वर्ष बहुधा एकोणीसशे साठ असेल .साठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .एक टुरिस्ट बस श्रीनगरला जम्मूहून जात होती .श्रीनगरचा रस्ता अतिशय धोकादायक वळणा वळणाचा. हिमालयातील सर्वच रस्ते वळणा वळणाचे आणि धोकादायक असतात.रस्ते अरुंद सर्वत्र खोल दऱ्या असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व रस्त्याला कठडे बांधणे शक्य नाही . हिमालय सर्वात तरुण पर्वत आहे .त्यामुळे त्याच्यात उलथापालथ वारंवार होत असते. भूस्खलन ही तर नेहमीचीच बाब आहे .त्यामुळे रस्ते वारंवार खचतात.ड्रायव्हर मंडळी अतिशय कुशल असतात .दर्या एवढ्या खोल असतात की खाली वाहणारी नदी एखाद्या रेघेसारखी दिसते .
त्या टूरिस्ट बसमध्ये तरुण वृद्ध लहान मुले सर्व वयोगटातील मंडळी होती .काही डुलक्या काढत होती .तर रसिक मंडळी हिमालयाचे सौंदर्य निरखून पाहात होती.बस एका संथ गतीने घाट चढत होती.एवढ्यात काय झाले माहित नाही, कदाचित टायर पंक्चर झाला असेल, कदाचित ड्रायव्हरचा अंदाज चुकला असेल ,कदाचित भूस्खलन झाले असेल ,परिणाम एकच होता बसने खोल दरीमध्ये कोलांटउडी मारली.बसला आग लागली .बसच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या.बसचे जळते तुकडे हवेत उडाले .जळते तुकडे जळती माणसे सर्व काही दरीत जाऊन नदी किनारी विसावली.धुवाधार पाऊस सुरू झाला. लहानसा भूकंप झाला .भूस्खलन झाले आणि सर्व काही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले .
बस श्रीनगरला पोचली नाही हे सर्वांना कळल्यानंतर हाहा:कार उडाला .त्या काळी बस नक्की कुठे पडली हे शोधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि इतर हेलिकॉप्टर वगेरे सामुग्री विकसित झालेली नव्हती .(अजूनही कित्येक वेळा बस विमान हेलिकॉप्टर इत्यादीचे अवशेष सापडणे बिकट होते .)तरीही उपलब्ध साधनांच्या द्वारे आठ दहा दिवस अविरत प्रयत्न केले जात होते . सर्व अवशेष मातीखाली दबले गेल्यामुळे काहीही तपास लागू शकला नाही.सर्वजण ती गोष्ट हळूहळू विसरले .मृतांचे नातेवाईकही हळूहळू ती गोष्ट विसरून आपल्या दैनंदिन जीवनक्रमात व्यग्र झाले .
यानंतर अनेक वर्षे गेली एक दोन पिढ्या निघून गेल्या .माती वाहून गेली .सर्व माणसांची हाडे उघडी पडली.का कुणाला माहीत परंतु ती हाडे वाहून गेली नाहीत.नदी किनारी पाण्यापासून दूर तशीच उघड्यावर पडून राहिली .अशीही कित्येक वर्षे गेली.त्या खोऱ्यामध्ये चंद्रप्रकाश थोडाच वेळ पडत असे. शुक्लपक्षात अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत आठ दिवस चंद्रप्रकाश खोऱ्यात पडत असे .एरवी एखादेवेळी प्रकाश आला तरी त्याची तीव्रता फारच कमी असे .
*आजची रात्र फार वेगळी होती.आज काहीतरी विशेष घडणार होते.* चंद्रप्रकाश हळूहळू सरकत त्यातील काही हाडांवर पडला .तसा महिन्यातून आठ दिवस चंद्रप्रकाश थोडा बहुत काही हाडावर किंवा सर्व पसरलेल्या हाडांवर नेहमीच पडत असे .परंतु आजचा दिवस म्हणजे रात्र काही वेगळीच होती .प्रकाश हाडांवर जसा पडत गेला तसतशी ती हाडे म्हणजे माणसे जिवंत होऊ लागली.प्रकाश पडल्याबरोबर आई वडील व एक दहा बारा वर्षांचा मुलगा उठून उभे राहिले.
दरीमध्ये नदी वाहात होती व तिच्या काठावर ते उभे होते. झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते इकडे तिकडे पाहात होते .ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करीत होते .बसमधून जात असताना बस दरीमध्ये पडली ते त्यांना आठवत होते.ज्या हाडावर चंद्रप्रकाश पडला ती माणसे जागी होत होती . उठून इकडे तिकडे बावरल्यासारखे ती पाहात होती .एवढ्यात चंद्र डोंगराआड गेला प्रकाश नाहीसा झाला. आणि त्या जिवंत झालेल्या माणसांचे पुन्हा हाडामध्ये रूपांतर झाले. नदीकाठावर भयाण शांततेमध्ये ती हाडे पुन्हा दुसऱ्या रात्रीच्या चंद्र प्रकाशाची वाट पाहात पडून राहिली.
दुसऱ्या दिवशी ज्या ज्या हाडांवर चंद्रप्रकाश पडत होता,तेथील माणसे प्रथम बसत. नंतर आळोखे पिळोखे देत. त्यानंतर उठून उभी राहात होती .हाडांचे माणसात जिवंत माणसात रूपांतर कसे होत होते ते कळत नव्हते .चंद्र प्रकाशात जिवंत झालेली माणसे कुठेही हिंडू फिरू शकत होती .मात्र चंद्रप्रकाशाच्या बाहेर त्यांना जाता येत नव्हते .जर ती चंद्रप्रकाशाच्या बाहेर जाऊ लागली तर त्यांना विजेचा झटका बसल्यासारखे होत होते .चंद्र प्रकाशाच्या सीमारेषेत त्यांना फिरता येत होते .आणखी एक गोष्ट लक्षात आली. जिथे हाडे पडलेली असत तिथून प्रकाश नाहीसा व्हायला लागल्याबरोबर तो ती किंवा लहान मूल जिथे असेल तिथून खेचल्या सारखे त्या जागेकडे येत असे.लगेच तिथे झोपी जात असे आणि नंतर त्याचे हाडात रूपांतर होत असे. दुसऱ्या दिवशी चंद्रप्रकाश पडल्यावर प्रथम हाडे एकत्र येत. नंतर त्यावर मांस त्वचा इत्यादी येत असे.आणि नंतर ती उठून बसत असत .हे काय चेटूक होते सांगता येत नाही .चंद्रप्रकाश अमृतमय असतो असे म्हणतात .त्या खोऱ्यांमध्ये तो जरा जास्तच अमृतमय होत असावा .
अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रप्रकाश जास्त जास्त जागेवर पडत जात असे.सर्वत्र हाडे विखुरलेली असल्यामुळे रोज जिवंत होऊन उठणाऱ्या माणसांची संख्या क्रमशः वाढत जात असे.
त्याचप्रमाणे जिथे प्रथम चंद्रप्रकाश येई त्याठिकाणी तो जास्त वेळ राहत असे .त्यामुळे तिथे जिवंत होणाऱ्या माणसांचे आयुष्य काही मिनिटांनी तासांनी का होईना परंतु जास्त असे.
महिन्यातील आठ दिवस वगळता उरलेले तीन आठवडे तेथे त्या खोर्यात काहीही हालचाल नसे .
त्याचप्रमाणे कोणत्याही कारणांनी का असेना, बर्फवृष्टी पाऊस इत्यादी, चंद्रप्रकाश जर नसेल तरीही काही हालचाल नसे.
ज्यावेळी आकाशातून नुसते पांढरे किंवा काळे ढग जात असत त्यावेळी चंद्रप्रकाश आहे नाही आहे नाही असे होत असे .माणसांचे हाडांत रूपांतर व हाडांचे माणसात रूपांतर जलद क्रमाने होत असे .त्या वेळी जर एखाद्याने ते दृश्य पाहिले असते तर तो कदाचित हार्टअटॅकने मेला असता .
चंद्रप्रकाशाचा असा परिणाम त्या तिथे खोऱ्यात हाडांवर का होत होता हे एक न उकलणारे गूढ आहे .(अशी माणसाला न उकलणारी अनेक आश्चर्ये जगात आहेत)
ती माणसे काही मिनिटांचे तासांचे का होईना परंतु आयुष्य जगत होती.तीन आठवडय़ांनी किंवा कदाचित दीर्घ काळाने त्याची पुनरावृत्ती होत होती.त्या त्या वयाचे आयुष्य जरी ती माणसे जगत असली तरी प्रत्येक वेळी आयुष्य जगण्याची पद्धती वेगवेगळी असे.
उदाहरणार्थ मधुचंद्रासाठी काश्मीरला निघालेली एक जोडी जर घेतली तर जेव्हा ती जिवंत होई~तेव्हा ती हातात हात घालून नदीकिनारी फिरत असत .~ तर केव्हा जोडीने नदीकिनारी बसून गप्पा मारीत असत . ~तर केव्हा केव्हा नदी किनारी स्तब्ध बसून बारीक बारीक खडे नदीमध्ये फेकत असत. ~तर केव्ह़ा केव्हां त्यांचा भांडणाचा,वाद विवादाचा, मूड असे. ~ केव्हा ते शांतपणे काहीही बोलल्याशिवाय बसून राहत . ~ तर केव्हा त्यांच्यात भांडण झालेले असे व ती एकमेकांपासून दूर एकमेकांकडे पाठ फिरवून बसलेली असत. *थोडक्यात एका नवीन जोडीमध्ये जे जे काही होत असते ते ते त्यांच्यामध्ये होत असे*.
त्याप्रमाणेच दुसऱ्या एका वृद्ध जोडीच्या जिवंत झाल्यावर वेळोवेळी निरनिराळ्या गोष्टी चाललेल्या असत.~केव्हा दोघे एकमेकांच्या प्रकृतीची काळजी करीत असत .~केव्हा एकमेकांच्या रोगांची चौकशी करीत असत.तुझा गुडघा काय म्हणतो ?तुमचे डोके दुखायचे थांबले का? इत्यादी इत्यादी.~केव्हा बीपीची गोळी डायबेटिसची गोळी शोधण्याचे काम चालू असे . तिथे त्यांच्या औषधाच्या गोळ्या सापडत नसत.~केव्हा मुलगा व सून आता काय करीत असतील याबद्दल चर्चा चाले.~जेव्हा आपण निघालो तेव्हा नातीची तब्बेत बरी नव्हती आता ती कशी असेल?असे काळजीपूर्ण उद्गार निघत असत.~केव्हा मुलाचे कौतुक सुनेची गार्हाणी केव्हा सुनेचे कौतुक मुलाची गार्हाणी ~केव्हा जावयाचे कौतुक चालत असे.~केव्हा केव्हा तर खेड्यामधले घर कौलारू त्याच्या आठवणी चालत ~
आई वडील व दहा वर्षांचा मुलगा यांची काही एक वेगळीच तऱ्हा होती .~त्या मुलाचा सारखा चॉकलेटचा हट्ट चाले .आणि आईवडील त्यामुळे दात कसे बिघडतात वगैरे सांगत रहात.~केव्हा केव्हा तो मुलगा आक्रस्ताळेपणा करीत असे आणि त्या वेळी त्याचे वडील त्याला एक भक्कम चापट देत असत .~त्याची आई त्याला पोटाशी धरून वडिलांकडे रागाने पाहात असे .~ केव्हा केव्हा त्या जोडप्याची आपल्या मुलाला पुढे काय शिक्षण द्यायचे याबद्दल चर्चा व वादविवाद चालत असत ~वादविवाद अशासाठी की वडिलांना आपला मुलगा सीए व्हावा असे वाटे तर आईला तो डॉक्टर व्हावा असे वाटे~मुलाची कुवत काय? त्याचा कल काय?त्याला काय व्हावेसे वाटते ?हे कोणीच विचारात घेत नसे.~त्या जोडप्याला नवीन फ्लॅटमध्ये जायचे होते . त्या फ्लॅट संबंधी तो कसा असावा त्याची चर्चा चालत असे ~ आईला असलेली नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची होती त्यासंबंधी विचार चालत.~
दोन मल्ल कुस्तीत भाग घेण्यासाठी श्रीनगरला चालले होते .त्यांच्यावर चंद्र प्रकाश पडला की ते उठून लगेच शड्डू ठोकायला सुरुवात करीत .नदी किनाऱ्याच्या वाळूमध्ये त्यांची कुस्ती चालू होई.
दोघे जण एका कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी चालले होते.ते उठून बसल्यावर त्यांची त्यासंबंधी चर्चा चाले.
एक जलतरणपटू होता तो जिवंत झाल्याबरोबर लगेच नदीमध्ये पोहोण्यासाठी जाण्याला उत्सुक असे .मात्र त्यावेळी जर नदीवर चंद्रप्रकाश नसेल तर तो हिरमुसला होई .चंद्रप्रकाश असेल तर तो लगेच उत्साहाने पोहण्यासाठी जाई.
अशी प्रत्येकाची निरनिराळी तर्हा होती.सर्वजण एकत्र असूनही त्यांचे एकमेकांशी काही बोलणे होत नसे .जो तो आपल्या स्वत:त किंवा स्वतःच्या कुटुंबात मश्गूल असे.दुसरे येथे आहेत याची त्यांना जाणीव होती की नाही ते माहीत नाही .फक्त आपणच असल्यासारखे त्यांची वर्तणूक असे .बहुधा त्यांना आणखी कोणी दिसत नसावे .
अष्टमी ते पौर्णिमा या काळात रोज जिवंत होणार्या माणसांची संख्या क्रमशः वाढत जात असे.अष्टमीला कोरम सर्वात छोटा असे .तर पौर्णिमेला तो सर्वात मोठा असे .पौर्णिमेला नदी किनारा गजबजून जात असे .
असे हे जीवन मरणाचे चक्र कितीतरी काळ चालू होते. याला सुरुवात झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षे सहज लोटली .यांचा अंत होणार की नाही ते कळत नव्हते .~मातीखाली दीर्घकाळ गाडले गेले. ~माती बाहेर वाहून न जाता दीर्घकाळ तसेच होते.~कुणी तरी जादू केली ~चंद्रप्रकाश पूर्वीही होता आणि आताही होता .~मात्र आता तो प्रकाश संजीवनमय होता .
काश्मीरच्या खोऱ्यात, नदीकाठी ,भयाण शांततेत ,केवळ नदीच्याच आवाजात ,हे सर्व कां चालू होते?किती काळ चालू राहणार होते? ते त्या दयाघन परमेश्वरालाच माहीत !
परंतु त्यांच्या सुटकेचा समय जवळ आला होता .अर्थात त्यांना ती सुटका वाटणार होती की काय?त्यांना ते कळणार होते की काय? ते माहित नाही .आपल्या दृष्टीने मात्र ती सुटका होती.निदान आज अनेक वर्षे सातत्याने चांदण्याच्या प्रकाशात जे घडत होते ते आता थांबणार होते एवढे नक्की .त्या खोऱ्यात अडकलेले ते आत्मे कुठे जाणार होते ते माहीत नाही . निदान ते चक्र तरी थांबणार होते .(कदाचित आणखी काही दुसरे चक्र चालू झाले असते!!)
त्या खोऱ्यातील बिकट वाटेवरून एक साधू चालला होता .दाढी, जटा, कमंडलू, छाटी ,काखेत मृगाजिन, छोटी काठी, पायांत खडावा, असा तो चालला होता.चालता चालता तो अकस्मात थबकला .इथे आसपास कुठेतरी काहीतरी विपरीत घडत आहे,घडले आहे, असे त्याला जाणवले . शेजारीच मृगाजिन पसरून त्यावर तो ध्यानस्थ बसला .दहा पंधरा मिनिटांमध्ये त्याला काय झाले, काय होत आहे ,व काय केले पाहिजे, ते जाणवले.आपल्या वाटेने पुढे तसेच न जाता तो खोऱ्यात उतरू लागला.थोड्याच वेळात तो नदीकाठी येऊन पोहोचला .इतस्तत: पसरलेली हाडे पाहून त्याला आश्चर्य वाटले नाही.ते दृश्य त्याने ध्यानस्थ असतांना अगोदरच पाहिले होते .
तो लगेच कामाला लागला .सूर्यास्त होण्याच्या आत त्याला सर्व काही संपवायचे होते .रात्री काळ्या शक्ती पाशवी शक्ती बळकट होतात .त्याने त्या सर्व हाडांचा एक मधोमध ढीग केला.नदीमधून कमंडलूत पाणी भरून आणले . ध्यानस्थ बसून त्याने ते पाणी अभिमंत्रित केले .ते पाणी त्या हाडाच्या ढिगाभोवती फिरविले .उरलेले पाणी त्या हाडांच्या ढीगावर शिंपडले.आणि मोठ्याने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच क्षणी त्या ढिगाने पेट घेतला. जसे काही त्याने ढिगावर पाणी नव्हे तर पेट्रोल शिंपडले होते, अशा ज्वाला निघाल्या व वर आकाशाला जाऊन भिडल्या.थोड्याच वेळात तिथे राखेचा ढीग उरला .त्या ढीगावरही त्याने पुन्हा अभिमंत्रित पाणी शिंपडले. त्याने आकाशाकडे पाहून काही प्रार्थना केली. नदीतील पाण्याचा एक लहानसा भाग वेगळा होऊन त्या राखेच्या ढिगापर्यंत आला.सर्व राख त्या प्रवाहात मिसळली. आणि तो प्रवाह पुन्हा नदीला जाऊन मिळाला.थोड्याच वेळात ती राख त्या प्रवाहात दिसेनाशी झाली .
*रात्री चंद्रप्रकाश आला .पौर्णिमा होती. तो प्रकाश कदाचित हाडे शोधीत असावा.प्रकाशाला हाडे दिसली नाहीत .सर्व हाडांचे माणसांचे आत्म्यांचे संमेलन त्या दिवशी झाले नाही.*
*त्यानंतर नदीकाठी केव्हाच जीवन मृत्यूचा खेळ झाला नाही*
२१/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com