त्या छोट्याश्या बंगलीला बाहेरून कुलूप लावलेले दिसत होते.यमुनाबाई बहुधा बाहेर गेल्या असाव्यात.त्या एकट्याच तिथे राहात होत्या.आसपासचे येणारे जाणारे काकू मामी बाई मावशी आजी कुठेतरी बाहेर गेल्या असतील असे मनात म्हणत असावेत.त्यांच्याकडे सकाळी कामाला मोलकरीण येत असे .तीही गेले चार दिवस आली नव्हती.दूधवाला दुधाची पिशवी बाहेर टांगलेल्या पिशवीत नेहमी टाकत असे.त्यानेही गेले चार दिवस दुधाची पिशवी दिली नव्हती.आजी गावाला गेल्या असतील असे वाटत होते .सर्व काही आलबेल दिसत होते .बंगलीच्या खिडक्या दरवाजे लावलेले होते.चार दिवसांनी येणाऱ्या जाणाऱ्याला बंगलीतून घाणेरडा वास येऊ लागला.कुठे तरी जवळपास उंदीर घूस कुत्रे मेलेले असावे असे लोकांना वाटले .एक दोन दिवसांत तो वास तीव्र झाला .वास बंगल्यातून येत होता .
कुणीतरी पोलिसांना फोन केला .पोलिस आले .वास बंगल्यातून येत आहे याची खात्री करून घेतली.बंगल्याचा दरवाजा फोडण्यात आला.बेडरूममधून वास येत होता .नाकाला मास्क लावल्याशिवाय पुढे जाणे अशक्य होते .म्हातारी बेडवर पडलेली होती. पोस्टमार्टेम झाल्याशिवाय म्हातारी कशाने मेली ते कळणार नव्हते.पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू , हार्टअटॅक, आत्महत्या, खून,या सर्व शक्यता गृहित धरून आपली तपासाची दिशा ठेवली होती .बाहेरच्या दरवाजाच्या कडी कुलपापासून घरातील सर्व नवे जुने ठसे गोळा करण्यात आले .कॉटवर आजींचे डोके आपटलेले दिसत होते.कॉटला थोडे रक्ताचे डागही दिसत होते.डोक्याला मागच्या बाजूने मोठी खोक पडलेली दिसत होती. आजींचा मृत्यू बहुधा रक्तस्रावाने झालेला होता. कपाट फोडलेले होते.आतील वस्तू विस्कटलेल्या होत्या .चोरीचा उद्देश होता की नुसता चोरीचा देखावा निर्माण करण्यात आला होता काही कळत नव्हते.त्यांचा पुतण्या नागपूरला राहतो असे कुणीतरी म्हणाले.त्याचा फोन नंबर डायरीमधून शोधून त्याला फोन करून बोलावून घेण्यात आले.पूर्ण तपासाअंतीच सर्व चित्र स्पष्ट झाले असते. फोटो घेण्यात आले व नंतर प्रेत शवागारात शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी दरवाजाला सील केले. एक पोलीस संरक्षणासाठी तिथे ठेविला आणि चौकशीपथक ऑफिसवर आले .
शामराव नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसमध्ये आले होते.त्यांना पोलिसांचे स्क्वॅड कुठे गेले आहे याची माहिती देण्यात आली .असेल काही तरी नेहमीचा प्रकार असे म्हणून शामरावानी तिकडे लक्ष दिले नव्हते.त्यांची नेहमीची रूटीन कामे चालली होती .पोलीस स्क्वॅड आल्यावर त्याचा प्रमुख आपल्याला रिपोर्ट करीलच याची त्यांना खात्री होती.एवढ्यात बाहेर पोलीस व्हॅन आल्याचा आवाज आला.आणि शामरावांचा असिस्टंट मधुकर त्यांच्या केबिनमध्ये आला.
त्याने सर्व हकीकत सविस्तर सांगितली . आपला अंदाज सांगितला. स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच पडलेली होती.बाहेर दूध टाकण्यासाठी पिशवी टांगलेली होती त्यात दूध नव्हते.बहुधा नैसर्गिक मृत्यू नसावा.वरवर तरी चोरी झालेली दिसत होती. खुनाची शक्यता वाटते .कदाचित चक्कर येउन आजी कॉटवर आपटल्या असाव्यात आणि त्यांच्या डोक्याला खोक पडली असावी .त्यातच अतिरक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला असावा .चार दिवस तरी म्हातारीला मरून झाले असावेत.दुधाच्या पिशव्या का टाकण्यात आल्या नाहीत ?का दूध पिशवी रोज टाकण्यात आली आणि ती कुणीतरी नेली ?आसपास चौकशी करता मोलकरीण कामासाठी येत असे. ती का आली नाही ?सर्व चौकशी करणे आवश्यक आहे .
शामरावांनी सर्व हकीगत नीट ऐकून घेतली आणि मधुकरला पुढील तपास करण्यास सांगितले.सॅल्यूट करून मधुकर पुढील चौकशीसाठी निघून गेला .दुसऱ्या दिवशी मधुकरने शामरावांना रिपोर्ट दिला .मोलकरणीला फोन करून तू कामावर काही दिवस येऊ नकोस आजी गावाला जात आहेत असे सांगितले होते.त्याचप्रमाणे दूध टाकणार्यालाही तू काही दिवस दूध देत जाऊ नको म्हणून सांगण्यात आले होते.त्यालाही तसा फोन आला होता .हे फोन कॉल कुणी केले ?त्याचा तपास केल्याशिवाय व शवचिकित्सा अहवाल आल्याशिवाय आपल्याला पुढील तपास करता येणार नाही .एवढ्यात शामरावांच्या टेबलावरचा फोन वाजला. शवचिकित्सा करणार्या डॉक्टरांचा तो फोन होता .शामरावानी डॉक्टरना प्राथमिक तोंडी अहवाल देण्यास सांगितले होते.डोक्यावर काहीतरी जड वस्तूंचा प्रहार झाल्यामुळे किंवा डोके कठीण वस्तूंवर आपटल्यामुळे रक्तस्राव होऊन मृत्यू झाला .असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता .पोटातील व्हिसेराही तपासासाठी पाठविण्यात आला होता .
जी केस कदाचित नैसर्गिक मृत्यू असेल असे वाटत होते ती आता कदाचित खुनाची केस झाली होती. पोलिसांजवळ तपासासाठी संख्याबळ कमी असते. कायद्याने त्यांचे हात बांधलेले असल्यामुळे एका विशिष्ट मर्यादेबाहेर जाऊन त्यांना तपास करता येत नाही .ऑफिसर्स व सामान्य कॉन्स्टेबल यांच्यावर कामाचा ताण असतो.जोर जबरदस्ती करून काम केल्यास वरिष्ठांना जाब द्यावा लागतो. बऱ्याच वेळा राजकीय दबाव असतो . खासगी डिटेक्टिव्हला बर्याच गोष्टी डावलून पुढे जाता येते.
शामरावांनी युवराजांची मदत घेण्याचे ठरविले .ते स्वतःच फोन करून युवराजांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले . काही कामानिमित्त संदेशही तिथे आला होता .त्यामुळे काम जास्तच सुलभ झाले होते .सर्व हकीकत सविस्तर व्यवस्थित सांगितल्यावर शामरावांनी युवराजांचा निरोप घेतला .कुणा राजकीय पुढार्याची सभा असल्यामुळे त्यांना बंदोबस्तासाठी जायचे होते .ते गेल्यावर युवराजांनी संदेशला कोणकोणती माहिती गोळा करायची याबद्दल काही सूचना दिल्या. संदेशने तिथूनच फोन करून आपल्या हस्तकांना कोणती माहिती गोळा करावयाची याबद्दल सूचना दिल्या .
दोन दिवसांमध्ये संदेशने युवराजांना पुढील रिपोर्ट दिला. दूधवाल्याला व मोलकरणीला आलेले फोन बंगल्यातील आजींच्या फोनवरून करण्यात आलेले होते .आवाज आजींचा नसून तो कुणातरी पुरुषाचा होता. सुदैवाने दोघांचेही मोबाइल रेकॉर्डिंग मोडवर असल्यामुळे संभाषणाचे रेकॉर्डिंग उपलब्ध झाले होते. त्याची कॉपी करून संदेशने आणली होती .आजी काही दिवस गावाला जात आहेत मी त्यांचा पुतण्या बोलत आहे तरी पुन्हा फोन येईपर्यंत कामाला येऊ नये .असा संदेश मोलकरणीला गेला होता.तर दूध पिशवी देऊ नये असा संदेश दूधवाल्याला गेला होता .दोन्ही आवाज वेगवेगळे होते .त्या अर्थी आजीचा मृत्यू झाला त्यावेळी दोघे जण तेथे उपस्थित असावेत.व त्यांनीच फोन केले असावेत असे वाटत होते. आजींकडे मोबाइल नव्हता. लँडलाइनवरून फोन करण्यात आले होते.पुतण्याला पोलिसांनी बोलाविल्यामुळे तो येऊन लगेच पुन्हा नागपूरला गेला होता. संदेश नागपूरला पुतण्याला जाऊन भेटला होता.आजींच्या मृत्यूच्या वेळी तो नागपुरातच होता याची खात्री संदेशने करून घेतली होती .हा खून असल्यास तो पुतण्याने स्वत: केला नव्हता.हा बंगला मुख्यतः जमीन विकून दहा लाख रुपये मिळणार होते.शिवाय एक फ्लॅटही मिळाला असता.त्याच्या मोहाने पुतण्याने खून केला असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही.परंतु संदेशला तरी पुतण्या निर्दोष वाटत होता.पुतण्याच्या आवाजाच्या रेकॉर्डिंगशी बंगल्यातून फोन केलेल्यांचे आवाज जुळत नव्हते .
युवराजांनी संदेशला आजींच्या विभागातील टप्पोऱ्या पोरांवर जरा लक्ष ठेवण्यास सांगितले .त्याचप्रमाणे एकूणच गुन्हेगारी जगतात खूप पैसा हाती आल्यामुळे कुणी अवास्तव खर्च करीत असल्यास त्यांचाही मागोवा घेण्यास सांगितले .
संदेशचे खबरे होते त्यांना ही माहिती काढायला सांगितल्यावर त्यांनी लगेच पुढील माहिती दिली .खाजगी गुत्त्यावर दोन पोरे जास्त पैसा खर्च करताना आढळली .त्यांना कुठुनतरी भरपूर पैसे मिळाले होते .त्यांना ताब्यात घेऊन बोलते केल्याशिवाय कुठून पैसे मिळाले? किती मिळाले?आणि का मिळाले ?ते कळणार नव्हते.त्यांना बोलते करण्याचे काम शामराव करू शकले असते .युवराजांनी संदेशला ती जागा ताब्यात आल्यामुळे कुणाचा फायदा होणार होता का ?ते शोधून काढण्यास सांगितले .त्याचप्रमाणे शामरावांना फोन करून त्या दोन पोरांना उचलण्यास व बोलते करण्यास सांगितले.
दोन दिवसांनी सर्व माहिती गोळा करून संदेशने युवराजांना फोन केला .संदेशचे बोलणे ऐकून त्यांनी संदेशला स्वत: ऑफिसवर येण्याला सांगितले .*ती जागा मिळाली तर एका बिल्डरचा फायदा होणार होता .*
*सुपारी*भाग २
(युवराज कथा)
भाग २
जेव्हा ती छोटीशी बंगली बांधली गेली त्यावेळी तिथे आसपास वस्ती नव्हती .वामनराव लहानपणापासून भाड्याच्या घरात राहात होते.स्वतःच्या मालकीचा छोटासा का होईना पण बंगला असावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती.यमुना बरोबर त्यांचे लहानपणीच लग्न झाले होते .वामनराव व यमुनाबाई यानीं कमी उत्पन्नातही चांगल्याप्रकारे संसार केला .दुर्दैवाने त्यांना मुलबाळ नव्हते .त्यांचा एक पुतण्या नागपूरला रहात असे .याशिवाय त्यांना जवळचे नातेवाईक नव्हते .वामनरावांची बंगला हवा ही इच्छा यमुनाबाईंना माहिती होती .वामनरावानी काटकसर करून साठवलेल्या पैशात त्यांनी स्वतःचे स्त्रीधन घालून गावापासून दूर हा जमिनीचा लहानसा तुकडा घेतला व त्यावर छोटीशी बंगली बांधली.
बंगली जेमतेम पाचशे चौरस फूट कार्पेट एरिया असलेली होती. वर्हांडा छोटासा हॉल किचन बेडरूम टॉयलेट ब्लॉक आणि मागे भांडी घासण्यासाठी छोटीशी जागा .गावापासून दूर असली तरी दोघेही इथे राहात असत .वामनराव सायकलने गावात जाऊन लागणारे सामान घेऊन येत असत .हळूहळू गाव विस्तारत गेले. आसपास अनेक बंगले झाले .जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला .आसपासच्या जमिनी लोकांनी विकत घेतल्या . दुकाने मॉल चित्रपटगृहे इत्यादी बांधण्यात आले.जशी वस्ती वाढत गेली, जसा गाव विस्तारत गेला,जसे उद्योग वाढत गेले,तश्या उंच उंच इमारती उभ्या राहू लागल्या.पूर्वी बांधकाम करताना आपल्याला स्वतःलाच सर्व लक्ष ठेवावे लागे.आता बिल्डर ही एक नवी जमात उदयाला आली .फ्लॅट संस्कृती आली. शेकडो फ्लॅट्स एकत्र असलेली संकुले उभी राहू लागली.त्या ठिकाणी सर्व अंतर्गत सोयी असत. स्टेशनपर्यंत तिथून बसचीही व्यवस्था असे.बंगले विकत घेऊन तिथे उंच उंच इमारती बांधल्या जात होत्या .बंगलेवाल्यांना भरपूर पैसे देऊन शिवाय त्यांना मनासारखा फ्लॅटही दिला जात असे.
एका बिल्डरने आसपासची बरीच रिकामी जमीन बंगले चाळी इत्यादी विकत घेतले होते .त्याला त्या परिसरात एक मोठे संकुल, सर्व सोईंनी युक्त असे संकुल, उभे करावयाचे होते . आसपासचे अनेक बंगले त्याने विकत घेतले होते .दोन चार बंगलेवाल्याशी बोलणी चालू होती.यमुना बाईंचा बंगला त्याच्या डोळ्यात सलत होता .तो मध्यवर्ती होता .तुम्हाला चांगला फ्लॅट देतो चांगली किंमत देतो अशी अनेक प्रलोभने त्याने यमुनाबाईंना दाखविली होती .
चार वर्षांपूर्वी वामनराव वारले होते .यमुनाबाई एकट्याच बंगल्यात राहात असत.वामनराव सरकारी नोकरीत असल्यामुळे आजीना फॅमिली पेन्शनही मिळत होते .त्यामध्ये त्यांचा गुजारा होत असे .बंगल्यात ठिकठिकाणी वामनरावांच्या आठवणी दडलेल्या होत्या . त्या आठवणींच्या साह्याने यमुनाबाई जगत होत्या .बिल्डर व बिल्डरच्या माणसानी अनेकदा त्यांना बंगली विकण्यासाठी प्रलोभने धाकदपटशा इत्यादी निरनिराळे मार्ग अवलंबिले होते .यमुनाबाई आपल्या मतावर ठाम होत्या .त्यांना त्या बंगलीत वामनरावांच्या आठवणीं बरोबर मरायचे होते .ती बंगली एखाद्या रत्नहारामध्ये पदक असावे त्याप्रमाणे सर्व जागेच्या मोक्याच्या ठिकाणी होती.ती विकत घेतल्याशिवाय बिल्डरला आपले आदर्श संकुल उभे करता येत नव्हते.
एवढी सगळी सविस्तर विस्तृत हकिगत सांगून संदेश बोलण्याचे थांबला .आजी बंगली विकण्याला का तयार नव्हत्या व बिल्डर वाटेल ते करून बंगाली विकत घेण्याच्या मागे का होता त्याचा उलगडा होत होता .बंगली न मिळाल्यास त्याची सर्व गुंतवणूक फुकट जात होती .त्याने घेतलेले बँकेचे कर्जही फिटणे कठीण झाले असते .
आजीना हवा तेवढा पैसा देऊन बिल्डर बंगला खरेदी करण्याला तयार होता. आजी बंगला विकण्याला तयार नव्हत्या.ती जागा ताब्यात आल्याशिवाय संकुल उभे राहू शकत नव्हते.आजी किती वर्षे जगतील याचा भरवसा नव्हता.बिल्डरने पुतण्याला भेटून आजींच्या मृत्यूनंतर ती जागा त्याला विकण्यासाठी विसार रक्कमही दिली होती.आजीच्या मृत्यूनंतर पुतण्याला पोलिसांनी बोलवून घेतले होते.बंगल्यातून काही दागिने व काही पैसा चोरीला गेला असावा असा अंदाज होता.त्या पकडलेल्या दोन पोरांनी दागिने सराफाला विकल्याचे आढळून आले . खून चोरी करण्याच्या उद्देशाने झाला असा वरवर बनाव निर्माण करण्यात आला होता .अंतस्थ हेतू मात्र वेगळा होता .
दोन अधिक दोन चार इतके सर्व चित्र स्पष्ट झाले .पोलिसी हिसका दाखवताच तो पोरे पोपटासारखी बोलू लागली .आजीकडे त्या पोराचे येणे जाणे होते .आजीची बाजारातील काही कामे ती पोरे करीत असत .आजी त्यांना त्याचा काही मोबदला देत असे .त्या मुलांना एक दिवस फोन आला . तुम्हाला एका विशिष्ट झाडाच्या ढोलीमध्ये एक पाकीट सापडेल. त्यामध्ये पन्नास हजार रुपये ठेवलेले आहेत. त्यात चिठीही मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही काम पूर्ण करायचे आहे. काम झाल्यावर त्याच ढोलीमध्ये तुम्हाला उरलेले पैसे म्हणजे पन्नास हजार रुपये मिळतील असा मजकूर होता . सोबत एक स्टँपेपरही होता .कागदावर जबरदस्तीने आजींची सही घ्यायची होती .आजीने सही करण्यास नकार दिला .त्यामध्ये आजी चक्कर येउन कॉटवर आपटल्या .आम्ही घाबरून पुढे काय झाले ते बघण्यासाठी थांबलो नाही. चोरीचा देखावा तयार केला .
शेजारीच पडलेले कुलूप घेऊन आम्ही ते दरवाज्याला लावले.त्या अगोदर सर्व खिडक्या बंद केल्या.कुणी बघत नाही ना हे पाहून आम्ही तिथून पळून गेलो.चार दिवसांनी पोलिस आजीचे प्रेत घेउन गेले. आम्ही झाडाच्या ढोलीतून उरलेली रक्कम घ्यावी असा आम्हाला फोन आला . त्याप्रमाणे आम्हाला उरलेले पैसे मिळाले.
मुलांचे ठसे बंगलीमध्ये मिळाले .आजींच्या डोक्यावर मारलेले हत्यार मिळाले नाही .कॉटवर आजीचे डोके जिथे आपटले तिथे आजींचे रक्त सांडल्याचे पुरावे मिळाले .आजी चक्कर येऊन कॉटवर पडल्यामुळे त्यांना खोक पडली की मुलांनी धरून त्यांना आपटले त्यामुळे खोक पडली हे कळू शकले नाही. त्या मुलांवर खुनाचा आरोप शाबित होऊ शकला नाही.त्या दोन मुलांना पांच पांच वर्षे शिक्षा झाली . बिल्डरवर मुलांना खून करण्यासाठी पैसे दिल्याचा व अप्रत्यक्ष रित्या आजींचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही .
बिल्डरने ती बंगली आजींच्या पुतण्याकडून विकत घेतली.तिथे भव्य संकुल बांधले .मनोमन खात्री असूनही पुराव्याअभावी बिल्डर सुटला .बिल्डरचा फायदा होता म्हणून त्याने खून केला असे म्हणता येत नाही.असे कोर्ट म्हणाले .
सुटूनही खर्या अर्थाने न सुटलेली (कारण खर्या आरोपीना शिक्षा झाली नाही ),खर्या आरोपींना शिक्षा न झालेली, ही शामराव व युवराजांची पहिलीच केस,असे म्हणावे लागेल.
१४/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com