नेहमीप्रमाणे  इन्स्पेक्टर शामराव ऑफिसमध्ये सकाळी आठ वाजता शिरले .सर्व पोलिसांनी उठून त्यांना कडक सलाम ठोकला .उजवीकडच्या बाकावर एक पोरसवदा तरुणी बसलेली होती .तिचे डोळे पाण्याने डबडबलेले होते .शामराव आपल्या केबिनमध्ये बसल्यावर प्यूनने त्यांना पाणी आणून दिले.त्यांनी समोर कडक शिस्तीमध्ये उभ्या असलेल्या पोलिसाला आज काय विशेष म्हणून विचारले.त्यावर तो म्हणाला .बाहेर एक बाई आलेल्या आहेत  त्यांची तक्रार लिहून घेतली आहे तरीही त्या तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणत आहेत .शामरावानी त्या बाईला आंत पाठवून द्यायला सांगितले.ती तरुणी दरवाजा ढकलून आत आली आणि शामराव बसा म्हणाल्यावर समोरच्या खुर्चीत बसली .शामरावांनी बोला म्हणून सांगितल्यावर तिने बोलायला सुरुवात केली .

तिचा नवरा आयटी ऑफिसमध्ये काम करीत आहे .त्याच्या शिफ्ट प्रमाणे येण्या जाण्याच्या  वेळा असतात .काल दुसरी शिफ्ट असल्यामुळे तो बारानंतर घरी यायला  हवा होता .बाराला त्याने मी आता निघत आहे म्हणून फोन केला होता.कामाचे लोड असल्यास किंवा रिलिव्हर काही कारणाने न आल्यास शिफ्ट पुढे कंटिन्यू करावी लागते .त्यामुळे नेहमी तिचा नवरा दुसरी शिफ्ट असेल तेव्हां, बारा वाजता येत आहे किंवा येत नाही म्हणून कळवतो. ऑफिसमधून निघाल्यावर घरी यायला सुमारे अर्धा तास लागतो .सुधाकर एक वाजेपर्यंत न आल्यामुळे मी त्याला फोन केला .त्याचा फोन स्विच ऑफ येत होता.ऑफिसात फोन करून पाहिल्यानंतर तिथून तो केव्हाच निघाल्याचे कळले.सकाळपर्यंत तो घरी न आल्यामुळे मी सकाळी येथे पोलिस कम्प्लेंट करण्यासाठी आले .एवढे कसेबसे एका दमात बोलून ती ओक्साबोक्शी रडू लागली .तिचा रडण्याचा भर ओसरल्यावर शामरावानी तिला,जे जे काही करता येण्यासारखे आहे ते मी करीन तुम्ही काळजी करू नका. तो कदाचित काही कामाने कुठे गुंतला असेल असे म्हणून तिला आश्वस्त केले .

एवढ्यात शामरावांच्या टेबलावरील फोन खणखणला शामरावांनी फोन उचलताच पलीकडून फिरत्या गस्ती पथकाने रिपोर्ट देण्याला  सुरुवात केली .त्यांना रेल ट्रॅक जवळ एक प्रेत मिळाले होते.बहुदा रात्री ट्रॅक क्रॉस करीत असताना आलेल्या रेल्वेने त्याला उडविले असावे असा त्यांचा तर्क होता.शामरावानी गस्ती पथकाला कशालाही हात लावू नका. लोकांना जवळ येवू  देऊ नका. मी आमच्या नेहमीच्या स्टाफसह तिथे येत आहे म्हणून सांगितले.लगेच त्यांनी संबंधित स्टाफ प्रमुखाला फोन करून लगेच निघायचे आहे म्हणून सांगितले .त्या मुलीला काही कल्पना न देता तिच्या जवळ सुधाकरचा एखादा फोटो आहे का म्हणून विचारले.तिने तिच्या मोबाईलमधील फोटो शामरावांच्या मोबाइलवर पाठविला .तिचा निरोप घेऊन शामराव स्टाफसह जीपमधून घटनास्थळी निघाले .

गणपतीच्या देवळाजवळून जात असताना त्यांना युवराज त्यांच्या गाडीमध्ये बसत असलेले दिसले.त्यांनी इकडे कुठे म्हणून युवराजांना जरा गाडी स्लो करून  विचारले .त्यावर दर्शनाला आलो होतो आता ऑफिसवर निघालो असे उत्तर युवराजांनी दिले .शामरावांना आता कुठे असे विचारता त्यांनी कुठे निघालो ते सांगितले. व त्यांना चला येत असले तर म्हणून आमंत्रण दिले. युवराजांनी ऑफिसला फोन करून कुणी आले आहे का विचारले .त्यावर विजयाने कुणीही नाही आणि अपॉइंटमेंट दुपारची बाराची आहे असे उत्तर दिले .त्यावर मला जरा यायला उशीर होईल मी शामरावांबरोबर आहे असे सांगून गाडी पार्किंग लॉटमध्ये सोडून युवराज त्यांच्याबरोबर निघाले. 

जीप घटनास्थळी आली .गस्ती पथक शामरावांची वाट पहात होते. बॉडीवर कव्हर घातलेले होते .जिथे बॉडी सापडली तिथे खडूने मार्किंग केलेले होते .विशेष रहदारीचा रस्ता जवळपास नसल्यामुळे फारशी गर्दी नव्हती.धुळीमध्ये टायरचे ठसे उमटलेले स्पष्टपणे दिसत होते.त्याचप्रमाणे धुळीतील टायरच्या ठशांपासून रेल्वेच्या पटरीपर्यंत येणार्‍या व जाणाऱ्या बुटांचे ठसे दिसत होते.त्याचे नीटपणे निरीक्षण करून युवराजांनी शामरावांजवळ पुढील निष्कर्ष सांगितले .गाडी टोयाटो असावी .गाडीतून दोन माणसांनी देह पटरीवर नेऊन ठेवला असावा .त्या दोघांनी आदिदासचे अमुकअमुक बूट घातलेले असावेत .गाडी जाईपर्यंत ते थांबलेले असावेत .गाडीने अगोदरच मृत असलेला देह उडविल्यानंतर ते निघून  गेले असावेत. सुधाकरचा मृत्यू नाकावर जोरात उशी दाबून धरल्यामुळे झाला असावा.त्या प्रयत्नात त्याच्या नाकाचे हाड मोडले असावे.एवढा निष्कर्ष तुम्ही कसा काढला असे विचारता त्यांनी टायरचे ठसे दोन टायर मधील अंतर पुढील व मागील टायर मधील अंतर व बुटांच्या ठशांचे स्वरूप यावरून हा निष्कर्ष काढल्याचे सांगितले .तर त्याच्या नाकाचा बदललेला आकार व चेहऱ्यावर  उमटलेल्या खुणा यावरून उशी दाबून त्याचा मृत्यू झाल्याचे अनुमान काढले असे सांगितले .अर्थातच पोस्टमार्टममध्ये नक्की मृत्यू कशाने झाला ते कळणार होते .

बॉडीवरील कव्हर काढल्यावर व प्रेताचा चेहरा पाहिल्यावर  शामरावानी चुकचुक असा आवाज केला.दुर्दैवाने मला वाटत होते तसे झाले असे पुटपुटत त्यांनी खिशातून मोबाईल काढून त्यावरील फोटो पाहिला .खात्री पटल्यासारखी त्यानी मान हलविली.युवराजानी कुणी ओळखीचा आहे काय असे विचारता त्यांनी होय असे म्हणून सकाळची सर्व हकीगत सांगितली . युवराजाना जरी घटनेबद्दल वाईट वाटले असले तरी प्रेताची ओळख पटल्याबद्दल त्यांना  समाधानही वाटले .सर्व सोपस्कार आटपून शामराव व त्यांची टीम ऑफिसवर निघाली.ऑफिसवर परत जाताना शामरावांनी  युवराजांना  त्यांची गाडी पार्क केली होती तिथे सोडले. ऑफिसवर आल्यावर शामरावानी त्या मुलीला फोन करून बोलवून घेतले.बरोबर कुणी नातेवाईक असतील तर त्यांनाही आणण्यास सांगितले.सुधाकरच्या खिशात त्याचे पाकीट किंवा मोबाईल सापडला नव्हता .जी माहिती कदाचित पाकिट किंवा मोबाईल यावरून समजली असती ती आता समजणे शक्य नव्हते .

शामरावांनी युवराजांना फोन करून त्यांची मदत मागितली.एवढ्या मोठ्या शहरात टोयाटो गाडी कुणा कुणाकडे आहे त्याचा शोध लावणे आणि नंतर विशिष्ट प्रकारचे आदिदासचे बूट कोणकोण  घालतो त्याचा तपास करणे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती. युवराजांनी एक अंदाज बांधला .तो अंदाज खरा ठरला तर त्यावर बांधलेली इमारत यशस्वी झाली असती .भर वस्तीत भर रस्त्यावर मध्यरात्र असली तरी सुधाकरला पकडून एखाद्या जागी नेणे अशक्य नसले तरी कठीण होते.त्याचे ऑफिस गावाबाहेर होते . तिथून येत असताना दाट शहर वस्ती लागण्याच्या अगोदर त्याला पकडणे सोपे होते.तेथे त्याला  अडवण्यात आले. तेथूनच एखाद्या जवळ असलेल्या त्या लोकांच्या अड्ड्यावर नेण्यात आले. त्यांचे काम झाल्यावर त्याला ठार मारून नंतर जवळच्या  रेल्वे पटरीवर त्याला ठेवण्यात आले. युवराजानी सुधाकरची बॉडी  जिथे सापडली होती तिथून तीन किलोमीटरचे वर्तुळ काढून त्यात टोयाटो कुणा कुणाकडे आहे ते आरटीओ ऑफिसमधून पाहण्यास संदेशला सांगितले .त्याचप्रमाणे सुधाकरच्या गाडीचा नंबर व त्याचे वर्णन त्याला देऊन तशी गाडी कुठे सापडते का तेही पहाण्यास सांगितले .गाडी चोरून  रातोरात तिचे पार्ट मोकळे करून  त्याची विल्हेवाट लावली जाते तेव्हा गाडी सापडणे अशक्य आहे .तरीही दोन्ही दृष्टीने प्रयत्न करण्यास त्याला सांगितले.

संदेश डिटेक्टिव ऑफिस चालवत असल्यामुळे त्याचे खबऱ्यांचे बऱ्यापैकी जाळे होते.त्याने दोन्ही दृष्टीने प्रयत्न करण्यास त्याच्या खबऱ्यांना सांगितले .युवराजांनी सुधाकरच्या ऑफिसपासून तो घरी ज्या रस्त्याने येत असे त्या रस्त्याने येऊन त्याला कुठे अडविले असेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला .अंदाजाने दोन तीन जागा त्यांनी निश्चित केल्या .व त्याच्या आसपास कुठे फोन पाकीट किंवा आणखी काही वस्तू सापडतात का ते पाहण्यास सांगितले.युवराजांचा अंदाज बरोबर होता .त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणाच्या आसपास झाडीमध्ये संदेशला पाकीट मिळाले. बहुधा संदेशने ते त्याला पकडल्यावर फेकले असावे. आणखी कुठेतरी सोडून दिलेली गाडीही मिळाली .पाकिटात उपयोगी असा विशेष काही पुरावा मिळाला नाही .गाडीचा तपास करता त्या गाडीमध्ये कौशल्याने बनवून घेतलेला एक चोरकप्पा मिळाला .त्यामध्ये मोबाईल व काही कागदपत्र होते .संदेशने त्याच्या मोबाइल एक्सपर्टला बोलवून मोबाइल ओपन करून त्यातील सर्व माहिती जशीच्या तशी संदेशला देण्यास सांगितले.ती सर्व माहिती कोडिंग स्वरूपाची होती .कोड क्रॅक करणे व ती माहिती कळेल अशा शब्दांमध्ये उपलब्ध करणे हे एखाद्या तज्ञाचे काम होते. सुधाकरच्या पत्नीकडे चौकशी करता सुधाकर दोन सिम वापरण्याऐवजी दोन मोबाइल वापरत असे एक नेहमीच्या संदेशवहनासाठी व दुसरा विशेष कामासाठी अशी माहिती मिळाली.त्याचे दुसरे विशेष काम कोणते ते त्याच्या पत्नीला माहित नव्हते.असेल काहीतरी ऑफिसचे असे म्हणून तिने त्याकडे विशेष लक्षही दिले नव्हते. हा दुसरा फोन तो घरी व गाडीमध्येही गुप्त जागी ठेवीत असे असेही कळले .

एका तज्ञाने एक दोन दिवसांनंतर मोबाइलमधील माहिती डिकोड करण्यात यश मिळविले.ती सर्व माहिती टाइप करून कळेल अशा आपल्या नेहमीच्या शब्दांमध्ये संदेशला दिली .संदेशने ती फाईल जशीच्या तशी युवराजांकडे पाठविली .अर्थात नेहमीप्रमाणे तो त्याची एक कॉपी आपल्या जवळ ठेवण्यास विसरला नाही .त्या गुप्त माहितीवरून असे लक्षात आले की सुधाकर ऑफिसमध्ये काम करीत असताना सरकारसाठी सायबर हेर म्हणूनही काम करीत असे.जे आंतरराष्ट्रीय सिग्नल्स जात असतात ते पकडून ते डिकोड करून त्यातील उपयोगी अशी महत्त्वाची माहिती तो सरकारला  देत असे.युवराज या केसमध्ये आहेत असे कळल्यावर त्यांच्यावर एक सरकारी हेर लक्ष ठेवून होता .युवराजांना भेटून त्याने सरकारी ओळखपत्र दाखवून काही महत्त्वाची माहिती मिळाली तर ती आमच्या ऑफिस प्रमुखाकडे सुपूर्त  करा असे सांगितले होते.सरकारी गुप्तहेर खाते युवराजांनी मिळविलेला हा सर्व पुरावा ताब्यात घेऊ शकले असते .परंतु त्यांचा युवराजांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी तसे न करता युवराजांना या केसवर काम करण्यास परवानगी दिली होती .

युवराजांची सरकारी गुप्तहेर खात्यांमध्येही ओळख होती .त्यांनी ती सर्व माहिती जशीच्या तशी त्या अधिकाऱ्यांकडे सोपवली . त्या गुप्त माहितीसाठी सुधाकरचा खून झाला हे युवराजांच्या लक्षात आले .ज्याअर्थी मोबाइल त्यांना मिळाला नाही त्या अर्थी त्यांना सुधाकरकडून विशेष काही माहिती उपलब्ध झाली नसावी असा तर्कही युवराजानी काढला.आपल्या ऑफिसवर त्या टोळीचे लक्ष असणार हे त्यांच्या लक्षात आले होते .सुधाकरने त्या पकडणाऱ्यांना ओळखू नये म्हणून त्याचा नाहक खून केला गेला. त्यांनी अगोदरच संदेशला त्यांच्या ऑफिसच्या समोरच्या बिल्डिंगमधील एका फ्लॅटमधून त्यांच्या  ऑफिसवर नजर ठेवण्यास सांगितले होते .तो फ्लॅट युवराजांच्या मालकीचा होता .मिळालेला मोबाइल शोधण्यासाठी ती मंडळी इथे येतील याची त्यांना खात्री होती .सरकारी सायबर सेलच्या मदतीने त्यांनी मोबाइलमधील उपयुक्त माहिती काढून घेऊन दुसरीच माहिती कोडिंग स्वरूपात मोबाईलमध्ये लोड केली होती .जरी ती त्या देशद्रोही टोळीच्या हातात पडली तरी त्यांची पूर्णपणे दिशाभूल होईल अशी व्यवस्था केली होती .

त्या टोळीतील लोकांनी मोबाइल चोरल्यावर त्याना लगेच न पकडता त्यांचा पाठलाग करून त्यांची संपूर्ण टोळी हाती लागणे आवश्यक होते .त्या दृष्टीने त्यांनी संदेश व त्याच्या सहकाऱ्यांना थोडक्यात ब्रीफ केले होते.ऑफिसच्या टेबलमधील एका चोरकप्यात त्यांनी तो मोबाइल ठेवला होता .दोन रात्री काहीच घडले नाही .ते लोक मोबाइल चोरण्यासाठी येथे येतील व त्यांच्या मार्फत सर्व टोळी आपल्या हाती लागेल हा आपला अंदाज चुकतो की काय असे त्यांना वाटू लागले होते .तसे होते तर टोळी शोधण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागले असते. तिसऱ्या रात्री संदेशला युवराजांच्या ऑफिसमध्ये रात्री दोन वाजता काही हालचाल दिसली. कुणीतरी त्यांचे ऑफिस उघडण्याचा व आंत शिरण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला आत शिरून चोरी करण्यास कुणीहि प्रतिबंध केला नाही.संदेशला त्याला तिथेच पकडावे व त्याला बोलते करून टोळीचा शोध लावावा असे वाटत होते. परंतु युवराजांची स्ट्रीक्ट ऑर्डर होती .कारण असे हेर वेळप्रसंगी सायनाइडची गोळी खाऊन प्राण देतात व मागे काहीही पुरावा ठेवीत नाहीत आणि मग खरा देशद्रोही पकडणे अशक्य होते .

त्या चोराने मोबाइल चोरल्यावर त्याचा पाठलाग दोन तीन जणांनी सुरू केला .असे करण्याचा हेतू एखाद्याला त्याने गुंगारा दिला तरी तो दुसऱ्याच्या पंज्याखाली असेल असा होता .तो मोबाइल त्याने आपल्या प्रमुखाला नेऊन दिला व तो प्रमुख लगेच मोटारीतून तो मोबाइल देण्यासाठी त्याच्या बॉसकडे निघाला .संदेशने युवराजांमार्फत पोलिसांना सर्व काही कळवून त्यांचीही मदत घेतली होती .तो देशद्रोही ज्या व्यक्तीकडे केला ते पाहून शामराव आश्चर्यचकित झाले .ती व्यक्ती एक मोठी राजकीय पुढारी होती .भराभर शामरावानी शत्रू राष्ट्राच्या हेराना पकडले .त्यांच्याकडून त्या पुढार्‍याला पकडता येईल अशी माहिती गोळा केली .आणि नंतर पूर्ण तयारीनिशी त्या पुढाऱ्यांकडे ते गेले .वॉरंट दाखविताच ते पुढारी जे समजायचे ते समजले .त्यांनी शामरावांना नमस्कार करून चला म्हणून सांगितले.  असे करता करता त्यांनी हातातील सायनाइडची गोळी पटकन तोंडात टाकली.आणि दुसऱ्याच क्षणी ते धाडकन खाली कोसळले .

शत्रू देशाचे एक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात अशाप्रकारे युवराज व शामराव यशस्वी झाले .

जी गोष्ट एका रेल पटरीवरील तथाकथित अपघातापासून सुरू झाली .त्याचा शेवट शत्रूचे जाळे उद्ध्वस्त करण्यात झाला .

सुधाकरच्या पत्नीला सरकारकडून पेन्शन देण्यात आले. त्याचप्रमाणे तो ज्या कंपनीत नोकरी करीत होता तिथूनही तिला भरपूर पैसे मिळाले .तिलाही आपला नवरा सायबर हेर म्हणून सरकारतर्फे काम करतो हे माहीत नव्हते.कितीही पैसे मिळाले तरी आपल्या गेलेल्या नवर्‍याची भरपाई होऊ शकत नाही .आपला नवरा देशासाठी काम करीत असताना मृत्यू पावला एवढेच तिला समाधान होते.

१९/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel