमचे बाबा नक्की काय होते, हे मी चांगलाच जाणून आहे." सचिन म्हणाला,  "त्यांनी धंद्यात इतका पैसा काय सरळमार्गाने कमविला असेल असे तुम्हाला वाटते??"

"तुला म्हणायचंय.. की.. " महेश भीत भीत म्हणाले.

" हो. त्यांनीही खूप गैरव्यवहार केलेला आहे. तेही नागेशच्या मदतीने. "

" काय?? " तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.

" होय. " सचिन म्हणाला, " मला यातले काहीच ठाऊक नव्हते ; कारण बरीच वर्षे मी घराच्या बाहेरच होतो. मग इथे आल्यानंतर धंद्यात विवेकला थोडी थोडी मदत करायला लागलो. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे बाबा आणि नागेशच्या होणाऱ्या सततच्या भेटीगाठी. आमच्या अॉफिसमध्ये त्यांचं बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत बोलणं चालायचं. मी आणि विवेक लवकर घरी यायचो. हे दोघे इतका वेळ काय बोलतात, हे पाहण्यासाठी आम्ही दोघे एक दिवस कोणाच्याही नकळत मागे थांबलो आणि त्यांचे बोलणे ऐकले. तेव्हा आम्हाला खुपच धक्कादायक अशा गोष्टी समजल्या. धंद्यात फायदा कमवण्यासाठी गैर कामे करण्यासाठी बाबांनी नागेशचा उपयोग करून घेतला होता आणि आता तो त्या बदल्यात आमच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा मागत होता. बाबा त्याला राजी होत नव्हते. ही घटना म्हणजे आमच्यासाठी फार मोठा धक्का होता. बाबा पहिल्यापासूनच आमचे आदर्श होते आणि ते असे काही करतील, असा मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तेव्हापासून आमचा बाबा आणि नागेश दोघांवरही राग निर्माण झाला. विवेक तर भयंकर चिडला होता ; पण त्याला बाबा फारच जवळचे असल्यामुळे तो शांत राहिला. आम्ही कोणालाच काही बोललो नाही.

आम्ही यात फार लक्ष न घालता आमचे काम सुरू ठेवले. पण दोन दिवसांपूर्वी मी माझ्या वडीलांना नागेशला वचन देताना ऐकले, की आमच्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा ते त्याला देतील. ते ऐकून माझी संतापाने लाही लाही झाली. आम्ही धंदा सांभाळण्यासाठी दिवसरात्र राबत होतो आणि हा सर्व आयतेच घेऊन खाणार होता. अखेर मी त्या दोघांचाही काटा काढण्याचे ठरविले. बाबा त्यांच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस झाल्यावर मृत्युपत्र तयार करणार होते, म्हणजे कालच. रात्री बाबा आणि नागेशची वादावादी झाली नसून मृत्यूपत्राबाबत चर्चा झाली होती. ते मी ओळखले आणि काही होण्याआधीच बाबांचा खेळ संपविला. त्यानंतर नागेश त्यांच्या खुनाच्या आरोपात फसेल, अशी सगळी व्यवस्था करून ठेवली. मला बाबांची सवय ठाऊक होती आणि मला खात्री होती, की ते कोणालातरी पाळतीवर ठेवणार. थोडे निरीक्षण करताच मला खाली रस्त्यावर संजू उभा असल्याचे ध्यानात आले. आता काम आणखीनच अवघड झाले होते. पण मी एकदा ठरवले की ठरवले. त्यामुळे मी व्यवस्थित बेत आखून बाबांचा खुन केला आणि नागेशलादेखील अडकविले.

माझा डाव सफल झालाय, असे मला काही वेळापुर्वीपर्यंत वाटत होते. पण प्रधान सर आणि अल्फाच्या इथे असलेल्या उपस्थितीकडे मी कानाडोळा केला आणि इथेच माझी सर्वात मोठी चूक झाली. तुम्ही इतक्या खोलवर जाऊन विचार कराल, असे मला कधीच वाटले नव्हते. तुम्ही खरेच ग्रेट आहात!! तुमच्या चातुर्याला आणि शोधकार्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. मला मान्य आहे की मी गुन्हा केलाय. पण हे आपल्यासाठीच होते, विवेक. मी ही संपत्ती त्या दुष्टाच्या हाती लागू देणार नव्हतो. त्यासाठी हे करणे आवश्यक होते. आणि ते मी केले. मला जे बोलायचे होते, ते आता बोलून झाले आहे. आता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. "

" शिक्षा तर तुला होणारच. तू स्वतःला न्यायव्यवस्थेच्या वरचे समजलेस आणि न्याय करायला निघालास. पण शेवटी गुन्हा तो गुन्हाच. आता तुझा न्याय न्यायालयातच होईल. घेऊन जा त्याला!! " प्रधान सर ओरडले. बंगल्याच्या बाहेर थांबलेले पोलीस आत आले आणि सचिनला घेऊन गेले. विवेकने हातपाय गाळले आणि तो अश्रू ढाळू लागला. महेशने त्याला सावरले.

" रडू नकोस. आता सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर आहे. " प्रधान सर त्या दोघांना म्हणाले, " इथून पुढे नीट रहा आणि चांगल्या मार्गाने धंदा चालवा. जी चूक तुमच्या वडिलांनी केली, ती तुम्ही करू नका. त्यात तुमचंच भलं आहे. "

त्या दोघांनी मान डोलावली.

" चला. आता निघण्याची वेळ झाली. सर्वांनी गेलं तरी हरकत नाही. " प्रधान सर म्हणाले.

*

संध्याकाळी उशिरा आम्ही परत सांगलीला जायला निघालो. बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हते. माझा वीकेंड इतका सनसनाटी होईल, अशी मी कल्पनाच केली नव्हती. मी कालपासूनचे सगळे प्रसंग मनात घोळवत राहिलो. अल्फा गाडीतून बाहेर पाहत होता आणि प्रधान सरही कसल्यातरी विचारांत मग्न होते.

"माधवने असे काही केले असेल, असे वाटले नव्हते. " अखेर प्रधान सरच बोलले, " तो माझा फार जुना मित्र होता आणि आम्ही एकमेकांना चांगले ओळखत होतो. पण तो पैसे मिळविण्यासाठी वाईट मार्गांचा अवलंब करत होता, हे मला ठाऊक नव्हते. काही काही वेळा माणसे वरून दिसतात तशी आतून असत नाहीत, हेच खरे..!! "

" खरंय. " अल्फा म्हणाला. पुन्हा दोन मिनिटे शांतता, आणि एकदमच अल्फाला आठवले, " सर, आपली पैज?? या सगळ्या गोंधळात आपण त्याबद्दल विसरूनच गेलो!! "

" अरे हो, खरंच की!! " प्रधान सर स्मितहास्य करीत म्हणाले, " आपले पंच तर इथेच बसलेत. आणि पैज कोणी जिंकली आहे, हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे. "

त्या दोघांनीही माझ्याकडे पाहिले.

" त्याला कशाला विचारायला हवंय. पैज मीच जिंकलेली आहे. त्याला पहिला मेसेज माझाच गेला होता. विचारा ना त्याला. तो सोबतच होता माझ्या. " अल्फा रुबाबात म्हणाला. मी प्रधान सरांकडे पाहिले. आम्हा दोघांनाही एकदमच हसू फुटले. अल्फा काहीच न कळून आमच्याकडे पाहू लागला.

" काय चाललंय तुमचं? का हसताय तुम्ही?? "

मी माझ्या मोबाईलचा मेसेज बॉक्स उघडून अल्फाला दाखविला. त्यात प्रधान सरांचा मेसेज अल्फाच्या बराच वेळ आधी आलेला त्याला दिसला. ते पाहून अल्फा एकदम खट्टू झाला.

" म्हणजे.. यावेळी पण.. "

" यावेळीपण मीच जिंकलो. " प्रधान सरांनी त्याचे वाक्य पूर्ण केले. आम्ही हसू लागलो.

" मला प्रधान सरांचा मेसेज आपण संजूला भेटायला निघालो होतो, तेव्हाच आला होता. पण मी तो जेव्हा तू मेसेज केलास, तेव्हाच पाहिला. मला तेव्हाच खुनी कोण आहे, हे कळाले आणि पैज कोणी जिंकली आहे, हेही कळाले. पण मी मुद्दामच काही बोललो नाही. तुझ्या आनंदावर विरजण नको म्हणून म्हटलं थोडा वेळ राहुदे खुष. नंतर सांगू खरं काय ते. " मी म्हणालो.

" बरं बरं.. असूदे.. " अल्फा म्हणाला, " एवढं हसण्यासारखं काय आहे त्यात? तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहात. अनुभवी आहात. तुम्ही जिंकणारच की.. "

" वा रे वा!! पैज लावण्याच्या वेळी तर असं काही सुचलं नाही!! आणि हरल्यावर मी एकदम मोठा झालो का!! " प्रधान सर डोळा मारत म्हणाले, " लक्षात ठेव अल्फा, 'बाप बाप होता है'!! "

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel