आम्ही लहान होतो त्यावेळची गोष्ट आहे .माझ्या वडिलांचा एक लहानसा व्यवसाय होता .उदर निर्वाह भागून त्यातून त्यांना विशेष पैसा शिल्लक राहत नसे .हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत होता .का कुणाला माहीत परंतु त्यांना फार्महाऊस घेण्याची फार हौस होती .त्यांच्या कुणीतरी ओळखीतल्या एका माणसाने एक फार्महाऊस विकायचे आहे म्हणून त्यांना सांगितले .ते स्वतः जाऊन फार्म हाऊस बघून आले. त्यांना ते आवडले .त्यांनी ते कर्ज काढून व स्वतःजवळचे थोडे पैसे त्यात घालून विकत घेतले.तेव्हापासून सुट्टीमध्ये आम्ही काही दिवस फार्म हाऊसवर राहायला जात असू .वडिलांना त्यांच्या व्यवसायामुळे सलग काही दिवस तिथे राहणे शक्य नव्हते .आई व आम्ही भावंडे अशी तिथे जाऊन राहात असू .आई सुद्धा काही दिवसच राहात असे.वडिलांची खाण्यापिण्याची आबाळ होत असल्यामुळे ती नंतर शहरात आमच्या घरी परत जाई.सुटीमध्ये आम्हाला मोकळ्या वातावरणात राहायला आवडत असे.फार्म हाऊसवर मागे एक छोटीशी बंगली होती .त्यामध्ये केअरटेकर राहात असत.ते काका काकू अतिशय प्रेमळ होते .ते वडिलांचे विश्वासू असल्यामुळे त्यांच्या भरवशावर आम्हा भावंडांना सोडून आई शहरात परत जात असे.

मे महिन्यातील सुट्टी मोठी असल्यामुळे आम्ही फार्म हाऊसवर दर वर्षी राहायला जात असू .शक्य झाले तर एखादा आठवडा दिवाळीच्या सुट्टीमध्येही आम्ही जात असू.

फार्महाऊस दोन अडीच एकरवर पसरलेले असावे .म्हणजे हल्लीच्या परिभाषेत सुमारे एक हेक्टर.फार्म हाऊसवर गर्द झाडी होती .वड पिंपळ आंबा जांभूळ अशी विविध प्रकारची झाडे त्यांमध्ये होती .आमचा बंगला साधारण मध्यभागी होता . त्यांच्या मागे केअरटेकर काका काकू व त्यांची  दोन मुले राहात असत .आम्ही तीन भावंडे दोन भाऊ एक बहीण व ती दोघे एक भाऊ एक बहीण अशी पाच जण एकत्र खेळत असू .फार्म हाऊसच्या कडेला एक लहानसा तलाव होता .त्यामध्ये आम्ही मुले अनेक वेळा डुंबण्यासाठी जात असू .तलावाची खोली कडेला फार कमी होती आत  गेल्यावर तलाव चांगलाच खोल होता.गर्द झाडी व पाठीमागे असलेला तलाव यामुळे गारवा चांगल्यापैकी असे.दिवाळीमध्ये तर रग पांघरून झोपावे लागे. उन्हाळ्यातही रात्री गारवा असल्यामुळे पांघरूण घेऊन झोपावे लागे.तीन बेडरूम एक किचन हॉल व्हरांडा अशी बंगल्याची रचना होती.आई असे त्यावेळी किचनमध्ये सैपाक होत असे.एरवी काका काकूंच्या इथे आम्ही जेवायला जात असू .आई नसे त्यावेळी काका काकूनी बंगल्यात राहायला यावे व इथे सैपाक करावा असे आईला वाटे.काका काकूंना ते विशेष पसंत नसे .

गावातून दोन माणसे कामासाठी नेहमी येत असत .ती दोघे दिवसभर कामावर असत .आपला जेवणाचा डबा ती दोघे बरोबर घेऊन येत .सकाळी नऊ दहा वाजता ती कामाला येत व संध्याकाळी सहा वाजता परत गावात आपल्या घरी जात.बंगल्याची साफसफाई आगराची साफसफाई त्यांच्याकडे असे.काका काकू सर्वत्र लक्ष ठेवून काम व्यवस्थित होत आहे ना हे पाहात असत .जेव्हा काही काम जास्त असे त्यावेळी गावातून आणखी मजूर आणले जात .

आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर राहायला जाऊ त्यावेळी केवळ दंगा दंगा आणि दंगा एवढेच आम्ही  करत असू .दोन चार वेळा खाणे पिणे आणि दंगा याशिवाय आम्हाला काही उद्योग नसे. सकाळी नाष्टा चार वाजता काहीं च्याव म्याव  आणि दुपारी व रात्री जेवण हादडणे हा आमचा उद्योग असे .

*आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर जात असू तेव्हा आम्हाला काही वेगळेच अनुभव येत असत.त्यावेळी आम्हाला ते काही विशेष अनुभव आहेत किंवा काही अमानवी प्रकार आहे असे मुळीच वाटले नाही.*

उन्हाळ्यात आम्ही नेहमी तलावात डुंबण्यासाठी पोहण्यासाठी जात असू .कडेलाच पोहायचे मध्यभागी जायचे नाही अशी आम्हाला सक्त ताकीद असे.आई वडील काका काकू आम्हाला सतत बजावत असत .जेव्हा शक्य असे त्यावेळी काका आमच्या बरोबर तलावाकडे येत असत .नाहीतर कामावर असलेल्या एखाद्या मजुराला आमच्याबरोबर पाठविण्यात येई.आम्ही पोहत असताना आमच्यावर लक्ष ठेवण्याचे काम त्या मजुराकडे असे.

एकदा पोहायला गेलेले असताना आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका मजुराला सांगितले होते .अाम्हा तीन भावंडांत मी सगळ्यात मोठा.नंतर मधू व नंतर छोटी उर्फ कमू.एकदा कमू पोहोता पोहोता खोल पाण्यात गेली.काय झाले नक्की माहित नाही परंतु ती गटांगळ्या खाऊ लागली .आम्ही घाबरून गेलो .ती पटकन पाण्यात बुडाली .आम्ही मजुराला त्याच्या नावाने हाका मारू लागलो. एवढ्यात कमू पाण्यावर तरंगू लागली .व नंतर पाण्यावरून तरंगत तरंगत कडेपर्यंत  आली .ती अर्धवट बेशुद्धावस्थेत होती. पाण्यातून आलेल्या दोन हातांनी तिला उचलून  तलावाच्या कडेवर ठेवले.व नंतर ते हात अदृश्य झाले.तेवढ्यात तो मजूर तेथे आला.ती खाली कशी गेली वर कशी आली तरंगत कडेपर्यंत कशी आली तलावाच्या कडेवर तिला कुणी ठेवले आम्हाला काहीच कळले नाही .कमू बुडत असताना आम्ही एवढे घाबरून गेलो होतो की नंतर काय झाले ती गोष्ट सहज विसरून गेलो .कमू सुखरूप आली या आनंदात आम्ही सर्व विसरून गेलो.

नंतर एकदा मी जांभळाच्या झाडावर जांभळे काढण्यासाठी चढलो होतो .त्या दिवशी आमचे मजूर काही कारणाने कामावर आले नव्हते.जांभळे काढीत असताना माझा पाय पटकन घसरला.माझ्या वजनाने हाताने धरलेली खांदी मोडली आणि मी खाली पडू लागलो .तेवढ्यात मला कुणीतरी अलगद धरल्यासारखे वाटले आणि मी जमिनीवर अल्लद उतरलो .खाली पालापाचोळा गवत असल्यामुळे मला बहुधा लागले नसावे .मला कुणीतरी धरल्याचा भास झाला असावा असे मला वाटले.आता पुस्तकातील ती हकीगत वाचल्यानंतर असे स्मरते की मला कुणीतरी धरून हळूच जमिनीवर ठेवले .

मी सर्वात मोठा असल्यामुळे बाकीच्यांची जबाबदारी माझ्यावर असे . त्या दिवशी काका काकू गावात गेलेली असल्यामुळे दूध तापवून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. गॅस पेटविताना लायटर कुठे सापडत नव्हता .आम्ही सर्वांनी तो शोध शोध शोधिला.तेवढ्यात आम्हाला तो ओट्यावर जाग्यावर टांगून ठेवलेला आढळला .मला पक्के आठवते की मी जेव्हा तो तिथून काढण्यासाठी पाहिले तेव्हा तो तेथे नव्हता .तो नक्की कुणी तरी तिथे आम्ही शोधीत असताना आणून ठेविला होता .

आम्ही हॉलमध्ये नेहमी खेळत असू. खेळत असताना मध्ये खुर्च्यांची अडचण नको म्हणून खुर्च्या भिंतींबरोबर लावून ठेवत असू .खेळता खेळता मध्येच भिंतीजवळील एका खुर्चीची जागा सरकलेली आढळून येई.कुणीतरी ढकलावी त्याप्रमाणे ती खुर्ची हळूहळू सरकत मध्यभागी पंख्याच्या खाली येत असे.नंतर आम्ही पुन्हा ती खुर्ची भिंतींबरोबर नेवून ठेवत असू .

आम्ही बरेचदा खोलीमध्ये रात्री पाणी आणून ठेवल्याशिवाय झोपी जात असू .मध्यरात्री केव्हातरी जाग आल्यावर पाणी प्यावेसे वाटे.त्यावेळी कुणीतरी पाण्याचे तांब्या भांडे भरून उशी जवळील स्टुलावर ठेवलेले आढळून येई.  झोपेमध्ये तांब्या भांडे भरून आम्ही ठेवले होते कि नव्हते, ते आठवत नसे. आम्ही विचारही करीत नसू.झोपेमध्येच पाणी पिऊन मोकळे होत असू.

अशी तीन चार वर्षे फार्महाऊसवर सुट्टीच्या काळात आमची आनंदात गेली.आम्हाला कधीही भीती वाटली नाही .आम्ही असुरक्षित आहोत असे कधीही वाटले नाही .किंबहुना कसले तरी आम्हाला संरक्षण कवच आहे असे वाटत असे .त्यावेळी या गोष्टी आमच्या लक्षात आल्या नाहीत . परंतु आता मागे वळून पाहता तिथे काहीतरी होते आणि ते चांगले होते असे वाटते .

अशी एक समजूत आहे की प्रत्येक वस्तूला एक वास्तुपुरुष असतो .तो वास्तुपुरुष त्या वास्तूचे संरक्षण करीत असतो .वास्तूप्रमाणे त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणार्‍या  मालक किंवा त्यांच्या जवळील लोकांचेही तो संरक्षण करीत असतो.आमच्या जुन्या फार्म हाऊसमध्ये तसा काही प्रकार असावा असे वाटते. किंवा काही कारणाने तिथे एखाद्या भुताचे वास्तव्य असावे परंतु ते भूत अतिशय सज्जन परोपकारी विशेषतः लहान मुलांना मदत करणारे, लहान मुले आवडणारे असावे .

नंतर मोठेपणी कधी तरी एक बातमी फोटोसह एका अशाच विषयाच्या पुस्तकामध्ये वाचलेली आठवते.त्यामध्ये एका फार्म हाऊसमध्ये हाऊस किपरने काही कारणामुळे आपल्या दोन मुलांना विष दिले.नंतर स्वतः पंख्याला टांगून घेऊन  आत्महत्या केली अशा आशयाचा काही मजकूर आला होता.नंतर ती बाई भूत झाली .ते भूत प्रेमळ होते लहान मुलांना मदत करीत असे अशा आशयाचा मजकूर होता .

वडिलांचा व्यवसाय चांगला चालू लागल्यामुळे त्यांनी ते फार्महाऊस विकून नंतर दुसरे जास्त मोठे त्यांच्या मनासारखे फार्म हाऊस घेतले . तिथे पूर्वीच्या फार्म हाऊस पेक्षा जास्त सुखसोयी होत्या आणि त्याचबरोबर थोडीबहुत शेती करता येईल अशी मोकळी जमीनही होती .आम्ही जुन्या फार्महाऊसमध्ये तीनचार वर्षे जात होतो .नंतर या नव्या फार्म हाऊसमध्ये आमचे जाणे होत असे .

* बहुधा आम्ही त्या पुस्तकात उल्लेख केलेल्या फार्म हाऊसमध्ये तीनचार वर्षे घालविली असावी .*

२१/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel